Showing posts with label पाण्याकाठचं घर. Show all posts
Showing posts with label पाण्याकाठचं घर. Show all posts

Friday, 21 May 2021

पाण्याकाठचंघर ८.१

आपण जे टिपतो अनुभवतो ते सांगण्यासाठी शब्दांचा सडा घालायचा,पानंफुलं मांडायची, आरास करायची, रांगोळीचे गालिचे भरायचे! अशी धडपड बघणाऱ्या गुणी कवी मित्राने तीच सगळी धडपड सुबक कुपीत अत्तर भरल्यासारखी कवितेत बांधून आपल्याला द्यायची !!! असं अप्रूप वाट्याला आलं म्हणून सृजनाच्या देवाचे आभार मानतेय !!

माझी कालची पोस्ट Chaitanya Dixit च्या या कवितेत नक्की
वाचा !!
आला उन्हाळा कोवळा
त्याचे ऊन मऊसर
घरापुढचे लकाके
त्यात शांत सरोवर !
वास जांभळ्या फुलांचा
व्यापे सारा आसमंत
त्याने उन्हाळ्याचा गंध
होतो अजून श्रीमंत.
सुरी फिरावी लोण्यात
तशी फिरती पाण्यात
वल्ही नाविकांची साऱ्या
एकसूर एक साथ.
काठावरी चार गळ
ध्यान लावून एकांती
अदर्शनेही देवाच्या
आनंदाने चकाकती
पोरापोरींचे पाण्यात
बालसुलभसे खेळ
गृहस्थ नि गृहिणींच्या
हास्य-गप्पांचा नि मेळ
बाळ बदकांचा कल्ला
बदकायांची धांदल
सोडविता सोडविता
त्यांचे बालिश भांडण
दिसभराच्या उन्हाने
तापतापून अंबर
हळूहळू लावू पाही
तिन्हीसांजेला झुंबर
झुंबरात लागे दीप
चंद्रकोरीचा मंदसा
सभोवार होई शांत
नाद दिसाचा बंदसा
साऱ्या दिवसभराच्या
धावपळ-कल्लोळाला
चंद्रकोरीच्या रूपाने
स्वल्पविराम लाभला!

पाण्याकाठचंघर ५

नोकरीच्या निमित्ताने देश सोडून पहिल्यांदा बेल्जियममध्ये येऊन आता 14 वर्षे होऊन गेलीत. वर्ष दोन वर्षे रहायचं, काम संपलं की परत मायदेशात जायचं,असं करत आता तिसऱ्यांदा येऊनही दोन वर्षे झालीच! 'इथलं चांगलं तिथलं वाईट' किंवा 'तिथलंच चांगलं इथलं वाईट' या वाटेवरून गाडी कधीच पुढे निघून आली. आता 'तिथलं वेगळं इथलं वेगळं' या स्टेशनवर मुक्काम आहे. आणि हा थांबा फार चांगला आहे.
हे सगळं मनात येण्याचं कारण आजच पार्कात फिरताना सापडलेला चाफ्याचा भाऊ !
मला आठवतं सुरुवातीला इथल्या फुलांना वासच नसतो, मातीचा वास वगैरे फक्त देशातच, पाऊस फक्त आपलाच खरा,ऊन फक्त आपलंच मायाळू असे एक नाही शेकडो समज घट्ट चिकटलेले होते. एकदा मित्राने काय आणू देशातून असं विचारल्यावर मोगरा, निशिगंध, सोनचाफा ही फुलं आण असा हट्ट केल्याचंही आठवतंय!!! नारळाच्या करवंटीवर पाणी टाकलं की जो मातकट वास येतो त्याने व्याकुळलेलं आठवतंय. इथलं सापडलेलं पहिलं सुगंधी फुल म्हणून लवेंडर च्या पुरचुंड्या करून जपून ठेवलेल्या अजुनी आहेत!!!
मग हळुहळू इथल्या मातीशी नातं जुळायला लागलं. बोट धरून इथला निसर्ग दाखवणारे लोक भेटले. इथल्या लोकांच्या जीवनशैलीतही निसर्गाबद्दलची आस्था किती सहज आहे ते कळू लागलं. श्रद्धा, धारणा इथपासून आहार विहार, भाषा,आवडीनिवडी इथपर्यंत प्रत्येक गोष्टीत असणारे आविर्भाव कमी कमी होत गेले तसतसं मन अधिक मोकळं होतंय हे जाणवत गेलं. म्हणजे त्या जाणिवा संपल्या नाहीत तर त्यांचा विस्तार झाला. अनुभवाच्या पेटीत बंद असलेल्या जुन्या गोष्टींचे स्थान ढळू न देता नव्या गोष्टींना आपलं म्हणता येणं जमू लागलं.कारण नव्या सापडलेल्या गोष्टी कुठल्या तरी कारणाने आपल्याजवळच्या जुन्या गोष्टींशी जोडलेल्या निघतातच!
आताही पूर्वीसारखी देशातली फुलं आठवतातच. पण त्या मोगरा, रातराणी, निशिगंध,चाफा,सोनटक्का या आठवणीत व्याकुळ होऊन समोर असलेलं निसर्गाचं दुसरं देणं नाकारलं जात नाही. दर वेळी नव्या वासाचं फुल भेटलं की त्याला अरे तू तर आमच्या हजारमोगऱ्याचा भाऊ,किंवा मधुमालतीची बहीण किंवा कण्हेरीची मावशी असं आवर्जून नातं जोडलं जातं!!! देश कोणताही असला तरी तिथे वड पिंपळ उंबर कडुनिंब असतातच! थोडे वेगळे असतात एवढंच!
तर इथं बकुळीची जुळी बहीण लिंडन भेटली.रातराणीची ताई, बहाव्याचा धाकटा भाऊ स्पॅनिश ब्रूम सापडला. कवठी चाफा आणि हिरवा चाफा यांच्या मधला भाऊ आणि माझा लाडका मरव्याच्या कुळातला लवेंडर हे आणि असे अजून काही सुगंधी मित्र यांचा गोतावळा जमा झालाय ! त्यांच्या सुगंधानीही आमची कुपी भरून टाकली आहे! सुंदराचे धागे जुन्या जरीमध्ये घट्ट विणले जातच आहेत! दोघांनी मिळून हे असं वर्तमानात जगणं हा सुंदर प्रवास आहे!!















