Showing posts with label सैपाकपाणी. Show all posts
Showing posts with label सैपाकपाणी. Show all posts

Friday, 23 December 2022

नुच्चिनउंडे

 तर परवा काय झालं, आमच्या सोप्या अवघड रेसिपी या ग्रुपमध्ये एक काम अंगावर येऊन पडलं. त्या ग्रुपमध्ये सगळे सतत इतरांना कामाला लावत असतात.त्यात ऍडमिन ताई सगळ्यात पुढं ! त्यांनी आता निमित्त केलं स्वातंत्र्यदिनाचं! प्रत्येकाला भारतातलं एकेक राज्यच बहाल केलं आणि सांगितलं- "ऐश करा! या राज्यातला एक नवा आधी कधी न केलेला पदार्थ शिका आणि करा आणि खा आणि अर्थातच दाखवा!"

मग काय लागले सगळे कामाला.
मला आधी आलं पुद्दुचेरी. खूप शोधाशोध करून तिथले सापडले ते शाकाहारी पदार्थ तमिळच निघाले ! फ्रेंच पद्धतीचा तिथल्या खानपानावर खूप पगडा आहे पण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परकीय पदार्थ करायचं मनाला काही पटेना. मग राज्य बदलून मिळावं म्हणून अर्ज केला तर आलं कर्नाटक! ब्येष्ट !!!
इडली,दोशे,उत्तप्पा, वडे,अवियल, रसम,सांबार, तंबळी,उपमा,शिरा,आप्पे,मुद्दे,भाताचे प्रकार हे सगळं सगळं खूप आवडतं असल्याने शिकून नेहमीच करत असल्याने अजून नवं काहीतरी शिकायचं होतं. Geeta Muthya गीताताईने सांगितलेले मोश्शप्पू,काई गंजी,कूट असे बरेच पदार्थ शिकायच्या यादीत आहेत पण त्यातही एका पदार्थाने लक्ष वेधून घेतलं.
नुच्चिनउंडे !
आपल्या महाराष्ट्रात नागपंचमीला वाफवून उकडून केलेले पदार्थ खातात तसंच कर्नाटकातही नागपंचमीला नुच्चिनुंडे हा वाफवून खायचा पदार्थ करतात. नागपंचमी पण होतीच तर हेच करायचं ठरवलं.
पदार्थ सोपा आहे,पौष्टिक आहे, कमी वेळात होणारा आहे आणि चविष्ट आहे!
हेब्बारताईंनी व्हिडीओसह रेसिपी दाखवलेली आहेच तरीपण लिहिते.
साहित्य :
१वाटी तुरीची डाळ
१वाटी हरबरा डाळ
अर्धी वाटी खोवलेला नारळ
अर्धी वाटी बारीक चिरलेला शेपू ( हा आवडत नसल्यास नका घालू)
अर्धी वाटी कोथिंबीर
दोनचार मिरच्या बारीक चिरून
चमचाभर जिरे,थोडा हिंग
मीठ
कृती -
डाळी कमीतकमी 3 तास भिजवायच्या. मी रात्रभर भिजवल्या.
मग निथळून पाणी न घालता भरड वाटून घ्यायच्या.
त्यात नारळ,शेपू,कोथिंबीर, मिर्ची, जिरे,हिंग मीठ मिसळून गोल किंवा सिलिंडर वळून घ्यायचे. चाळणीत ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायचे.
उंडे तयार.
हे उंडे वरून तूप घालून एखाद्या तिखट चटणीबरोबर खातात. मी आज टोमॅटोची तिखट चटणी आणि नारळ कोथिंबिरीची अशा दोन चटण्या केल्यात. हे फार कोरडं वाटत असेल तर तंबळी किंवा मज्जीगेहुळी सारखं पातळ काहीतरी सोबत छान लागतं.
न्याहारी म्हणून हा पदार्थ मला उत्कृष्ट वाटला. साईड डिश म्हणूनही उत्तम आहे.
आजची न्याहारी नुच्चिनउंडे, टोमॅटो चटणी,कोथिंबीर चटणी,तूप,आणि रवा केसरी !
येताय ना खायला?

२६ ऑगस्ट २०२१



अनोळखीपणाची ओळख

 काल ब्रेडची रेसिपी टाकली त्यावर काहीजणांनी विचारलं की बिघडला तर काय? म्हणलं पीठ,पाणी, तेल,मीठ, दूध, यीस्ट तेही सुमारे अर्धा तास उच्च तापमानात बेक झालेलं, त्यात काय बिघडणार आहे? फार तर फुगणार नाही. अशा वेळी नाव बदलायचं की झालं ! म्हणजे थोडासाच फुगला तर डेन्स ब्रेड,अजून कमी फुगला तर फ्लॅट ब्रेड,अजून कमी फुगला तर नान,अजूनच सपाट झाला तर कुलचा आणि सपाट कडक झाला तर खाकरा म्हणायचं त्याला की झालं काम !

