प्रिय,
नव्या देशातल्या या नव्या गावाची आता चांगली ओळख झाली आहे. गुगलवाल्या आक्का रस्ता सांगताना काहीही म्हणत असल्या तरी अरे हा शॉर्टकट आहे चल तिकडून असं आत्मविश्वासाने सांगत गावभर फिरता येऊ लागलं आहे ! सार्वजनिक वाहनांचा पास घेतल्याने जवळपासच्या गावांमध्ये फिरणं सुद्धा फारच सोपं झालंय.
परवा अशीच चालायला म्हणून बाहेर पडले तर पाच मिनिटांत धोधो पाऊस आला! समोरच बसस्टॉप होता तिथे त्या क्षणी आलेल्या बसमध्ये बसले. आमच्या घरातून डोंगर दिसतो त्यात मध्येच येणारी काळुंद्री उंचच्या उंच इमारत आहे. काहीतरी सुपर पॉवर अंगात यावी आणि मी नुस्त्या टिचकीने ती इमारत पाडून टाकावी असे विध्वंसक विचार अनेकदा मनात येतात त्याचं कारण म्हणजे या इमारतीमुळे पलीकडच्या टेकडीवर असलेली गावं दिसत नाहीत. तर ही बस त्या इमारतीला वळसा घालून मागून एक रस्ता जातो तिथून ष्टेटबाख नावाच्या भागात जाते असं वाचून समजलं! शेवटच्या स्टॉपला उतरले आणि बाहेर इकडेतिकडे बघते तर हर्षवायूच झाला मला !!!! त्या काळुंद्री इमारतीच्या आड लांबवर डोंगरात जाणारा नागमोडा रस्ता आणि कुरणं आणि खेडी दिसतात तिथं उतरले होते मी !
पाऊस पूर्ण थांबेपर्यंत नकाशावर जवळच एक भारतीय दुकान आहे असं दिसलं म्हणून शोधत निघाले तर ते अगदी पाच मिनिटांत आलं. सत्तरीचा श्रीलंकन मालक मस्त बोलघेवडा निघाला. खरंखोटं सांगत असेल पण म्हणे पस्तीस वर्षांपूर्वी मी इथं आलो आणि नोकरीच नाही मिळाली म्हणून इथला घर जावई झालो !!! एकंदर दुकानाचा आकार अवतार बघता पस्तीस वर्षात याला फार सासुरवास झालाय हे दिसतंच होतं! ते काहीही असलं तरी यांच्याकडे ताजा कढीलिंब, शेवगा, नारळ,सुरण,इडली राईस आणि हिरवी मिरची मिळते यानेच खुश होऊन शेजारी त्याच्याच टपरीवजा हॉटेलातून चटणी वडे घेऊन निघाले.
अजूनही पाऊस थांबायचं नाव घेईना म्हणून तिथेच कोपऱ्यावर टेकडी पायथ्याशी असलेल्या रापसिडच्या पिवळ्या धम्मक रानाला उद्या येतेच त्याला घेऊन असं सांगून उलट बसने परत आले.
घरी येऊन नवऱ्याला एवढं कौतुक ऐकवलं की दोनचार दिवसांनी पाऊस थांबल्या दिवशी गुगल मॅप अडीच km तर सांगतोय असं म्हणत त्याने सायकलीच काढल्या ! पोरीला सायकलवर अडकवून दहा मिनिटात पोहोचलोसुद्धा !
एकीकडे हिरवीगार गव्हाची शेतं आणि दुसरीकडे सोनसळी रापसीड ! मधूनच वाहणारे बर्फगार पाण्याचे झुळुझुळ पाट, त्यावरचे साकव आणि याला मुकुट म्हणून चढत गेलेल्या टेकड्यांवरून लांबवर दिसणारे शुभ्र आल्प्स! टेकडीवर कुरणं म्हणून सोडलेली माळरानं जास्त आणि शेतं कमी आहेत. सगळीकडे मेंढ्या आणि इथल्या सुप्रसिद्ध ढबऱ्या गायी गळ्यात तशाच ढबऱ्या घंट्या घेऊन चरताना दिसतात.
हे सगळं चित्र कागदावर असावं आणि एका रेषेत तो कागद संपावा तसं रस्ता ओलांडला की रेल्वे स्टेशन, उंच इमारती, मॉल आणि दाट वस्ती सुरू !
तरीही त्या गायी मेंढ्या बघायला पुन्हा पुन्हा नियमित यायची जागा असं ठरवून टाकलं!
सलग सुट्टी आली तेव्हा झुग नावाच्या गावी अमोहाला झुकगाडीत बसवायचं म्हणून मित्राकडे गेलो! पर्वतरांगा त्याखाली भलं मोठं सरोवर आणि त्याच्या काठावर मित्राचं गाव ! अग, त्याच्या घरात दिवाणखान्यात बसलं की सरोवर आणि पर्वतरांगा दिसतात! मधेमधे एकही काळुंद्री इमारत न येता! फार सुंदर सुबक गाव आहे ते. त्या तळ्याकाठी सुंदर बागा आहेत तिथं सिनेमात घुसून फिरून यावं असं फिरून आलो. मी सांगितलं नाही तर खुशाल ते फोटो म्हणजे नुसते पडदे आहेत आणि त्यापुढे फोटो काढलेत असाच कुणाचाही समज होईल !
खरं अशा वेळी इथल्या मातीत इथल्या निसर्गाच्या कुशीत आपण फार विसंगत दिसतो बघ! एका चित्रावर चिकटवलेल्या दुसऱ्या चित्रसारखे! हेच खरं तर खरं असतं नाही? म्हणजे आपल्या वावरारानात काढलेले आपले फोटो आणि इथल्या शेतात काढलेले आपले फोटो यात खरे वाटणारे फोटोच आपले खरे फोटो असतात! कितीही आपण जाऊ ते आपलं घर म्हणलं तरी आपलं एक खरंखुरं घर असतं ते असतंच!
हं, इथं तुमच्यापैकी कुणीतरी या बघू ! म्हणजे इथेही घराचा अंश आलासे वाटेल. त्या पिवळ्या शेतातल्या शेजारून गेलेल्या पाटावर साकव आहे ना,तिथं बसून डबे उघडून खातपीत गप्पा मारत दिवसभर बसूया!
इथं राहून गेलेला मित्र म्हणाला गायी दिसतील त्या घरात इस्टेटीत घुसायचं बिनधास्त आणि त्यांना विचारायचं ताजं दूध आणिक लोण्याचा भाव काय म्हणून !!!
जरा थांब अजून दोन महिने, आता कुठं ही भाषा समजू लागली आहे, थोड्या दिवसात भाषा उत्कृष्ट नाही आली तरी जिव्हाळ्याच्या विषयावर आठवतील ते शब्द वापरून हातवारे करत बोलण्याएवढा आत्मविश्वास नक्कीच येईल आणि मी ताजं लोणीही आणू शकेन :))
अजून फार लिहायचं आहे पण थांबावं लागेल आता!
लिहितेच पुढच्या आठवड्यात !
तुझी
माया
1 Jun 2021
No comments:
Post a Comment