प्रिय,
या देशातला पहिला उन्हाळा रमतगमतच चालला आहे. अधूनमधून येणारा पाऊस आणि अधूनमधून येणारे स्नेही यांच्यामुळे सगळं आल्हाददायक आहे.
इथला पाऊस वेगळाच आहे बघ. समोर टेकड्या दिसतात ना तिथं कबड्डी खेळणाऱ्या मुलांसारखे ढग जमा होतात. दोन बाजूला दोन संघ. त्यांचा तो विशिष्ट 'सलेटी' रंग चढेपर्यंत व्यूहरचना चालू असते. आणि मग कडकन एखादी वीज चमकते आणि सामना सुरू होतो! गडगडाट काय लखलखाट काय कडकडाट काय काही विचारू नको ! प्रत्यक्ष पाऊस पडतो त्यापेक्षा तिप्पट हा गोंधळच जास्त ! रात्र असली तर हे अजूनच रौद्र दिसतं. समोरची काळूबाई हॉरर सिनेमात केस सुटलेली हडळ दिसावी तशी हुबेहूब दिसते! झाडांचे डोळे विचित्र चमकत राहतात, तळी, डबकी दोन्ही कोपरं दुमडून बारीक डोळ्यांनी बघणाऱ्या मांजरासारखे दिसायला लागतात..
दिवस असेल तर पाऊस टेकड्यांवरून लोळण घेत आमच्या गावावर येताना दिसतो !
इथं हवामानाचा अंदाज बहुतांशी चुकत नाही. सगळ्या लोकांना तो बघूनच कामं ठरवायची सवय असावी. आम्हाला बऱ्याच गोष्टी लोकांकडूनच कळतात. लख्ख ऊन असतानाही रेनकोट घालून बाहेर पडणारी माणसं, झिमझिम पावसात सायकली काढणारे लोक, ढग आलेले असताना वेग वाढलेल्या गाड्या यातून हवामानाचा अंदाज गुगलपेक्षा जास्त चांगला समजतो असं आपलं माझं मत !
परवा दिवसभर बाहेर जायचं होतं म्हणून सकाळी कपडे वाळत घालायला गॅलरीत स्टँड मांडत होते. समोरच्या इमारतीतली आजी आणि शेजारच्या इमारतीतल्या काकू दोन दा डोकावून भुवया उंचावून गेल्या गेल्या. याला म्हणलं आज नक्की पाऊस असणार आहे जरा बघ तर खरंच संध्याकाळी पाऊस लिहिलेला होता !
आमच्या लहानलहान सहलीपण चालू झाल्या बरं का! परवा इथल्या एका रिगी नावाच्या शिखरावर जाऊन आलो. पूर्ण प्रवास एवढा देखणा! पर्वताच्या पायथ्याशी विशाल जलाशय आणि त्याच्या काठावरची समृद्धीच्या खुणा मिरवणारी गावं. निसर्गाला थेट भिडून हट्टाने तिथंच राहणारी माणसं मला नेहमीच शूर वाटतात. अंगणाच्या पायरीवरून तळ्यात पाय बुडवता येईल अशी घरं बघताना ठळकपणे लक्षात येत होती ते चर्चचे मिनार ! कितीही लहान गाव असलं अगदी पाच घराचं तरीही तिथं सुंदर सुबक चर्च आहेच.
खरं तर त्या आठवड्यात वादळामुळे पुराचा इशारा होता. आम्ही जाणार त्या दिवशी पाऊस नव्हता म्हणून निघालो खरं. रेल्वे,बस आणि मग इथली प्रसिद्ध आपल्या माथेरान शिंमल्याला असते तशी छोटी झुकगाडी जी थेट शिखरावर घेऊन जाते त्यात बसलो. वर जाताना समोरच्या सीटवर एक पंचाहत्तरीची आजी बसली होती. ती एकटीच दर उन्हाळ्यात रिगी फिरायला दर आठवड्याला येते म्हणे! कुठून फोटो छान येतील, पुढे काय आहे असं सांगत होती. झरे,डोंगर,नदी,डोंगरातली एकांडी घरं, गायी हे सगळं नव्याने बघितल्यासारखी कौतुकाने बघत होती. आणि अचानक ओह नो आलं तिच्या तोंडून ! म्हणे तुमचं नशीब असेल तर ऊन पडेल आणि तुम्हाला वरून सगळं सुंदर दृश्य दिसेल ! ती असं का म्हणत होती ते रिगीला उतरल्यावर कळलं. एवढे दाट ढग होते की अक्षरशः 10 फुटांच्या पुढचं काहीही दिसत नव्हतं! वर चढत जावं लागतं तिथं दोन बाण दोन चित्रांनी दाखवले होते. एक रस्ता तरुणांनी चढण्याचा तीव्र चढ असलेला पण कमी अंतर असलेला आणि एक म्हाताऱ्यांनी कमी चढाचा पण जास्त अंतराचा ! किती लहान सूचना खरं तर ! ते सांगताना एवढी गोड कल्पकता ! आम्हाला घाई नव्हतीच आणि आम्ही दोन्ही गटात मोडत नाही अशी सोबत्यांची खात्री असल्याने म्हातारा रस्ता निवडला! समोर काहीही दिसत नसताना ढगात तरंगून खाली आलो !
