Showing posts with label डच बालकथांचा स्वैर भावानुवाद. Show all posts
Showing posts with label डच बालकथांचा स्वैर भावानुवाद. Show all posts

Thursday, 20 January 2011

डच बालकथेचा स्वैर अनुवाद ८ : प्लुक !

तुम्हाला प्लुक माहीतंय ? प्लुक हा एक पेंग्विन आहे. तो उत्तर ध्रुवावर रहातो. प्लुक आपल्या घरी बर्फात खूप आनंदी आहे. पण त्याला एकच अडचण आहे. त्याला पाण्याची जाम भिती वाटते. प्लुक कधीच पाण्यात उअतरत नाही. बाकीचे सगळे पेंग्वीन समुद्रात छप्पाक्क छप्पाक्क करून उड्या मारतात आणि ताजे ताजे मासे खातात. प्लुकला पोहता येत नसल्याने त्याला कधीच पोटभर मासे खायला मिळत नाहीत.
तो पाण्याला घाबरतो या एका गोष्टीवरून त्याचे सगळे पेंग्वीन मित्र त्याला चिडवत रहातात. त्यांच्या चिडवण्यामुळे अजिबात न रागावता प्लुक म्हणतो , " तुम्हीच जा त्या खोल खोल पाण्यात ! मला यायचंच नाही. मला आपले वर बर्फावर मिळणारे माशांचे तुकडेच पुरेत ! "

पण खरं सांगायचं तर असं नव्हतं. प्लुकला ते माशांचे तुकडे पुरायचे नाहीत. त्याला सारखी भूक लागायची आणि पोट काही भरायचं नाही. मग तो दूरवर फिरायला जायचा. भुकेला. एकटा. दु:खी !

एक दिवस काय झालं , प्लुक असाच भटकत होता. तेवढ्यात त्याला ताज्या माशांचा वास आला. थोडे शोधले तर त्याला एक गंमत दिसली. एका ठिकाणी बर्फावर एक टोपलीएवढे छिद्र पाडलेले होते. प्लुक त्यात डोकावला. खाली पाणी होतं. आणि एक मासे पकडण्याचा गळ त्यात टाकून ठेवलेला दिसत होता. ते काय आहे हे काही छोट्या प्लुकला समजले नाही. त्याने तो गळ हाताने हळुच हलवला. भलताच जड होता तो ! मग त्याने अजून थोडी शक्ती लावून ओढला. आणि काय चमत्कार ! त्या गळाला चांगले ५-६ लठ्ठ लठ्ठ मासे अडकलेले होते. प्लुकने तर आनंदाने उडीच मारली. पोटात एवढी भूक लागली होती की ते मासे खाण्याशिवाय इतर कोणताच विचार तो करू शकत नव्हता. पोटभर मासे खाऊन झाले. मस्त ढेकर आला. मग प्लुक रोजच तिथे येऊ लागला. रोज त्याला पोटभर मासे खायला मिळू लागले.

पण एके दिवशी...
प्लुक मासे खाण्यात मग्न होता. तेवढ्यात त्याला कुणाचातरी आवाज आला. बघितले तर काय, एक एस्किमो मुलगी आपल्या हातातली काठी उगारून रागारागाने त्याच्या दिशेने येत होती. ती मोठमोठ्याने ओरडत होती, " चोर ! चोर ! बरा सापडलास आज ! रोज माझे मासे चोरुन खातोस ! तरीच आजकाल मला मासे मिळत नाहीत ! लबाड ! थांब आता तुला चांगलीच अद्दल घडवते..... ! "

प्लुकला आपलं काय चुकलं तेच कळेना. त्या मुलीचा रागावलेला चेहरा आणि हातातली काठी बघून तो जाम घाबरला. खरं तर त्याला सगळं नीट सांगायचं होतं. पण ती मुलगी खूपच जास्त रागावलेली दिसत होती. तिने काही त्याचे ऐकुन घेतले नसते. प्लुकने तिथून धुम ठोकली. तरीपण ती मुलगी त्याच्या मागे पळत होती. तोंडाचा पट्टा चालूच होता. " आता पुन्हा माझे मासे चोरशील तर याद राख ! माझ्याशी गाठ आहे. टोका म्हणतात मला. उत्तर ध्रुवावरची सर्वात शूर एस्किमो मुलगी आहे मी ! "

शेवटी टोका परत फिरली. प्लुक एका आडोशाला उभा राहून तिच्याकडे बघत होता. त्याला वाटले, ' बिचारी टोका ! तिला वाटले की चोर आहे. पण मला तिचे मासे चोरायचे नव्हते. मला काय माहीत ते तिचे मासे आहेत म्हणून ! '

टोका कुठे जाते हे बघायचे त्याने ठरवले. टोकाने आपला गळ, मासे गोळा केले आणि ती बर्फावरचा निसरडा रस्ता चढायला लागली. तिच्या पाठीवर कसलीशी जड सॅक दिसत होती. त्या ओझ्याने तिचे पाय सारखे निसटत होते. पण ती जिद्दीने अवघड चढण चढत होती. तितक्यात तिच्या पाठीवरच्या सॅकचा एक बंद तुटला नि ती सॅक खाली पडली. पडली नि वेगात उतारावरून घसरायला लागली.

" अरे अरे ! थांब ! थांबवा ती सॅक ! मदत ! धावा ! धावा ! " टोका प्रचंड घाबरून ओरडायला लागली.
हे सगळे प्लुक बघत होता. तेवढ्यात त्याला त्या सॅकमधुन एक छोटेसे डोके आणि इवले इवले हात बाहेर येताना दिसले. छोटंसं गोंडस बाळ होतं त्या सॅकमध्ये !

झूऊऊप्प ! मागचा पुढचा विचार न करता प्लुकने ती सॅक वाचवण्यासाठी बर्फावर झेप घेतली. सॅकच्या मागोमाग तो ही तितक्याच वेगाने सरसर करत बर्फावरून घसरू लागला. आणि अचानक ! डुबुक ! छप्पाक्क !!! आधी सॅक नि मागोमाग प्लुक समुद्रात पडले !

अगदी दोन तीन क्षणात प्लुक पोहायला लागला ! " वॉव ! मला पोहता येतंय की ! " प्लुक मनाशी म्हणाला. आणि मग त्याने सॅकच्या दिशेने सूर मारला. सॅक पकडली. नि मग
एक..दोन..एक..दोन..एक..दोन.. करीत सॅक घेऊन पोहत पाण्यावर आला.
बाकीचे पेंग्वीन हे सगळे बघून मदतीला धावले. त्यांनी सहा,पाच्,चार्,तीन,दोन असे एकावर एक उभे राहून मस्त मनोरा तयार केला. प्लुक सॅक घेऊन तो मनोरा चढला नि जमिनीवर आला.