पाण्याकाठचंघर २

बेल्जियममधल्या कोरोना संबंधित बातम्या लिहायचं टाळत होते कारण त्या फार भिववणाऱ्या आहेत. पण अनेकांनी उत्सुकता दाखवली म्हणून आज थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते. मी जे काही लिहीत आहे त्यावरून भारत आणि बेल्जियम अशी तुलना करू नये. भौगोलिक परिस्थितीपासून लोकसंख्येपर्यंत कोणतीच गोष्ट समान नसताना ती तुलना योग्य ठरणार नाही.

दुसरं म्हणजे मी जे लिहितेय ते माझ्या लॉकडाऊनच्या काळातल्या घराबाहेरच्या मर्यादित वावरातून आणि इथली बातम्या देणारी माध्यमं जे चित्र दाखवताहेत त्या अनुभवावर आधारित आहे. डच भाषा येत असली तरी राजकारणातले इथले अंडरकरंट्स मला समजत नाहीत त्यामुळे इंग्रजी आणि डच मीडियात जे येतंय त्यातून समजलेल्या या गोष्टी.
शेवटचं , मी कोणी एक्स्पर्ट नाही तर लॉकडाऊन मध्ये अडकलेली, इथे परदेशी नागरिक असलेली सामान्य गृहिणी आहे. त्यामुळे या लेखनाकडे त्याच दृष्टीने बघितले जावे.
नमनाचं तेल संपलं.
फेब्रुवारीमध्ये भारतात घरी गेले होते. तिथून परत आले 7 मार्चला. प्रवासात रिकामं असलेलं झुरीक आणि ब्रुसेल्सचं विमानतळ बघून काहीतरी भयंकर पुढे वाढून ठेवलं आहे याची कल्पना आली होती. त्या दिवशी स्विस मध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 5 केसेस सापडल्या होत्या आणि बेल्जियम मध्ये 3 !
घरी आल्यावर नॉर्मल रूटीन सुरू झालं. दोन दिवसांनी ग्रोसरीला गेले तर तिथेही वर वर सगळं नेहमीसारखं दिसत होतं. इथं आल्यापासून कोणा स्थानिक मित्र मैत्रिणीशी बोलणं झालं नव्हतं आणि बातम्याही बघितल्या नव्हत्या.
सगळ्या लोकांच्या शॉपिंग कार्ट मध्ये प्रचंड सामान दिसत होतं.
ग्रोसरीतून परत येताना एक ओळखीचं जोडपं भेटलं आणि नेहमीप्रमाणे गळ्यात न पडता शक्य तितक्या दूर उभं राहून आम्ही बोललो.
माझ्याकडून पैसे घेतल्यावर ग्रोसरने सॅनिटायझर लावून हात स्वच्छ केले.
आमच्या लेकीचे खूप लाड करणारे शेजारी एवढ्या दिवसांनी ती दिसत असूनही लांबून बोलून गेले.
एका खोकत असलेल्या माणसाला लोक वळून वळून बघत होते.
दुसऱ्या दिवशी गावातच 3 केसेस सापडल्याची बातमी आली आणि हा वणवा वेगात पेटत गेला. 12 तारखेला लॉक डाऊनची कल्पना देण्यात आली. त्यात काय बंद होणार,काय उघडं राहणार,कोण घरून काम करायचं आहे कोणी कामावर जायचं आहे, बाहेर वावरताना कोणते नियम पाळायचे आहेत ते मोडले तर काय शिक्षा असणार आहे याच्या स्पष्ट सूचना होत्या.
15 तारखेला लॉकडाऊन सुरू. गावातले सगळे रस्ते ओस पडले.पोलिसांची गस्त सुरू झाली.
ग्रोसरी स्टोअर्समध्ये जेष्ठ नागरिक, विशेष गरजा असलेले आणि फ्रंट लाईनर्स यांच्यासाठी वेगळी वेळ,वेगळी रांग ठरवून दिली. एका दुकानात एका वेळी किती लोक जाऊ शकतात हे ठरवलं आणि जास्तीत जास्त 30 मिनिटे ही मर्यादा सूचना म्हणून लिहिली गेली.
कुठेही गर्दी गडबड दिसली नाही तरी लोक पॅनिक होऊन साठेबाजी करत होतेच. दूध,फ्रोजन फूड,टॉयलेट पेपर,बटाटे आणि पास्ता हे भराभर संपत होतं. हे सगळ्यांना सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळतील असं सरकारने सांगितल्यावर 8 दिवसांनी कमी झालं !
पुढचे दिवस रोज सकाळी कोरोना केसेस वाढल्याच्या बातम्या बघायच्या आणि कामाला लागायचं असं रूटीन झालं.
इथे जेष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येत जास्त आहे. त्यातही एकटे राहणारे लोक खूप.
एक पत्रक टपालात आलं त्यात लिहीलं मेयरने या लोकांसाठी गप्पा मारायला, मन मोकळं करायला हेल्पलाईन सुरू केली असं कळलं.