मित्रमंडळी सोबत होती,रस्ता सुंदर होता आणि खाऊ जवळ होता म्हणून खूप मजा आली! मंजिलसे भी हसीन रास्ते वगैरे म्हणत खाली उतरलो. जवळपास 3 वर्षांनी एका भारतीय रेस्टोरांतमध्ये भरगच्च थाळी घेऊन जेवलो !!! अजून किती सुंदर व्हावी सहल !!
हां तर लोकांबद्दल सांगत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक आत्ममग्न आणि संवेदनशील दोन्ही एकाचवेळी असतात असं सतत वाटतं. रस्त्यावर दिसलेली गोगलगाय कुणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून उचलून बाजूला ठेवणारी बाई बघितली असा एकच प्रसंग नव्हता.
रविवारी सायकलवर चक्कर मारायला ग्लाटच्या काठाने निघालो. हवा छान असल्याने बरेच लोक फिरायला आलेले होते. गाव संपून शेतं सुरू झाली. बहुतेक शेतांमध्ये आज उद्या कापणीला आलेली पिकं वाकून उभी होती. काही ठिकाणी नुकतीच कापणी झाल्याने उरलेल्या धांडांचा वास हवेत तरंगत होता. जिथं कुठं जरासा उतार असेल तिकडं पावसाचं पाणी धावत जाऊ बारके बारके झरे खेळत होते. नदी खळखळत वाहत होती. लख्ख ऊन पडलं होतं. एवढ्यात समोर अचानक भरगच्च फुललेलं सुर्यफुलांचं शेत आलं !
सूर्यफुलं आनंद उधळतच फुलत असतात. सुगंधासारखा आनंदही आपोआप त्यांच्या आजूबाजूला पसरतो! रस्त्यावर चालणारे अनोळखी लोकही आम्हाला अतिशय आनंदाने हाय हॅलो करत जात होते.
मोह आवरला नाही म्हणून सायकली थांबवून फोटो काढायला सुरुवात केली. तेवढ्यात अजून एक पन्नाशीचं जोडपं फिरत आलं आणि त्यांनीही फोटो काढायला सुरुवात केली.
त्यातली बाई कौतुकाने प्रेमाने सुर्यफुलांकडे बघत होती ते एवढं छान दिसत होतं! मी तिला म्हणलं किती सुंदर आहेत नाही फुलं ! ती सहज म्हणाली ,"हो ना, प्रत्येका फुलाचा चेहरा किती वेगळा, आणि ती किती वेगवेगळ्या आनंदात आहेत !!!" तिच्या या वाक्यामागे काय नव्हतं! समाधान होतं, कुतूहल होतं, जगण्याची असोशी होती, अपार प्रेम होतं आणि मुख्य म्हणजे हे सगळं बघता येतंय याबद्दल कृतज्ञता होती !
हे ऐकणं,उमगणं हा त्या दिवसातला सर्वात आनंदाचा क्षण होता!
वेगळ्याच तंद्रीत निघालो तर आत्ताच आम्हाला ओलांडून वेगात गेलेल्या दोन सायकलस्वारांना थांबलेलं बघितलं! त्यातली बाई उतरून एक मोठं पान घेऊन आली आणि काहीतरी उचलून रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाखाली ठेवून त्यावर थोपटून सायकलकडे आली. कुतूहल म्हणून मी बघायला गेले तर रस्त्यावर मरून पडलेला एक उंदीर तिने उचलून बाजूला ठेवला होता. त्यावर पानं झाकली होती आणि त्याला थोपटून ती निघाली होती!
कुठून येते ही सहवेदना ? समृद्धीच्या पुढे येत असावी.
छोटं गाव, त्याला लागून भली मोठी शेतं, कुरणात चरणाऱ्या शेकडो गायी, त्यापुढे लगेचच विमानतळ आणि त्यावरून उडणारी लहानलहान विमानं, लहानलहान पण अतिशय सुखद रस्ते, वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात असणारे लहानसहान कारखाने ही समृद्धी या देशाने कशी कमावली असेल??
अशी माणसं आणि अशी दृश्य दिसली की या लोकांचा हेवा वाटतो. यातलं आपण काय करू शकतो असं मनात येतं आणि स्वप्नं पडायला सुरुवात होते.
५ ऑगस्ट २०२१
No comments:
Post a Comment