Wednesday, 12 May 2021
अमोहाची डायरी 7
Friday, 29 January 2021
अमोहाची डायरी ६
आम्ही ना सकाळी गाडीत बसून गावाला गेलो होतो. गावाला म्हणजे खूप वेळ गाडीत बसून जातात त्याला गावाला म्हणतात. सायकलवर नाहीतर pram मध्ये बसून आम्ही बाजारात दुकानात आणि लायब्ररीत जातो. तसं गावाला जायचं असेल तेव्हा गाडीत बसतात. माझं छोटं सीट आहे त्यावर बसून पट्टे बांधले की मला खिडकीतून सगळं दिसतं. मग मला खूप वेळ कंटाळा येत नाही. इतके दिवस मी छोटी होते ना, मला कंटाळा यायचा नाही पण आता मी पंचवीस महिन्यांची झाले. आता मला कंटाळा येतो.
गाडीमध्ये आमच्यासोबत दादा आणि काकू आणि काका होते. त्यांनी माझ्यासाठी शेव आणली होती ती मी रस्ताभर खात होते. आणि सगळे मोठे लोक गप्पा मारत असताना शांत बसून बाहेर बघत होते. बाहेर हळूहळू सगळीकडे पांढरं पांढरं दिसायला लागलं होतं. एवढं पांढरं की मला दुधाचीच आठवण आली. पण बाहेर गेल्यावर दूध प्यायचं नसतं कारण आपला straw घरीच राहिलेला असतो.
हळूहळू माझे डोळे आपोआप बंद व्हायला लागले तेवढ्यात मला पंखे सापडले. मग मी आरडाओरडा करून पंखा सापडला पंखा सापडला म्हणत सगळ्यांना पंखा दाखवला.
खूप वेळ पंखे दिसल्यावर बाबाने गाडी उभी केली आणि आम्ही सगळे खाली उतरलो. एवढी थंडी होती. मी दोन पॅन्टस,दोन शर्ट,जॅकेट टोपी हातमोजे पायमोजे आणि शूज घालूनसुद्धा थंड थंड वाटत होतं. खाली उतरलो तर माझे पाय पांढऱ्या वाळूत रुतले! बाबा म्हणाला त्याला बर्फ म्हणतात. मग आम्ही त्यात पाय उमटवले. आई काकू काका दादा इकडेतिकडे फिरुन फोटो काढत होते त्यामुळे मी बाबाला घट्ट धरून ठेवलं. ते काय सगळं पांढरं पांढरं होतं ते नुसतं बघत बसले.
मग पुन्हा गाडीत बसून गावाला गेलो.
तिथं जे बाप्पा केलं आणि पराठा खाल्ला. झोका खेळला. काकाच्या आणि बाबाच्या खांद्यावर बसून चक्कर मारली आणि झोपूनच गेले!!!
घरी आलो तेव्हा घरापुढे माझी खेळायची वाळू पण पांढरी पांढरी झाली होती ! त्याला बर्फ म्हणतात हे मला आठवलं म्हणून आईने माझी पापी घेतली !
आमचा पार्क आहे ना, तिथे पण खूप बर्फ पडला होता. आम्ही तिकडे गेलो तर खूप मज्जा दिसत होती. मी जोरजोरात पायाने बर्फ उडवत धावत होते आणि माझं गवत लपलं ते शोधत होते. आई बाबाने मला लाडू करायला शिकवले. हे बर्फाचे लाडू खायचे नाहीत ! खोकला येतो ना..
आम्ही नुसतेच लाडू केला लाडू फेकला लाडू फुटला असं खेळलो !
आईने बाबा आणि मी अशा दोन बर्फाच्या बाहुल्या केल्या.
दुसऱ्या दिवशी मला पुन्हा बर्फात खेळायचं होतं पण बर्फ गावाला गेला.
घराच्या समोर दोन डबकी आहेत त्यात बर्फाचं पाणी असतं. त्यात खडे टाकायला मला फार मजा येते. मी मोजत मोजत एकोणचाळीस खडे टाकले तेव्हा आई म्हणाली आता ते डबकं भरून गेलं ! मग दुसऱ्या डबक्यात दगड टाकायचे तर आपली छोटी छोटी आई कंटाळून गेली होती म्हणून तिला बोट धरून घरी नेलं मी!
