मला कानडी पद्धतीचं जेवण फार आवडतं. म्हणजे इडली वडे डोशे हे तर आवडतंच पण सहसा कुठल्याही हॉटेलमध्ये न मिळणारे साधे घरगुती पदार्थ जास्त आवडतात. माझी एक ताई कानडी आहे. तिच्याकडे भाज्या,चटण्या,सार,भाताचे प्रकार फार सुंदर असतात. तिच्या हातचे चाखलेले बहुतेक सगळे पदार्थ खूप आवडले म्हणून शिकून सोडलेत बघा !!!
त्यातलाच एक सौम्य सुंदर पदार्थ म्हणजे गोज्जु !
एकदा अशीच लांबच्या प्रवासातून दमून तिच्याकडे पोहोचले होते तेव्हा तिने गरमागरम पोळी आणि शिमला मिर्चीची रसभाजी वाढली. पहिला घास घेताच रंग चव वास यांची हार्मनी अशी भिडली की लगेचच रेसिपी लिहून घेतली. त्या भाजीला गोज्जु म्हणतात असं ऐकलं आणि भैरप्पांच्या एका कादंबरीत त्याचं वाचलेलं वर्णन आठवलं. पण ते गोज्जु अननसाचं.
मग कळलं की हा प्रकार मराठवाडी येसराचा कानडी भाऊ ! म्हणजे कोरडा मसाला तयार करून ठेवता येतो. करायच्या वेळी पाण्यात कालवून फोडणी घातली की झालं !!! असे पारंपरिक इन्स्टंट प्रकार तर आपल्या अति आवडीचे! मग तो मसाला करून वेगवेगळे प्रयोग केले आणि सगळे आवडले.
अगदी मोजके जिन्नस लागतात याला.
घ्या लिहून -
१मोठा चमचा हरबरा डाळ
१मोठा चमचा उडीद डाळ
१ मोठा चमचा तीळ
१ मोठा चमचा धणे
पाव चमचा मेथ्या
अर्धी वाटी खोबरं
सगळं कोरडं भाजायचं, गार होऊ द्यायचं, वाटून बरणीत भरून ठेवायचं. हा झाला कोरडा मसाला.
तर अननस गोज्जु हा मुख्यतः मंदिरात प्रसादाच्या जेवणात होणारा प्रकार. लग्नकार्यात पण हा असतोच. यात कांदा लसूण नसतो. पण घरी सहज करायचं असेल तर तुम्ही घालू शकता.
अननस घालून याला सर्वोत्तम चव येते.
(शक्यतो खोबऱ्याच्या) तेलात जिरे मोहरी हिंग अशी फोडणी करायची. त्यात अननसाच्या फोडी परतायच्या. तिखट हळद मीठ घालून पाणी ओतायचं. आणि लगेच गोज्जु मसाला घालायचा. अननस मुळात आंबट गोड असल्याने त्यात चिंच गूळ नाही घातला तरी चालतो. पाचेक मिनिटांत रस्सा छान आळून येतो. गोज्जु तयार.
नेहमीच अननस वापरलं पाहिजे असं काही नाही.
शिमला मिर्ची/वांगी/तोंडली/पडवळ/भोपळा या भाज्यांना वेगळा रस्सा हवा असेल तर फोडणीत भाजी परतायची, हळद तिखट घालायचं पाणी घालायचं आणि हा मसाला घालायचा. चिंचगुळमीठ घालून उकळी आली की अप्रतिम चवीची भाजी पोळी,भात कशाशीही खायला तयार !
मी तर आंबट निघालेल्या सफरचंदाचं पण गोज्जु करते. पटकन होतं आणि छान लागतं.
कोणतीच भाजी न घालता नुसता कांदा तेलावर परतायचा. तिखट मीठ हळद चिंच गूळ आणि गोज्जु मसाला घालायचा. हवं तेवढं पातळ घट्ट ठेवायचं. हे सार किंवा आमटी भात खिचडी भाकरी कशासोबतही खायला फार मस्त लागतं.
आज मी अननस गोज्जु केलंय. वरून घालायला कोथिंबीर नव्हती म्हणून कोथिंबीर पावडर भुरभुरलं आहे.
सौम्य तरीही चवदार वेगळं काही खायचं असेल तर गोज्जु नक्की करून बघा आणि सांगा कसं झालं ते 🙂
खूप छान रेसिपी. तुमचे इतरही लेख आवडले
ReplyDeleteखूप छान रेसिपी. तुमचे इतरही लेख आवडले
ReplyDelete