Wednesday, 12 May 2021

पाण्याकाठचं घर १६ (अंतीम)

एखादं परदेशी गाव आपलं गाव कसं होतं? 
तर एक दिवस प्रवासी पक्ष्यासारखे आपण त्या गावात येऊन उतरतो.
नवे परके,अनोळखी वास,हवेचा वेगळा स्पर्श, सवयीपेक्षा वेगळे रंग आवाज यांना हळूहळू सरावतो. त्या गावची भाषा शिकावी वाटते. गावातल्या रस्त्यांची नावं ओळखीची होतात. लहानसं गाव असल्याने हळूहळू सगळ्या गल्लीबोळात फिरून होतं. लायब्ररी, पार्क,मुख्य चौक अशा जागांशी खास मैत्री होते. घरातला परका गंध जाऊन शिस्तीत फोडण्या मसाले,खळखळ उकळलेला चहा, वाळत घातलेले कपडे,उदबत्ती, साबण, असे गधं घराला चिकटतात, सराईतपणे अनोळखी फळं,भाज्या ताटात यायला लागतात.. 
रोजच्याच रस्त्यावर आपल्याच वेळेला चालणारे चेहरे ओळखीचं हसायला लागतात,शेजारीपाजारी सुरुवातीचा कडक इस्त्रीचा आलिप्तपणा सोडून तुमच्या परदेशी जगण्यात डोकवायला लागतात, या देशाचे अनुभव म्हणून काय काय करायला हवं ते ही आवर्जून सांगू लागतात. आपणही मोकळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी पारखु लागतो.
एखादं वर्ष नव्याने कुतूहलाने सगळे ऋतू अनुभवण्यात जातं. आता भाषा सराईत येत असते. अनोळखी लोकांच्या नजरेतलं' परदेशी बाई आपली भाषा बोलते'  हे कौतुक झेलत आपण मोकळे व्हायला लागतो. बाजारात शेतकरीण तुम्ही तिची भाषा बोलता या कौतुकाने एक बारीक काकडी जास्तीची देते आणि एक पर्मनंट गिऱ्हाईक मिळवते. सगळी दुकानं पालथी घालून हे आपलं नेहमीचं दुकान असं ठरतं आणि त्या दुकानातल्या पोरीसोरीपण तुम्हाला ओळखायला लागतात. बस वापरत असलो तरी ड्रायव्हर सुद्धा ओळखीचं हसून बोलायला लागतात. 
लायब्ररीत कुठल्या कपाटात कुठली पुस्तकं इथपासून कोणत्या गल्लीतल्या कोणत्या दुकानात सुगंधी तांदूळ मिळतो, कुठे भारतात तयार झालेले कपडे मिळतात, कापूर कुठं मिळतो, केशर कोणत्या दुकानातलं चांगलं हे आपण डोळे झाकून सांगू शकतो. आवडीची खाद्यठिकाणं नेहमीची होतात, नेहमीच्या रस्त्यावर असलेले सिग्नल,उतार,चढ,पूल आणि त्याखालचे रस्ते, खड्डे सगळ्याची नोंद होऊन माहिती वापरात यायला लागते. 
दगडी रस्ते तुडवता तुडवता कडेला असलेल्या सुगंधी फुलझाडांची ओळख होते, अनोळखी पक्ष्यांची नावं शोधली जातात, मसाल्यांची झुडपं ओळखू यायला लागतात,कालवे नद्या तर पटकन आपल्याच होतात, सर्वांगाने मऊ असलेल्या खास पायवाटा सापडतात,दोन बागा, चार खेळ उद्यानं कळतात, एक दिवस सायकल निघून आजूबाजूला असलेली खेडी निरखून येते आणि आपला एरिया वाढतो !!! मागच्याच वर्षी अनुभवलेल्या पुढच्या ऋतूची चाहूल उमगू लागते. 
आणि मग कुठे चार दिवस जाऊन परत गावात आलं की 'घरी' आल्यासारखं वाटतं! पहिल्या घोटात अजिबातच न आवडलेली कॉफी आता घर आल्याची जाणीव करून देणारी असते. घरातल्या उठायबसायच्या जागा मनाला निवांतपणा देत असतात. घर स्वच्छ करताना व्हॅक्युम क्लिनरही मायेने फिरू लागतो, धूळ पुसून लख्ख केलेलं घर आपलं साजरं वाटू लागतं..
माणसांच्या ओळखी वाढतात तसं येणं जाणं, देवाणघेवाण वाढते. आपल्या आयुष्यातल्या माणसांच्या गोष्टींमध्ये एकेक भर पडत जाते. देश कोणताही असला तरी माणसं सगळीकडे सारखीच याचा पुन्हा पुन्हा अनुभव येऊन माणसांबद्दलची शहाणीव वाढत असते. ती लोकही आपल्याकडे असंच बघत असणार आणि  आपणही त्यांच्या आयुष्यतली अशीच एक स्टोरी झालेलो असणारच! 
हे सगळं असंच होतं आणि असंच असणार आहे असं गृहीत धरतोय की काय असं वाटतानाच मुक्काम हलण्याचे संकेत येऊ लागतात. 
गुंता वाढवायचा नाही असं कितीही ठाम ठरवलं तरी तो वाढतोच. माया असते,जिव्हाळा असतो,माणसांचा आणि जागेचाही. 
एक दिवस इथून उठून जायला लागणार आहे याची स्वच्छ जाणीव कितीही जागी ठेवली तरी पावलं अडकतात. 
नव्या जागा बोलवत असतात, तिकडे जायची ऊर्मी कमी नसतेच पण हे ही सुटत नाही अशी घालमेल नुसती !!! 
अशा वेळी फार काही करू नये. आयुष्यात ज्या ज्या वेळेला जे जे गरजेचं असतं ते ते सामोरं येत जातं यावर विश्वास ठेवावा. 
माणसं भेटतात,जागा गवसतात, ओल मिळते, सावली सापडते... त्या त्या वेळी या सगळ्याबद्दल  कृतज्ञता बाळगावी ! 
मेकलीनचा मुक्काम संपत आलाय. मित्रमंडळी निरोप देऊन गेलीत. सगळा संसार बॅगा खोकी यात बंद झालाय. 
आता निघायचं. या आधीही दोन वेळा असाच निरोप घेऊन इथून गेलो होतो. यावेळी मुक्काम जरा वाढला होता,  म्हणून की काय मन हळवं होतंय. 
उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा...!!
इथलं पाण्याकाठचं घर स्वप्नात येत राहील!!!No comments:

Post a Comment