बाबा असला की मला तो डबक्यात उड्या मारू देतो. पॅन्ट आणि बूट ओले झाले की घरी जावं लागतं तरीपण मी खूप खूप उड्या मारून पाणी उडवते. मग बाबाला कंटाळा आला की तो सरळ मला उचलतो आणि घराकडे निघतो. मी कितीही मोठ्याने रडले तरी अजिबात ऐकत नाही. फार हट्टी झाला आहे बाबा !
मला मधमाशी खूप आवडते, मुंगीबाई पण आवडते,गोगलगाय आणि कोळी किडा पण आवडतो. यातल्या कुणाची मला भिती वाटत नाही. या सगळ्यांच्या गोष्टींची पुस्तकं आहेत माझ्याकडे. पण चिलट आणि माशी मात्र मला फार घाबरवतात!काल रात्री तर स्वप्नात पण माशी आली आणि मी जोरात रडत उठले. उठल्यावर बघितलं तर माशी नव्हतीच ! माशी छोटी असते तिला घाबरू नाही असं आई बाबा शिकवतात पण तरी मला खूप भीती वाटतेच !
आई आता त्यांच्या गोष्टीच लिहिते म्हणाली. मग मला त्यांची भीती वाटणार नाही म्हणे..मी म्हणलं लिहिणार तर लिही बाई ! मला काय ! मला गोष्ट सांगून तुझं पोट भरणार असेल तर मला बरंच वाटेल !!!
हे तुम्हाला म्हातारीच्या गोष्टीतलं बोलते असं वाटलं ना? पण मला खूप गोष्टी ऐकून पाठ झाल्यामुळे तसंच बोलणं येतंय.
मी पराठ्याला म्हणते - आता मी तुला खाऊन टाकते..
आणि बाबाला म्हणते - कशाला घाबलली? बाबाला घाबरू नाही. आपला छोटा छोटा बाबा आहे ना???
परवा सकाळी उठून आईला म्हणलं "आई आई, असं ग का बोलतेस? " आईला काही कळलंच नाही. मग मी पुढची गोष्ट सांगितली -" आई आई, असं ग का बोलतेस? लेकीला वाईट वाटलं! " तरीपण आईला कळेना. मग म्हातारीने सगळी हकीकत लेकीला सांगितली असं म्हणल्यावर आईला कळलं की मी गोष्ट सांगतेय !!!
कसं ना, आई बाबा दोघांनाही कधी कधी मी काय बोलते ते कळतच नाही. कुठल्याही गाण्याची ओळ म्हणली की त्या पुढची ओळ मला म्हणता येते पण त्या दोघांना गाणं कुठलं हेच आठवत नाही. मग मी त्यांना आठवेपर्यंत खूप वेळा कधी कधी सकाळपासून रात्रीपर्यंत ती एकच ओळ म्हणत बसते !!!
तुम्हाला माहीत आहे, बाबाने आईला शाळेत घातलं आहे. ती कम्प्युटर समोर बसून वेगळ्याच भाषेत अभ्यास करते तेव्हा मी नीट लक्ष ठेवते. रात्री साडेनऊला तिची शाळा संपेपर्यंत मी अजिबात झोपत नाही. मग मात्र आई झोपायला आली की मी झोपते. कारण आई थकून जाते.
बाबा ऑफिसला गेला की मी आणि आई घरभर पसाऱ्याची नदी करतो. मणी, पझल्स,पुस्तकं, पपेटस आणि ठोकळे एकत्र करायचे आणि पसरून द्यायचे. त्याला पसाऱ्याची नदी म्हणतात. मग आवरायचं असलं की मी आधी कार्ड्स मग पपेट्स आणि मग मणी शोधून शोधून आईला देते. मला आई कधी कधी राजमा खेळायला देते. राजमा टोपल्यात घेऊन आवाज करत चमच्याने एकीकडून दुसरीकडे टाकत सैपाक करायला मला खूप आवडतं. पण राजमा कार्पेटवर लपून बसला की पायांना टोचतो म्हणून लगेच भरून ठेवावा लागतो. ते काम मीच करते.