ज्यांना घराबाहेर जाणं शक्य नाही त्यांना घरपोच अन्न देणारी संस्था कामाला लागली.
स्थलांतरित,होमलेस आणि राजकीय शरणार्थी यांच्यासाठी वेगळी सोय केली होती. त्यांच्यासाठी काही ngo मदत गोळा करत आहेत.
व्यायाम म्हणून चालणं पळायला जाणं, कुत्रे फिरवणे याला परवानगी आहे. सायकलिंग पण चालू आहे.
फ्रंट लाइनर्स च्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शाळांनी घेतली आहे. फक्त यांची मुलं शाळेत जातात आणि दिवसभर तिथेच थांबतात.
आणि
रोज संध्याकाळी 8 वाजता आपल्या दारात येऊन फ्रंट लाइनर्ससाठी प्रोत्साहन, कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याची विनंती केली होती. जे एक दिवसही खंड न पडता आजही सुरू आहे.
इथे चर्चचा पगडा आहे. त्यांनी प्रार्थना म्हणून घरासमोर पांढरी कापडं लावा असं सांगितल्याने कधी नव्हे ते घरासमोर पांढऱ्या चादरी,टॉवेल, पडदे लटकवलेले दिसताहेत.
या सगळ्यात काहीच वाईट घडत नव्हतं असं नाही.
सगळ्यात वाईट होतं वैद्यकीय उपचारासाठी जागा आणि साधनं कमी असणं. अगदी अत्यवस्थ असाल म्हणजे श्वासच घेता येत नसेल तर आणि तरच दवाखान्यात या अन्यथा घरीच वेगळे रहा अशा सूचना होत्या. त्या आधी डॉक्टर फोनवरून बोलत होते.
टेस्ट करण्यासाठी नेमके काय निकष आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीतच नव्हतं.
केअर सेंटरमध्ये राहणाऱ्या वृद्धांना भेटायची परवानगी नाकारावी लागत होती कारण कोरोना संसर्ग त्यांना व्हायची भीती!
गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अंगावर थुंकणे, चोऱ्या करणे, 300 लोक जमवून लॉकडाऊन पार्ट्या करणे, पोलिसांची वाहनं जाळणे तोडफोड हे सगळं कुठे कुठे चालूच आहे. लोकांनी पार्कमध्ये जमून खेळायला सुरुवात केली. ते ऐकेनात तेव्हा पार्क बंद केले.
शेतकऱ्यांचं, उद्योगजगताचं आणि पर्यटन क्षेत्राचं नुकसान हे प्रचंड फ्रस्ट्रेट करणारं आहे.
असं सगळं काळं पांढरं चालू आहे.
आता मात्र केसेस आटोक्यात आल्यात.
एकूण 50781 लोक कोरोना पोजिटिव्ह, 8415 लोक मृत्युमुखी पडले, ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेऊन (?) बरे झाले 12980 लोक ! ट्रीटमेंट न घेता आपोआपच बरे झाल्याच्या केसेसही अनेक आहेत.
आता लॉक डाऊन उठवण्याच्या दुसऱ्या टप्प्यात काय होणार ते आज कळलं आहे.
त्यानुसार सोमवारी सगळी दुकानं उघडतील. रांगेचे नियम, मास्क अनिवार्य !
रेस्टॉरंट, कॅफे, बार आणि स्पोर्टक्लब उघडणार नाहीत. आठवडे बाजार बंदच राहील.
सार्वजनिक वाहनातून जाताना मास्क अनिवार्य असेल. ते मास्क रेल्वे स्टेशनवर वेंडिंग मशीन मधून मिळताहेत व एका मास्क ची किंमत 15 युरो एवढी जास्त आहे! हा मास्क 500 वेळा वापरता येईल असा आहे म्हणे.
घरासमोर कालव्यात होड्या पुन्हा दिसू लागल्यात.
सायकलिंग करणारे लोक जास्त दिसत आहेत.
काल पार्क पण उघडे होते आणि विशेष गर्दी नव्हती.
आम्हाला ब्रुसेल्स किंवा अँटवर्पवरून भारतीय किराणा मागवावा लागतो. गेले दोन महिने ते आणून देणारा दुकानदार येत्या रविवारी येऊ शकणार आहे.
प्राथमिक शाळा आता थेट सप्टेंबर मध्ये उघडणार आहेत.
अजूनही शक्य त्या लोकांनी घरी बसूनच काम करायचं आहे.
एकाच कुटुंबातील 4 लोक दुसर्याकडे भेटायला जाऊ शकतात. पण त्यांनी घर ते घर प्रवास करावा इतर कुठेही जाऊ नये अशा सूचना आहेत.
हे सगळं सांगून पंतप्रधान म्हणतात,"तुम्ही हे नियम पाळत आहात की नाही हे बघायला आम्ही येऊ शकणार नाहीत. पण तुमच्या विवेकबुद्धीवर आमचा (सरकारचा) विश्वास आहे!"
अशा प्रकारे आता आम्ही "नवीन नॉर्मल" जग उघडण्याची वाट बघत आहोत.