🤗
तसंही पातळ पोह्यांचा उपमा, बिर्याणीची खिचडी, चटणीचं सूप, कढीचं पिठलं हे काही आपल्याला नवीन नाही 😎
यावरून काहीतरी आठवलं ते सांगते.
लग्न झाल्यापासून नवऱ्यानं असं जुळवून घ्यायला शिकवलंय मला! विशेषतः खायच्या गोष्टीत.(तसंही ते पटकन शिकलं जातं म्हणा😁)
एकदा तो हॉंगकॉंगला राहत असताना त्याच्याकडे गेले होते. तिथं भाषेचा आनंद असल्याने तसंही खाणाखुणाच करायच्या तर इंग्रजी कशाला फाडा म्हणून आम्ही हातवारे करत मराठीतच बोलायचो. पण ती गोष्ट पुन्हा कधीतरी!
तर बाजारात भाजी आणायला गेलो त्याला विचारलं इथं हिरवी भाजी काय खातोस? तो म्हणे ते बघ हिरवा पाला भरलेल्या सहा टोपल्या आहेत. तर मी दर वेळी पुढच्या टोपलीतली भाजी घेतो. मी म्हणलं,ते ठीक आहे पण ती भाजी कशी करायची ते कसं शोधतोस? तो म्हणे मी नाही शोधत. मी त्या भाजीचं नाव पालक ठेवतो आणि करतो !!!!! 🙀
या साक्षात्कारी प्रसंगानंतर मन एकदम मुक्त का काय झालं माझं ! सगळ्या अनोळखी भाज्या,फळं,कडधान्ये याबद्दलचे राग लोभ निमाले ! मनात कणभरही शंका उरली नाही. सर्व शाकाहारी पदार्थाना आमच्या घराचं दार सताड उघडं झालं. ज्या अर्थी खायच्या रॅकवर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि माणसं त्या विकत घेऊन जाताहेत त्या अर्थी त्या गोष्टी आपण खाऊ शकतो एवढं साधं गणित!
आता मला विटलोफ, ब्रोकोली, कुर्जेट,कोको बीन्स, स्विस चार्ड,लीक,टर्निप,अस्पारागस,पार्स्निप,पाकचोय,ब्रुसेल्स स्प्राऊट्स अशी कुठलीही भाजी करताना मनात शंका येत नाही.
परवा पहिल्यांदाच र्हुबार्ब आणले. भाजीवालीला विचारलं याचं काय करतात? ती म्हणे केक,जॅम,ज्यूस ! चक्क अळूच्या देठासारखं दिसणारं ते प्रकरण इथं फळ म्हणून खातात याची गंमत वाटली. घरी येऊन चाखून बघितलं तर चक्क ठार आंबटपणा! मग त्याचा छान चिरून हिंग गूळ मेथ्या घालून शिजवून मेथांबा झाला की ! पुढच्या वेळी त्याला म्हणणार र्हुबार्ब असशील तुझ्या घरी! आज तुझं नाव चुका !आणि मग त्याचं वरण करणारे 😋
आपल्याला काय, कोणतीही भाजी डोळे वटारून बघू दे आपण म्हणायचं,ए बाबा, कुर्जेट असशील तुझ्या घरचा,आज तुझं नाव घोसावळं !!! 😄😄

तुम्हाला सांगते, परदेशी लोकांशी बोलताना त्यांच्यात मिसळताना आधी अशीच 'अनोळखीपणाची' भीती असायची. मग हळूहळू सगळीकडे माणसं सारखीच असतात कळायला लागल्यावर मी आता मनातल्या मनात इजाबेलचं नाव ईशा, मार्गारेट काकूंचं नाव शैलामावशी, अलीसियाचं सिया, हेन्रीकचं रामकाका असं ठेऊन देते. आणि मग मैत्री सोपी होते !!!!

😊

२१ जून २०२१

ग्रीक ऑलिव्ह ब्रेड

 ग्रीक ऑलिव्ह ब्रेड (Eliopsomo)