एक गंमत सांगू का? समोरच्या कालव्यातले पक्षी किर्रर्रर्रर आवाज करतात ना,तो ऐकून ऐकून मला रडायचं किंवा चिडायचं असलं की मी पण अगदी तसाच आवाज काढायला शिकलेय ! तो आवाज आई आणि बाबाच्या आवाजा पेक्षा खूप मोठा असतो. वरच्या आजी आजोबांना पण ऐकू जातो. आणि जे काय चालू आहे ते मला अजिबात आवडत नाहीये हे आईबाबाला आपोआप समजतं. म्हणजे मला गोष्टीतल्या बॉबीसारखं पॉटीवर बसून शी शु करायला अजिबात अजिबात आवडत नाही. तरीपण मला त्यावर बसवलं की मी किर्रर्रर्रर किर्रर्रर्रर आवाज करून रडायला लागते ! बाहेरून घरात येताना, खूप वेळ टबात आंघोळ करून हाताची पायाची बोटं म्हातारी झाली तरी मला उठायचं नसतं. आई माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष देत मला उचलून टॉवेलमध्ये गुंडाळते तेव्हा पण तसंच ओरडते. मग आई मला क्रीमचा डबा खेळायला देईपर्यंत मज्जा !
फोनवर लाल बटण असतं. आणि हिरवं बटण असतं. मला लाल रंग आवडतो म्हणून फोन सुरु असला की मी लाल बटण दाबते. अण्णा, काका, मामी किंवा मावशी किंवा आजीला खेळणी पुस्तक दाखवून झालं की मी लाल बटण दाबते. मग ते जातात. आई पुन्हा फोन करते आणि बोलते तेव्हा मात्र मी माझी खेळते. कारण मोठ्या माणसांना काम करायचं असतं.
मला पण खूप काम असतं. ड्रॉवरमध्ये पावडर टिकली आहे की ते रोज बघायचं असतं. त्यासाठी रोज डब्यातून पावडर सांडून बघावी लागते. घरातल्या सगळ्या आरशात मनु सापडते का ते तपासायचं असतं, गुडमॉर्निंग फ्रेंड्स,फन टाइम्स हे नवीन गाणं पाठ होईपर्यंत तेच तेच तेच तेच ऐकायचं असतं, tv वर मुळा काही उपटेना बघायचं असतं... हे सगळं उड्या मारत आणि इकडून तिकडे पळत करायचं.मग मनु थकून जाते.
आईला झोपायला नेते. मग आम्ही जय जय समर्थ श्लोक म्हणतो मला तीन श्लोक येतात आई त्याच्या पुढचे दोन म्हणते मग मी ओम शांति म्हणते आणि बाकीची बडबड सुरू करते. आई वाचत बसते मी बडबड करत सेम ! मग थोड्या वेळाने मला आईने हळूच पांघरूण घातलं आणि कपाळावर पापी घेतली की गुडूप झोप लागते.
Thursday, 19 November 2020
अमोहाची डायरी 5
Tuesday, 22 September 2020
अमोहाची डायरी ४
Friday, 21 August 2020
अमोहाची डायरी ३
"हिला एवढे पाय फुटलेत ना! दोन मिनिटं एका जागेवर थांबेल तर शपथ!" असं आई फोनवर कोणाला तरी सांगत होती. पण मला तर दोनच पाय आहेत! त्या दिवशी सकाळी अचानक मला समजलं की आपल्याला हातही दोन आहेत! मग मी पुन्हा पुन्हा आरशात बघून खात्री करून घेतली की मला खरंच दोन दोन हात आहेत. हे बाबाला सांगितलं तर तो थक्कच झाला! मग त्याने बघितलं तर काय त्यालाही दोन दोन हात आहेत! आम्ही दोघे आईकडे गेलो तर तिलाही दोन हात !!! मला दोन दात आले तेव्हा आई म्हणत होती अजून थोडे दात आले की मला गाजर चावून खाता येईल. तसं आता पुढचे हात कधी येतात ते मी रोज उठले की आरशात बघते. कधी कधी मी मज्जा म्हणून रडत असेल तर आई मला अजून हात आले का ते बघायला आरशासमोर पाठवते मग रडायचं राहून जातं!
सध्या रोज आंघोळझोप झाली की मी जेवते आणि आईसोबत गाणी ऐकते. मला खूप गाणी पाठ झालीत पण मी सांगितलेले शब्द वेगळ्याच आवाजाचे असतात म्हणे! मी सारखी बडबड करत असते. त्यातलं फारच थोडं या मोठ्यांना कळतं. रडताना पण मला वेगवेगळ्या चालीत रडून बघायला फार आवडतं. कधी सावकाश कधी भरभर,कधी थांबून कधी थुंकीचा फुगा करत,कधी आ ई उ ओ असे सूर लावत रडलं की छान वेळ जातो. शिवाय कुणी कशाला नाही म्हणत असेल की आपण मोठ्या आवाजात रडायचं म्हणजे मला नाही म्हणलेलं आवडलं नाही हे तरी त्यांना कळतं. म्हणून मी रडते. त्याचा उपयोग कळण्यापुरताच! आई बाबा काही सगळे हट्ट पुरवत नाहीत!