तिथे टोका दु:खाने जोरजोरात रडत होती. तितक्यात तिला छप छप असा विचित्र आवाज आला. मागे वळुन बघितल्यावर तिला प्लुक येताना दिसला. त्याच्या हातात बाळाची सॅक होती ! टोकाला एवढा आनंद झाला की तिने उड्या मारायला सुरुवात केली. टाळ्या वाजवायला सुरुवात केली. प्लुकच्या हातातून बाळाला घेऊन ती आनंदात हसू लागली. " माझा टोपिती ... माझं बाळ.. माझं शोनुलं , माझा लाडका तान्हा भाऊ ! " " ये आता माझ्या कोटाच्या आत ! लवकरच तुला उबदार वाटेल. " असे म्हणून टोकाने टोपितीला आपल्या उबदार कोटात गुंडाळले.

तिने प्लुकला मिठी मारली. " थँक यु प्लुक ! तुझ्यामुळे माझा भाऊ मला परत मिळाला. "
प्लुक आणि त्याच्या मित्रांना टोका म्हणाली, " चला आता लवकर लवकर ! माझ्या इग्लूत लवकर पोहोचलं पाहिजे. नाहीतर माझा टोपिती आजारी पडेल. येणार ना सगळे माझ्यासोबत ? "
सगळे पेंग्वीन आनंदाने उड्या मारत टोकाच्या घरी गेले. टोकाने मस्त शेकोटी पेटवली. त्यावर ताजे ताजे मासे खमंग भाजून सगळ्यांना खायला दिले.
आणि प्लुक ? आज या जगात तो सर्वात आनंदी पेंग्वीन होता.

Tuesday, 18 January 2011

डच बालकथेचा स्वैर अनुवाद ७ : एल्माची भरारी

सकाळी जाग आली तेव्हा एल्माने आपले पंख पसरले. मस्तंच दिसत होते पंख ! मोठे नि मजबूत ! असे पंख पसरूनच एल्मा आपल्या घरट्याच्या कोपर्‍याकोपर्‍यात फिरली. मग ती घरट्याच्या काठावर येऊन उभी राहिली. आपल्या पंखांकडे बघत मनाशीच म्हणाली, " आता मला उडायचंय ! "

उंच आकाशात घिरट्या घेणार्‍या एल्माच्या आईला एल्मा दिसली. किती काठावर उभी होती ती ! आई पट्कन खाली उतरली.
" एल्मा, लवकर आत घरट्यात जा बघू ! " असे म्हणून तिने एल्माला घरट्यात पाठवले.
" पण मला उडायला शिकायचंय आई ! माझे पंख बघ किती मोठे नि बळकट झालेत.. " घरट्यातून हळूच डोकावत एल्मा आईला म्हणाली.
आईने तिच्या चोचीत एक दाणा घातला.
" घरट्यातच रहा ", आई म्हणाली
"अजून तुला उडता येत नाही पिलु ... तू अजून खूप दाणे खाल्ले पाहिजेस. मग तू एक ताकदवान पक्षी होशील नि तुला उडता येईल. " असे म्हणून आई अजून दाणे शोधायला उडून गेली.

एल्माने आपले पंख फडफडवले. ती पुन्हा एकदा घरट्याच्या काठाशी उभी राहिली. तिने पंखांची उघडझाप केली. मग जोरजोरात पंखांची फडफड करू लागली. एवढ्या जोरात की ती जवळजवळ हवेत उडायलाच लागेल असे वाटत होते.
" आज मी नक्की उडू शकेन " एल्माने विचार केला.
" आणि मग मला दाणे शोधायचेत. ते खाऊन मी बलवान पक्षी बनेन ! "

इतक्यात आई आलीच !
" एल्मा ! काठावरून आत घरट्यात जा. " आई ओरडली.
" पण आई, बघ तरी मला माझ्या पंखांनी काय करता येतंय ते ! " एल्माही ओरडली. " मला उडायचंय. आणि दाणे शोधून आणायचेत. "

आईने अजून एक दाणा एल्माच्या चोचीत भरवला.
" घरट्यात बस. दाणे खा. " आईने बजावले.
" अजून तू उडण्याएवढी मोठी नाहीस. मी दाणे शोधून आणते. त्याची काळजी तू नको करू. दाणे खा. मग बघ . एक दिवस तू खूप छान उडू शकशील. " असे सांगून आई भुर्र्कन उडून गेली.

एल्माला काही स्वस्थ बसवेना. ती पुन्हा जोरजोरात फडफड करू लागली. तिने उड्याही मारायला सुरुवात केली. उंच... अजून उंच...अजून.. अजून उंच.. ! प्रत्येक उडीसोबत तिला घरट्याच्या पलीकडचं जग दिसू लागलं.
" बघा बघा ! मला उडता येतंय ! " आनंदाने एल्मा अजून उंच उड्या मारू लागली.
काय काय दिसलं तिला ? ते एक घर ! मोठी मोठी झाडं..त्यामागे अजून घरं .. मग एक टेकडी.. त्या टेकडीमागे काय बरं ?? अंहं ! ते काही केल्या दिसेना. एल्माने अजून उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ !

तेवढ्यात पुन्हा आई आली. तिने एल्माला उड्या मारताना पाहिलं होतं. ती एल्माला चांगलीच रागावली.
"तुला सांगितलं ना अजून तू लहान आहेस म्हणून ! चल पळ आता घरट्यात. हे दाणे खा. आणि कुठेही उड्या मारू नकोस. " आई म्हणाली.
" पण मला उडायचंय आई ! मला दाणे शोधायचेत. आणि त्या टेकडीमागे काय आहे ते पण पहायचंय " एल्मा हट्ट करत म्हणाली.
" ए मुली, वेडी की काय तू ! तुला माहितंय त्या टेकडीच्या मागे कोन आहे ? एक मोठ्ठी काळी मांजर आहे तिथे ! " आईने एल्माला चांगलीच भिती घातली.
" तू घरट्यातून हलायचं नाहीस ! कळलं का ? " " हे दाणे खा आणि शांत बसून रहा. नाहीतर तू कधीच मोठी पक्षीण होणार नाहीस " असे म्हणून आई दाणे शोधायला गेली.

