Friday, 29 January 2021

बदामाचं झाड, मुंगळे आणि व्याकरण

मधली सुट्टी संपली की संस्कृतचा तास असायचा. बाई वर्गात आल्या की रोज मला देव शब्द चालवायला लावायच्या! घोकंपट्टी न जमल्याने देव काही चालायचा नाही आणि माझी रवानगी वर्गाबाहेर व्हायची! दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या वर्गासमोर खाली लावलेल्या बदामाच्या झाडाच्या बहारदार फांद्या असायच्या. हिरवीपिवळी गुलाबी चॉकलेटी पानं, बदामाचे घोस आणि त्यावर तुरुतुरु चालणारी मुंगळ्यांची फौज हे जमेल तेवढ्या बारकाईने बघत संस्कृतचा तास संपायचा. व्याकरण कधी जमलं / आवडलं नाही. 10वीला वर्गातल्या बहुसंख्य जनतेला शंभरपैकी किमान 95 मार्क मिळाले तेव्हा मला 88 मिळाले होते. 

पुढे संस्कृत संभाषण शिकताना व्याकरणावाचून बोलायचं काही अडत नाही हे नीटच समजलं. 
मराठी एम ए करताना सुदैवाने  उत्तम प्राध्यापक मिळाल्याने व्याकरण रसाळ झालं आणि त्या पेपरला पहिला वर्ग आपोआप मिळाला. पण त्यानंतर वाचताना बोलताना लिहिताना कधीही डोक्यात व्याकरण आलं नाही. 
डच शिकताना वर्गात डच शिक्षिकेने जेव्हा व्याकरण न घेता थेट संभाषण सुरू केलं तेव्हा हुश्श झालं आणि मला डच नेटकं बोलता यायला लागलं. व्याकरण आधी बोलणं नंतर असा प्रवास न होता आधी बोलणं आणि मग त्यातलं व्याकरण असा प्रवास झाला ते उत्तम झालं. 

इंग्रजी मात्र अजूनही कधी कधी व्याकरणात अडखळतं कारण कुणी इंग्रजी 'बोलायला' शिकवलंच नाही. म्हणजे तशी पद्धतच नव्हती. वाचून ऐकून बघून इंग्रजी शिकले. पण मला इंग्रजीपेक्षा डच जास्त चांगली बोलता येतं असं मला वाटतं कारण मी व्याकरणाचा विचार न करता डच भाषेत विचार करायला शिकले. हे मला थोडं हिशोब शिकण्यासारखं वाटतं. सहजता असेल तर हिशोब पटकन करता येतो. त्यालाच भागाकार, वर्गमूळ इ नावं दिली की गाडी एकदम मंद होते! 

आता जर्मन शिकायला सुरुवात केली आहे. जर्मन शिक्षक जर्मनमधूनच जर्मन शिकवत असल्याने त्यात सहजता आहे. एक शब्दही इंग्रजी बोलणार नाही अशी शपथ घेतल्यासारखं तीन साडेतीन तास जर्मन वाहत असतं. वेगळी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवसापासून डब्यातल्या भाजी पोळी सारखं व्याकरण संभाषण हातात हात घालून चाललं आहे. मला ती भाजी आवडत नाही पण नुसती पोळी खाऊ शकत नसल्याने काही पर्याय नाही ! 

आता लहान वाक्य तयार करून बोलण्याएवढं किंवा गुरुजी बोलतात त्यातलं अलमोस्ट सगळं कळण्याएवढं जमतंय.मित्रमंडळी जेव्हा जर्मन व्याकरण संस्कृत सारखंच आहे असं (पक्षी: त्यात काय एवढं तुला सहज जमेल )  असं सांगतात तेव्हा आजही बदामाचं झाड आणि त्यावरचे मुंगळे डोळ्यापुढे नाचायला लागतात ! त्यांचं गाणं जर्मन असतं एवढाच काय तो फरक !!!

No comments:

Post a Comment