८ मे २०२०

Wednesday, 12 May 2021

पाण्याकाठचं घर १६ (अंतीम)

एखादं परदेशी गाव आपलं गाव कसं होतं? 
तर एक दिवस प्रवासी पक्ष्यासारखे आपण त्या गावात येऊन उतरतो.
नवे परके,अनोळखी वास,हवेचा वेगळा स्पर्श, सवयीपेक्षा वेगळे रंग आवाज यांना हळूहळू सरावतो. त्या गावची भाषा शिकावी वाटते. गावातल्या रस्त्यांची नावं ओळखीची होतात. लहानसं गाव असल्याने हळूहळू सगळ्या गल्लीबोळात फिरून होतं. लायब्ररी, पार्क,मुख्य चौक अशा जागांशी खास मैत्री होते. घरातला परका गंध जाऊन शिस्तीत फोडण्या मसाले,खळखळ उकळलेला चहा, वाळत घातलेले कपडे,उदबत्ती, साबण, असे गधं घराला चिकटतात, सराईतपणे अनोळखी फळं,भाज्या ताटात यायला लागतात.. 
रोजच्याच रस्त्यावर आपल्याच वेळेला चालणारे चेहरे ओळखीचं हसायला लागतात,शेजारीपाजारी सुरुवातीचा कडक इस्त्रीचा आलिप्तपणा सोडून तुमच्या परदेशी जगण्यात डोकवायला लागतात, या देशाचे अनुभव म्हणून काय काय करायला हवं ते ही आवर्जून सांगू लागतात. आपणही मोकळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी पारखु लागतो.
एखादं वर्ष नव्याने कुतूहलाने सगळे ऋतू अनुभवण्यात जातं. आता भाषा सराईत येत असते. अनोळखी लोकांच्या नजरेतलं' परदेशी बाई आपली भाषा बोलते'  हे कौतुक झेलत आपण मोकळे व्हायला लागतो. बाजारात शेतकरीण तुम्ही तिची भाषा बोलता या कौतुकाने एक बारीक काकडी जास्तीची देते आणि एक पर्मनंट गिऱ्हाईक मिळवते. सगळी दुकानं पालथी घालून हे आपलं नेहमीचं दुकान असं ठरतं आणि त्या दुकानातल्या पोरीसोरीपण तुम्हाला ओळखायला लागतात. बस वापरत असलो तरी ड्रायव्हर सुद्धा ओळखीचं हसून बोलायला लागतात. 
लायब्ररीत कुठल्या कपाटात कुठली पुस्तकं इथपासून कोणत्या गल्लीतल्या कोणत्या दुकानात सुगंधी तांदूळ मिळतो, कुठे भारतात तयार झालेले कपडे मिळतात, कापूर कुठं मिळतो, केशर कोणत्या दुकानातलं चांगलं हे आपण डोळे झाकून सांगू शकतो. आवडीची खाद्यठिकाणं नेहमीची होतात, नेहमीच्या रस्त्यावर असलेले सिग्नल,उतार,चढ,पूल आणि त्याखालचे रस्ते, खड्डे सगळ्याची नोंद होऊन माहिती वापरात यायला लागते. 
दगडी रस्ते तुडवता तुडवता कडेला असलेल्या सुगंधी फुलझाडांची ओळख होते, अनोळखी पक्ष्यांची नावं शोधली जातात, मसाल्यांची झुडपं ओळखू यायला लागतात,कालवे नद्या तर पटकन आपल्याच होतात, सर्वांगाने मऊ असलेल्या खास पायवाटा सापडतात,दोन बागा, चार खेळ उद्यानं कळतात, एक दिवस सायकल निघून आजूबाजूला असलेली खेडी निरखून येते आणि आपला एरिया वाढतो !!! मागच्याच वर्षी अनुभवलेल्या पुढच्या ऋतूची चाहूल उमगू लागते. 