पण आज काहीही झाले तरी उडायचंच असं एल्माने ठरवलंच होतं. तिने पंख फडफडवले. अजून जोरात. खूप जोरात... आणि एका क्षणी घरट्याच्या काठावरून खाली उडी मारली.
फड्फड्फड... फड्फड्फड... तिने जोरजोरात पंख हलविले. एल्मा वेगात खाली पडू लागली.
फड्फड्फड्फड..फड्फड्फड.. आता पडणार जमिनीवर ! किती जवळ दिसतेय जमीन !!! फड्फड्फड.. अजून वेगात.. सगळी शक्ती लावून...फड्फड्फड्फड्फड...झूऊऊउप्प !
एल्मा उडाली !!! युप्पी..... एल्माला उडता आलं !

खुशीत एक शीळ घालून एल्माने हवेत एक मस्त गिरकी घेतली ! मग अजून उंच भरारी घेतली.. इकडून तिकडे..तिकडून इकडे.. एल्मा उडू लागली. झाडांवरून, घरांवरून..थेट त्या टेकडीपर्यंत एल्मा उडत उडत गेली. तिने खाली बघितलं. खाली एक कुरण होतं. ती तिथे उतरली. सगळीकडे हिरवेगार गवत पसरले होते. अधुनमधून झाडं होती. मोठ्या कुतुहलाने एल्मा टुण् टुण् करीत उड्या मारत इकडेतिकडे बघू लागली.
" हे काय आहे ? अळी ? अम्म्म्म ! किती कडक आहे ही ! " " हा दाणा दिसतोय..बघू बघू ! खरंच ! दाणा आहे हा. इथे पण एक आहे . तिथे एक दिसतोय.. हा दाणा नाही.. ही अळी मस्तंय ! लागते पण छान ! " असे करत करत एल्मा बर्‍याच दूरवर गेली.

अचानक तिला झुडुपातून डोकावणारे एक मोठे धूड दिसले. काय आहे ते ?? काळी मांजर ??? हो. मांजरच आहे ती. बापरे ! आता काय करू ? उडून गेलं पाहिजे आता.
पण भितीने एल्माचे पंख जणू शरीराला चिकटून बसले होते. खूप भिती वाटत होती तिला.
" मला उडालं पाहिजे. मला उडता येतं.." एल्मा मनाशीच म्हणू लागली.
मांजर हळुहळू जवळ येऊ लागली. जिभल्या चाटू लागली. एल्मा अजून घाबरली. " मला उडालं पाहिजे ! मला उडता येतं " असे पुटपुटत तिने हळूच पंख हलवुन पाहिले. पंख हलले. फड्फड..फड्फड..अजून जोरात..फडफड्फड.. वेगात..

मांजर समोर उभे राहून स्थिर नजरेने एल्माकडे बघत होती..
फड्फड्फड्फड...मांजराने झेप घेण्यासाठी दबा धरला..
एक..फड्फड्फड....दोन...फडफड्फड्फड....सगळी शक्ती पणाला लावून एल्मा उडाली.. झूऊऊऊप्प ! तिने उंच भरारी मारली. मांजर खालून बघत बसली.
एल्मा उडाली ती थेट आपल्या घरट्यात येऊन बसली.
तिचे पंख थरथर कापत होते. काळिज धडधडत होतं. इतक्यात आई आली.

" हुश्श ! बरं झालं तू घरात सुखरूप आहेस ते ! " आई म्हणाली. " हा घे दाणा..." आई दाणा भरवत होती. आणि एल्मा काहीही न बोलता खात होती.

Wednesday, 22 December 2010

डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना

" अहाहा ! वॉव ! " नुकतेच फिरायला बाहेर पडलेले दास अस्वल नि वॉस कोल्हा आनंद आणि आश्चर्याने थक्क होऊन एकत्रच उद्गारले ! त्यांना क्षितिजावर एक अप्रतिम सुंदर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसले होते.

त्या सुंदर इंद्रधनुष्याकडे दास नि वॉस अगदी एकटक बघत राहिले. तेवढ्यात दास म्हणाला, " माहितंय तुला, त्या इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी एक गुप्त खजिना असतो म्हणे ! "

" कोणता खजिना ? " वॉसने विचारले.
" मला नीट माहीत नाही. पण तो खूपच मूल्यवान असतो. ज्यामुळे आपण खूप खूप श्रीमंत होतो " दास म्हणाला.

तो खजिना शोधण्यासाठी ते दोघे इंद्रधनुष्याच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मनात फक्त त्या खजिन्याबद्दलचेच विचार येत होते. कसा दिसत असेल तो खजिना ? लहान असेल की मोठा ? कोणत्या रंगाचा असेल ?

तेवढ्यात त्यांना ओक वृक्षाखाली एक खारूताई दिसली. " अहा ! हा माझा खजिना ! माझा एकटीचा !! " असे म्हणत ती नाचत होती. दास आणि वॉस तिच्याजवळ जाताच ती ओरडली. " जा इथून ! तुम्ही माझा खजिना चोरू शकणार नाही ! पळा ! "
" पण हा खजिना नाही." वॉस म्हणाला " ही तर फक्त ओक ची फळं आहेत. "
" पण माझ्यासाठी हा खजिनाच आहे. " खार म्हणाली. " हे माझं हिवाळ्यातलं अन्न आहे. जेव्हा सगळीकडे बर्फ पडेल आणि झाडावर काहीच खाण्यासारखे रहाणार नाही तेव्हा मी ही वाळलेली फळं खाईन. यापेक्षा वेगळा कोणता खजिना असेल ? "

" आता आपण खराखुरा खजिना शोधायला जाऊया " दास म्हणाला. दोघे मित्र घाईघाईने पुढे निघाले.

लवकरच तिथून पुढे असलेल्या एका नदीजवळ ते आले. तेवढ्यात पाण्याजवळ वाढलेल्या गवतातून एक आई बदक बाहेर आले. आई मोठमोठ्याने हाका मारत होती. " सोनुल्यांनो... कुठे आहात तुम्ही ? माझा खजिना कुठे लपून बसलाय बरं ? "

दास आणि वॉस उत्सुकतेने पुढे गेले. त्यांनी आई बदकाला विचारले," तू खराखुरा खजिना शोधते आहेस ? "
" हो रे बाबांनो, माझी दोन पिल्लं कुठे लपुन बसलियेत त्यांना शोधतेय मी ! " आई बदक म्हणाले.

" ही बघा आली ती दोघे. " तिकडून दोन पिवळ्याधम्मक रंगाची दोन पिल्लं तुरुतुरू चालत आई बदकाजवळ आली. आईने त्यांना अलगद आपल्या पंखांखाली घेतले.
" असं मला न सांगता इकडेतिकडे जायचं नाही हं, मला मग तुमची खूप काळजी वाटते ! " आई पिलांना प्रेमळ रागाने म्हणाली.
" हा तुझा खजिना आहे ? " हे सर्व बघत असलेल्या दास ने विचारले. " निश्चितच हा माझा खजिना आहे " ! " या जगात मला सर्वात जास्त आवडणारी माझी पिल्लंच तर आहेत. दुसर्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा ती मला प्रिय आहेत. मग ती माझा खजिनाच नाहीत का ? " आई बदक
म्हणाले आणि आपल्या पिलांसोबत नदीकडे निघून गेले.