मला इथं तिथं चढून उंचावरून खाली कसं दिसतं ते बघायचं असतं. आई बाबा आधीच उंच आहेत. त्यांना उंच न चढताच सगळं वेगळं छान दिसतं. त्यांना कसं दिसतं ते बघण्यासाठी मला कशावर तरी चढावं लागतं. मग मी पेपरवर चढते,पुस्तकावर चढते,शूजवर चढते,सोफ्यावर चढते,खुर्चीवर चढून तिच्या हातावर पण चढते! मग मला उंच झाल्यासारखं वाटतं. मला टेबलवरचं काही घ्यायचं होतं म्हणून मी पेपरवर चढले तर सगळे मला हसले ! अजून एक गंमत सांगू का? मला गच्चीच्या रेलिंगवर पण चढता येतं! पण आई बाबा घाबरतात. बाबाने तिथं एक पक्की जाळी लावली आहे तिच्यात माझं बोट अडकलं होतं ! ते दोघे सतत वर चढायचं नाही सांगतात म्हणून मी पण त्यांना तसंच सांगते! बाहेर जायचं,रेलिंगवर चढायचं आणि मोठयाने ओरडायचं-मनूsss वर चढायचं नाsss ही !
शनिवारी रविवारी बाबाला सुट्टी असली की दोघेही माझ्यासारखंच पाय फुटल्यासारखी कामं करत असतात. मग मलाही काम करावंच लागतं! मी माझ्या घोड्याला आंघोळ घालते, त्याला खाऊ देते, माझं घर आवरते,गुळण्या करून हॉल मध्ये पाणी सांडलेलं असतं ते पुसूनही घेते, भाजी तोंडाने तुकडे करून देते, ट्रॉलीतली भांडी खाली काढते, भाजलेले दाणे निवडते !! आता मला दोन चेंडू हातात एकत्र घेता येतात. खरं तर मला दोन हात आहेत समजल्यापासून या हातात किती किती वस्तू एकदम घेऊ असं होतं! खडे,मुरमुरे, फुटाणे,वाळू,चेंडू,पुस्तकं, पेन्सिली असं दोन हातात मावेल एवढं उचलून सांडायला फार मज्जा येते! फक्त काल अननस ठेवलेला मोठा डबा हातातून खाली पडला तो पायावर पडला नाही हे नशीब असं बाबा म्हणत होता!
सगळी कामं झाली,अभ्यास झाला जेवण झालं की आम्ही तिघे गच्चीत बसतो. त्यावेळी मी रेलिंगवर किंवा खुर्चीवर चढत असले तरी पाय अडकायची भीती वाटत नाही. उन्हाची मोठी छत्री आहे तिचा दांडा धरून गोल गोल फिरताना कधी कालवा दिसतो कधी बाबा दिसतो! मग मी यिप्पी करून ओरडते! मग मी पाऊस बघते आणि आनंदाने भिजत ओरडते! पाऊस मला माळ देतो. तिला हात लावला की ती गळून जाते. तरीपण मला असं खेळायला आवडतं. कधीकधी मी आणि बाबा पावसात खाली बसून अरिंगमिरिंग किंवा आपडीथापडी खेळतो.
माझा आवाज ऐकून वरचे आजी आजोबा लगेच खाली वाकून माझ्याशी गप्पा मारायला येतात. त्यांची आई मात्र असं वाकून बघायचं नाही असं त्यांना का सांगत नसेल ! पण ते दोघे मला फार आवडतात. ते खाली रस्त्यावर उभे राहून माझ्यासाठी गाणी म्हणतात,उड्या मारतात आणि नाचतात सुद्धा! ते निघाले की मोठा आवाज काढून रडते म्हणून आई मला मनुका हव्यात का किंवा बडीशेप हवी का असं विचारते. ते खाऊन येइपर्यंत ते दोघे गेलेले असतात! मला ते पण आवडतात आणि मनुका सुद्धा आवडतात! काय करावं!
