Friday, 23 December 2022

Its life you know...

 या घरात रहायला आल्याबरोबर सर्वात जास्त आवडली होती ती बाल्कनी ! एका बाजूला रोजमेरी अस्ताव्यस्त वाढलेली तिच्या खाली चार फुलझाडं लावण्यापुरतीच जागा आणि दुसऱ्या बाजूला एक खूप शेवाळलेलं एकही पान नसलेलं झाडाचं खोड! ते झाड कशाचं असेल याचा अंदाज लावत बसायचो आम्ही!

ती वसंताची सुरुवात होती. हळूहळू झाडाच्या फांद्या रूप बदलू लागल्या. काड्यांना डोळे आले. कोवळी पोपटी पानं चक्क कडुनिंब आहे असं म्हणू लागली.
मग एक दिवस पानं मोठी होऊन तुऱ्यांसारख्या काड्या वर आल्या आणि त्यांना घोसाने कळ्या लगडल्या. सध्या हे सोनसळी रूप दिवसरात्र सोबत आहे. याचं नाव काय म्हणून गुगल केलं तर याचं नाव चक्क 'प्राईड ऑफ इंडिया' असं निघालं आहे! यालाच गोल्डन रेन ट्री पण म्हणतात. आम्ही आपलं सोनमोहर नाव ठेवलं !
त्यावर शेकडो मधमाशा आणि भुंगे अखंड सूर लावून घुमत असतात. खालचा लालू बोका त्या भुंग्याची शिकार करायला म्हणून सरसर वर चढून येतो आणि आमच्या बाल्कनीत मुक्काम ठोकून बसतो. दुपारची वेळ चिमण्यांची असते. त्या वेळी मात्र भुंगे येत नाहीत.
गंमत म्हणजे एवढं लख्ख ऊन पडूनही खोडांवरच्या शेवाळाच्या छटा तशाच आहेत.
परवाच्या वादळात इथं खूप नुकसान झालंय. मागच्या आवारातली मोठी बाभळीसारखी आणि आपट्यासारखी दिसणारी झाडं मुळापासून उन्मळून पडलीत.
आल्याबरोबर या जागेला आपलं म्हणावं असं ज्यामुळे वाटलं तो वडीलधारा पंचवीस तीस वर्षांचा लिंडन मुळापासून उन्मळून पडला ते बघून दोघांनी आवंढा गिळला!
परवा शेजारणीशी गप्पा मारताना त्या झाडांबद्दल विशेषतः लिंडनबद्दल हळहळत होते तर तिलाही तेवढंच दुःख झालेलं! एक मोठा सुस्कारा सोडून it's life you know...! एवढंच म्हणाली ती.
घरात आलं की हा सोनमोहर दिसतो, त्याच्या आडून पाहिलं की उन्मळून पडलेली झाडं दिसतात. त्या झाडांच्या हिरव्या भिंतीला भगदाड पडल्याने एरवी न दिसणाऱ्या दूरच्या टेकड्या दिसतात. याचा आनंद वाटला तर अपराधी वाटतं. पारवे चिमण्या अजूनही त्या आडव्या पडलेल्या झाडांवर नांदताहेत त्यामुळे शक्य असेल तितके दिवस ती झाडं उचलून त्याची लाकडं करू नयेत असं वाटत राहतं.
दारातला लिंडन पण अजून उचलला नाही. सावली नाही, कळ्या फुलांचा सुगंध नाही तरी त्यावरही अजून पाखरं बसतात.
त्याच्या मूळखोडाचा चार हाताच्या कवेत मावणार नाही एवढा पसारा बघताना शेजारी असलेला बाळ लिंडन दिसतो.
आणि शब्द आठवतात, Its life you know...!

२२ जुलै २०२१


No comments:

Post a Comment