Tuesday, 6 March 2012

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २

२२ एप्रिल २०११

मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.

ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला :)

मला खरंच फार वाईट वाटलं. सरांचा व्यासंग जाणवत होता. वयाकडे पाहता अनुभवही उदंड असणार. त्यांची नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत याची किंचित खंतही बोलण्यात होती. पण मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वासही नव्हता. मग ते मराठी माध्यमातील शिक्षक, अभ्यासक्रम इ वर अगदी निराशाजनक बोलले. मी म्हटलं," सर, मी हे सगळं ऐकूनही आशावादी आहे." तर पटकन अचानक म्हणाले - " मी थकलोय आता. संपूर्ण निराश झालोय... "
हे ऐकून मला कसंतरीच झालं.

विषय बदलून मी माझ्या कामावर आणला. तर उत्तर - " तुझ्या पात्रतेएवढा पगार देणं मला जमणार नाही. शिवाय सध्या संस्थांतर्गत राजकारण एवढं माजलंय की तुला हे लोक कितपत टिकू देतील माहीत नाही. "
हा नकार आहे हे गृहीत धरून पण एका चांगल्या माणसाला भेटल्याच्या समाधानात मी निघाले.

मग एक दिवस वाटलं, परत एकदा सुरुवातीला उमेदवारी केलेल्या शाळेतच परत का जाऊ नये ? खरं तर तिथे पैसे फार कमी मिळणार आहेत. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं, समविचारी लोक अवतीभवती असणं, कामाच्या पद्धतीत स्वातंत्र्य असणं आणि मुख्य म्हणजे हवा तेवढाच वेळ काम करता येणं या गोष्टी माझी गरज होत्या. परदेशात काढलेल्या चार वर्षात प्रत्यक्ष काम केले नसले तरी अभ्यास, वाचन भरपूर झाले होते. आधीचा अनुभवही पाठीशी होता. पण या गॅपमुळे आत्मविश्वास बोंबलला होता. कामाला सुरुवात झाल्याशिवाय, पकड आल्याची जाणीव झाल्याशिवाय हे आत्मविश्वास नावाचं शिंगरू ताब्यात येणं कठीणंच !

हा सगळा गुंता घेऊन शाळेत गेले. तेच ओळखीचे चेहरे, ओळखीचं वातावरण पाहताना घरी आल्यासारखं वाटलं. सर भेटले आणि कामाला कधी सुरुवात करतेस असा थेट प्रश्न आला.. मला मनातून आनंद झाला. उत्साहाचे कारंजे नाचू लागले. त्यांना हो म्हणाले. सरांनी कामाचे प्लानिंग करताना उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक कामांची आखणी करायला सांगितली.

पूर्वी मी खेळाडूंसाठी काम केलं होतं. आता रेग्युलर शाळेतल्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी करायचं होतं. माझ्यासोबत अजून दोन सहकारी समुपदेशक असणार होत्या.

दोन दिवसात कामाची आखणी, सहकारी मैत्रिणींची ओळख, कामाची विभागणी अशी गडबड झाली.

आज वाटतंय... हेच करण्यासाठी किती आसुसले होते मी...आता नवी सुरुवात. परत एकदा अभ्यासाला लागलं पाहिजे. स्कूल सायकॉलॉजिस्ट! म्हणजे नेमकं काय करता तुम्ही ? असे प्रश्न नेहमीचे. काय करतो आम्ही ? पालकसभेत स्वतःच्या रोल ची ओळख करून द्यावी लागेल. एका कागदावर लिहिले -
स्कूल सायकॉलॉजिस्टची कामे - विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज या सगळ्यांसोबत काम करायचे.

१. भावनिक, वर्तनविषयक आणि समायोजनाविषयक समस्यांशी झगडणार्‍या विद्यार्थ्यांना समूपदेशन करणे
२. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी मदत करणे, त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत येणारे अडथळे नेमकेपणाने शोधणे
३. मानसिकरित्या स्वस्थ, निरोगी राहाण्यासाठी संवाद कौशल्य, स्व-नियमन, समस्या निवारण, उद्दिष्ट निश्चिती, स्वयंशिस्त आणि आशावाद शिकण्यास मदत करणे
४. कौटुंबिक समस्या, अपघात, दुर्दैवी घटना अशा परिस्थितीत समायोजन साधण्यास मदत करणे
५. अध्ययन अकार्यक्षमता, भयगंड, न्यूनगंड अशा प्रकारच्या समस्या हाताळणे
६. वरील सर्व कामांसाठी गरज पडेल तिथे विविध मानसशास्त्रीय चाचण्या वापरणे
७. मुलांचे मानसशास्त्र, विकासाचे टप्पे, मुलांच्या अभिक्षमता आणि मूलभूत कौशल्ये यासंदर्भात शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणे, आवश्यक तिथे पालकांचे समुपदेशन
८. विशेष गरजा असणार्‍या मुलांना योग्य त्या तज्ञाकडे पाठवणे.
९. वर्गातील वातावरण निरोगी, आनंददायी आणि प्रेरणादायी ठेवण्यासाठी शिक्षकांना मदत करणे
१०. वेगवेगळ्या सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या आणि भिन्न वातावरणात रुळू पाहणार्‍या मुलांना मदत करणे.

