Wednesday, 12 May 2021

पाण्याकाठचं घर १५

या लेखसाखळीतला हा शेवटचा लेख. मागचं वर्षभर कुठेही प्रवास, सहली नाहीत, डोंगरदऱ्या, जंगलं यांची भटकंती नाही. सक्तीने गाव न सोडता सलग एकाच ठिकाणी रहावं लागलं. त्यात जेमतेम पाच किलोमीटरच्या परिघातले हे दिवस. एक पूर्ण ऋतुचक्र यानिमित्ताने मुरवून घेत अनुभवायला मिळालं. बदलणाऱ्या ऋतूंच्या दर महिन्याला नोंदी करत राहिले. या सोळा नोंदी करताना खूप वेगळं समाधान मिळालंय. तुम्ही सगळ्यांनी कौतुकाने वाचून अजून हुरूप वाढवला. लॉकडाऊन वर्षाने शिकवलेली वर्तमानात राहण्याची ही मोठीच शिकवण आहे. 
वेळोवेळी मला आळस सोडायला लावून हे लिहायला लावणाऱ्या मित्रमंडळीनो, असाच स्नेह असू द्या 🙏🙏
🌱🍀🍁🍂🍃🌾🌵🌿🌻☘️🌱🌲🌳🌴🌵🌾🌿🍂