आणि मग कुठे चार दिवस जाऊन परत गावात आलं की 'घरी' आल्यासारखं वाटतं! पहिल्या घोटात अजिबातच न आवडलेली कॉफी आता घर आल्याची जाणीव करून देणारी असते. घरातल्या उठायबसायच्या जागा मनाला निवांतपणा देत असतात. घर स्वच्छ करताना व्हॅक्युम क्लिनरही मायेने फिरू लागतो, धूळ पुसून लख्ख केलेलं घर आपलं साजरं वाटू लागतं..
माणसांच्या ओळखी वाढतात तसं येणं जाणं, देवाणघेवाण वाढते. आपल्या आयुष्यातल्या माणसांच्या गोष्टींमध्ये एकेक भर पडत जाते. देश कोणताही असला तरी माणसं सगळीकडे सारखीच याचा पुन्हा पुन्हा अनुभव येऊन माणसांबद्दलची शहाणीव वाढत असते. ती लोकही आपल्याकडे असंच बघत असणार आणि  आपणही त्यांच्या आयुष्यतली अशीच एक स्टोरी झालेलो असणारच! 
हे सगळं असंच होतं आणि असंच असणार आहे असं गृहीत धरतोय की काय असं वाटतानाच मुक्काम हलण्याचे संकेत येऊ लागतात. 
गुंता वाढवायचा नाही असं कितीही ठाम ठरवलं तरी तो वाढतोच. माया असते,जिव्हाळा असतो,माणसांचा आणि जागेचाही. 
एक दिवस इथून उठून जायला लागणार आहे याची स्वच्छ जाणीव कितीही जागी ठेवली तरी पावलं अडकतात. 
नव्या जागा बोलवत असतात, तिकडे जायची ऊर्मी कमी नसतेच पण हे ही सुटत नाही अशी घालमेल नुसती !!! 
अशा वेळी फार काही करू नये. आयुष्यात ज्या ज्या वेळेला जे जे गरजेचं असतं ते ते सामोरं येत जातं यावर विश्वास ठेवावा. 
माणसं भेटतात,जागा गवसतात, ओल मिळते, सावली सापडते... त्या त्या वेळी या सगळ्याबद्दल  कृतज्ञता बाळगावी ! 
मेकलीनचा मुक्काम संपत आलाय. मित्रमंडळी निरोप देऊन गेलीत. सगळा संसार बॅगा खोकी यात बंद झालाय. 
आता निघायचं. या आधीही दोन वेळा असाच निरोप घेऊन इथून गेलो होतो. यावेळी मुक्काम जरा वाढला होता,  म्हणून की काय मन हळवं होतंय. 
उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा...!!
इथलं पाण्याकाठचं घर स्वप्नात येत राहील!!!











पाण्याकाठचं घर १५

या लेखसाखळीतला हा शेवटचा लेख. मागचं वर्षभर कुठेही प्रवास, सहली नाहीत, डोंगरदऱ्या, जंगलं यांची भटकंती नाही. सक्तीने गाव न सोडता सलग एकाच ठिकाणी रहावं लागलं. त्यात जेमतेम पाच किलोमीटरच्या परिघातले हे दिवस. एक पूर्ण ऋतुचक्र यानिमित्ताने मुरवून घेत अनुभवायला मिळालं. बदलणाऱ्या ऋतूंच्या दर महिन्याला नोंदी करत राहिले. या सोळा नोंदी करताना खूप वेगळं समाधान मिळालंय. तुम्ही सगळ्यांनी कौतुकाने वाचून अजून हुरूप वाढवला. लॉकडाऊन वर्षाने शिकवलेली वर्तमानात राहण्याची ही मोठीच शिकवण आहे. 
वेळोवेळी मला आळस सोडायला लावून हे लिहायला लावणाऱ्या मित्रमंडळीनो, असाच स्नेह असू द्या 🙏🙏
🌱🍀🍁🍂🍃🌾🌵🌿🌻☘️🌱🌲🌳🌴🌵🌾🌿🍂

