ग्रीक ऑलिव्ह ब्रेड (Eliopsomo)
काल असं ठरलं की आज सगळ्यांनी काहीतरी बेक करूया. मला बेकिंग म्हणलं की फक्त ब्रेडच आठवतो. केक आणि कुकीज वगैरे मंडळी माझ्याशी फटकून वागतात म्हणून मी त्यांच्या नादी लागत नाही. ब्रेड ब्रेड असं म्हणत असताना आज सकाळी उठल्याबरोबर काही वर्षांपूर्वी 'हा ब्रेड करणार मी नक्की' असं रेसिपी दात्याला दिलेला शब्द आठवला! असे शब्द पाळायला बारा तेरा वर्ष म्हणजे फार काही उशीर झालेला नव्हता. मग घरात जिन्नस आहेत याची खात्री करून घेऊन लागले कामाला!
तेव्हा डच शिकत होते. वेगवेगळ्या संदर्भात भाषा वापरण्याचा सराव चालू होता. वर्गात इंग्रजी बोलायची परवानगी नसायची. 12-13 वेगवेगळ्या देशातले आम्ही 12-13 लोक चार तास रोज न बोलता राहणं शक्य1 नसायचं. मग वाट्टेल तशी डच मोडकीतोडकी करून बडबड चालू असायची.
एकदा गृहपाठ आला की तुमच्या देशातला एखादा पदार्थ डचमध्ये लिहून आणा!!
आता कुणीही कितीही सुगरण असलं तरी डच भाषेची ऐपत बघून रेसिपी लिहिणं आलं ! आधीच पळीवाढ,फोडणी,हिंग,सादळलेले,भज्यांच्या पिठाएवढं पातळ, चरचरीत हे शब्द इंग्रजीत सांगतानाही फजिती व्हायची तिथं डच मध्ये थालीपीठ कसं सांगायचं या विचाराने झोप लागली नव्हती !!!
शेवटी थालीपीठ झालं नाहीच. गाजराचा हलवा झाला!!
तर अशी फाफललेली मी एकटीच नव्हते हे दुसऱ्या दिवशी वर्गात समजलं.
एका ग्रीक पठ्ठ्याने या वरच्या ब्रेडची रेसिपी मोजून 22 शब्दात लिहून आणली होती. आणि वर आम्हाला ती रेसिपी पटावी म्हणून स्वतः ब्रेड करून आणला होता!
दीड किलोचा ब्रेड 14 जणांनी 14 मिनिटात संपवला होता एवढंच आठवतंय!
आणि एक गंमत आठवतेय, सोरिनाने त्याला विचारलं तू ब्रेडचं पीठ आपटायचं लिहिलंस ते किती वेळ? यावर महाशय म्हणे माझी आई मोजून 80 वेळा आपटते !
हे सगळं आठवलं. बाळबोध डच भाषेत लिहिलेल्या बारा रेसिपीज असलेलं ते आमचं रेसिपीबुक आठवलं आणि मी हा ब्रेड केला.
कृती सोपी आहे.
साधारण अर्धा किलो मैदा घ्यायचा. अर्धा कप दूध कोमट करून त्यात 7 ग्राम यीस्ट छोटा चमचा साखर आणि चमचाभर मैदा घालून झाकून ठेवायचं.
इकडं मिळाले असतील ते ऑलिव्ह ओबडधोबड चिरून घ्यायचे. तिकडं यीस्ट जागं झालं असेल. ते मैद्याच्या विहिरीत टाकायचं. त्यावर मोठी पळीभर किंवा पाव कप ऑलिव्ह तेल घालायचं.मैद्यावर बाजूनी मीठ शिंपडायचं. ( यीस्टवर मीठ घालून हिंसा करायची नाही) आता साधारण कपभर कोमट पाणी हाताशी ठेवून हळूहळू पीठ मळून घ्यायचं. प्रेमाने. पुरणपोळीची कणिक किंवा भटूरे करताना असतं तेवढं सैल पीठ व्हायला हवं. हाताला चिक्कट लागणं कमी होऊन मऊ गोळा झाला की मग मात्र नीट आपटायचं. ग्रीक काकूंच्या पद्धतीने मी खरंच 80 वेळा आपटून घेतलं.
आता वरून तेलाचा हात लावून गोळा फुगायला उबदार ठिकाणी ठेऊन द्यायचा.
दीड तास किंवा गोळा दुप्पट होईपर्यंत थांबायचं.
आता हलक्या हाताने गोळा पंक्चर करायचा. आणि त्याचे तीन चार भाग करायचे.
एक भाग हातानेच पातळ थालीपीठ थापल्यासारखा थापून घ्यायचा. त्यावर चिरलेले ऑलिव्हज आणि आवडतील ते हर्ब्ज घालायचे. मी आज रोजमेरी आणि ओरिगानो घातलेत. आता दुसरा आणि तिसरा गोळाही असाच तयार करायचा. शेवटच्या गोळ्यावर ऑलिव्हज घालायचे नाहीत. नुस्तं तेल लावायचं. आता ऑलिव्हज घातलेले थालीपीठ एकावर एक रचायचे. शेवटच्या थालीपीठाला तेलाच्या बाजूने घालून कडा एकत्र दाबून घ्यायच्या. आणि सारण भरल्यावर कसा कडा गोळा करतो तसं करत या सगळ्यांचा एकच गोळा तयार करायचा. गाठोडं वळायचं. हा गोळा ज्या भांड्यात/पॅन / डिश मध्ये बेक करणार आहात त्यावर ठेऊन ओल्या रुमालाने झाकून ठेवायचं.
आता ओव्हन 260डिग्री से ला 20 मिनिटं प्री हीट करून घ्यायचा. दणदणीत गरम व्हायला हवा. त्या वीस मिनिटातच आपलं ओलिव्हचं गाठोडं किंचित फुगलेलं असेल. त्यावर ब्रशने दूध लावायचं आणि हव्या त्या बिया चिकटवायच्या. हे करताना शक्यतो ते गाठोडं फाटलं नाही पाहिजे. मी आज जवस, भोपळा बिया,चिआ आणि तीळ घातलेत. मग ते बेक करायला ठेऊन आधी ओव्हनचं तापमान 230 डिग्री से ला आणून ठेवायचं. 35 मिनिटांचा अलार्म लावायचा. आणि सोनेरी वरून कडक आतून मऊ गरम स्वादिष्ट ब्रेडचं स्वप्नरंजन करत बसायचं!
ही रेसिपी तंतोतंत फॉलो केली तर ते स्वप्नं खरोखरच पूर्ण होतं!!!
No comments:
Post a Comment