दास आणि वॉस तसेच पुढे निघाले. इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी असलेला खजिना मिळवण्याची त्यांना आता खूप घाई झाली होती. समोर एक उंच टेकडी लागली. कसेबसे रांगत, धडपडत ते टेकडीच्या माथ्यावर गेले तर तिथे त्यांना एक म्हातारा ससा दिसला.
" हॅलो मुलांनो, इथे कसेकाय आलात तुम्ही ? " सशाने विचारले. " आम्ही इथे एका खजिन्याच्या शोधात आलोय. " दोघेही एका आवाजात म्हणाले.
" ओह्ह ", ससा उद्गारला. " तो तर माझ्याकडे खूप खूप आहे " ससा म्हणाला.
" खरंच ? कुठे आहे मग तो खजिना ? " दास आणि वॉस ने विचारले.
" इथे आहे " सशाने आपल्या डोक्याकडे बोट दाखवले. " माझ्या आठवणी माझा खजिना आहेत. त्या मला खूप खूप आनंद देतात " हसून ससा म्हणाला.
" आठवणी म्हणजे काय ? " दास ने विचारले.
" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... " " आज तुम्ही जे साहस करताय नं त्याची पण नंतर एक आठवण राहील. तेव्हा मजा करा पोरांनो.. "
हो.. असे म्हणत दोघे पुढे निघाले नि अचानक घसरून टेकडीच्या माथ्यावरून थेट पायथ्याशी पोहोचले !

एव्हाना आभाळ ढगांनी भरून आलं होतं. सगळीकडे अंधारलं होतं. इंद्रधनुष्य तर अदृश्यच झालं होतं. पावसाला सुरूवात झाली. टप्पोरे थेंब पडू लागले. हळूहळू पाऊस खूप जास्त पडू लागला. आता दोघांनीही आसरा शोधला.

" आता आपण आपला खजिना कधीच शोधू शकणार नाही ! " दास दु:खाने म्हणाला. पाऊस थांबण्याची वाट बघत ते दोघे झाडाखाली शांत बसून राहिले. आज दिवसभरात घडलेल्या गोष्टी दोघांनाही आठवू लागल्या. खार आठवली. जी पोटभर खायला मिळणार म्हणून खूप आनंदात होती. आई बदक आठवले. जे आपल्या पिलांवरच्या प्रेमाने खूप समाधानी होते. म्हातारा ससा आठवला. जो केवळ आठवणींमुळे खूप आनंदी राहू शकत होता. प्रत्येकाजवळ फक्त त्यांचा स्वतःचा असा खजिना होता. ते सोनंनाणं नसेलही कदाचित, पण जे काही होतं त्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्या गोष्टी त्यांच्यासाठी जगात सर्वात अधिक मूल्यवान होत्या. त्या त्यांना आनंद देत होत्या.

" तूच तर आहेस माझा खजिना ! " टुण्ण्कन् उडी मारत दास वॉसला म्हणाला.
" आणि तू माझा खजिना ! " वॉस गिरकी घेत आनंदाने ओरडला. आणि ते नाचू लागले. हसू लागले. अगदी दमेपर्यंत !
शेवटी पाऊस थांबला नि स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला. दोघे मित्र आपापल्या घराकडे निघाले. त्यांच्या मागे दूरवर क्षितिजावर एक नवे इंद्रधनुष्य उगवले होते. पण या दोघांनाही ते बघण्याची गरजच भासली नाही.

Saturday, 21 August 2010

डच बालकथा ५ - नीनाची सकाळ

एका शेतातल्या वाडीवर यान कुत्रा आणि त्याचे कुटुंब रहात असे. त्याची नि त्याच्या छोट्याशा पिलाची, नीनाची ही गोष्ट.

कुकूSSSSचकूSSS! कोंबड्याने बांग दिली. पा उठला. अगदी हळूच, पावलांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत तो दाराकडे जाऊ लागला. तरीपण त्याच्या चाहुलीने नीना जागी झालीच!

" कुठे जातोयस तू पा ? " नीनाने विचारले.

" श्श्श्श्श.. ! आता सगळ्यांना जागी करू नको हं नीना. अगं, मी वाडीवर एक फेरफटका मारायला जातोय सहजच. तुला यायचंय का माझ्यासोबत ? " पा ने विचारले.

नीना काय तयारच होती. टुणकन उडी मारून ती पा च्या मागे निघाली.

बाहेर शेतकरीणबाईच्या कामाला सुरुवात झालेली होती. हातात एक चरवी घेऊन ती गोठ्याकडे निघाली होती.

" आता काय करणार ती ? " नीनाने पा ला विचारले.

" चल माझ्यासोबत. मग तुला ती काय करते ते पहाता येईल. " पा उत्साहात म्हणाला.

ते शेतकरीणबाईच्या मागे मागे गोठ्यात गेले. तिथे शेतकरीण गायीजवळ बसलेली दिसली.

" ती तिथे का बसली आहे ? " नीना म्हणाली.

" थांब थोडा वेळ. मग कळेल. " पा म्हणाला.

अचानक चरवीत काहीतरी पडत असल्याचा आवाज आला. कुतुहलाने नीना थोडी पुढे सरकली. शेतकरीण दूध काढत होती. त्यातले काही थेंब नीनाच्या तोंडावरच उडाले. नीनाने ते चाटून बघितले. " म्म्म... काय चविष्ट आहे हे ! "

एवढ्यात बाहेर कसलीशी घरघर मोठ्ठ्या आवाजात ऐकू आली. नीना आणि पा दचकलेच ! नीना तर घाबरून पा च्या कुशीत शिरली.

" ते काय आहे ? " तिने विचारले. " या खिडकीखालच्या कोळशाच्या ढिगावर चढ म्हणजे तुला खिडकीतून ते काय आहे हे बघता येईल. " पा म्हणाला.

एक प्रचंड मोठ्ठा कीटक वाडीवर घिरट्या घालत होता. नीनाला खूप भीती वाटली. ती एवढी घाबरली की त्या ढिगावरून घसरून खालीच पडली. धप्पाक् ! थेट दुधाच्या चरवीवर !!! तिच्या सगळ्या अंगावर दूध सांडलं.