काल असं ठरलं की आज सगळ्यांनी काहीतरी बेक करूया. मला बेकिंग म्हणलं की फक्त ब्रेडच आठवतो. केक आणि कुकीज वगैरे मंडळी माझ्याशी फटकून वागतात म्हणून मी त्यांच्या नादी लागत नाही. ब्रेड ब्रेड असं म्हणत असताना आज सकाळी उठल्याबरोबर काही वर्षांपूर्वी 'हा ब्रेड करणार मी नक्की' असं रेसिपी दात्याला दिलेला शब्द आठवला! असे शब्द पाळायला बारा तेरा वर्ष म्हणजे फार काही उशीर झालेला नव्हता. मग घरात जिन्नस आहेत याची खात्री करून घेऊन लागले कामाला!
अशी सरळ रेसिपी नाही सांगणार! आधी बडबड ऐका!!!
तेव्हा डच शिकत होते. वेगवेगळ्या संदर्भात भाषा वापरण्याचा सराव चालू होता. वर्गात इंग्रजी बोलायची परवानगी नसायची. 12-13 वेगवेगळ्या देशातले आम्ही 12-13 लोक चार तास रोज न बोलता राहणं शक्य1 नसायचं. मग वाट्टेल तशी डच मोडकीतोडकी करून बडबड चालू असायची.
एकदा गृहपाठ आला की तुमच्या देशातला एखादा पदार्थ डचमध्ये लिहून आणा!!
आता कुणीही कितीही सुगरण असलं तरी डच भाषेची ऐपत बघून रेसिपी लिहिणं आलं ! आधीच पळीवाढ,फोडणी,हिंग,सादळलेले,भज्यांच्या पिठाएवढं पातळ, चरचरीत हे शब्द इंग्रजीत सांगतानाही फजिती व्हायची तिथं डच मध्ये थालीपीठ कसं सांगायचं या विचाराने झोप लागली नव्हती !!!
शेवटी थालीपीठ झालं नाहीच. गाजराचा हलवा झाला!!
तर अशी फाफललेली मी एकटीच नव्हते हे दुसऱ्या दिवशी वर्गात समजलं.
एका ग्रीक पठ्ठ्याने या वरच्या ब्रेडची रेसिपी मोजून 22 शब्दात लिहून आणली होती. आणि वर आम्हाला ती रेसिपी पटावी म्हणून स्वतः ब्रेड करून आणला होता!
दीड किलोचा ब्रेड 14 जणांनी 14 मिनिटात संपवला होता एवढंच आठवतंय!
आणि एक गंमत आठवतेय, सोरिनाने त्याला विचारलं तू ब्रेडचं पीठ आपटायचं लिहिलंस ते किती वेळ? यावर महाशय म्हणे माझी आई मोजून 80 वेळा आपटते !
हे सगळं आठवलं. बाळबोध डच भाषेत लिहिलेल्या बारा रेसिपीज असलेलं ते आमचं रेसिपीबुक आठवलं आणि मी हा ब्रेड केला.
कृती सोपी आहे.
साधारण अर्धा किलो मैदा घ्यायचा. अर्धा कप दूध कोमट करून त्यात 7 ग्राम यीस्ट छोटा चमचा साखर आणि चमचाभर मैदा घालून झाकून ठेवायचं.
इकडं मिळाले असतील ते ऑलिव्ह ओबडधोबड चिरून घ्यायचे. तिकडं यीस्ट जागं झालं असेल. ते मैद्याच्या विहिरीत टाकायचं. त्यावर मोठी पळीभर किंवा पाव कप ऑलिव्ह तेल घालायचं.मैद्यावर बाजूनी मीठ शिंपडायचं. ( यीस्टवर मीठ घालून हिंसा करायची नाही) आता साधारण कपभर कोमट पाणी हाताशी ठेवून हळूहळू पीठ मळून घ्यायचं. प्रेमाने. पुरणपोळीची कणिक किंवा भटूरे करताना असतं तेवढं सैल पीठ व्हायला हवं. हाताला चिक्कट लागणं कमी होऊन मऊ गोळा झाला की मग मात्र नीट आपटायचं. ग्रीक काकूंच्या पद्धतीने मी खरंच 80 वेळा आपटून घेतलं.
आता वरून तेलाचा हात लावून गोळा फुगायला उबदार ठिकाणी ठेऊन द्यायचा.
दीड तास किंवा गोळा दुप्पट होईपर्यंत थांबायचं.
आता हलक्या हाताने गोळा पंक्चर करायचा. आणि त्याचे तीन चार भाग करायचे.
एक भाग हातानेच पातळ थालीपीठ थापल्यासारखा थापून घ्यायचा. त्यावर चिरलेले ऑलिव्हज आणि आवडतील ते हर्ब्ज घालायचे. मी आज रोजमेरी आणि ओरिगानो घातलेत. आता दुसरा आणि तिसरा गोळाही असाच तयार करायचा. शेवटच्या गोळ्यावर ऑलिव्हज घालायचे नाहीत. नुस्तं तेल लावायचं. आता ऑलिव्हज घातलेले थालीपीठ एकावर एक रचायचे. शेवटच्या थालीपीठाला तेलाच्या बाजूने घालून कडा एकत्र दाबून घ्यायच्या. आणि सारण भरल्यावर कसा कडा गोळा करतो तसं करत या सगळ्यांचा एकच गोळा तयार करायचा. गाठोडं वळायचं. हा गोळा ज्या भांड्यात/पॅन / डिश मध्ये बेक करणार आहात त्यावर ठेऊन ओल्या रुमालाने झाकून ठेवायचं.
आता ओव्हन 260डिग्री से ला 20 मिनिटं प्री हीट करून घ्यायचा. दणदणीत गरम व्हायला हवा. त्या वीस मिनिटातच आपलं ओलिव्हचं गाठोडं किंचित फुगलेलं असेल. त्यावर ब्रशने दूध लावायचं आणि हव्या त्या बिया चिकटवायच्या. हे करताना शक्यतो ते गाठोडं फाटलं नाही पाहिजे. मी आज जवस, भोपळा बिया,चिआ आणि तीळ घातलेत. मग ते बेक करायला ठेऊन आधी ओव्हनचं तापमान 230 डिग्री से ला आणून ठेवायचं. 35 मिनिटांचा अलार्म लावायचा. आणि सोनेरी वरून कडक आतून मऊ गरम स्वादिष्ट ब्रेडचं स्वप्नरंजन करत बसायचं!
ही रेसिपी तंतोतंत फॉलो केली तर ते स्वप्नं खरोखरच पूर्ण होतं!!!
खरं तर ब्रेड ओव्हनमधून काढून दोन तास तरी गार व्हायला हवा. मग तो खायचा. पण धीर धरवत नसेल तर गरमगरम एक तुकडा चाखून बघितलेलं चालतं !
या सोबत सूप, त्झाझिकी,ग्रीक सलाड असलं की झालं!
माझं साधं टोमॅटो सूप उकळतंय, सॅलड चिरून होतंय तोवर काहीतरी गोड घेऊन या बरं जेवायला
🙂

20 Jun 2021











Thursday, 4 February 2021

अननस गोज्जु

 मला कानडी पद्धतीचं जेवण फार आवडतं. म्हणजे इडली वडे डोशे हे तर आवडतंच पण सहसा कुठल्याही हॉटेलमध्ये न मिळणारे साधे घरगुती पदार्थ जास्त आवडतात. माझी एक ताई कानडी आहे. तिच्याकडे  भाज्या,चटण्या,सार,भाताचे प्रकार फार सुंदर असतात. तिच्या हातचे चाखलेले बहुतेक सगळे पदार्थ खूप आवडले म्हणून शिकून सोडलेत बघा !!! 
त्यातलाच एक सौम्य सुंदर पदार्थ म्हणजे गोज्जु ! 
एकदा अशीच लांबच्या प्रवासातून दमून तिच्याकडे पोहोचले होते तेव्हा तिने गरमागरम पोळी आणि शिमला मिर्चीची रसभाजी वाढली. पहिला घास घेताच रंग चव वास यांची हार्मनी अशी भिडली की लगेचच रेसिपी लिहून घेतली. त्या भाजीला गोज्जु म्हणतात असं ऐकलं आणि भैरप्पांच्या एका कादंबरीत त्याचं वाचलेलं वर्णन आठवलं. पण ते गोज्जु अननसाचं. 
मग कळलं की हा प्रकार मराठवाडी येसराचा कानडी भाऊ ! म्हणजे कोरडा मसाला तयार करून ठेवता येतो. करायच्या वेळी पाण्यात कालवून फोडणी घातली की झालं !!! असे पारंपरिक इन्स्टंट प्रकार तर आपल्या अति आवडीचे! मग तो मसाला करून वेगवेगळे प्रयोग केले आणि सगळे आवडले. 
अगदी मोजके जिन्नस लागतात याला. 
घ्या लिहून - 
१मोठा चमचा हरबरा डाळ
१मोठा चमचा उडीद डाळ
१ मोठा चमचा तीळ 
१ मोठा चमचा धणे
पाव चमचा मेथ्या 
अर्धी वाटी खोबरं 
 सगळं कोरडं भाजायचं, गार होऊ द्यायचं, वाटून बरणीत भरून ठेवायचं. हा झाला कोरडा मसाला.
तर अननस गोज्जु हा मुख्यतः मंदिरात प्रसादाच्या जेवणात होणारा प्रकार. लग्नकार्यात पण हा असतोच. यात कांदा लसूण नसतो. पण घरी सहज करायचं असेल तर तुम्ही घालू शकता. 
अननस घालून याला सर्वोत्तम चव येते.