परवा दुपारी अचानक दोन दोन इंद्रधनुष्य निशाण रोवून गेले तेव्हाच वसंत आला बरं.. अशी कुजबूज वाऱ्यावर ऐकू आली. जरा डोळसपणे बघायला सुरुवात केली तर एकेक नवल समोर ठाकू लागलं. 
सकाळी फिरून येताना बघितलं, हिवाळ्यात वस्तीला आलेली पाखरं कधी नव्हे ती कालव्याच्या काठावर ओळीत शांत बसली होती. नेहमीचा कलकलाट नाही,झडप मारून खाणं नाही,बदकांवर दादागिरी नाही की नुस्त्या घिरट्या नाहीत. एरवीच्या लढाया सोडून इथली बदकंसुद्धा त्यांच्या आजूबाजूला शांत राहून वावरत होती. यांच्यातही यजमानपदाचं शहाणपण दिसत होतं. पुढच्या हिवाळ्यात येताना दूरदेशीच्या अमुक इतक्या गोष्टी सांगितल्या तरच वस्तीला रहायचं, चार किंवा पाच महिने राहिल्यावर जाताना अमुक इतक्या बिया पेरून जायला हवं अशा वाटाघाटी चालू आहेत असा आपला अंदाज . बरं दोन्ही बाजूनी मंडळी एवढी संयत वगैरे बोलत होती की कालव्याच्या मध्यस्थीची खरंच काही गरज आहे का असा प्रश्न पडावा! तो नेहमीसारखा तलम पाणी पसरत सावरत आपल्याच तंद्रीत गात होता.
मागच्याच आठवड्यात पाण्यात डोकावणाऱ्या पहिल्या नारसिससचं जरा कौतुक काय केलं, आता ती खुळी फुलं दिसेल त्या सांदीकोपऱ्यात गवताशी फटकून उभी राहून नटून स्वतःकडे बघत बसलीत! बरं ज्या मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ही फुललीत त्यांना याच्याशी काहीच देणंघेणं नाही ! ती आपली आकाशाच्या नव्या निळ्या रंगात बुडवायची म्हणून हात वर करून बोटं पसरून उभी आहेत! परवा परवा अक्रोड आणि कस्तानियानी डोळे उघडायला सुरुवात केली तोच त्याना आकाश नवं ऊन आणतय हे दिसलं असणार. यांचे वार्ताहर जबरदस्त असावेत. कारण नंतर चारच दिवसात परिसरातली सगळी झाडं डोळे टक्क उघडून आणिक आम्हालाही नवं ऊन हवं म्हणत माना उंचावून उभी आहेत. वडीलधारी झाडं सगळीकडे देखरेख करत आपापल्या फांद्या पाणकावळे आणिक पारवे आणि लहान कावळे या मंडळींना घरटी बांधायला वाटून देत आहेत. त्यांच्या बुंध्याला आलेलं शेवाळ हळूहळू सुकून जाईल तेव्हा वेगवेगळे किडे तिथं वस्तीला येतील. 
आमच्या घराशेजारी असलेला मॅग्नोलिया पानांची वाट न बघता थेट फुलं उधळत सुटलाय. त्या आनंदात समोरच्या काठावरच्या बुटक्या घराशेजारची प्लम चेरी सुद्धा तशीच उतावीळ होऊन फुलांनी डवरुन गेलीत. हिवाळ्यात हिरवे असलेले दर्भासारखे गवताचे उंचच उंच तुरे पिकून चक्क सोनेरी झालेत. 
आता पार्कात तर नुसती लगबग उडाली आहे. दाराशी असलेला छोटा साकव,त्याच्या खालून वाहणारं नेहमीच काळं दिसणारं पाणी काठच्या सोनेरी गवतामुळे जास्त उठून दिसतंय. तिथंच असलेली तुती, मलबेरी कोवळी मऊ पानं फुटून लवलवताना दिसताहेत. लिंडनपण कोवळ्या पानांनी उन्हातला गंध शोषून घेतोय. हाच सुगंध त्याला उन्हाळ्यात उधळायला हवा असणार.
गुलाबाच्या रानात मात्र अजून हिवाळा वस्तीला आहे. नुसत्या काटक्या आणि काटे ! याच रानात अजून दोनच महिन्यात जाल तर गुलाबाच्या वासाने घेरी येईल एवढी फुलं फुललेली दिसतील! पलिकडे डेलियाच्या रानातही अजून विशेष काही बातमी नाही. नाही म्हणायला कुंपण म्हणून लावलेल्या सफरचंदाच्या झाडांना भरपूर मोहर दिसतोय. यंदा भरपूर फळं द्यायचं अख्ख्या ओळीने ठरवलेलं दिसतंय. मागच्या वर्षी आलेली कीड यंदा पुन्हा आली नाही तर चंगळ असेल.
गुलाबाच्या रानाकडुन पुढे जायला तळ्याच्या अलिकडे एक सुबक वळणदार पाऊलवाट आहे तिथे एका बाजूला पाण्याशी लगट करत एका काठाला चेरी आणि दुसच्या काठाला बेरीज निखळ फुलांनी बहरून आल्यात. चेरीला इतकी फुलं आहेत आजूबाजूला दिसणारा उजेडसुद्धा गाळलेल्या गुलाबी रंगासारखा दिसतो. अजून काही दिवसांनी इथल्या उजेडाने पानांचा गडद चॉकलेटी रंग नेसलेला असेल. 
 ती वाट तळ्याला वळसा घालून परत येते तिथं डावीकडे दोन सुंदर विलोची झाडं आहेत. लांबसोनेरी केस विंचरत, तळ्याच्या शांत पाण्यात डोकावून बघत बसलेली विलो त्या नारसिससची आजी असणार नक्की ! 
हिवाळ्यात परागंदा झालेले हंस आणि मोठी ढोली बदकं अजून परतलेली नाहीत तोवर क्वेलसारख्या लहान पक्षांची चंगळ आहे. परिसरातलं अन्न आणि तळ्यातले मासे यावर त्यांची मालकी! लहान लहान मासे भरपूर आलेत. अजून काही दिवसांत माणसांनी खायचे मासेही येतील आणि मग काठावर अनेक गळ दिसू लागतील.
हे सगळं मागच्या वर्षीही असंच होतं. पुढच्या वर्षीही कदाचित असंच असणार! 
घरी परत येताना चेरीच्या फुलांमधून स्वल्पविराम दिल्यासारखी चंद्रकोर दिसली तेव्हा हे असंच परवाच तर तुम्हाला सांगितलं याची आठवण आली. 
एक ऋतुचक्र पूर्ण झालं तर !
