"हा हा हा ! तू अगदी डालमेटीर कुत्र्यासारखी दिसतेय नीना ! " पा हसत म्हणाला. " म्हणजे रे कशी ? " नीनाने विचारले. " म्हणजे तो एक काळे ठिपके असलेला पांढराशुभ्र कुत्रा असतो. तू फक्त पांढरे ठिपके असणारी काळी कुत्री दिसतेयस ! "

बाहेर आल्यावर पा ने सांगितलं की तो घिरघिरणारा किडा नसून ते एक हेलिकॉप्टर आहे. तेवढ्यात त्यांना शेतकरीण हातात एक टोपली घेऊन येताना दिसली.

" आता कुठे जातेय ती पा ? " नीना

" मला माहीत नाही गं. चल आपणही जाऊया तिच्यामागे... " पा म्हणाला.

मग ते कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आले. तिथे शेतकरीण अंडी गोळा करत होती. ती अंडी घेऊन बाहेर गेल्यावर नीनाने बघितलं, एक अंडं शिल्लक राहिलं होतं.

"पा, ती एक अंडं विसरली. हे बघ.. " असे म्हणून ती थोडी पुढे गेली. च्चप्पक ! अंड्यावर पाय पडून अंडे फुटलेसुद्धा !! ते पण नीनाने चाटले. "म्म्म्म्म.. हे पण मस्त लागतंय रे पा ! " नीना मिटक्या मारत म्हणाली.

आता शेतकरीण पुन्हा बाहेर दिसली. पार कुंपणाच्या पलिकडे चालली होती ती.

" पा, आपण जायचं का तिच्या मागे ? मग आपल्याला ती कुठे जातेय ते कळेल. " नीना एकदम पा सारखं म्हणाली. " गुड आयडिया ! " पा मिश्किलपणे म्हणाला.

शेतकरीण बाहेर असणार्‍या छोट्या छोट्या लाकडी कपाटांजवळ हळूच काम करत होती. तिने हातात मोजे चढवले होते आणि चेहर्‍यावर पण जाळीचा रुमाल लपेटला होता.

" वाSSS ! कित्ती सुंदर घरं आहेत ही ! " नीना आनंदाने ओरडली.

" ती मधमाशांची घरं आहेत. फार जवळ जाऊ नको हं त्यांच्या... " पा ने सांगितले.

" का नको जाऊ ? " नीना म्हणाली.

" कारण कोणी आपल्या कामात अडथळा आणलेलं मधमाशांना मुळीच आवडत नाही. " पा ने समजावले.

पण नीना ते ऐकण्यासाठी तिथे थांबलीच नव्हती. शेतकरीण तिथून निघून गेल्याबरोबर नीना त्या घरांजवळ पोहोचली होती.

" मी त्यांना त्रास नाही देत. फक्त गुड डे म्हणून येते " , नीनाने हे ओरडून पा ला सांगितले. ती एका घराजवळ गेली आणि जाळीत नाक खुपसून तिने वास घेतला. " म्म्म.. किती छान वास आहे हा ! किती चान चव असेल याची ! " नीना पा ला सांगण्यासाठी मोठ्याने म्हणाली.

पण त्याच आवाजाने मधमाशांना नीनाचा एवढा राग आला ! सगळ्याजणी नीनाकडे रागाने पाहू लागल्या. आणि अचानक त्यांनी नीनावर हल्लाच केला!

" वाचवा..... !!! " असे म्हणत नीना धुम पळत सुटली. पा पण तिच्या मागे पळाला. दोघांना पण धावल्यामुळे खूप तहान लागली होती. ते नदीजवळ आले. पाणी पिण्यासाठी म्हणून नीना खाली वाकली. पण ते काय आहे ?

" पा, पा, इथे एक कुत्रा आहे पाण्यात." नीना म्हणाली.

" वेडाबाई, तू ओळखत नाहीस का त्या कुत्र्याला ? " पा ने हसत विचारले.

" तपकिरी, पांढरा आणि पिवळा, आणि डोक्यावर काहीतरी विचित्र असलेला हा कुत्रा माझ्या ओळखीचा नाही " नीना

" अगं पुन्हा एकदा नीट बघ पाहू " पा ने सांगितल्याने नीना ने पुन्हा एकदा पाण्यात वाकून पाहिले. आणि धबाक्कन ती पाण्यातच पडली !

" खोडकर मुली, समजलं का आता ? आता मस्तपैकी आंघोळ कर बरं. " पा काठावरून म्हणाला. नीना पण मोठमोठ्याने हसू लागली.

" पण पा, बघ मला पोहोता पण येतय... मस्त नं ? " " तुला पोहोता येतं पा ? " असे नीनाने म्हणताच पा ने पण पाण्यात उडी मारली. मग बराच वेळ ते कमळाच्या वेलींभोवती लपंडाव खेळले.

थोड्या वेळाने ते वाडीवर चालत चालत आले. दोघांना पण खेळल्यामुळे खूप छान वाटत होतं. पण वाडीवर मात्र अजून सगळे झोपलेलेच होते. नीना दमली होती. तिच्या डोळ्यात झोप मावत नव्हती. ती हळूच आईच्या कुशीत शिरली. त्या हालचालीने आई जागी झाली. तिने एक डोळा उघडून नीनाकडे बघितले.

" मी आज शोधलं की दूध आणि अंडी खूप चवदार असतात. आणि हो, मधसुद्धा खूप छान असतो. " नीना झोपाळू आवाजात आईला म्हणाली.

" नीना, तुला नक्कीच एखादं छान स्वप्न पडलेलं दिसतंय ! " आई म्हणाली. " पण पा च्या डोक्याला काय झालंय हे ? " आईने विचारले.

'म्म्म्म .. ते आमचं गुपित आहे. तुला नंतर सांगेन मी !!" असे म्हणत म्हणत नीना झोपलीसुद्धा.

आई मात्र पा च्या डोक्यावर चिकटलेल्या कमळाच्या पानाकडे बघत ते गुपित काय असावं याचा विचार करत होती.

Thursday, 19 August 2010

डच बालकथा ४ - कोंबडी आणि पिल्लू

एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.

हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्‍या शेतात असणार्‍या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.

एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय... एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! " कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार "!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !

पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं... ! पिल्लू बाहेर येईना.

मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, " पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. " तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !

आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, " पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! " अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. " खूपच हट्टी दिसतंय पिल्लू " असं म्हणून बसून राहिली.

थोड्या वेळाने तिला वाटले," किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. " मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ' पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. " पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.

अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्‍या दिवशी पण अंडे तस्सेच !

कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.

सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. " सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? " कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. :)

Tuesday, 3 August 2010

डच बालकथा ३ - हत्ती आणि मासोळी

एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वाना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता.

एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो जंगलाच्या दुसर्‍या टोकाला गेला. त्याला खूप खूप तहान लागली होती. म्हणून तो पाणी शोधू लागला. उन्हाळ्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणचे पाणी आटले होते. काही ठिकाणी नुसताच चिखल राहिला होता तर काही तळ्यांचे डबक्यात रुपांतर झाले होते. खूप शोधल्यानंतर हत्तीला अखेर एक जागा सापडली. तिथे खड्ड्यात पाणी दिसले. हत्तीने त्यात आपली सोंड बुडविली. आणि फुर्रर्रर्र करून पाणी पिऊ लागला. एक मिनिटात सगळे पाणीच संपले ! सगळे पाणी हत्तीने पिऊन टाकले होते ! " अरेच्चा ! पाणी संपले सुद्धा ! " हत्ती मनात म्हणाला. तेवढयात त्याला सोंडेच्या टोकावर काहीतरी वळवळ जाणवली....बघतो तर काय....एक छोटीशी मासोळी पाण्यातून बाहेर पडल्यामुळे तडफडत होती. अगदी सोंडेच्या टोकावर ! हत्तीने पाहिले. मासोळीला म्हणाला " हाय, कशी आहेस ? " मासोळीला हत्तीचा खूप राग आला होता. तिचे सगळे पाणी त्याने संपवले होते नं.. " काय रे हत्तीदादा, एवढा मोठा झालास तू तरी तुला काही कळत नाही ! माझे पाणी संपवलेस. आता मी कुठे राहू ? पाण्याबाहेर तर मी जगूच शकत नाही. तुझ्यामुळे मी आता मरून जाणार ! दुष्ट आहेस तू ! " असे मासोळी खूप रागारागाने बोलली. हत्तीला खूप वाईट वाटले.आपली चूक त्याला समजली. पण त्याने मुद्दाम पाणी संपवले नव्हते. तो म्हणाला," अगं मासोळी, चुकून संपलं गं पाणी! मी तुला दुसरे पाणी शोधून देतो. चल आपण शोधूया.. "
मासोळी म्हणाली," तू खरंच मला मदत करशील ? " " हो गं हो. नक्की करेन" हत्ती म्हणाला. मग ते दोघे पाणी शोधत शोधत फिरू लागले. पाणी काही सापडेना. मासोळीची तडफड खूपच वाढू लागली. हत्तीला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे मासोळीला त्रास होतो आहे हे बघून त्याला रडू आले. दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. टप टप पाणी जमिनीवर पडले. तो म्हणाला, " आता काय करायचं? " पाणी बघून मासोळीने टुण्णकन त्यात उडी मारली. आणि ती म्हणाली, "हत्तीदादा, हे पाणी मला थोडावेळ पुरेल. तू दुसरे पाणी शोधून ये तोवर मी इथेच थांबते. " हत्तीला गंमतच वाटली. तो पाणी शोधायला एकटाच निघून गेला.

तिथेच जवळ एका चिखलाच्या डबक्यात एक मगर होती. ती हे सगळे दुरून बघत होती. मासोळीला एकटी सोडून हत्ती निघून गेल्याचे तिने पाहिले. मासोळी बघून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आज आयतीच मेजवानी मिळणार म्हणून ती खूष झाली. दबक्या पावलांनी मासोळीच्या मागे गेली नि एका घासात तिने मासोळीला गट्टम् केले ! हत्ती परत आला तर तिथे मासोळीच नाही. "आता काय करायचं?" पण तिथल्या झाडावरच्या एका धीवर पक्षाने हत्तीच्या कानात सगळे सांगितले. हत्तीला मगरीचा एवढा राग आला.. त्याने तिला उचलले नि झाडावर उलटे टांगले ! मगरीला खूप भीती वाटली. ती हत्तीला तिला झाडावरून खाली उतरवण्यासाठी विनवू लागली. हत्ती म्हणाला, " आधी ती गिळून टाकलेली मासोळी बाहेर टाक मग मी तुला खाली उतरवतो." मगरीपुढे काही पर्यायच नव्हता. तिने मासोळी खाली टाकली.

मासोळी हत्तीला म्हणाली, " तुला बघून आत्ता कुठं माझ्या जिवात जीव आला ! आता सोड बरं मला पाण्यात ! " हत्तीचे तोंड एवढुसे झाले. त्याला अजून पाणी कुठे सापडले होते ! तो म्हणाला" मी पटकन येतो. तू इथेच माझी वाट बघ." आणि तो पाणी शोधायला निघाला. इकडे झाडावरच्या धीवर पक्षाने एक झडप मारली नि मासोळीला चोचीत उचलले. पिल्लांना खाऊ मिळाला या आनंदात तो घरट्याकडे निघाला. समोर हत्ती उभा ! त्याने आपल्या सोंडेत धीवराचे घरटेच पकडले होते. त्यात धीवराची पिल्लं घाबरून ओरडत होती. धीवराला आपली चूक समजली. त्याने मासोळीला अलगद खाली ठेवले. हत्तीनेही मग घरटे जागेवर ठेवले.

त्याने मासोळीला उचलले आणि सापडलेल्या छोट्याश्या तळ्याकडे निघाला. मासोळीला ते तळे पाहून खूप आनंद झाला. तिच्या आधीच्या घरापेक्षा इथे थोडे जास्त पाणी होते. हत्तीने तिला पाण्यात सोडताच सुळसुळ पोहत ती आनंदात गिरक्या घेऊ लागली. ते बघून हत्तीला खूप खूप आनंद झाला. अखेर त्याने मासोळीला वाचवले होते !

उन्हात फिरून फिरून हत्ती खूप थकला होता. आणि त्याला खूप तहान लागली होती. त्याने समोरच्याच पाण्यात आपली सोंड बुडविली. आणि तो ढसाढसा पाणी पिऊ लागला. दोन मिनिटात तळयातले पाणीच संपले !!!! त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं???

Monday, 19 July 2010

डच बालकथा - २

एक अळी होती. कुरूप, बुटकी नि लठ्ठ. तिला ना हात होते ना पाय. टिंबाएवढे मिचमिचे डोळे होते फक्त. दिवसभर इकडे तिकडे आपले अंग ओढत कशीबशी सरपटत रहायची. झाडाची पाने कुरतडून कुरतडून खात रहायची. ही अळी खूप भित्री होती. कोणाची चाहूल जरी लागली तरी अंग चोरून घेत एखादया पानामागे लपून बसायची. तिला वेगात पळता सुद्धा येत नसे. पण या अळीच्या डोळ्यात कुतूहल मात्र अपार होते. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ती निरखून बघायची. जगात किती वेगवेगळ्या, सुंदर सुंदर गोष्टी आहेत असे तिला सारखे वाटायचे. आणि मग स्वतःची कुरूपता बघून तिला अजूनच वाईट वाटायचे.