बापरे ! हे सगळं किती आदर्श वाटतं ना !

ह्म्म.. उद्यापासून हे सगळं प्रत्यक्ष करायला सुरुवात. समस्या असणारी मुलं आणि पालक येतीलच. पण मुळात समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काही कार्यक्रम तयार करता येईल का ? शाळेत जसे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, जिम असते, योगासनं आणि प्राणायाम असतात तसे मानसिक आरोग्य उत्तम रहावे म्हणून काही नियमीत कार्यक्रम आखता येईल का ?

आधी एक ठरवायचं, कोणत्याही संस्थेत राजकारण असणार, चांगल्यासोबत फारसे चांगले नसलेले लोकही असणार, गट असणार, वर्चस्व आणि हेवेदावेही असणार. यात माझी शक्ती मी कमीत कमी घालवेन.
मी मुलांसाठी काम करायला इथे आहे. त्यामुळे आधी मी माझं मानसिक आरोग्य जपेन. आणि अजून एक, मदत मागायला येणारा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक थरातला असला तरी माझी व्यावसायिक नीतिमत्ता मी जपेन.

जमेन नं ?????

Saturday, 3 March 2012

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी

१२ एप्रिल २०११

आज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...

मुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. "सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..!" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले ! माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.

सरः बोला मॅडम
मी: मी अमुक तमुक
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे.
आपल्या शाळेत काम करण्याची इच्छा आहे.

सर : ह्म्म.. ( हातातला बायोडेटा वाचल्यासारखा करत) किती पैशे घेता तुम्ही ?

कामाबद्दल काहीही जाणून न घेता येवढ्या जबाबदार पदावर काम करणारा माणूस पहिला प्रश्न हा विचारत होता.
मग कामाचे स्वरूप सांगून झाले. उपमुख्याध्यापिकाही आल्या. सरांनी ओळख करून दिली.

बाई : म्हणजे तुम्ही औषधं वगैरे देत असाल नं...

मी : नाही. औषधं देणारे सायकिअअ‍ॅट्रिस्ट असतात. मी सायकॉलॉजिस्ट आहे. आम्ही वेगवेगळ्या काउन्सेलिंग थेरपी वापरतो. त्यासाठी आवश्यक असेल तेथे मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतो.

सर : ओ: काउन्सेलिंग ! माझा आवडता विषय.. तुम्हाला सांगतो मॅडम, मला इथे एवढं काउन्सेलिंग करावं लागतं की कधीकधी डोकंच आउट होतं बघा !!!

मी : ( जरा चाचरत..) नाही सर, आमची समूपदेशन पद्धत वेगळी असते. मुलांच्या वर्तन विषयक समस्या, भावनिक समस्या, गटात मिसळण्यासंबंधी समस्या या आम्ही हाताळतो. त्याचप्रमाणे मुलांच्या क्षमता, बुद्ध्यांक, कल इ. समजून घेऊन त्यांना अभ्यासात आणि खेळात उत्तम यश मिळण्यासाठी आम्ही मदत करतो.

बाई : हां... म्हणजे सर, तो दहावीच्या वर्गातला तारे यांच्याकडे पाठवला पाहिजे. अहो मॅडम, एवढा दांडगटपणा करतो तो...आणि आठवीतली ती जोडी.. फेमस कपल आहे ! नववीच्या वर्गात साठपैकी ४० मुलं टारगट आहेत...

सर : त्या तारेला माझ्याकडे पाठवत जा बाई ! दोन मिनिटात सरळ होईल. आजकाल ना पालकच मुलांना फार डोक्यावर बसवतात...

मी : सर, बरेचदा नं, पालकांना मुलांना कसं वागवावं ते सुचत नाही हो... बरेचदा आपल्या वागण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतात ते ही लक्षात येत नाही. त्यातून पालक आणि मुलांमध्ये बराच गुंता तयार होतो.. त्यातून बाहेर पडायला आम्ही मदत करतो.

सर : अभ्यासात मदत म्हणजे काय करता ?

मी : बरेचदा मुलांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो पण अभ्यास करण्याची पद्धत न समजल्याने ती अभ्यासात मागे असतात. त्यांना अभ्यास करायचा म्हणजे काय ते सांगावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी वाचन,लेखन,पाठांतर या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यांना रुचणारी अभ्यासाची पद्धत आम्ही सुचवतो. स्मरण, लेखन, वाचन हे 'कौशल्य' म्हणून कसे विकसित करायचे याची तंत्र आम्ही शिकवतो. मग मुलांना अभ्यास करणं आवडायला लागतं.

सरांना बहुतेक कंटाळा आला असावा. त्यांच्या दॄष्टीने हा विषय महत्त्वाचा नाही हे स्पष्ट दिसत होते. त्यांनी पुन्हा पैशांचा विषय काढला. मी किमान अपेक्षा सांगितल्यावर 'हे काउन्सेलिंग प्रकरण भलतंच महाग आहे हो...' असा माझ्या तोंडावर शेराही मारला. आणि संचालक समितीच्या बैठकीत विषय मांडतो म्हणून मला निरोप दिला.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं अशा या 'सरांकडे' बघताना राहून राहून मनात काही प्रश्न पडतायत.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.

क्रमशः