(शक्यतो खोबऱ्याच्या) तेलात जिरे मोहरी हिंग अशी फोडणी करायची. त्यात अननसाच्या फोडी परतायच्या. तिखट हळद मीठ घालून पाणी ओतायचं. आणि लगेच गोज्जु मसाला घालायचा. अननस मुळात आंबट गोड असल्याने त्यात चिंच गूळ नाही घातला तरी चालतो. पाचेक मिनिटांत रस्सा छान आळून येतो. गोज्जु तयार. 
नेहमीच अननस वापरलं पाहिजे असं काही नाही. 

शिमला मिर्ची/वांगी/तोंडली/पडवळ/भोपळा या भाज्यांना वेगळा रस्सा हवा असेल तर फोडणीत भाजी परतायची, हळद तिखट घालायचं पाणी घालायचं आणि हा मसाला घालायचा. चिंचगुळमीठ घालून उकळी आली की अप्रतिम चवीची भाजी पोळी,भात कशाशीही खायला तयार ! 
मी तर आंबट निघालेल्या सफरचंदाचं पण गोज्जु करते. पटकन होतं आणि छान लागतं. 

कोणतीच भाजी न घालता नुसता कांदा तेलावर परतायचा. तिखट मीठ हळद चिंच गूळ आणि गोज्जु मसाला घालायचा. हवं तेवढं पातळ घट्ट ठेवायचं. हे सार किंवा आमटी भात खिचडी भाकरी कशासोबतही खायला फार मस्त लागतं. 

आज मी अननस गोज्जु केलंय. वरून घालायला कोथिंबीर नव्हती म्हणून कोथिंबीर पावडर भुरभुरलं आहे. 
सौम्य तरीही चवदार वेगळं काही खायचं असेल तर गोज्जु नक्की करून बघा आणि सांगा कसं झालं ते 🙂



Tuesday, 19 January 2021

सूप्स सूप्स सूप्स !!!

 जगात दोन प्रकारचे खवैय्ये असतात. एका गटाला चावून निवांत तोंडात घोळवून कोरडं कडक इ खायला आवडतं आणि दुसऱ्या गटाला कमीत कमी कष्टात चावायचे फार कष्ट न पडता लवकरात लवकर गिळता येईल असं खायला आवडतं !

तुम्हाला भाकरी पोळीपेक्षा पराठे; बिर्याणी, मसालेभात इ फडफडीत प्रकारांपेक्षा खिचडी,मऊ भात बिशिब्याळीभात ; धपाटे, थालिपीठापेक्षा वरणफळं, गडगिळे, उकडशेंगोळे;पोह्यांपेक्षा उपमा; पिझ्झापेक्षा नूडल्स पास्ता; रोटी,नानपेक्षा इडली डोशे हे असं आवडत असेल तर आपणतुपन एकाच गटात आहोत ! 
तुम्हीही माझ्यासारखे दुसऱ्या गटात गिळणारे असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी ! 

सूप्स सूप्स सूप्स !!! 

जनरली रस्सा भाजी,कढी, आमटी,वरण, सार,सांबार वाटीने प्यायला आवडणाऱ्या लोकांना सूप प्रकार आवडतात. 
आमच्याकडे सूप हा मुडाखिसारखाच नियमीत होणारा प्रकार आहे. बेल्जियन लोक सूप खातात. पीत नाहीत. बिस्क या घट्ट फ्रेंच सूपच्या प्रकाराचा इथल्या सुपांवर प्रभाव आहे. इथं चमचे सुद्धा कॉफीलेपल  आणि सूपलेपल अशी असतात. सूप बोल नसतात तर सूप डिश असतात. रोज संध्याकाळी जेवणात कोणतातरी मांसाचा तुकडा, पाव आणि सूप किंवा पास्ता आणि सूप असं यांचं जेवण असतं. आम्हाला संध्याकाळच्या जेवणाला हा सुटसुटीत प्रकार आवडतो. छान रंगीबेरंगी कोशिंबीर करावी किंवा भाज्या नुसत्याच मीठ मिरपूड घालून लोण्यावर परतून घ्याव्या, घट्ट सूप करावं आणि एखादा छोटा पाव घेऊन जेवायला बसावं! रोजच्या कुकर,तवा,फोडण्या,मसाले यातून मिळणारा असा ब्रेक मला फार आवडतो. 

गेल्या काही दिवसातले सूपविचार तुमच्याशी शेअर करतेय. घट्ट क्रीमी सूप, भाज्यांचे तुकडे असलेलं सूप, क्लिअर सूप, मोमो सूप,नूडल्स सूप असे सगळे प्रकार आवडतात पण त्यातल्या त्यात क्रीमी सूप जास्त! 
ही सगळी सूप्स संपूर्ण शाकाहारी, लो फॅट, बाहेरचं कोणतंही फ्लेवर्ड प्रिझर्व्हेटिव्ह (मसाला ब्लॉक्स , स्टॉक ब्लॉक्स,एमएसजी वगैरे)न घालता केलेली आहेत. 

