Monday 10 August 2020

अमोहाची डायरी १

कितीही वेळ मिळाला तरी कामं संपतच नाहीत ! सकाळी उठल्यावर आधी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या केल्या. बाबाने थोडी मदत केली. मग आई भाजी चिरत असताना तिला कंटाळा येऊ नये म्हणून  ओट्यावर खिडकीत बसून अर्धा टोमॅटो आपापला खात गप्पा मारल्या.
थोडा वेळ बाल्कनीत बसून मुंगीबाई शोधली. परवा खाऊन बघितली तर मला काही फार आवडली नव्हती म्हणून आज तिलाच बिस्कीट खायला दिलं. आणि आईला बजावून सांगितलं"मुंगीबाई खायचीsss ना ही ss !!!
मग 2 स्कुटर,5 सायकल आणि 5 होड्या बघितल्या. गाडीतून कोणीतरी आलं त्यांना हाय केलं. मोठी बोट जात होती तिला टाटा केलं. कबुतरं बघितली. शेजारच्या आजींना याssस  याss स  असं म्हणून दाखवलं. त्या नुसत्या हसतात. आणि तोंडातून चित्रविचित्र आवाज काढतात!
 घरात आले तर वाटीत फुटाणे दिसले. मग ते सांडून बघितल्यावर खावे वाटले. आई म्हणते सांडलेलं तोंडात घालायचंsss ना हीsss !!!  शिवाय मला अजून दाढ आली नाही ना म्हणून सांडलेले सगळे फुटाणे 23 चकरा मारत आईला आणि बाबाला भरवले.
 पोळीचा वास आला की पटकन स्वयंपाकघरात जाऊन भुक्का भुक्का ओरडले. बाबाने मग दूध पोळी कुस्करून दिली. मला वंचं आणि चट्टी दोन्ही हवं होतं पण बाबा म्हणे एका वेळी एकच म्हणून आंब्याचं वंचं खाल्लं.
किती वेळ झाला तरी आई आंघोळ घालत नव्हती. म्हणून शी करून टाकली. आपोआप आईने दुसरं डायपर घालायच्या आधी पटकन आंघोळीला बसवलं. मग खेळायचं कासव उलटं करून त्यात पाणी भरून थोडं पिऊन बघितलं पण तेवढ्यात आईने बघितलं तेव्हा तिला अंघोळ पाणी प्यायचं ssss ना ही !! असं जोरात सांगितलं.
मला केस विंचरून घ्यायला अजिबात आवडत नाही. आईने कपडे घालून दिले की मी पळून गेले. मग बाबाला साराची गोष्ट वाचायला सांगितली. तो म्हणे सकाळपासून एक्कावन्नवेळा वाचून झालीय ती !!! दुसरं पुस्तक आण. मला खरं तीच गोष्ट हवी होती पण बाबा रडेल म्हणून मी दुसरं पुस्तक आणून दिलं.
बाबा कामाला जायच्या आधी आई फार कामात असते. मग आई आली की बाबा कामाला जातो. तो गेला की आईने पुस्तकं आवरूया म्हणलं. मला छानच झालं. कोळी किड्याचं आणि गोगलगायीचं 400 वेळा वाचून झालेलं पुस्तक आईने कंटाळून लपवून ठेवलं होतं ते सापडलं !!! ते बघून आई अरे देवा पण म्हणाली.
पुस्तकं असा ढीग करून बसायला मला फार आवडतं. खेळणी पण अशी ढीग करून ठेवायला आवडतात. पण पुस्तकात जास्त रंग असतात ! आणि खूप गोष्टी.
आई पुस्तकं आवरत असताना मी तिला 3 गोष्टी वाचून दाखवल्या. आई पण पुस्तकं आवरायला काढली की अशी न आवरता हे ते पुस्तक हातात घेऊन वाचत बसते. मला पण तसंच आवडतं.
शेवटी बाबाने पुढच्या कामाची म्हणजे मला झोपवण्याची आठवण केल्यावर भराभर जागेवर गेली पुस्तकं.
आईने सीपर दिलं पण मला ग्लासनेच पाणी प्यायचं होतं. मग 5 घोट सांडून 1 घोट पाणी तोंडात गेलं. कारण मी सध्या गुळण्या करायला शिकतेय त्याची प्रॅक्टिस राहिली होती. शर्ट भिजला. पॅन्ट भिजली. मग आईने ती बदलताना मी अजिबात रडले नाही. त्यात काय ! एवढी मजा करायची असेल तर पाणी सांडणारच ना!
आईला म्हणलं चंदाला बोलावून झोपू तर ती म्हणे दिवसा चंदा कामात असतो.
सगळे माझ्यासारखं काम करतात. आता मी जरा दमले. पीच खाऊन सुस्ती आली. झोपते.
उठल्यावर समोरच्या कालव्यात बदकांची पिलं मला भेटायला येणारेत.

- अमोहा , साडे एकोणीस महिने







1 comment:

  1. प्रिय अमोहा,
    तुला इतकं समृध्द बालपण मिळत आहे याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे.
    आज मी काय म्हणतो आहे हे तुला आज एखादवेळेस कळणार नाही पण समजेल नक्की.
    खूप मज्जा कर आणि आम्हाला ही सांग.
    तुझ्या आनंदात आम्हाला अतीव आनंद आहे.

    ReplyDelete