हिवाळ्याचा सोहळा झालेला बघायला मिळणं म्हणजे नशीबच ! यंदा हा रंग बघायला मिळाला याचा फार आनंद आहे. नुसतीच थंडी, किरकिरा पाऊस,हट्टी धुकं याचा कंटाळा आला होता आणि एक दिवस हवामानाच्या अंदाजात स्नो दिसला! बेल्जियममध्ये आमच्या भागात असा स्नो होणं म्हणजे कौतुकच !
दोन दिवसांपासून प्रवासी पक्षी आवाज बदलून ओरडू लागले होते ते हेच सांगत असावेत असा आत्ता वाटतंय.
एक दिवस दुपारपासून वेगळ्याच लहरीत पाऊस सुरू झाला आणि तापमान हळुहळू कमी होत गेलं. मैत्रिणीसोबत फिरायला गेले होते तेव्हा चक्क पाच वगैरे तापमान होतं ते दोन तासांनी उणे चार झालं. आमच्या शेजाऱ्यांनी आपापल्या गाड्या झाकून टाकल्या आणि रस्त्यावर फिरणारे लोक पावसाच्या कपड्यांऐवजी छान लोकरीचे जाडजूड कपडे आणि स्नोमध्ये घालायचे जोडे घालून फिरताना दिसू लागले. वरच्या जोडीने कधी नव्हे ते भरपूर वाणसामान वाहून आणलेलं बघितलं आणि स्नो होणार याची खात्री पटली !!!
दुपार पावसासोबत कलत गेली. आणि बर्फाची भुरभुर सुरू झाली. अंधार आणि स्नो एकमेकांत मिसळून इतके साळसूदपणे पडू लागले की पावसाचा रंग बदललाय हे ध्यानात यायला वेळच लागला. ते एवढे नाजूक की तळव्यावर बर्फ म्हणून झेलावं आणि हात फक्त ओला दिसावा ! बरं यांना कसलीच घाई नाही. निवांत रमतगमत जागा निवडून अलगद विसावणार. आधी झाडांचे शेंडे, गवताची पाती, झाडांच्या फांद्या व्यापून टाकणार. मग घरांची कौलं आणि कारची डोकी, मग जिन्याचे हात आणि लहान पायवाटा आणि सगळ्यात शेवटी वर्दळीच्या वेळा संपवून निवांत पडलेले रस्ते !
अधीर होऊन घराच्या या खिडकीतून त्या दारातून या जिन्यावरून त्या गच्चीवरून आम्ही आपले कौतुक करत बघत बसलो !
सकाळी उठून पडदा उघडला तर एखादा देखणा वॉलपेपर दिसावा असं दृश्य समोर ! खरोखरच आपण चित्रात राहतोय की काय असा भास झाला.
अजून पावलं न उमटलेले स्नोने झाकलेले रस्ते हळू हळू पावलं रुतून घडी मोडत होते. आमच्या घराजवळ एक शाळा आहे. रोज ठराविक वेळी पुढे आई/बाबा आणि त्यांच्या मागे बदक पिलांसारखे लगटून चालणारी चिमुकली मुलं बघणं फार छान असतं. चार पाच वर्षांची मुलं एवढ्या थंडीत सायकल मारत आईबापांशी मोठ्या आवाजात गप्पा मारत शाळेत जात असतात. एवढ्या बर्फात काय करणार हे असं वाटत होतं तर अजून एक नवल दिसलं ! लोकांनी आपापल्या स्लेज काढल्या आता ! आईबाबा स्लेज ओढत बर्फात चालत शाळेकडे निघालेले आणि स्लेजवर उत्साह आनंदाने फसफसून चिवचिवाट करणारे चिमुकले जीव !!! शाळा सुटायच्या वेळी सगळी मोठी मंडळी हातात स्लेजच्या दोऱ्या घेऊन शाळेच्या गेट बाहेर आपापल्या लहानपणच्या स्नोच्या आठवणी बोलत बसलेली. आपल्या नातवंडांना तसा नाही तर निदान एवढा तरी स्नो अनुभवायला मिळतोय म्हबून उत्साहात दुसऱ्याच्या पाठीवर थाप मारत गडगडाटी हसणारे आजोबा किती आनंदी दिसले!! ©Maya Dnyanesh
उन्हाळ्यात हेच लोक छोट्या नावा घेऊन मुलांना सोडायला घ्यायला येतात ! निसर्गाशी जोडलेली ही हौशी मंडळी आयुष्यात दुःखाचा लवलेश नसलेली असणार असं उगाच वाटून गेलं !