शेजारच्या मावशीशी बोलायला पण मला फार आवडतं पण ती काम करतेय असं सांगून आई मला आत आणते. खरं तर मी फार बोलत नाही. नुसती दर थोड्या वेळाने पिपपिप असा आवाज करून तिला बोलावते. ती माझ्याकडे बघून काहीही बोलली तरी मी पिपीप वरच ठाम राहते. हसून तिने काम सुरू केलं की मी पुन्हा पीपीप करते 😁
आई आणि ती वेगळ्या आवाजात बोलतात ते मला काही कळत नाही. मी नुसत्या यास यास असा आवाजाने त्यांचं बोलणं थांबवू शकते!
तुम्हाला सांगू का, आजकाल माझी आणि आईबाबाबांची फारच जास्त भांडणं होतात! मी बोलतेय ते त्यांना कळत नाही,ते सांगतात ते मला करायचं नसतं आणि म्हणून मी मोठ्याने खाली बसून रडून सांगते तर ते बुचकळ्यात पडून नुसते बघत राहतात त्यांचं काय करावं ते कळत नाही! म्हणजे कपडे घालणं, जेवताना एका जागी बसणं, बागेत खेळून झाल्यावर घरी येणं, कुणी गप्पा मारत असेल तर टाटा करणं,एक पुस्तक एकदाच वाचून मग दुसरं वाचायला घेणं, कार्पेटवर गुळण्या न करणं,आंघोळ झाली की केस पुसू देणं अशा विचित्र गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत! रोज केस पुसताना मी राडा घालते त्याला कंटाळून आईने माझी कटिंग करून टाकली! बाबा मला जिंगल टूनस दाखवत होता तेवढ्यात केस कुठंतरी निघूनच गेले म्हणे!
मी एकदा नीट बोलायला लागले की आपली भांडणं अर्धी होतील असं आज मला बाबा म्हणत होता. मी तर खूप नीट बोलते ! मी आता 20 महिन्यांची झालेय ना! हे दोघे अजून थोडे मोठे झाले की त्यांना माझं बोलणं कळेल असं मला वाटतं!
आता मी सायकलवर बाहेर जाणार आहे. उन्हाळा संपला की जायला नाही मिळणार म्हणून सध्या रोज बाहेर जातो आम्ही ! बाहेर गेले की काय मजा होते ते नंतर सांगेन! बाय बाय !
Monday, 10 August 2020
अमोहाची डायरी 2
मी अमोहा. मला आईबाबांना लोंबकळत रहायला फार आवडतं म्हणून ते मला फांदी म्हणून चिडवतात. पण मी आता 16 महिन्यांची म्हणजे नीटच मोठी झाल्याने मी चिडवण्याकडे दुर्लक्ष देते ! 🤓
मला पुस्तकं खूप आवडतात. म्हणजे खेळायला आई किंवा बाबा असतील तरच खेळणी आवडते.बाबा ऑफिस गेला की आई तिचं काम होइपर्यंत मला माझी गाणी लावून देते. मग मी आईला सोडून देते आणि गाणी ऐकत पुस्तकं वाचते ! आपली आपली ! म्हणजे आई किंवा बाबाने ती गोष्ट आधीच सांगितलेली असते मी फक्त चित्र वाचते. 👧
ते ससुल्याचं पुस्तक आहे ना त्यात वेगळे वेगळे प्राणी हाताला कसे लागतात ते बघता येतं. त्यात ससा,कुत्रा,खारुताई असे मऊ मऊ लोक आहेत. 😍
ते बेडकाचं पुस्तक आहे त्यात सगळे प्राणी माझ्याशी बोलतात ! बेडूक,डुक्कर,घोडा,गाय,चिऊताई असे आपल्या आपल्या भाषेत बोलतात. माझ्याकडे अशी 4 पुस्तकं आहेत.😎
तीन पुस्तकं आहेत त्यातली दोन पुस्तकं कापडी आहेत. म्हणजे कधी कधी ती पुस्तकं तोंडात घालायला, टोपी करायला,बुआ कुक खेळायला मला फार आवडतं! आणि तिसरं पुस्तक प्लॅस्टिकचं आहे. मी आंघोळ करताना त्याला पण आंघोळ घालते! मज्जा! 🤗
अजून खूप पुस्तकं आहेत. पण त्यांच्याबद्दल सांगायचा मला आता वेळ नाही. मराठी,इंग्रजी आणि डच एवढी पुस्तकं आवरून ठेवायला सांगितलं आहे बाबाने. त्याची मीटिंग झाली की तो मला नवं पुस्तक देणारे 😀
२३-एप्रिल-२०२०
अमोहाची डायरी १
थोडा वेळ बाल्कनीत बसून मुंगीबाई शोधली. परवा खाऊन बघितली तर मला काही फार आवडली नव्हती म्हणून आज तिलाच बिस्कीट खायला दिलं. आणि आईला बजावून सांगितलं"मुंगीबाई खायचीsss ना ही ss !!!