सगळी सूप्स करायची पद्धत जवळपास सारखीच आहे. तरी थोडक्यात सांगते. 
तेल/तूप/बटर चमचाभर गरम करायचं. त्यावर तमालपत्र आणि लवंग मिरी दालचिनी यातलं आवडेल ते घालायचं. अर्धा कांदा घालायचा. मग लाल भोपळा/दुधी भोपळा/गाजर/मटार/मश्रुम/फुलगोबी/झुकीनी/ब्रोकोली/पालक/भिजवलेल्या डाळी इ पैकी एक किंवा आवडतील त्या भाज्या घालायच्या. शिजवून वाटून किंचित दूध घालून गरम केलं की सूप तयार. 
मी कोणताही स्टॉक / फ्लेवर एनहॅन्सर वगैरे वापरत नाही. 
क्रीमी सूप हवं असेल तर बटरवर मसाले घातले की चमचाभर कणिक किंवा ज्वारी पीठ घालायचं. ते नीट परतलं की कपभर दूध घालायचं आणि शिजू द्यायचं. गाठी मोडल्या नाहीत तरी हरकत नाही कारण भाज्यांसोबत एकत्र प्युरी करताना त्या आपोआप फुटतील. 
असं सूप छान दाटसर होतं. मिळून येतं. 
दाट सुपासाठी बटाटा किंवा रताळी पण घालता येतील. 
मसाले आणि भाज्या यांचं कॉम्बिनेशन आवडीनुसार वेगवेगळ असू शकतं. 

उदा: लाल भोपळा सूप करताना त्यात फक्त जायफळ घालते. भोपळा जायफळ यांचा स्वाद खूप छान लागतो. 
मटार सूप करताना बडीशेप घालायची. उत्तम लागते. 
टोमॅटो सूप करताना दालचिनी हवीच. जिरे आणि नारळाचं दूध पण हवं ! किंवा ताजा बासिल. 
मश्रुम सूप करताना मिक्स्ड हर्ब्ज घालायचे. आणि वरून मिरपूड. बाकी कोणतेही मसाले नाही घातले तरी चालतात. 
तुर्की पद्धतीने लेंटील सूप करताना वरून तेलतिखट तिळाची फोडणी अप्रतिम लागते.
ताजा बेसिल,सेलरी,पुदिना इ घालून सूप्स खूप छान होतात. 
सूपसाठी भाज्या शिजवताना अक्रोड बदाम घातले की स्वाद बदलून 'शाही' होतो. 
मोमो सूपचे पण हवे तसे प्रकार करता येतात. फोटोत दाखवलेलं मोमो सूप तिळाचं आहे. मोमो कोबी गाजर फरसबी भरलेले आहेत. 
क्लिअर सूप्स करताना शक्य तितके कमी मसाले घालावे. लिंबू मिरपूड पुरेशी असते. क्लिअर सूप आणि मोमोज पण छान लागतात. 
पास्ता सूप - कोणत्याही क्रीमी सूपमध्ये मूठभर पास्ता शिजवला की एकाच डिशमध्ये पोटभरीचं जेवण होतं. 
माझ्या दृष्टीने फूटी कढी, सोलकढी, आंबील, रस्सम, कढण, आळण इ प्रकार पण सूप आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! 

तुम्हीही तुमची सूप्स सांगा.मला शिकायला, करून बघायला नक्कीच आवडतील!














Tuesday, 25 August 2020

स्वयंपाक का करायचा?

🥘🍲 तुम्हाला स्वयंपाक करून काय मिळतं? 🍱🍜 

लॉक डाऊन च्या काळात सुरुवातीला नवे पदार्थ करून पाहणं, फोटो दाखवणं वगैरे सुरू असताना "केवढा हा माजोर्डेपणा" असं म्हणत स्वयंपाक म्हणजे काहीतरी तुच्छ गोष्ट आणि ती करणारे अतिशय अप्पलपोटे स्वार्थी लोक असं म्हणण्याची फॅशन आली होती. तेव्हा मी माझ्यासाठी स्वयंपाक काय आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला होता. इथं स्वयंपाकावर अतिशय प्रेम करणारे लोक आहेत. म्हणून शेअर करावा वाटतोय. 

सूचना (ही पोस्ट स्वयंपाकासंबंधी आहे. यात कोणतीही रेसिपी नाही. विषय आवडत नसल्यास तुमचा कंटाळ्याचा अधिकार अवश्य वापरा) 

समोर ठाकलेल्या विपरीत परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगवेगळे असतात. सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूला बघितलं तर लोक काय काय करत आहेत! इथे बेल्जियम मध्ये लोक गात आहेत, व्हायोलिन वाजवत आहेत, रोज ठराविक वेळी टाळ्या वाजवत आहेत आणि सगळ्यात जास्त लोक स्वयंपाक करत आहेत. इथेही वेगवेगळ्या रेसिपीज, फोटो व्हिडीओ, कमीत कमी जिन्नस वापरून उत्तम पदार्थ करण्याचे चॅलेंजेस यांची धूम चालू आहे. लोक आपण जास्तीत जास्त सकारात्मक कसे राहू याचा विचार करत आहेत. खूप मोठा अंधारा बोगदा सगळ्या जगाला पोटात घेऊन बसलाय. हे कधी संपेल याचं निश्चित उत्तर कोणाकडेही नाही ही त्यातली सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट आहे. 

जेव्हा समोर फक्त अनिश्चितता असते, परिस्थिती बदलण्यासाठीची एकही गोष्ट माझ्या हातात नसते, मनात विचारांच्या अस्वस्थ वावटळी फिरत असतात, सगळं जग उलथापालथ होऊन अस्थिर झालंय असं वाटत असतं, हे सगळं बघत मुकाट्याने सहन करत  निष्क्रीय बसणं अगदी अशक्य वाटत असतं तेव्हा मी माझी एक खास वही (होय वहीच!) घेऊन स्वयंपाकघरात पाऊल ठेवते. 