एकदा अळीला एक गोगलगाय दिसली. तिच्यासारखीच हळुहळू चालली होती. अळीला वाटले, अरे! ही पण माझ्यासारखीच की! पण जेव्हा गोगलगाय जवळ आली तेव्हा तिला दिसले. गोगलगायीच्या पाठीवर तिचे सुंदर घर होते! आणि तिला दोन सुंदर शिंगंसुद्धा होती. वार्‍याची एक मोठी झुळूक आली नि गोगलगाय अलगद पाठीवरच्या घरात गुडुप झाली!! अळी आश्चर्याने बघतच बसली. या थंडगार वार्‍याने तिलाही थंडी वाजत होती पण तिला नव्हते असे सुंदर घर...
रात्री देवबाप्पाशी बोलताना ती म्हणाली, "मला कधी मिळणार असे सुंदर घर??" "बाळा, थोडी वाट बघावी..." देवबाप्पा म्हणाला. अळी तशीच थंडीत कुडकुडत झोपून गेली.

सकाळ झाली. मस्त सोनेरी उन्हे पसरली होती. अळी खूष होती. नवा दिवस दिसला की ती अशीच आनंदी असायची. अचानक तिच्या टिंबुल्या डोळ्यांपुढे काहीतरी सुंदर चमकले. बघते तर काय? एक कोळी किडा भराभर जाळे विणत होता. त्या जाळ्याचे चमचमणारे धागे दवबिंदू अडकून अजूनच सुंदर दिसत होते. अळी कुतुहलाने पुढे गेली. एवढयात तो कोळी तिच्यावर वस्सकन ओरडला, "ए सुरवंटा, दूर हो, दूर हो.. दिसत नाही मी इथे जाळे विणतोय ते....!!!" बिचारी अळी! हिरमुसून मागे सरकली. पण तिला थोडा आनंदही झाला. तिला तिचे नाव कळाले होते. "सुरवंट".

सुरवंट रात्री बाप्पाला म्हणाला, "मला निदान जाळे विणायला तरी शिकव की..." "अरे बाळा, थोडा धीर धर रे. योग्य वेळ आली की सगळे काही मिळेल." बाप्पा म्हणाला. सुरवंटाने विचारले, "पण म्हणजे कधी ???" बाप्पाने काहीच उत्तर दिले नाही. सुरवंट हिरमुसून झोपी गेला.

सकाळी कसलीशी लगबग ऐकू आली म्हणून सुरवंटाने मान वर करून बघितले. समोर मुंग्यांची भलीमोठी रांग गाणी गात चालली होती. प्रत्येक मुंगीच्या हातात मोठ्ठा साखरेचा दाणा होता. सगळ्या मुंग्या पावसाळ्यात खाण्यासाठी म्हणून आपापल्या घरात अन्नाचा साठा करून ठेवण्यात मग्न होत्या. सुरवंटाला परत एकदा वाईट वाटले. त्याला फक्त झाडाची पानेच कुरतडून खाता येत असत. आणि मुंग्यांसारखे मोठ्ठा किल्ला असलेले घरही नव्हते त्याला.

आपल्याला असं काहीच का मिळत नाही याचे सुरवंटाला खूप दु:ख झाले. जयबाप्पाचा रागही आला. त्याने ठरवले. जयबाप्पाशी कट्टी करायची! खूप रडू यायला लागले. रडत रडत तो झोपून गेला.

केव्हातरी मधेच जाग आली. त्याला जाणवले की कुणीतरी आपल्या अंगावर मस्त मऊमऊ पांघरूण घातले आहे. त्या रेशमी पांघरूणात झोपायला त्याला एवढे छान वाटले! वाटले की कधी उठूच नये... निघूच नये या पांघरुणाच्या बाहेर. अजून झोपही येत होती. आता अजून गाढ झोप लागली. किती वेळ झोपला तो ते बाप्पालाच माहीत! सूर्य आला नि गेला सुद्धा... चांदोबा आला नि झोपलेल्या सुरवंटाला हळूच हाक मारून गेला.

सुरवंटाने डोळे उघडले. खूप वेळ झोपल्यामुळी अंग अगदी आंबून गेले होते. त्याला खूप आळोखेपिळोखे द्यावे वाटत होते... आणि हात-पाय उगवल्याने देताही येत होते!! यिप्पी... आनंदाने त्याने आपले नवे हातपाय ताणून दिले. तर काय?? अंगाभोवतालचे पांघरूण गळून पडले. सकाळच्या लख्ख उन्हात त्याला पहिल्यांदाच आपले सुंदर पंख दिसले. निळे निळे पंख नि त्यावर पांढरी पिवळी नक्षी ! कोळीकिड्याच्या जाळ्यापेक्षाही मऊमऊ... मस्त टोकदार मिशापण आल्या होत्या की! गोगलगायीपेक्षा ऐटबाज! त्याने अलगद पंख हलवले. आता तर हवेत उडता येत होते त्याला!! किती भिरभिर उडता येते पंखांमुळे! सगळ्या मुंग्या खालून त्याच्याकडे बघत ओरडू लागल्या, "ते बघा... बघा... किती सुंदर फुलपाखरू!!!"

फुलपाखराला खूप खूप आनंद झाला. सगळी फुले, किडे, मुंग्या, गोगलगाय त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. त्याच्या आनंदात सामील झाले होते.

Thursday, 8 July 2010

डच बालकथा

मला आवडलेल्या एका डच बालकथेचा हा स्वैर अनुवाद -

एक बदकाचे पिल्लु होते . त्याचे नाव होते कोल. त्याला दोन भाऊ पण होते. आई-बाबा आणि दोन भावांबरोबर तो एका छोट्या तळ्याच्या काठावर रहायचा. कोल थोडा लाजाळूच होता. खूप कमी बोलायचा. सगळी कामंपण तो खूप हळुहळू करायचा. एकटाच उंच उंच गवतात खेळत रहायचा. तिथून थोडया अंतरावर अजून एक मोठे तळे होते. तिथे हंसांची वस्ती होती. का कुणास ठाऊक पण सगळी बदके हंसांना घाबरायची. कोलला त्या मोठ्या तळयाबद्दल खूप कुतुहल होते. पण "तिकडे अजिब्बात जायचं नाही हं " असं आई सारखं सांगायची. म्हणून त्याला तिकडे जाताच यायचे नाही.