मग 2 स्कुटर,5 सायकल आणि 5 होड्या बघितल्या. गाडीतून कोणीतरी आलं त्यांना हाय केलं. मोठी बोट जात होती तिला टाटा केलं. कबुतरं बघितली. शेजारच्या आजींना याssस याss स असं म्हणून दाखवलं. त्या नुसत्या हसतात. आणि तोंडातून चित्रविचित्र आवाज काढतात!
घरात आले तर वाटीत फुटाणे दिसले. मग ते सांडून बघितल्यावर खावे वाटले. आई म्हणते सांडलेलं तोंडात घालायचंsss ना हीsss !!! शिवाय मला अजून दाढ आली नाही ना म्हणून सांडलेले सगळे फुटाणे 23 चकरा मारत आईला आणि बाबाला भरवले.
पोळीचा वास आला की पटकन स्वयंपाकघरात जाऊन भुक्का भुक्का ओरडले. बाबाने मग दूध पोळी कुस्करून दिली. मला वंचं आणि चट्टी दोन्ही हवं होतं पण बाबा म्हणे एका वेळी एकच म्हणून आंब्याचं वंचं खाल्लं.
किती वेळ झाला तरी आई आंघोळ घालत नव्हती. म्हणून शी करून टाकली. आपोआप आईने दुसरं डायपर घालायच्या आधी पटकन आंघोळीला बसवलं. मग खेळायचं कासव उलटं करून त्यात पाणी भरून थोडं पिऊन बघितलं पण तेवढ्यात आईने बघितलं तेव्हा तिला अंघोळ पाणी प्यायचं ssss ना ही !! असं जोरात सांगितलं.
मला केस विंचरून घ्यायला अजिबात आवडत नाही. आईने कपडे घालून दिले की मी पळून गेले. मग बाबाला साराची गोष्ट वाचायला सांगितली. तो म्हणे सकाळपासून एक्कावन्नवेळा वाचून झालीय ती !!! दुसरं पुस्तक आण. मला खरं तीच गोष्ट हवी होती पण बाबा रडेल म्हणून मी दुसरं पुस्तक आणून दिलं.
बाबा कामाला जायच्या आधी आई फार कामात असते. मग आई आली की बाबा कामाला जातो. तो गेला की आईने पुस्तकं आवरूया म्हणलं. मला छानच झालं. कोळी किड्याचं आणि गोगलगायीचं 400 वेळा वाचून झालेलं पुस्तक आईने कंटाळून लपवून ठेवलं होतं ते सापडलं !!! ते बघून आई अरे देवा पण म्हणाली.
पुस्तकं असा ढीग करून बसायला मला फार आवडतं. खेळणी पण अशी ढीग करून ठेवायला आवडतात. पण पुस्तकात जास्त रंग असतात ! आणि खूप गोष्टी.
आई पुस्तकं आवरत असताना मी तिला 3 गोष्टी वाचून दाखवल्या. आई पण पुस्तकं आवरायला काढली की अशी न आवरता हे ते पुस्तक हातात घेऊन वाचत बसते. मला पण तसंच आवडतं.
शेवटी बाबाने पुढच्या कामाची म्हणजे मला झोपवण्याची आठवण केल्यावर भराभर जागेवर गेली पुस्तकं.
आईने सीपर दिलं पण मला ग्लासनेच पाणी प्यायचं होतं. मग 5 घोट सांडून 1 घोट पाणी तोंडात गेलं. कारण मी सध्या गुळण्या करायला शिकतेय त्याची प्रॅक्टिस राहिली होती. शर्ट भिजला. पॅन्ट भिजली. मग आईने ती बदलताना मी अजिबात रडले नाही. त्यात काय ! एवढी मजा करायची असेल तर पाणी सांडणारच ना!
आईला म्हणलं चंदाला बोलावून झोपू तर ती म्हणे दिवसा चंदा कामात असतो.
सगळे माझ्यासारखं काम करतात. आता मी जरा दमले. पीच खाऊन सुस्ती आली. झोपते.
उठल्यावर समोरच्या कालव्यात बदकांची पिलं मला भेटायला येणारेत.
- अमोहा , साडे एकोणीस महिने














































