Wednesday, 12 May 2021

अमोहाची डायरी 7

 इगाsssखखो! आय्याय्या एक्दम ! जंगलके महाराssssस ! दाsssर   हे sssहेssss !!! (आस्ते कदम, निगाह रखो, जंगल के महाराज पधार रहे है)
आणि मग वाघ म्हातारीला म्हणाला ए म्हाताये! आकाया फआकाया नकोस ! माझ्याशी गाठ आहे sss !!!! ( इ म्हातारे, मला फसवायचा प्रयत्न करू नकोस! माझ्याशी गाठ आहे) 
हे मी जे काही सांगतेय ते तुम्हाला समजतंय ना? म्हणजे काय होतं सांगू का? मला सतत गोष्टी ऐकायच्या वाचायच्या नाही तर बघायच्या असतात. म्हणजे सततच ! उठल्यावर, आंघोळ करताना,खाताना, खेळताना, आईबरोबर बाजारात,बाबा बरोबर झोक्यावर,अगदी मला उगीच रडू येतं तेव्हा सुद्धा मला गोष्टी ऐकायच्या असतात ! पण आपली छोटी छोटी आई आणि छोटा छोटा बाबा थकून जातात म्हणून मीच बडबड करत मला गोष्टी सांगते ! आईबाबा पण ऐकतात आणि त्यांना पण मज्जा येते ! 
आता आम्ही झुईकला आलो आहोत. मला आधी वाटलं आम्ही समदूर(समुद्र) बघायला गेलो होतो तसं दोन दिवसांनी मेकलीनच्या घरी परत जाणार. पण आई म्हणाली आपल्याला नवीन घरी रहायला जायचं आहे. म्हणजे मला काही कळलं नाही पण बाबाने चालेल तुला? असं विचारलं की मी पटकन चालेल मला म्हणाले. 
आम्ही खूप खूप वेळ गाडीत बसून इकडे आलो. मेकलीनचे शेजारचे आजी आजोबा आणि मावशी आणि तिथले सगळे काका काकू मला टाटा करताना रडत होते. मग मी गप्पच झाले. शहाण्यासारखी हट्ट न करता कार सीटमध्ये 8 तास बसून राहिले. 
इकडे आधी दुसऱ्या घरी होतो 10 दिवस तर एवढा कंटाळा आला होता की सारखं रडूच येत होतं!
आमच्या घरातला ओटा, खिडकीतून पाणी बघत जेवण, बदकं, बोटी आणि वरचे आजी आजोबा आठवत होते. माझं माझं मऊ पांघरूण आणि सोफा आणि आंघोळ करायचा टब यांची फार आठवण येत होती, आईबाबा घरी का घेऊन जात नाहीत म्हणून मी खूप रडत होते. मला इथलं काहीच नको होतं. स्ट्रॉबेरी सुद्धा नाही आणि चीज सुद्धा नाही आणि दहीभात सुद्धा नाही ! 
 मग आम्ही अखेर आमच्या नवीन घरात रहायला आलो. आई बाबांनी सगळे बॉक्स उघडले तेव्हा माझी हसरी आणि अमूचान दोघीही भेटल्या! मला इतकं छान वाटलं की मी त्यांना कुशीत घेऊनच झोपले! 
मला हे घर खूप आवडलं! घराचा रस्ता म्हणजे लहान डोंगरच आहे. आणि तिथं पाईनचे कोन आहेत. चेस्टनटचं झाड आहे आणि खूप खूप फुलं आहेत. त्याना ट्युलिप्स म्हणतात असं आई म्हणाली. इथं पायऱ्या आहेत. खूप खूप पायऱ्या म्हणजे बावीस चढून गेलं की आमचं घर आहे. आणि मज्जा म्हणजे घरात खूप मोकळी जागा आहे. एका खोलीत खालीच दोन मोठ्या गाद्या आहेत. बाहेर हॉल मध्ये आधी फक्त माझा तंबू होता. आता एक छोटी गादी आणि चार खुर्च्या ! मला घरभर पळत पळत खेळायला खूप मज्जा येते! खुर्ची टेबल कपाट असं काहीच आडवं येत नाही ! दुसऱ्या छोट्या खोलीत माझी सगळी खेळणी सापडली तेव्हा मी खूप उड्या मारल्या! उड्या मारता मारता मारता मला खाली झोका आणि घसरूंडी दिसली ! पण बाबा म्हणे 10 दिवसांनी तिथं जायचं! 
आम्हाला तिघांना भूक लागत नव्हती आणि वास येत नव्हता ना म्हणून आम्ही खूप खूप झोपत होतो. रोज फोनवर आजीशी आणि मामा आणि अण्णांशी बोलत होतो. दिवसातून 4 वेळा बाबा तिघांच्याही बोटाला मशीन लावून काहीतरी लिहून ठेवत होता. आणि ताप तर मला मोजता येतो ! बाबाने ताप मोजायला नळी ठेवली मी 'छत्तीपाच' असं आधीच सांगून टाकते ! म्हणजे त्याला पटकन लिहून ठेवता येतं. 