एके दिवशी सकाळी आई बाबांनी कोल आणि त्याच्या भावांना बोलावलं. आई म्हणाली, " बाळांनो, आजपासून तुम्ही पोहायला शिकायचं. स्वतःचा खाऊ मिळावायला शिकायचं. " बाबा म्हणाले, " चला , आज आपण थोडे खोल पाण्यात जाऊया. आमच्या सोबत सोबतच पोहायचं हं.. "

कोल आणि त्याचे भाऊ खूप आनंदले. उड्या मारत, आनंदाने ओरडत ते पाण्याकडे निघाले. आई बाबा त्यांना पोहायला शिकवू लागले. कोल मात्र हळुहळू मागे पडला. त्याला भिती वाटत होती. भाऊ मात्र न घाबरता सरसर पुढे गेले होते. एवढ्यात त्याला आकाशातून खाली झेपावणारा हंसांचा थवा दिसला. आता मात्र कोल खूप घाबरला. तिथे एकटाच होता तो ! कसाबसा पोहत, वाकडातिकडा पळत तो आपल्या घरात पोहोचला. थरथर कापत, डोळे बंद करून, पंखात डोके खुपसून सगळ्यांची वाट बघत बसून राहिला.

संध्याकाळी सगळे घरी परतले. कोलचे दोन्ही भाऊ खूप आनंदात दिसत होते. दिवसभराच्या गमतीजमती कोलला सांगत होते. खूप दमले होते सगळे. झोपून गेले. कोल मात्र हिरमुसला होता. रात्री आई बाबा त्याच्याविषयी खूप काळजीत पडून बोलत होते ते त्याने ऐकले. त्याला अजूनच वाईट वाटले. स्वतःची लाजही वाटली.

दुसर्‍या दिवशी कोल म्हणाला ' मी नाही येत तुमच्यासोबत... घरीच थांबतो. उद्या येईन नक्की ! " सगळे त्याला टाटा करत निघून गेले. कोल घरीच बसला. थोड्या वेळातच त्याला कंटाळा आला. मग तो खेळायला बाहेर पडला. मस्त हवा होती आज ! लख्ख ऊन पडलं होतं. कोल आपल्याच नादात गाणं गुणगुणत किती दूर आला त्याला कळलेच नाही !

अचानक त्याला काय दिसलं माहितंय... एक भलामोठा पांढरा पक्षी समोर उभा होता. कोलने मान उंच करून पाहिले. हंस होता तो ! नक्कीच ! कोल खूप खूप घाबरला. त्याला काहीच सुचेना. त्याने हळूच पुन्हा एकदा हंसाकडे पाहिलं. हंस प्रेमळपणे हसत त्याच्याकडेच बघत होता. " बदक ना रे तू? तुझं नाव काय ? " हंसाने विचारले. "कोल" हा एकच शब्द कसाबसा कोलने उच्चारला. " अरे वा ! मस्त नाव आहे की तुझं ! " हंस म्हणाला. कोलला आश्चर्य वाटले. हा तर छान बोलतोय. दिसतोय पण ऐटदार. याला का बरं सगळे घाबरतात ? इतक्यात हंसाने विचारले, " तू तर छोट्या तळ्याजवळ रहातोस नं ? इकडे कसा आलास ? आणि ते ही एकटाच ? "

मग कोलने त्याला सगळे सांगितले. एकट्याला पोहायला किती भिती वाटते, भाऊ कसे भरभर पुढे जातात... सगळे सांगितले. सगळे ऐकुन हंस म्हणाला, " हेत्तिच्या ! एवढंच होय. मी शिकवीन तुला पोहायला.. चल माझ्यासोबत ."
" पण तू मला सोडून एकटाच पुढे जाणार नाहीस नं ? मग मला रडू येईल खूप ! " कोलने विचारले. " नाही रे बाबा, मी तुला सोडून पुढे नाही जाणार. नक्की. "

मग कोल त्याच्यासोबत पोहायला तयार झाला. हळूहळू हंसाबरोबर गप्पा मारत, खेळत तो पोहायला लागला. हंस कोलसोबत हळुहळू पोहत होता. वेगवेगळ्या पाणवेलींची, शेवाळांची माहिती सांगत होता. तेवढ्यात कोलला बदकांचा आवडता खाऊ असलेल्या पाणवेली दिसल्या. हरखून जात तो सरसर पोहत तिकडे गेला. तो खाऊ खाताना त्याला आई बाबा आणि भावांची खूप आठवण आली. हे सांगायला त्याने मान वळवली तर काय ! हंस खूप दूर थांबून त्याच्याकडे बघत होता. कोल घाबरला. पटकन हंसाकडे गेला. " तू मला सोडून दूर का गेलास ? किती घाबरलो मी ! " रडवेल्या आवाजात कोल म्हणाला. हे ऐकून हंस हसू लागला. तो कोलला म्हणाला, " अरे वेड्या, मी तर तुझ्यासोबतच होतो. तूच भरभर पोहत माझ्या पुढे गेलास ! " " म्हणजे मला एकट्याला पोहता आलं ? " कोल म्हणाला. त्याला खूप आनंद झाला. त्याने अजून वेगात पोहून दाखवले. हंसाने त्याचे खूप कौतूक केले.

आनंदाने उड्या मारतच तो घराकडे परतला. खूप दमला होता तो. सगळे घरी यायच्या आत कधी झोप लागली त्याला समजलेच नाही.

सकाळी उठल्याउठल्या त्याने सर्वांना सांगितले, " आज मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. चला माझ्या बरोबर. " लाजाळू , भित्र्या कोलचा असा उत्साह बघून सर्वांनाच आनंद झाला. सगळे त्याच्या पाठोपाठ निघाले. कोलने सर्वांना मोठ्या तळ्यात नेले. हंसाची ओळख करून दिली. घाबरून गप्प बसले होते आई बाबा ! मग कोलने त्यांना धीर दिला. पोहायला सुरुवात केली. काल जिथे तो खाऊ सापडला होता ना, तिथे नेले सगळ्यांना. एवढा खाऊ बघून भावांनी तर टुण्णकन उडीच मारली. सगळ्यांनी पोटभर खाल्ले. खूप खूप आनंदात सगळे घरी परतले.

रात्री आई बाबांना म्हणत होती, " आपला कोल किती हुशार आहे नाइ? आणि खूप धीट सुद्धा ! " " मला कोलचा खूप अभिमान वाटतो " बाबा म्हणत होते. हे ऐकता ऐकता कोल झोपून गेला. स्वप्नातही त्याला ते मोठे तळे दिसत होते.