Wednesday, 17 February 2021

पाण्याकाठचं घर १४

हिवाळ्याचा सोहळा झालेला बघायला मिळणं म्हणजे नशीबच ! यंदा हा रंग बघायला मिळाला याचा फार आनंद आहे. नुसतीच थंडी, किरकिरा पाऊस,हट्टी धुकं याचा कंटाळा आला होता आणि एक दिवस हवामानाच्या अंदाजात स्नो दिसला!  बेल्जियममध्ये आमच्या भागात असा स्नो होणं म्हणजे कौतुकच !

दोन दिवसांपासून प्रवासी पक्षी आवाज बदलून ओरडू लागले होते ते हेच सांगत असावेत असा आत्ता वाटतंय. 

एक दिवस दुपारपासून वेगळ्याच लहरीत पाऊस सुरू झाला आणि तापमान हळुहळू कमी होत गेलं. मैत्रिणीसोबत फिरायला गेले होते तेव्हा चक्क पाच वगैरे तापमान होतं ते दोन तासांनी उणे चार झालं. आमच्या शेजाऱ्यांनी आपापल्या गाड्या झाकून टाकल्या आणि रस्त्यावर फिरणारे लोक पावसाच्या कपड्यांऐवजी छान लोकरीचे जाडजूड कपडे आणि स्नोमध्ये घालायचे जोडे घालून फिरताना दिसू लागले. वरच्या जोडीने कधी नव्हे ते भरपूर वाणसामान वाहून आणलेलं बघितलं आणि स्नो होणार याची खात्री पटली !!! 

दुपार पावसासोबत कलत गेली. आणि बर्फाची भुरभुर सुरू झाली.  अंधार आणि स्नो एकमेकांत मिसळून इतके साळसूदपणे पडू लागले की पावसाचा रंग बदललाय हे ध्यानात यायला वेळच लागला. ते एवढे नाजूक की तळव्यावर बर्फ म्हणून झेलावं आणि हात फक्त ओला दिसावा ! बरं यांना कसलीच घाई नाही. निवांत रमतगमत जागा निवडून अलगद विसावणार. आधी झाडांचे शेंडे, गवताची पाती, झाडांच्या फांद्या व्यापून टाकणार. मग घरांची कौलं आणि कारची डोकी, मग जिन्याचे हात आणि लहान पायवाटा आणि सगळ्यात शेवटी वर्दळीच्या वेळा संपवून निवांत पडलेले रस्ते ! 

अधीर होऊन घराच्या या खिडकीतून त्या दारातून या जिन्यावरून त्या गच्चीवरून आम्ही आपले कौतुक करत बघत बसलो ! 

