Friday, 29 January 2021

अमोहाची डायरी ६

आम्ही ना सकाळी गाडीत बसून गावाला गेलो होतो. गावाला म्हणजे खूप वेळ गाडीत बसून जातात त्याला गावाला म्हणतात. सायकलवर नाहीतर pram मध्ये बसून आम्ही बाजारात दुकानात आणि लायब्ररीत जातो. तसं गावाला जायचं असेल तेव्हा गाडीत बसतात. माझं छोटं सीट आहे त्यावर बसून पट्टे बांधले की मला खिडकीतून सगळं दिसतं. मग मला खूप वेळ कंटाळा येत नाही. इतके दिवस मी छोटी होते ना, मला कंटाळा यायचा नाही पण आता मी पंचवीस महिन्यांची झाले. आता मला कंटाळा येतो. 

गाडीमध्ये आमच्यासोबत दादा आणि काकू आणि काका होते. त्यांनी माझ्यासाठी शेव आणली होती ती मी रस्ताभर खात होते. आणि सगळे मोठे लोक गप्पा मारत असताना शांत बसून बाहेर बघत होते. बाहेर हळूहळू सगळीकडे पांढरं पांढरं दिसायला लागलं होतं. एवढं पांढरं की मला दुधाचीच आठवण आली. पण बाहेर गेल्यावर दूध प्यायचं नसतं कारण आपला straw घरीच राहिलेला असतो.  

हळूहळू माझे डोळे आपोआप बंद व्हायला लागले तेवढ्यात मला पंखे सापडले. मग मी आरडाओरडा करून पंखा सापडला पंखा सापडला म्हणत सगळ्यांना पंखा दाखवला.

खूप वेळ पंखे दिसल्यावर बाबाने गाडी उभी केली आणि आम्ही सगळे खाली उतरलो. एवढी थंडी होती. मी दोन पॅन्टस,दोन शर्ट,जॅकेट टोपी हातमोजे पायमोजे आणि शूज घालूनसुद्धा थंड थंड वाटत होतं. खाली उतरलो तर माझे पाय पांढऱ्या वाळूत रुतले! बाबा म्हणाला त्याला बर्फ म्हणतात. मग आम्ही त्यात पाय उमटवले. आई काकू काका दादा इकडेतिकडे फिरुन फोटो काढत होते त्यामुळे मी बाबाला घट्ट धरून ठेवलं. ते काय सगळं पांढरं पांढरं होतं ते नुसतं बघत बसले. 

मग पुन्हा गाडीत बसून गावाला गेलो. 

तिथं जे बाप्पा केलं आणि पराठा खाल्ला. झोका खेळला. काकाच्या आणि बाबाच्या खांद्यावर बसून चक्कर मारली आणि झोपूनच गेले!!! 

घरी आलो तेव्हा घरापुढे माझी खेळायची वाळू पण पांढरी पांढरी झाली होती ! त्याला बर्फ म्हणतात हे मला आठवलं म्हणून आईने माझी पापी घेतली !

आमचा पार्क आहे ना, तिथे पण खूप बर्फ पडला होता. आम्ही तिकडे गेलो तर खूप मज्जा दिसत होती. मी जोरजोरात पायाने बर्फ उडवत धावत होते आणि माझं गवत लपलं ते शोधत होते. आई बाबाने मला लाडू करायला शिकवले.  हे बर्फाचे लाडू खायचे नाहीत ! खोकला येतो ना.. 

आम्ही नुसतेच लाडू केला लाडू फेकला लाडू फुटला असं खेळलो !

आईने बाबा आणि मी अशा दोन बर्फाच्या बाहुल्या केल्या.

दुसऱ्या दिवशी मला पुन्हा बर्फात खेळायचं होतं पण बर्फ गावाला गेला. 

घराच्या समोर दोन डबकी आहेत त्यात बर्फाचं पाणी असतं. त्यात खडे टाकायला मला फार मजा येते. मी मोजत मोजत एकोणचाळीस खडे टाकले तेव्हा आई म्हणाली आता ते डबकं भरून गेलं ! मग दुसऱ्या डबक्यात दगड टाकायचे तर आपली छोटी छोटी आई कंटाळून गेली होती म्हणून तिला बोट धरून घरी नेलं मी! 

बाबा असला की मला तो डबक्यात उड्या मारू देतो. पॅन्ट आणि बूट ओले झाले की घरी जावं लागतं तरीपण मी खूप खूप उड्या मारून पाणी उडवते. मग बाबाला कंटाळा आला की तो सरळ मला उचलतो आणि घराकडे निघतो. मी कितीही मोठ्याने रडले तरी अजिबात ऐकत नाही. फार हट्टी झाला आहे बाबा ! 

मला मधमाशी खूप आवडते, मुंगीबाई पण आवडते,गोगलगाय आणि कोळी किडा पण आवडतो. यातल्या कुणाची मला भिती वाटत नाही. या सगळ्यांच्या गोष्टींची पुस्तकं आहेत माझ्याकडे. पण चिलट आणि माशी मात्र मला फार घाबरवतात!काल रात्री तर स्वप्नात पण माशी आली आणि मी जोरात रडत उठले. उठल्यावर बघितलं तर माशी नव्हतीच ! माशी छोटी असते तिला घाबरू नाही असं आई बाबा शिकवतात पण तरी मला खूप भीती वाटतेच ! 

आई आता त्यांच्या गोष्टीच लिहिते म्हणाली. मग मला त्यांची भीती वाटणार नाही म्हणे..मी म्हणलं लिहिणार तर लिही बाई ! मला काय ! मला गोष्ट सांगून तुझं पोट भरणार असेल तर मला बरंच वाटेल !!! 

