प्रिय,
या नोंदीला थोडा उशीरच झालाय. संसार मांडणं सुरू होतं. आता इथलं घर भरून गेलंय. कपाटं,बैठक,पडदे,टेबल खुर्च्या सगळा पसारा पुन्हा एकदा मांडला. जे घर आपल्याला मिळतं त्याला आपली ओळख देणं हे एवढं मोठं व्यापाचं काम असतं हे कितव्यांदा तरी पटतंय. मनासारखं घर लावेपर्यंत घरातले रिकामे भिंती कोपरे आता काय बरं करणार ही असं कुतूहलाने बघत असतात त्याचा नाही म्हणलं तरी वैतागच येतो.
परवा पासून नेटाने सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली. आता ओळखीच्या झालेल्या वाटा निवडताना मनात प्रश्न नसतो. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांच्याकुरणांच्या मधून फिरायचं की नदीच्या पाण्याबरोबर चालायचं एवढंच ठरवायचं असतं. दोन्ही नकाशे सरळ असले तरी मनात लपलेली मांजरीची पिलं इथं वाकून बघ,तिथं वळून बघ,इकडं चढ तिकडं उतर करत चाळीस मिनिटांचा फेरफटका तासाभराचा करतातच!
जराशाच उंच टेकाडावर असलेल्या घरातून उतरून सरसर उतारावरून डावीकडे वळलं की एक मोठा रस्ता लागतो. तो ओलांडून पुढं गेलं चक्क दोनचार एकर शेत आहे! शेत ओलांडलं की घरांची एक रांग की लागलीच क्रिसबाख नदी!
खरं तर ओढा म्हणावा एवढीच लहान आहे ती. जरा पाऊस पडला की आजूबाजूच्या डोंगरातलं पाणी खळखळ करत हिच्यात येतं की फुगूनच जाते ही! एरवी नितळ पाणी असतं पण एक जोरदार सर आली हिचा नदीभर चहा होतो! माझं येताजाता नीट लक्ष असतं हिच्याकडे. आधी लहान लहान वाटणारी शेवाळाची आणि कसल्या कसल्या पाणगवताची बेटं आता वाहत्या नदीत हिरवी लुगडी प्रवाहाबरोबर झुळझुळावी तशी दिसतात. एका गवताला तर चक्क सुंदर पांढरी फुलं आलीत. त्या नितळ पाण्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू पाहणारी बदकं बघणं फार मोठा विरंगुळा असतो!
तसंच पुढं गेलं की मागे तुला दाखवलं ते रापसीडचं शेत. ती पिवळी फुलं संपून शेंगा आल्या आणि त्याही आता पिवळ्या पडायला सुरुवात झालीये. थोड्याच दिवसात कापणी होऊन तेल तयार करायला घेऊन जातील. मग थंडी सुरू व्हायच्या आधी तिथं अजून काही लावतील का असं मला कुतूहल.
त्या शेताला लागून एक जंगल आहे. पलीकडच्या गावाला जायचा शॉर्टकट. एवढ्या दाट निर्मनुष्य जंगलात शाळेची पोरं, पोरीबाळी, म्हातारे यांच्या निर्भय सायकली ये जा करताना बघून इथल्या सुरक्षिततेचा हेवा वाटला.
नदीकाठ न सोडता काल अजून दोन किलोमीटर पुढं गेले. आमचं गाव बहुदा संपलं असावं. रस्त्यावर तुरळक पळणारे मुलं मुली,कुत्री फिरवायला आलेले लोक आणि शेतात कामाला सुरुवात करणारे लोक. कसली कसली यंत्र घेऊनच शेती करतात हे लोक. मी आपलं निंदणीला आलेल्या बाया कुठं दिसतात का बघत होते!
हां तर इथं हा भाग घरांचा आणि हा शेतीचा अशी काही वाटणीच नाही. घरांच्या ओळी बघत तुम्ही जात असता. मध्येच बंगले,साधी वाटावी अशी कौलारू घरं, मधेच तीन मजली अनेक बिऱ्हाडं असलेल्या इमारती, त्यांच्यासमोर राखलेल्या बागा, भोवताली आवर्जून वाढू दिलेली अस्ताव्यस्त झुडुपं, काही घरांमध्ये चक्क स्वतःची तळी त्यात पाळलेली बदकं, पाणकोंबडे वगैरे हे बघता बघता अचानक शेत सुरू होतं!
शेतात गहू,सोयाबीन,बार्ली नाहीतर ओट्स चक्क.
