Wednesday, 12 May 2021

त्रिपुरसुंदरी

 एक महिन्यापासून हजार सूर्यनमस्कार पूर्ण केले तर त्रिपुरसुंदरी करून खाईन असा नवस केला होता. माझे हजार तर नवऱ्याचे दोन हजार सूर्यनमस्कार पूर्ण झाल्याने दोघांनाही हे बक्षीस करून खावंच लागणार होतं !!! 
अमोहाच्या बाबाला पुरण फार आवडतं, मला ते नेहमीच ओव्हररेटेड वाटतं! मला खव्याची पोळी आवडते पण इथं खवाच मिळत नाही! 
आमच्यासारख्या अनेक जोड्या असणारेत त्या मला या रेसिपीनंतर आशीर्वाद देणारेत !!! 
त्रिपुरसुंदरी हा प्रकार काही वर्षांपूर्वी एका काकूंकडे खाल्ला. तेव्हा विस्मयचकित झाले होते मी ! बदाम वाटून पोळीत भरायचे ही कल्पनाच खूप श्रीमंत वाटली होती! 
अगदी बारा तेरा वर्षांपूर्वीही मराठी मध्यमवर्गात बदामासारख्या गोष्टी तोलूनमापूनच वापरल्या जात. सुका मेवा हा दैनंदिन आहाराचा भाग नसायचा. हिवाळ्यात मुलांना लाडूमधून किंवा बाळंतिणीला खाऊ घालायला किंवा अतिशय विशेष पदार्थात तो पदार्थ खास आहे हे कळावं यासाठी बदाम बेदाणे काजू वगैरे वापरले जात. 
हळुहळू बदाम ही रोज भिजवून खायची, प्रोटीन शेक मध्ये घालायची, सूपमध्ये घालायची सहजसाध्य वस्तू झाली. आज हा पदार्थ आज कदाचित एवढा विशेष वाटणार नाही. पूर्वी खूपच खास असायचा. वर्षातून एकदा एका कुळाचाराच्या नैवेद्याला केला जायचा.  
यात वापरलेल्या गोष्टी बघून कॅलरीज वगैरे डोक्यात येतील तेव्हा डबल चीज पिज्जा/गुलाबजाम विथ आईस्क्रीम/चॉकलेट फज वगैरे आठवा! मग तुम्हाला हे खायचा धीर येईल ! 
तर काय करायचं, 
हरबरा डाळ वाटीभर घेऊन धुवून शिजत घालायची.
वाटीभर खवा घ्यायचा. मिळत नसेल तर निशामधूलिकाच्या रेसिपीने 10 मिनिटात दुधपावडरचा खवा करून घ्यायचा. तोवर गरम पाण्यात बदाम भिजवायचे. खवा करून झाला की सोलायचे. वाटून बाजूला ठेवून द्यायचे. तिकडं हरबरा डाळ शिजली असेल. ती चांगली घोटून पुरणपात्रात/चाळणीत मऊ करून घ्यायची. 
आता हे सगळं एका जड बुडाच्या भांड्यात हाताने मिसळून घ्यायचं. खव्याच्या गाठी फुटायला हव्यात. मग ते पातेलं मंद आचेवर ठेवून द्यायचं. 
पातेल्यात तीन वाट्या जिन्नस आहेत तर साधारण दीड वाटी साखर घालायची. साखर विरघळून मिश्रण पातळ झालं की त्यात केशर,वेलची घालायची. जरा वेळ सतत ढवळत रहायचं. डाव उभा करून बघायचा. उभा राहिला की पुरण झालं. 
आता ते गार व्हायला ठेवायचं. जपून. खवा असल्याने जास्त चटका बसतो बरं का ! 
कणिक सैल मळून घ्यायची. कणिक आणि गार झालेलं पुरण सारखं पातळ असायला हवं. 
आता नेहमीसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची. तवा नीट तापला की तेल तूप न लावता भाजून घ्यायची. लक्षात घ्या हे करताना खव्याच्या पोळीसारखं मिश्रण बाहेर येऊ शकतं. त्याने काही बिघडत नाही. 
पोळी भाजून झाली की एका ताटलीत ठेवून भरपूर तूप लगेच पोळीवर माखायचं. पोळीचा कण आणि कण तुपात भिजायला हवा. 
मी जेव्हा काकूंकडे पोळी खाल्ली तेव्हा एकूण पन्नास पोळ्या केल्या होत्या. आणि एका परातीत तूप ठेवलं होतं. तव्यावरची पोळी थेट तुपात बुडवून मग दुसरीकडे ठेवली जात होती. 
तुम्हाला मूळ रेसिपीच करायची असेल तर तुम्हीही अख्खी पोळी तुपात बुडवू शकता.
याचं अजून एक इंटरेस्टिंग  प्रकरण म्हणजे ही पोळी करताना अतिशय कमी गोड करायची. तुपातून काढली की ताटात ठेवायची, त्यावर पिठी साखर पेरायची आणि वरून लिंबू पिळायचं ! 
अनेकांकडून हे आवडल्याचं ऐकलं आहे. मी खाऊन पाहिलं नाही अजून . 
शेवटी फक्त प्रमाण पुन्हा एकदा सांगते - 
१ वाटी बदाम
१वाटी हरबरा डाळ
१ वाटी खवा 
दीड वाटी साखर 
केशर, विलायची, तूप 
आज माझ्या वाटीच्या प्रमाणात लहान आकाराच्या 15 पोळ्या झाल्यात. एका जेवणानंतर राहिलेल्या पोळ्या मी डीप फ्रिज केल्यात! 
व्यवस्थित जड पदार्थ आहे हा. आज पंधरा km सायकल चालवून आल्यावर जेवले आणि संध्याकाळी चालायला जाणार आहे ! 
Its worth !!!





No comments:

Post a Comment