हे तुम्हाला म्हातारीच्या गोष्टीतलं बोलते असं वाटलं ना? पण मला खूप गोष्टी ऐकून पाठ झाल्यामुळे तसंच बोलणं येतंय. 

मी पराठ्याला म्हणते - आता मी तुला खाऊन टाकते.. 

आणि बाबाला म्हणते - कशाला घाबलली? बाबाला घाबरू नाही. आपला छोटा छोटा बाबा आहे ना???

परवा सकाळी उठून आईला म्हणलं "आई आई, असं ग का बोलतेस? " आईला काही कळलंच नाही. मग मी पुढची गोष्ट सांगितली -" आई आई, असं ग का बोलतेस? लेकीला वाईट वाटलं! " तरीपण आईला कळेना. मग म्हातारीने सगळी हकीकत लेकीला सांगितली असं म्हणल्यावर आईला कळलं की मी गोष्ट सांगतेय !!! 

कसं ना, आई बाबा दोघांनाही कधी कधी मी काय बोलते ते कळतच नाही. कुठल्याही गाण्याची ओळ म्हणली की त्या पुढची ओळ मला म्हणता येते पण त्या दोघांना गाणं कुठलं हेच आठवत नाही. मग मी त्यांना आठवेपर्यंत खूप वेळा कधी कधी सकाळपासून रात्रीपर्यंत ती एकच ओळ म्हणत बसते !!! 

तुम्हाला माहीत आहे, बाबाने आईला शाळेत घातलं आहे. ती कम्प्युटर समोर बसून वेगळ्याच भाषेत अभ्यास करते तेव्हा मी नीट लक्ष ठेवते. रात्री साडेनऊला तिची शाळा संपेपर्यंत मी अजिबात झोपत नाही. मग मात्र आई झोपायला आली की मी झोपते. कारण आई थकून जाते. 

बाबा ऑफिसला गेला की मी आणि आई घरभर पसाऱ्याची नदी करतो. मणी, पझल्स,पुस्तकं, पपेटस आणि ठोकळे एकत्र करायचे आणि पसरून द्यायचे. त्याला पसाऱ्याची नदी म्हणतात. मग आवरायचं असलं की मी आधी कार्ड्स मग पपेट्स आणि मग मणी शोधून शोधून आईला देते. मला आई कधी कधी राजमा खेळायला देते. राजमा टोपल्यात घेऊन आवाज करत चमच्याने एकीकडून दुसरीकडे टाकत सैपाक करायला मला खूप आवडतं. पण राजमा कार्पेटवर लपून बसला की पायांना टोचतो म्हणून लगेच भरून ठेवावा लागतो. ते काम मीच करते. 

एक गंमत सांगू का? समोरच्या कालव्यातले पक्षी किर्रर्रर्रर आवाज करतात ना,तो ऐकून ऐकून मला रडायचं किंवा चिडायचं असलं की मी पण अगदी तसाच आवाज काढायला शिकलेय ! तो आवाज आई आणि बाबाच्या आवाजा पेक्षा खूप मोठा असतो. वरच्या आजी आजोबांना पण ऐकू जातो. आणि जे काय चालू आहे ते मला अजिबात आवडत नाहीये हे आईबाबाला आपोआप समजतं. म्हणजे मला गोष्टीतल्या बॉबीसारखं पॉटीवर बसून शी शु करायला अजिबात अजिबात आवडत नाही. तरीपण मला त्यावर बसवलं की मी किर्रर्रर्रर किर्रर्रर्रर आवाज करून रडायला लागते ! बाहेरून घरात येताना, खूप वेळ टबात आंघोळ करून हाताची पायाची बोटं म्हातारी झाली तरी मला उठायचं नसतं. आई माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष देत मला उचलून टॉवेलमध्ये गुंडाळते तेव्हा पण तसंच ओरडते. मग आई मला क्रीमचा डबा खेळायला देईपर्यंत मज्जा !  

फोनवर लाल बटण असतं. आणि हिरवं बटण असतं. मला लाल रंग आवडतो म्हणून फोन सुरु असला की मी लाल बटण दाबते. अण्णा, काका, मामी किंवा मावशी किंवा आजीला खेळणी पुस्तक दाखवून झालं की मी लाल बटण दाबते. मग ते जातात. आई पुन्हा फोन करते आणि बोलते तेव्हा मात्र मी माझी खेळते. कारण मोठ्या माणसांना काम करायचं असतं. 

मला पण खूप काम असतं. ड्रॉवरमध्ये पावडर टिकली आहे की ते रोज बघायचं असतं. त्यासाठी रोज डब्यातून पावडर सांडून बघावी लागते. घरातल्या सगळ्या आरशात मनु सापडते का ते तपासायचं असतं, गुडमॉर्निंग फ्रेंड्स,फन टाइम्स हे नवीन गाणं पाठ होईपर्यंत तेच तेच तेच तेच ऐकायचं असतं, tv वर मुळा काही उपटेना बघायचं असतं... हे सगळं उड्या मारत आणि इकडून तिकडे पळत करायचं.मग मनु थकून जाते. 

आईला झोपायला नेते. मग आम्ही जय जय समर्थ श्लोक म्हणतो मला तीन श्लोक येतात आई त्याच्या पुढचे दोन म्हणते मग मी ओम शांति म्हणते आणि बाकीची बडबड सुरू करते. आई वाचत बसते मी बडबड करत सेम ! मग थोड्या वेळाने मला आईने हळूच पांघरूण घातलं आणि कपाळावर पापी घेतली की गुडूप झोप लागते.









No comments:

Post a Comment