सकाळी उठून पडदा उघडला तर एखादा देखणा वॉलपेपर दिसावा असं दृश्य समोर ! खरोखरच आपण चित्रात राहतोय की काय असा भास झाला. 
अजून पावलं न उमटलेले स्नोने झाकलेले रस्ते हळू हळू पावलं रुतून घडी मोडत होते. आमच्या घराजवळ एक शाळा आहे. रोज ठराविक वेळी पुढे आई/बाबा आणि त्यांच्या मागे बदक पिलांसारखे लगटून चालणारी चिमुकली मुलं बघणं फार छान असतं. चार पाच वर्षांची मुलं एवढ्या थंडीत सायकल मारत आईबापांशी मोठ्या आवाजात गप्पा मारत शाळेत जात असतात. एवढ्या बर्फात काय करणार हे असं वाटत होतं तर अजून एक नवल दिसलं ! लोकांनी आपापल्या स्लेज काढल्या आता ! आईबाबा स्लेज ओढत बर्फात चालत शाळेकडे निघालेले आणि स्लेजवर उत्साह आनंदाने फसफसून चिवचिवाट करणारे चिमुकले जीव !!! शाळा सुटायच्या वेळी सगळी मोठी मंडळी हातात स्लेजच्या दोऱ्या घेऊन शाळेच्या गेट बाहेर आपापल्या लहानपणच्या स्नोच्या आठवणी बोलत बसलेली. आपल्या नातवंडांना तसा नाही तर निदान एवढा तरी स्नो अनुभवायला मिळतोय म्हबून उत्साहात दुसऱ्याच्या पाठीवर थाप मारत गडगडाटी हसणारे आजोबा किती आनंदी दिसले!! ©Maya Dnyanesh 

उन्हाळ्यात हेच लोक छोट्या नावा घेऊन मुलांना सोडायला घ्यायला येतात ! निसर्गाशी जोडलेली ही हौशी मंडळी आयुष्यात दुःखाचा लवलेश नसलेली असणार असं उगाच वाटून गेलं ! 

दिवसभरात स्नो स्थिरावला. उणे बारा तापमान असलेला सूर्य उगवला आणि जग लखलखीत झालं! लहानपणी शोभेच्या वस्तू सजवताना त्यावर रांगोळी चिकटवायचो आणि मग त्यावर उजेड पडून ती चमचम करायची ते एकदम आठवलं. इथं सगळ्या भवतालावर रांगोळी शिंपडल्यासारखं दिसतंय. 

ऊन दिसलं. आनंद झाला. बाहेर पडले. त्या क्षणी थंडी येऊन चेहऱ्यावर आदळली. या उन्हाला 'धोखाधूप' हे नाव कसं अगदी चपखल आहे असं वाटलं. 

यावेळेस पडलेला स्नो पाच दिवस होऊन गेले तरी मुक्काम हलवायला तयार नाही. दिवसातून तीन वेळा रस्त्यावर घसरू नये म्हणून मीठ पसरणाऱ्या सरकारी गाड्या निर्विकार फिरत राहतात. बाजारात दुकानात उबेमुळे रेंगाळत जास्त खरेदी होत राहते. एकूण लोक खूश दिसतात. ©Maya Dnyanesh 

समोरच्या कालव्यात बर्फाचा थर तरंगतोय. त्या थरावर कमाल केल्यासारखे पक्षी चालत फिरताहेत. दिवसातून दोनदा येणाऱ्या मालवाहू बोटी ती बर्फाची साय मोडून जातात. त्याने चिडून प्रत्येक बोटीवर घिरट्या घालत कर्कश आवाजात निषेध नोंदवतायत. स्थानिक बदकं नेहमीप्रमाणे आपण भलं आपलं काम भलं असं म्हणत मिळेल ते खाऊन काठावरच्या बर्फात डोळे मिटून पंखात डोकी घालून बसून राहतात. शेजीबाई तिच्या बागेत पाखरांना खायला म्हणून जरा उंचावर ताटलीत दाणे ठेवते. मागच्या अंगणात पसरलेल्या बर्फावर फक्त गल्लीतल्या मांजराची पावलं उमटलेली दिसतात. समोर कोणतंतरी सुंदर बुटकं झाड आहे त्यावरचा बर्फ वितळून ते थेंब ठिबकताना उन्हं देखणी होतात...अक्रोडाच्या फांद्या वरून पांढऱ्या खालून तपकिरी दिसतात हे बघणारा पक्षी खुळा झालेला दिसतो. अंधार पडला तरी उठून दिसणारे शुभ्र रस्ते बोलके होत राहतात. चर्चची शिखरं स्नो पांघरत सगळ्या गावाकडे बघत राहतात. लहान लहान पायवाटा शुभ्रतेमुळे जास्तच लयदार वेलांट्या घेतायत असं दिसतं. पुलाच्या कमानी जास्त स्पष्ट होतात. 

जरा इकडेतिकडे बघितलं तर सपाट बर्फावर कुणी कुणी हळूच लिहिलेली नावं दिसतात. भल्या मोठ्या पटांगणात नाजूक पावलांची एखादी जोडी उमटलेली दिसते... 

यातलं काय खरं काय स्वप्नातलं असं वाटत आपलेही दिवस कालव्याच्या बर्फावर तरंगत राहतात. 
हे सगळं अजून चार दिवसांनी नसेल याचं भान कसं बरं गुडूप करता येईल असा विचार करत मन हळूहळू तंद्रीतून जागं होतं.