Monday, 2 November 2020

पाण्याकाठचं घर ८

ढगाळलेल्या गढूळ दिवसाच्या अपेक्षेत सकाळ मात्र लख्ख उजाडते. तांब्याच्या लख्ख घासलेल्या भांड्यासारखा दिसणारा उजेड पडलेला असतो. समोरच्या काठावरची झाडं झळाळून उठलेली असतात. अशा वेळी पटकन स्वेटर चढवून या भवतालाच्या रंगात पाय ठेवावेत.

हे करेपर्यंत कुठे जायचं हा विचारही मनात आणू नये.एकदा उजवीकडे एकदा डावीकडे बघून मग अगदी दोन पावलांच्या मधल्या क्षणी दिशा ठरवावी. चालू लागावं. अक्रोडाने फेकलेले शेवटचे चार अक्रोड हिवाळ्याची बेगमी करणाऱ्या पाखरांसाठी तसेच पडू द्यावेत. कोवळ्या उन्हाची गुंगी चढून पाण्यातल्या अगदी जवळ पोहणाऱ्या माशंकडे दुर्लक्ष करून बसलेल्या बदक जोडप्याची तंद्री मोडू नये. त्यासाठी वाळलेल्या पानांची रांगोळी चुकवत पाय न वाजवता हळूच पुढे जावं. पिवळ्या केशरी रंगांच्या छटांचे नवल मनात साठवत पुलावर जावं. दूरवर दिसणारी दुसऱ्या पुलाची वेल आता हळुहळू जमा होणाऱ्या ढगाळ रंगात बुडत असते. 

तिथं न रेंगाळता उजवीकडे कमानीच्या रस्त्यावर वळावं. कमानीची पायवाट ही खरी. उन्हाळ्यात बघितली होती ती हीच झाडं ?? हिरवी, करकरीत,अवखळ, धसमुसळी ! आता पोक्त,संन्यस्त,गंभीर दिसणारी तीच ही झाडं! त्यांच्या कमानीखाली सरसरत गेलेल्या पायवाटेने तरंगत जाणारे शुभ्र पक्षी बघावे. रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांनी ल्यायलेले आयव्हीचे रंगीत शेले बघावे. कुंपणावर अजूनही फुललेले चुकार पॅशनफ्रुट आणि गुलाब बघावे. उंच शेंड्यावर नवीनच आलेले काळे करकोचे पेलताना झाडांचा संयम बघावा. 

हे शांत गंभीर समाधान मनात उतरताना शांत उभं रहावं. आता मनाशीही काहीही बोलू नये. हळुहळू अलिप्त होऊन पाण्यात दिसतात ती प्रतिबिंब फक्त न्याहाळावीत. 

ही तंद्री जितका वेळ लागेल तेवढा वेळ सोनेरी. तंद्री मोडली की फार गुंतून पडू नये. मागे वळून आलेल्या वाटेने परत निघावं. अशा वेळेचे  कोणतेच धागे फार ताणू नयेत. आलेच चिकटून अंगाला तर अलवार सोडवून जपून ठेवावेत!


No comments:

Post a Comment