दिवसभरात स्नो स्थिरावला. उणे बारा तापमान असलेला सूर्य उगवला आणि जग लखलखीत झालं! लहानपणी शोभेच्या वस्तू सजवताना त्यावर रांगोळी चिकटवायचो आणि मग त्यावर उजेड पडून ती चमचम करायची ते एकदम आठवलं. इथं सगळ्या भवतालावर रांगोळी शिंपडल्यासारखं दिसतंय.
ऊन दिसलं. आनंद झाला. बाहेर पडले. त्या क्षणी थंडी येऊन चेहऱ्यावर आदळली. या उन्हाला 'धोखाधूप' हे नाव कसं अगदी चपखल आहे असं वाटलं.
यावेळेस पडलेला स्नो पाच दिवस होऊन गेले तरी मुक्काम हलवायला तयार नाही. दिवसातून तीन वेळा रस्त्यावर घसरू नये म्हणून मीठ पसरणाऱ्या सरकारी गाड्या निर्विकार फिरत राहतात. बाजारात दुकानात उबेमुळे रेंगाळत जास्त खरेदी होत राहते. एकूण लोक खूश दिसतात. ©Maya Dnyanesh
समोरच्या कालव्यात बर्फाचा थर तरंगतोय. त्या थरावर कमाल केल्यासारखे पक्षी चालत फिरताहेत. दिवसातून दोनदा येणाऱ्या मालवाहू बोटी ती बर्फाची साय मोडून जातात. त्याने चिडून प्रत्येक बोटीवर घिरट्या घालत कर्कश आवाजात निषेध नोंदवतायत. स्थानिक बदकं नेहमीप्रमाणे आपण भलं आपलं काम भलं असं म्हणत मिळेल ते खाऊन काठावरच्या बर्फात डोळे मिटून पंखात डोकी घालून बसून राहतात. शेजीबाई तिच्या बागेत पाखरांना खायला म्हणून जरा उंचावर ताटलीत दाणे ठेवते. मागच्या अंगणात पसरलेल्या बर्फावर फक्त गल्लीतल्या मांजराची पावलं उमटलेली दिसतात. समोर कोणतंतरी सुंदर बुटकं झाड आहे त्यावरचा बर्फ वितळून ते थेंब ठिबकताना उन्हं देखणी होतात...अक्रोडाच्या फांद्या वरून पांढऱ्या खालून तपकिरी दिसतात हे बघणारा पक्षी खुळा झालेला दिसतो. अंधार पडला तरी उठून दिसणारे शुभ्र रस्ते बोलके होत राहतात. चर्चची शिखरं स्नो पांघरत सगळ्या गावाकडे बघत राहतात. लहान लहान पायवाटा शुभ्रतेमुळे जास्तच लयदार वेलांट्या घेतायत असं दिसतं. पुलाच्या कमानी जास्त स्पष्ट होतात.
जरा इकडेतिकडे बघितलं तर सपाट बर्फावर कुणी कुणी हळूच लिहिलेली नावं दिसतात. भल्या मोठ्या पटांगणात नाजूक पावलांची एखादी जोडी उमटलेली दिसते...
यातलं काय खरं काय स्वप्नातलं असं वाटत आपलेही दिवस कालव्याच्या बर्फावर तरंगत राहतात.
हे सगळं अजून चार दिवसांनी नसेल याचं भान कसं बरं गुडूप करता येईल असा विचार करत मन हळूहळू तंद्रीतून जागं होतं.
No comments:
Post a Comment