Friday 23 December 2022

पाकपुरी

लहानपणी गोड फारसं आवडायचं नाही. पुरणपोळी या प्रकाराचा तर भयंकर कंटाळा यायचा. ज्या कुणी नैवेद्यासाठी पुरणपोळी हा पदार्थ ठरवला त्यांच्याकडे फक्त आणि फक्त हरबरा डाळच पिकत असणार यावर कसा विश्वास ठेवायचा म्हणे! घरात दूध दुभतं भरपूर असूनही गेल्या पंधरा वीस वर्षात मराठी स्वयंपाक घरात शिरलेले रसमलई, रसगुल्ले, रबडी इ पदार्थ तेव्हा नसायचे. श्रीखंड,बासुंदी, गुलाबजाम, जिलबी ऋतूनुसार व्हायची किंवा अगदी थोरल्या सणांना किंवा अगदी महत्वाच्या पाहुण्यांना! मग वर्षभरात येणाऱ्या त्यामानाने धाकट्या सणवाराना,सहज आल्यागेल्याला खाऊ म्हणून कणकेचा शिरा, रव्याचा शिरा, हातशेवईची खीर, साखरभात,कसले ना कसले लाडू, यांच्या ओळीत पुढे असायची पाकपुरी ! हे कुठलेही पदार्थ रीत म्हणून खायचे असं असायचं! आवड म्हणून फक्त श्रीखंड ! असं करूनही दर वेळी आई तेवढ्याच उत्साहाने करायची आणि आम्हाला खायला लावायची!

आमचं संघकार्यकर्त्याचं घर असल्याने घरी सतत माणसांचा राबता असायचा. आठवड्यात सरासरी चार माणसं बटर जेवायला असायचीच. कधी कधी त्यात अनेक दिग्गजही असायचे. आमच्याकडे सगळ्यांना निःसंकोचपणे इच्छाभोजन असायचं. आमंत्रण अण्णांनी दिलं असलं तरी नंतरचा विषय आई हातात घ्यायची. सरळ पाहुण्यांना विचारायची की तुम्हाला काय जेवायचं आहे! ते म्हणाले पिठलं भात तर पिठलं भात,ते म्हणाले खीर पुरी तर खीर पुरी! अजून एक म्हणजे जेवायला बसल्यावर ओ येईपर्यंत किंवा खाणाऱ्यांना अगदी नको होईपर्यंत आग्रह करायची पद्धत आजही आमच्याकडे नाही. जेवणाराने हसतखेळत मन-पोट भरेल एवढं जेवावं, त्यात आग्रह मानपान वगैरे फालतू गोष्टी आणू नयेत ही रीत मीही माझ्या घरी पाळते.
एकदा घरी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त येणार होते. त्या काळी गोट्या ही त्यांची मालिका फार आवडती असायची. एवढा दिग्गज माणूस आपल्याकडे जेवायला येणार म्हणल्यावर काहीतरी भारी मेनू करावा असं आईला वाटत होतं. पण नेहमीप्रमाणे त्यांनाही हा प्रश्न गेला की ! ते म्हणाले तुम्हाला पिठल्याच्या वड्या येतात का? आणि पाकातल्या पुऱ्या?? ही फर्माईश बघून आई हसायलाच लागली! शेवटी इच्छाभोजन महत्वाचं. आमच्या घरात चार जणांच्या डायनिंग टेबलवर बसून राजदत्त पिठल्याच्या वड्या, पाकपुऱ्या आणि भरीत भाकरी खात आहेत हे चित्र मनावर एवढं कोरलं गेलं की तेव्हापासून चक्क पाकपुऱ्या ग्लॅमरस वाटू लागल्या! पुढे ही पुरी माझ्या आवडीच्या पदार्थात जाऊन बसली.
आज असेच एक मोठे पाहुणे घरी यायचेत तर आईची आठवण काढत, सासूबाईंकडून रेसिपी तपासून घेऊन पाकपुऱ्या केल्यात!
पाहुण्यांना आवडणार आहेतच! पण आईला पण या खूप आवडल्या असत्या !
तुम्हाला सांगू का कृती?
वाटीभर कणिक असेल तर पाव वाटी बारीक रवा घ्यायचा. दोन्ही मिसळून किंचित मीठ घालून अगदी चमचाभर तुपाचं मोहन घालायचं. त्यात आंबट ताक किंवा दही घालून घट्ट मळून गोळा अर्धा तास मुरू द्यायचा.
मग एकीकडे वाटीभर साखर थोडं पाणी घालून एकतारी पाक करून घ्यायचा. पहिली उकळी आली त्यातच केशर, वेलची घालून दुसरी उकळी आली की गॅस बंद करायचा.
आता लहान लहान पुऱ्या लाटून तेलात तळून गरम असतानाच पाकात घालायच्या. दुसऱ्या घाण्यातल्या पुऱ्या तळत आल्या की आधीचा घाणा पाकातून काढून तिरक्या निथळत ठेवायच्या.
सगळ्या पुऱ्या झाल्या की हवी तर सजावट करायची आणि खायला घ्यायच्या.
या पुऱ्या शिल्लक राहिल्या तर फ्रिजमध्ये आठ दिवसही उत्तम राहतात.
वेळप्रसंगी पंगत असेल त्याच्या दोन दिवस आधी करून ठेवल्या तरी पाकात मुरलेल्या पुऱ्या अजून मस्त लागतात.
सोपी आहे ही कृती. पाकात साखरेच्या ऐवजी मीठ घातलं तरच फक्त बिघडेल!

२५ जुलै २०२१




No comments:

Post a Comment