ती एक गंमत सांगते. गहू ओळखू आला, बार्ली गुगलवर बघून समजली पण ओट्स मात्र कळत नव्हते. ओट्स एवढ्या आवडीने खाणारी मी पण ओट्सचं शेत कसं असेल याचा कधी विचारच केला नव्हता. तर मी वाकून पान तोडून,ओंब्या तोडून,हातात घेऊन चोळून वास घेऊन परेशान होत असलेली बघून चालायला आलेलं एक जोडपं काळजीने जवळ आलं. त्यातली स्त्री मी बरी आहे ना,माझं काही हरवलं आहे का असं विचारू लागली. मी हे शेत कशाचं आहे हे विचारल्यावर त्यांचे चेहरे वैतागलेच! "ओट्सचं शेत आहे हे " एवढं उत्तर फेकून मारल्यासारखे करत दोघेही तरातरा पुढं निघून गेले! यात एवढं वैतागण्यासारखं काय होतं काय माहीत!
पण ओट्सचं शेत हे नवं नवल होतं खरं!
तसंच नवल परवा गेलेल्या सहलीत सापडलं. भलं मोठं शेत त्यात वांग्याची नाहीत,भोपळ्याची नाहीत,भेंडीची नाहीत अशी रोपं. रस्ता सोडून चिखलात पाय घालत पुढे जाऊन बघितलं तर कुरजेट( झुकीनी) ! कुर्जेटाचं शेत म्हणल्यावर मजाच वाटली!
मेकलीनला असताना घरासमोरची झाडं अक्रोडाची आहेत हे समजल्यावर वाटलं होतं तेवढंच नवल आणि आनंद प्रत्येक नवं झाड पीक समजल्यावर होतो.
त्यावरून आठवलं, इथं घराच्या खाली माझा लाडका लिंडन, चेस्टनट आणि मागच्या कोपऱ्यात छोटं का होईना अक्रोडाचं झाड आहे हे समजल्यावर कुणीतरी ओळखीचं आजूबाजूला आहे असं वाटलं.
या नदीकाठच्या रस्त्यावरसुद्धा तीन मोठमोठी अक्रोडाची झाडं आहेत. कुणाच्या मालकीची नसावीत. त्यांना यंदा चांगलाच बहर आहे. कालपरवा झालेल्या वादळात छोटे कच्चे अक्रोड गळाले ते मात्र वाईट झालं. आता अजून दीड दोन महिन्यात अक्रोड पिकून गळायला लागतील तेव्हा इथं येऊन गोळा करेन.
घरी परतताना घराजवळच्या शेतावरून आले. अर्ध्या भागात गहू आहे आणि अर्ध्या भागात बीटरूट. गहू उगवला2तेव्हाच ओळखू आला होता पण बीटरूटला मात्र पालक समजले होते. आता पानं मोठी होऊन दांड्या लालसर दिसल्यावर बीटरूट आहे असं समजलं. वाहता रस्ता, घरांच्या गर्दीत मधेच असं शेत असून त्याला कुंपण नाही हे बघून पुन्हा नवल वाटलं.
सध्या इथल्या सुंदर घरांची कुंपणं गुलाबांच्या वेलींनी बहरली आहेत. आवर्जून लावलेले लावेंडर जांभळ्या सुगंधाने हवा हलकी तरल करतात.लिंडन ऐन बहरात असल्याने कुणाकडेही लक्ष न देता फक्त लाखो फुलं उधळत राहतो. रस्त्यावर सकाळी सकाळी चालताना ढबु गोगलगायीचे रात्रीतून स्थलांतर करणारे पण अर्धाच रस्ता पार करू शकलेले तांडे चुकवत चालावं लागतं.
अशी कसरत करत आपण चालत असतो आणि एका ठिकाणी एक मावशीबाई गोगलगायीच्या अख्ख्या तांड्याला कसल्याश्या भल्यामोठ्या पानावर अलगद उचलून रस्त्याच्या काठाला नेऊन सोडताना दिसते. तो क्षण तुम्हाला उजेड देऊन जातो. घराजवळ आलं की घाईघाईने ऑफीसला निघालेली सुटबुट टाय बांधलेल्या शेजारीण चार पावलं मागं येऊन पर्स बाजूला ठेऊन नळ सुरू करून आज कडक ऊन असणार हं असं तुम्हाला सांगत सगळ्या सार्वजनिक रोपांना पाणी शिंपडून मग कामाला निघते! पोस्ट बॉक्स मध्ये लेकीने खालच्या आजोबांच्या अंगणात टाकलेले कंगवे, चेंडू त्यांनी आणून ठेवलेले असतात. जिन्यापाशी एक शेजारीण तू माझ्या मुलीला इंग्रजी शिकव आणि तू तिच्याकडे जर्मन शिक असं आवर्जून सांगते. दिवस असा सुरू व्हावा.
No comments:
Post a Comment