मी करू शकेन अशा असंख्य शक्यता त्या वहीतुन आणि स्वयंपाक घरातल्या भाज्या,धान्य,मसाले यातून डोकावत माझ्याकडे बघत असतात. 

मग सुरू होतं माझं रिलॅक्सेशन ! पदार्थ ठरतो. उदाहरणार्थ सांबार. ही रेसिपी मी ज्या अन्नपूर्णेकडून शिकले तिची आठवण येते. रेसिपी शिकतानाच्या गप्पा सगळ्या आठवत नसल्या तरी तेव्हा आम्ही दोघी किती आनंदात होतो ते आठवतं. तिच्या हातचं अप्रतिम चवीचं ताज्या मसाल्याचं सांबार जिभेला आठवतं आणि आत्ता काय करायचं आहे हे उद्दिष्ट नक्की होतं. 

मग ताज्या सांबार मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले,डाळी, ताटात योग्य प्रमाणात मोजून काढले जातात. भाज्या धुवून निवडून चिरून ताटात सज्ज होतात. एकीकडे वरणभाताचा कुकर लागतो. मैत्रिणीच्या दक्षिण भारतीय उच्चारातल्या सूचना वहीतून ऐकू येऊ लागतात ! ' कोकनट को तोsडा छोटा काटके फिर गरम करना ! चना धाल रेड्ड ओनी! ईंsग तोडा ज्यादा ! अय्यो टाईमरिंड तो मस्ट् !!! स्लोव गॅस पर रोस्ट करके सब मिलाके ग्रैंडिट्ट (चाल   -माईंडीट्ट) !!! कुकरची शिट्टी तंद्री तोडते. पण मसाले भाजून वाटून झाले असतात. कुकर उघडून वाफ तोंडावर आली की डाळ अगदी मऊ छान शिजल्याचं कळतं. हळद हिंग घालून घोटताना लय साधली जाते. आठवणीने लेकीचा साधं वरण गोळा बाजूला काढला जातो ! भांड्यात किंचित तेलावर क्रमाने भाज्या घातल्या जातात. प्रत्येक भाजी परतायचा,शिजायचा वेळ ठरलेला असतो, तो दिला जातो. मग डाळ ओतून हवं तेवढं पातळ मिश्रण खळखळून उकळू लागतं. त्यात मघाशी वाटलेला मसाल्याचा गोळा एकजीव होतो. मीठ अंदाजे घातलं जातं. चिंच कोळून घातली की मग जादू सुरू होते. घरादारात सांबार सांबार असा कल्लोळ दरवळू लागतो. आता खोबऱ्याच्या तेलाची कढीलिंब मिरच्या मोहरी तडतडत असलेली फोडणी ओतली की मला माझ्या  एवढ्या खटाटोपाचं फळ मिळणार असतं!! 

हे सगळं करताना डोकं तरतरीत झालेलं असतं. सांबार करताना एकानंतर एक करत गेलेल्या कृतींनी काही वेळ तरी मन प्रोसेस ओरिएंटेड होऊन विचारांचा गुंता पण बराच सरळ झालेला असतो. चिंता करताना निष्क्रिय असलेले डोळे,नाक,कान, जीभ आपापलं काम करायला मिळाल्याने सुखी झालेली असतात. अगदी काहीच नसणाऱ्या, एकेकट्या निरर्थक असणाऱ्या गोष्टींचा मेळ जमवून एक चवदार गोष्ट मी तयार केली म्हणजेच माझा कशावर तरी कंट्रोल आहे याचं समाधान जीव शांत करत असतं. घरातल्या मंडळींना हे नक्की आवडेल याची पावती आधीच मिळायला लागलेली असते. त्यातून जो आत्मविश्वास वाढतो तो वेगळाच !ही सगळी प्रोसेस होताना माझा खायला उठलेला रिकामा वेळ काहीतरी चांगल्या कारणासाठी वापरला गेलेला असतो ! जुन्या रम्य आठवणी सुखावून जातात. एखादा पदार्थ कोणाकडून तरी प्रत्यक्षात शिकणं हे फक्त पदार्थ शिकणं नसतंच मुळी. ते असतं एक चांगली आठवण विणून ठेवणं! याचा प्रत्यय पुन्हा आलेला असतो.

ताट वाढून घेतल्यावर क्षणभर त्या भरल्या ताटाकडे बघताना कृतज्ञता वाटून जाते. माहेर, सासर, आप्त यांच्याकडून अन्नपूर्णेचा वारसा हातात उतरल्या बद्दल , ताट भरलेलं असल्याबद्दल ! 

शेवटी एक मात्र आवर्जून सांगते, स्वयंपाक करणं ही जिभेचे चोचले पुरवणे एवढं एकमेव साध्य असलेली गोष्ट नक्कीच नाही. तो मनाचा व्यायाम आहे. ज्याला तो आवडतो त्याच्यासाठी पोषण करणारा, शक्ती देणारा! ज्याला आवडत नाही त्याच्यासाठी शिक्षा ! काही लोकांसाठी दात घासणे,आंघोळ,ऑफिस यासारखी न्यूट्रल गोष्ट! तर स्वयंपाक आवडणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुमची स्वयंपाक करण्यामागची प्रेरणा कोणती?

