Friday 23 December 2022

अनोळखीपणाची ओळख

 काल ब्रेडची रेसिपी टाकली त्यावर काहीजणांनी विचारलं की बिघडला तर काय? म्हणलं पीठ,पाणी, तेल,मीठ, दूध, यीस्ट तेही सुमारे अर्धा तास उच्च तापमानात बेक झालेलं, त्यात काय बिघडणार आहे? फार तर फुगणार नाही. अशा वेळी नाव बदलायचं की झालं ! म्हणजे थोडासाच फुगला तर डेन्स ब्रेड,अजून कमी फुगला तर फ्लॅट ब्रेड,अजून कमी फुगला तर नान,अजूनच सपाट झाला तर कुलचा आणि सपाट कडक झाला तर खाकरा म्हणायचं त्याला की झालं काम !

🤗
तसंही पातळ पोह्यांचा उपमा, बिर्याणीची खिचडी, चटणीचं सूप, कढीचं पिठलं हे काही आपल्याला नवीन नाही 😎
यावरून काहीतरी आठवलं ते सांगते.
लग्न झाल्यापासून नवऱ्यानं असं जुळवून घ्यायला शिकवलंय मला! विशेषतः खायच्या गोष्टीत.(तसंही ते पटकन शिकलं जातं म्हणा😁)
एकदा तो हॉंगकॉंगला राहत असताना त्याच्याकडे गेले होते. तिथं भाषेचा आनंद असल्याने तसंही खाणाखुणाच करायच्या तर इंग्रजी कशाला फाडा म्हणून आम्ही हातवारे करत मराठीतच बोलायचो. पण ती गोष्ट पुन्हा कधीतरी!
तर बाजारात भाजी आणायला गेलो त्याला विचारलं इथं हिरवी भाजी काय खातोस? तो म्हणे ते बघ हिरवा पाला भरलेल्या सहा टोपल्या आहेत. तर मी दर वेळी पुढच्या टोपलीतली भाजी घेतो. मी म्हणलं,ते ठीक आहे पण ती भाजी कशी करायची ते कसं शोधतोस? तो म्हणे मी नाही शोधत. मी त्या भाजीचं नाव पालक ठेवतो आणि करतो !!!!! 🙀
या साक्षात्कारी प्रसंगानंतर मन एकदम मुक्त का काय झालं माझं ! सगळ्या अनोळखी भाज्या,फळं,कडधान्ये याबद्दलचे राग लोभ निमाले ! मनात कणभरही शंका उरली नाही. सर्व शाकाहारी पदार्थाना आमच्या घराचं दार सताड उघडं झालं. ज्या अर्थी खायच्या रॅकवर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि माणसं त्या विकत घेऊन जाताहेत त्या अर्थी त्या गोष्टी आपण खाऊ शकतो एवढं साधं गणित!
आता मला विटलोफ, ब्रोकोली, कुर्जेट,कोको बीन्स, स्विस चार्ड,लीक,टर्निप,अस्पारागस,पार्स्निप,पाकचोय,ब्रुसेल्स स्प्राऊट्स अशी कुठलीही भाजी करताना मनात शंका येत नाही.
परवा पहिल्यांदाच र्हुबार्ब आणले. भाजीवालीला विचारलं याचं काय करतात? ती म्हणे केक,जॅम,ज्यूस ! चक्क अळूच्या देठासारखं दिसणारं ते प्रकरण इथं फळ म्हणून खातात याची गंमत वाटली. घरी येऊन चाखून बघितलं तर चक्क ठार आंबटपणा! मग त्याचा छान चिरून हिंग गूळ मेथ्या घालून शिजवून मेथांबा झाला की ! पुढच्या वेळी त्याला म्हणणार र्हुबार्ब असशील तुझ्या घरी! आज तुझं नाव चुका !आणि मग त्याचं वरण करणारे 😋
आपल्याला काय, कोणतीही भाजी डोळे वटारून बघू दे आपण म्हणायचं,ए बाबा, कुर्जेट असशील तुझ्या घरचा,आज तुझं नाव घोसावळं !!! 😄😄

तुम्हाला सांगते, परदेशी लोकांशी बोलताना त्यांच्यात मिसळताना आधी अशीच 'अनोळखीपणाची' भीती असायची. मग हळूहळू सगळीकडे माणसं सारखीच असतात कळायला लागल्यावर मी आता मनातल्या मनात इजाबेलचं नाव ईशा, मार्गारेट काकूंचं नाव शैलामावशी, अलीसियाचं सिया, हेन्रीकचं रामकाका असं ठेऊन देते. आणि मग मैत्री सोपी होते !!!!

😊

२१ जून २०२१

No comments:

Post a Comment