परवा दुपारी अचानक दोन दोन इंद्रधनुष्य निशाण रोवून गेले तेव्हाच वसंत आला बरं.. अशी कुजबूज वाऱ्यावर ऐकू आली. जरा डोळसपणे बघायला सुरुवात केली तर एकेक नवल समोर ठाकू लागलं. 
सकाळी फिरून येताना बघितलं, हिवाळ्यात वस्तीला आलेली पाखरं कधी नव्हे ती कालव्याच्या काठावर ओळीत शांत बसली होती. नेहमीचा कलकलाट नाही,झडप मारून खाणं नाही,बदकांवर दादागिरी नाही की नुस्त्या घिरट्या नाहीत. एरवीच्या लढाया सोडून इथली बदकंसुद्धा त्यांच्या आजूबाजूला शांत राहून वावरत होती. यांच्यातही यजमानपदाचं शहाणपण दिसत होतं. पुढच्या हिवाळ्यात येताना दूरदेशीच्या अमुक इतक्या गोष्टी सांगितल्या तरच वस्तीला रहायचं, चार किंवा पाच महिने राहिल्यावर जाताना अमुक इतक्या बिया पेरून जायला हवं अशा वाटाघाटी चालू आहेत असा आपला अंदाज . बरं दोन्ही बाजूनी मंडळी एवढी संयत वगैरे बोलत होती की कालव्याच्या मध्यस्थीची खरंच काही गरज आहे का असा प्रश्न पडावा! तो नेहमीसारखा तलम पाणी पसरत सावरत आपल्याच तंद्रीत गात होता.
मागच्याच आठवड्यात पाण्यात डोकावणाऱ्या पहिल्या नारसिससचं जरा कौतुक काय केलं, आता ती खुळी फुलं दिसेल त्या सांदीकोपऱ्यात गवताशी फटकून उभी राहून नटून स्वतःकडे बघत बसलीत! बरं ज्या मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ही फुललीत त्यांना याच्याशी काहीच देणंघेणं नाही ! ती आपली आकाशाच्या नव्या निळ्या रंगात बुडवायची म्हणून हात वर करून बोटं पसरून उभी आहेत! परवा परवा अक्रोड आणि कस्तानियानी डोळे उघडायला सुरुवात केली तोच त्याना आकाश नवं ऊन आणतय हे दिसलं असणार. यांचे वार्ताहर जबरदस्त असावेत. कारण नंतर चारच दिवसात परिसरातली सगळी झाडं डोळे टक्क उघडून आणिक आम्हालाही नवं ऊन हवं म्हणत माना उंचावून उभी आहेत. वडीलधारी झाडं सगळीकडे देखरेख करत आपापल्या फांद्या पाणकावळे आणिक पारवे आणि लहान कावळे या मंडळींना घरटी बांधायला वाटून देत आहेत. त्यांच्या बुंध्याला आलेलं शेवाळ हळूहळू सुकून जाईल तेव्हा वेगवेगळे किडे तिथं वस्तीला येतील. 
आमच्या घराशेजारी असलेला मॅग्नोलिया पानांची वाट न बघता थेट फुलं उधळत सुटलाय. त्या आनंदात समोरच्या काठावरच्या बुटक्या घराशेजारची प्लम चेरी सुद्धा तशीच उतावीळ होऊन फुलांनी डवरुन गेलीत. हिवाळ्यात हिरवे असलेले दर्भासारखे गवताचे उंचच उंच तुरे पिकून चक्क सोनेरी झालेत. 
आता पार्कात तर नुसती लगबग उडाली आहे. दाराशी असलेला छोटा साकव,त्याच्या खालून वाहणारं नेहमीच काळं दिसणारं पाणी काठच्या सोनेरी गवतामुळे जास्त उठून दिसतंय. तिथंच असलेली तुती, मलबेरी कोवळी मऊ पानं फुटून लवलवताना दिसताहेत. लिंडनपण कोवळ्या पानांनी उन्हातला गंध शोषून घेतोय. हाच सुगंध त्याला उन्हाळ्यात उधळायला हवा असणार.
गुलाबाच्या रानात मात्र अजून हिवाळा वस्तीला आहे. नुसत्या काटक्या आणि काटे ! याच रानात अजून दोनच महिन्यात जाल तर गुलाबाच्या वासाने घेरी येईल एवढी फुलं फुललेली दिसतील! पलिकडे डेलियाच्या रानातही अजून विशेष काही बातमी नाही. नाही म्हणायला कुंपण म्हणून लावलेल्या सफरचंदाच्या झाडांना भरपूर मोहर दिसतोय. यंदा भरपूर फळं द्यायचं अख्ख्या ओळीने ठरवलेलं दिसतंय. मागच्या वर्षी आलेली कीड यंदा पुन्हा आली नाही तर चंगळ असेल.
गुलाबाच्या रानाकडुन पुढे जायला तळ्याच्या अलिकडे एक सुबक वळणदार पाऊलवाट आहे तिथे एका बाजूला पाण्याशी लगट करत एका काठाला चेरी आणि दुसच्या काठाला बेरीज निखळ फुलांनी बहरून आल्यात. चेरीला इतकी फुलं आहेत आजूबाजूला दिसणारा उजेडसुद्धा गाळलेल्या गुलाबी रंगासारखा दिसतो. अजून काही दिवसांनी इथल्या उजेडाने पानांचा गडद चॉकलेटी रंग नेसलेला असेल. 
 ती वाट तळ्याला वळसा घालून परत येते तिथं डावीकडे दोन सुंदर विलोची झाडं आहेत. लांबसोनेरी केस विंचरत, तळ्याच्या शांत पाण्यात डोकावून बघत बसलेली विलो त्या नारसिससची आजी असणार नक्की ! 
हिवाळ्यात परागंदा झालेले हंस आणि मोठी ढोली बदकं अजून परतलेली नाहीत तोवर क्वेलसारख्या लहान पक्षांची चंगळ आहे. परिसरातलं अन्न आणि तळ्यातले मासे यावर त्यांची मालकी! लहान लहान मासे भरपूर आलेत. अजून काही दिवसांत माणसांनी खायचे मासेही येतील आणि मग काठावर अनेक गळ दिसू लागतील.
हे सगळं मागच्या वर्षीही असंच होतं. पुढच्या वर्षीही कदाचित असंच असणार! 
घरी परत येताना चेरीच्या फुलांमधून स्वल्पविराम दिल्यासारखी चंद्रकोर दिसली तेव्हा हे असंच परवाच तर तुम्हाला सांगितलं याची आठवण आली. 
एक ऋतुचक्र पूर्ण झालं तर !
No comments:

Post a Comment