Monday, 10 August 2020

याचाएजेवोन

एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत कुणी अतिशय रोचक पद्धतीने एखादा पदार्थ करत असेल,त्या पदार्थाचं वर्णन करत असेल, त्याचं सादरीकरण खास पद्धतीने करत असेल तर तो तसाच्या तसा करून बघावा किंवा खावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा अस्सल खवैय्याचा गुण आहे हे लक्षात घ्या!
मलाही खूपदा असं वाटतं. गुलाबजाम असो की शेफ , राटाटुई असो की पास्ता... सगळं कसं साजरं दिसत असतं आणि ते आत्ता मला करायचंय असं वाटत असतं!
सध्या कोरियन वेबसिरीजच्या प्रेमात आहे. त्यात लोक जितकं खातात किंवा खाताना दाखवतात ते बघून फक्त भूक लागते ! आणि स्वयंपाक करताना जे दाखवतात ते बघून हळहळ !!! काय ते खेकडे,काय ते मासे,काय ते मांस आणि काय ती अंडी !!! किमची,नूडल्स, पॅनकेक्स,सूप्स, डंपलिंग्ज आणि अप्रतिम फळं !!!आपल्याला त्यातल्या फक्त भाज्या आणि फळंच खाऊन माहीत असतात. पण ते बघून बघून करायची खुमखुमी येते ती कुठं जिरवायची????
तर काल मी कोरियन सिरीज बघते म्हणून युट्यूबने मला आपोआप कोरियन रेसिपी शो दाखवायला सुरूवात केली! त्यात Maangchi नावाची एक सुबक ठेंगणी अपरनाकी मीनाक्षी चक्क शाकाहारी कोरियन पदार्थ शिकवत होती !!!!! म्हणजे मी कोरियन बघत असून शाकाहारी आहे हे ही युट्यूबला समजलं होतं 🙄
मग आपोआप डोळे बारीक करून ओठांचा चंबू करून बघत गेले बघत गेले बघत गेले....
काय ते भाज्या चिरणं, काय ते भांड्यांवरचं प्रेम दाखवणं, काय ते प्रेमानं,चांगलं चुंगलं खावं म्हणजे अंगी लागतं असं मागे लागणं, काय ते वस्तू वाया जाऊ नये म्हणून आटापिटा करणं, काय ते चव घेऊन दाखवणं अहाहा!!! ही खरं तर स पे मध्ये जन्मायची चुकून कोरियन झाली असं वाटलं बघा!
तर तिनं सहज गप्पा मारता मारता चक्क थालिपीठ लावलं की हो !
म्हणजे आधी लीक, कुर्जेट, रताळी,कोबी अशा भाज्या,मिर्चीकांदे छान उभे काडेपेटीतल्या काड्यांसारखे भरारा चिरून घेतले. त्यात मीठ आणि दोनच चमचे मैदा घातला आणि कपभर पाणी घातलं. मग पॅन मध्ये जरा जास्त तेल घालून हे मिश्रण थापलं आणि खरपूस कुरकुरीत भाजून घेतलं ! झालं की तयार!
सोबत काय तर सोया सॉस,व्हीनिगर, साखर आणि चमचाभर लाल तिखट एकत्र केलं,त्यात मीठ घालून फेटून घेतलं की झालं!
एवढं सोपं प्रकरण दिसायला एवढं भारी होतं की रात्रीचे 11 वाजले होते म्हणून करून खायला लाजले !
आज सोडते व्हय !
लीक,पिवळा कुरजेट, गाजर,मिर्ची, थोडे मश्रूम चिरून त्यात बाईंडिंग होईल एवढंच तांदळाचं पीठ घातलं आणि कमी तेलावर मंद आचेवर खरपूस भाजलं. याचं नाव Yachaejeon असं आहे म्हणे.
याचाएजेवोन सोबत परतलेला टोफू आणि स्वीट चिली सॉस!
हं, हे बघा !
आता इतर देशीय स्वयंपाकात मला कोरियन पण करता येतं असं मिरवायला मोकळी 😊
तुम्हाला कोणत्या सिनेमात किंवा मालिकेत बघून काय खावं वाटलं ते कमेंट्स मध्ये सांगा बरं का!!




Friday, 5 June 2020

आईसफ्रुट

उन्हाळ्यात रोज संध्याकाळी आईस्क्रीमची आठवण येते असे खूप लोक असतात. खरं तर आईस्क्रीमच पाहिजे असं काही नसतं. काहीतरी गारेगार हवं असतं. मग शाळेत असताना खात होतो ते गारेगार आईसफ्रुट आठवतात. बाहेरून आणलेलं त्याच त्याच चवीचं, भरपूर पैसे खाऊन वजन वाढवून देणारं आईस्क्रीम नको वाटतं. अशा वेळी आपणच पर्याय शोधतो. प्रयोग यशस्वी होतो आणि एवढे साधे साधे आनंद घरात बसावं लागल्यानंतर सापडताहेत याचं आनंदाचा बेस असलेलं खंत फ्लेवरचं नवल वाटायला लागतं!
तर आज आईसफ्रुट केलंच ! कसं ते सांगते. हे घरातल्या मुलांना करायला सांगा अजूनच गोड होईल 🙂
असतील त्या फळांचे तुकडे घेऊन ते साच्यात भरायचे. त्यांना एकत्र बांधायला आवडीनुसार सरबत.
ते या फोडींवर हळुहळू ओतायचं. साच्यात बुडबुडे रहायला नकोत. आणि मग फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. पूर्ण गोठायला 4 तास लागले. बाहेर काढलं की साचा अर्धा मिनिट पाण्यात बुडवून ठेवायचा. मग हलक्या हाताने हे आईसफ्रुट बाहेर काढायचे. मस्त फोटो काढून खायला घ्यायचे.
यात असंख्य चवी करता येतील. साखर घाला किंवा नका घालू. कोणतंही फॅट म्हणजे क्रीम दूध वगैरे घालायची गरज नाही. फळं ताजी असतील तर उत्तम. फ्रोजनही वापरता येतील.
मुलांना विशेष आवडतील कारण त्यांच्या आईस्क्रीमच्याही ठराविक ब्रँड च्या आवडीनिवडी अजून गोठलेल्या नसतात !
या फोटोत दिसत आहेत त्यात पिवळ्या किवी,द्राक्षं, स्ट्रॉबेरी,केळी वापरले आहेत.लिंबू सरबत काळं मीठ घालून बेस म्हणून घातलं आहे.