बाबा आणि मी आता फोनवर पुस्तक वाचतो माहितेय! त्याच्या फोनात माझी आवडती डच पुस्तकं आहेत आणि एटू लोकांचा देश पण आहे! मला एटू लोकांच्या सगळ्या कविता आता पाठ झाल्यात! म्हणून बाबाला पण पाठ झाल्या. मी कधी पण मधूनच कोणतीही कविता सुरू करते आणि पुढची ओळ आई किंवा बाबा म्हणतात की नाही ते बघते! 
जेव्हा मुलींचे करतात बारसे.... असं मी म्हणलं की बाबा 'तेव्हा कपाळावर बांधतात आरसे!' असं म्हणतो. 'मग मुली भांडल्या तर...' असं मी म्हणलं की 'हात धरतात आरशावर' असं आई म्हणते! असं आम्ही दिवसभर करतो ! 
आता खेळा नाचा मधली रसिका आणि अतुलची स ग ळी गाणी आणि ते बोलतात ते मला पाठ झालंय! 
ती गाणी, गोष्टी, जिंगल टून, नर्सरी ऱ्हाईम्स आणि कविता एवढं सगळं मला येतं. मग ते मला सतत म्हणतच रहावं लागतं !! 
एक गंमत सांगू का?  आई नि मी गच्चीत बसलो होतो. आमच्या घरामागे लहान तळं आहे तिथं एक काळी पांढरी आणि एक केशरी पांढरी अशा दोन मनीमाऊ आहेत. त्या माझ्याकडे बघून बोलत होत्या. एका बाजूला रोजमेरी नावाचं झाड आहे आई त्याचा वास घेऊन बघत होती. मला पण तिने वास घेऊ दिला तर मला वासच आला! मला इतका आवडला की मी दिवसभर एकेक पान तोडून वास घेत खुर्चीवर बसले ! झाडाला खूप माया करायची असते म्हणून मी थोडा थोडा वेळ झाला की झाडाची माया करून येते! 
खूप दिवसांनी आईसोबत खाली जाता आलं तेव्हा ट्युलिप्सची माया करताना मला म्हातारीची फुलं दिसली. मी हात लावला तर सगळ्या म्हाताऱ्या उडुनच गेल्या! मग काय मला आधी झोका खेळायचा होता. रस्ता शोधत आम्ही जात होतो तेव्हा रस्त्यावर सापडणाऱ्या सगळ्या म्हाताऱ्या मी हात लावून वाऱ्यावर उडवून मजा केली ! शेवटी आईला झोका सापडला. झोका खेळून मला एवढं मस्त वाटलं की घरी जायचं म्हणलं की रडूच यायला लागलं! मग आईने त्या झोक्यावर असलेला कोळी किडा दाखवला! त्याला किती वेळचा झोका खेळायचा होता ! मग काय मला भीती वाटत नाही तरी त्याची झोका खेळायची पाळी म्हणून मी पटकन उतरले. 
आम्ही घराजवळ आलो तर काय .. केशरी माऊ उड्या मारत आमच्याकडे आली आणि आई खाली बसली तर तिच्या मांडीवरच जाऊन बसली. तिने आईच्या हाताची पापी घेतली. मी जवळ गेले तर तिची मऊ मऊ शेपटी माझ्या डोक्यावरच आली ! मग आम्ही खूप खेळलो. माऊने आम्हाला छोटं तळं जवळ नेऊन दाखवलं. ट्युलिप्स पण दाखवले. आणि तिथं खेळातल्या बाहुल्या झाडांमध्ये रोवून ठेवल्या त्या पण दाखवल्या. आता आम्ही दोघी रोज खेळतो आणि मी बाहुल्या दुरूनच बघते. कारण त्या आपल्या नाहीत असं आई म्हणाली ! आता मी एकोणतीस महिन्यांची म्हणजे खूप शहाणी झाले असं आई बाबा म्हणत असतात. आता आम्ही लांब लांब फिरायला पण जातो. इथं मेकलीनपेक्षा छोटी नदी आहे. आणि त्यात मेकलीन सारखीच बदकं सुद्धा आहेत. मी बोट शोधली पण ती दुसऱ्या नदीत आहे म्हणे. आम्ही रविवारी जाणार आहोत बोटीत बसायला. 
आता मी चिक्कार हट्ट करते, भरपूर रडते, एवढ्या मोठ्या खोड्या करते तरीपण आई मला जवळ घेऊन म्हणते,"शहाणं ग बाळ माझं ! हट्ट करत नाही,रडत नाही, वरण भात खातं, पोळी भाजी खातं, सारखा टीव्ही बघायचा म्हणत नाही, डायपर बदलताना रडत नाही, pram मध्ये बसायला नाही म्हणत नाही, रस्त्यावर पळत नाही,झोपायला त्रास देत नाही,आईचा पेन घेऊन हातपाय गळा पोट रंगवत नाही,सारखं बाहेर जायचा हट्ट करत नाही, बाबाला ऑफिसचं काम आणि आईला अभ्यास करू देते, खेळणी आवरून ठेवते......" 
खरं तर यातलं मी काहीच करत नाही पण मला झोप यावी म्हणून ती असं म्हणत असणार ! छोटी छोटी आई नं आपली ? मं? तिला त्रास देऊ नये! आपलं आपण काय करायचं ते करावं !No comments:

Post a Comment