बेस आणि फळं
कोकम सरबत आणि सफरचंद,टरबूज
नारळपाणी केळीचे नारळाचे काप टरबूज
बिनादुधाचा चहा लिंबाच्या चकत्या घालून
डाळिंबाचा रस पपई सफरचंद
संत्र्याचा रस,द्राक्षं, डाळिंब
द्राक्षं रस संत्री मोसंबी स्ट्रॉबेरी
लिंबू पाणी किंचित हिरवी मिरची घालून पेरूच्या फोडी
आवळा सरबत केळी पुदिना
लिंबू सरबत दालचिनी मिरी आणि सफरचंद काप
लिंबू रस अननस द्राक्षं करवंदे
नारळपाणी आंबा केळी शहाळ्याची मलई करवंद
पाणीपुरीचे पाणी त्यात अननस घालून
चिंच गूळ एकदम पातळ पाणी करून त्यात कैरी तिखट मीठ
उसाचा रस सफरचंद लिची
जांभूळ, करवंदे, चेरी,लिची, जाम,ताडगोळे,फणस हे विसरले होते !
दही बेस म्हणून वापरून पण हे सगळे कॉम्बिनेशन्स करता येतील.
दालचिनी, आलं,मध,वेलची,केशर,बडीशेप असे फ्लेवर्स पण वापरता येतील.
मी या उन्हाळ्यात बाहेरचं आईस्क्रीम न खाता हे प्रयोग करणार आहे ! तुम्ही काय काय करताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. ते ही करून बघेन. आणि इथे दाखवेनही 🙂

पिठलं भात

दुर्गाबाई भागवतांचं खमंग हे पुस्तक हातात येऊन वर्ष झालंय. त्यातल्या आज विसरल्या गेलेल्या साध्या सोप्या पौष्टिक पाककृती वाचताना मी ज्यूली अँड ज्युलिया मधली ज्यूली झाले होते! त्यांची आजीने नातीला सांगावं तशी रेसिपी सांगण्याची शैली,सहज मराठी बोलीभाषा, जो पदार्थ करतोय त्याबद्दलची माया, त्याच्याशी जोडलेली एखादी गोष्ट, लोककथा हे सगळं फार फार लोभस आहे. कधीतरी या सगळ्या रेसिपीज रोज एक करून अनुभव लिहायचे आहेत! त्यात मौज असेल !!! 😃
जोंधळ्याची भाजणी, गव्हाच्या भरड्याची खिचडी,बिनतेलाची फोडणी, केवड्याच्या कणसाची भाजी,ऊसाच्या रसाची दशमी,वेसवार, उकडपिंडी असे वाचतानाच 'अहाहा!' करायला लावणारे मोजकेच पदार्थ यात आहेत.
यात सीतेचे पोहे या नावाचं पोह्यांवर लिहिलेलं एक प्रकरण तर त्यातल्या गोष्टींमुळे खूपच खुमासदार झालं आहे!
तर आत्ता हे सगळं सांगायचं कारण असं. सध्या विरंगुळा म्हणून स्वयंपाक करणारे खूप लोक आजूबाजूला आहेत. तऱ्हेतऱ्हेचे फोटो,रेसिपी यांचा पूर आला आहे. त्यात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थांच्या लाटा महाकाय आहेत!
भारंभार मसाले,भाज्या,तेल तूप साखर मैदा यांच्या लाटा आदळत असताना वाचूनच जीव थकून जातोय!  या सगळ्या गोंधळात दुर्गाबाईंच्या मराठमोळ्या जुन्या अतिशय साध्या पाककृती मनाला केव्हढी तरी शांतता देतात.
परवा एका ग्रुपवर पिठलं भाताची चर्चा चालली होती त्यात खमंग मधली ही रेसिपी आठवली. घरातच असलेले मोजके जिन्नस वापरून एकाच भांड्यात होणारी ही पोटभरीची रेसिपी !
काही मैत्रिणींना त्याचे स्टेप बाय स्टेप फोटो हवे होते म्हणून जरा निगुतीने केलंय हे!
यात विशेष मसाले वा भाज्या नाहीत. करायला फार काही कौशल्य काहीच लागत नाही त्यामुळे सरळ पायऱ्या लिहिते.







भातावरचं पिठलं :
१) दोन वाट्या भात पातेल्यात शिजत घातला. त्यात मीठ आणि चमचाभर तेल घातलं.











२) अर्धी वाटी बेसन त्यात दोन मोठे चमचे दही , अर्धा चमचा हळद,एक चमचा तिखट, हिंग मीठ घालून फेटून घेतलं. हे  भज्यांचे पीठ करतो तसं सरबरीत करून घ्यायचं. त्यात चमचाभर कसुरी मेथी घातली. ( या पायरीवर तुम्ही अनेक प्रयोग करू शकता. दही न घेता दूध किंवा पाणी , कोथिंबीर मिर्ची चा गोळा, परतलेला कांदा, इ)







३) भात शिजत आला की हे मिश्रण त्यात ओतून चांगलं मिसळायचं.
(मी एरवी मिसळण्याचेही कष्ट घेत नाही! हॉट प्लेट बराच वेळ गरम राहते त्यात वरच्यावर छान शिजतं)








४) बेसन शिजल्याचा वास येतो. पिठाचा पोत बदलतो. मग वरून हवी तेवढ्या तेलाची,लसणाची वा हिंगाची फोडणी.










झाला तयार पिठलं भात.
खमंग मध्ये आधी बेसन भाजून घ्यायला सांगितलं आहे पण मी भाजून घेतलं नाही. चव चांगली आली. कदाचित भाजून घेतलं तर जास्त खमंग होईल.
हा कमी कष्टात,कमी जिन्नस वापरून, कमी वेळात  होणारा पदार्थ नक्की करून बघा! विशेष म्हणजे हे केल्यावर स्वयंपाकाचं एकच भांडं तुम्हाला घासावं लागणार आहे 😁