Tuesday 19 January 2021

पाण्याकाठचं घर १३

म्हाताऱ्या माणसांकडून त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकणं हा विशेष अनुभव असतो. त्यात ते म्हातारे लोक जर दुसऱ्याच देशातले आपल्याला नवीन असलेल्या संस्कृतीतले असतील तर तो अनुभव अजूनच रोचक होतो! त्यातही स्नो ही आपल्यासाठी असलेल्या अपूर्वाईची गोष्ट त्या गप्पांमध्ये असेल तर तुम्ही कोणत्याही वयाचे असला तरी ती तुमच्यासाठी परीकथा असते! 

सहज हवापाण्याच्या गप्पा चालू असताना 'यंदा तरी स्नो पडतो की नाही !'अशी किल्ली फिरवायची की पुढच्या तासाभराची परिकथांची निश्चिंती !!!

" हा समोरचा कालवा त्या काळी नोव्हेंबरमध्येच पूर्ण गोठून जायचा. त्यावर बर्फातले खेळ खेळायला आम्ही गावातले हायस्कूलमध्ये शिकणारे सगळे अगदी रोज यायचो! अशाच एका दिवशी आईस स्केटिंग करताना मी जोरदार आपटले आणि मला तीन मुलांनी उचलून घरी नेऊन सोडलं. त्यातला एक नंतरचे चार पाच दिवस माझा पाय बरा आहे ना हे बघायला आणि मला होमवर्कमध्ये मदत करायला यायचा! पुढे तो माझा नवरा झाला !!!" 

" माझ्या वडिलांचे मोठे शेत होते, 300 हेक्टर ! त्यातच आम्ही रहायचो. माझे दोन भाऊ आणि आई,वडील आम्ही मिळून शेतीची सगळी कामं करायचो. स्नो सुरू झाला की मग मात्र काही काम नसायचं! त्या कामांचा कंटाळा असलेले आम्ही तिघे भाऊ स्नोची डोळ्यात प्राण आणून वाट बघायचो ! एकदा दोन दिवस स्नो झाला की आम्ही रेडिओ कानाशी धरून दिवसभर लोळत पडायला मोकळे !!" 

" माझा प्रियकर खूप दिवसांनी भेटला म्हणून आम्ही पार्कात फिरायला गेलो होतो. स्नो एवढा सुंदर दिसत होता! पूर्ण चंद्र असल्याने सगळीकडे सौम्य निळसर प्रकाश होता.  सगळी तळी गोठली होती, पाईन स्नो चे अंगरखे घालून झगमगत होते ते एवढं जादुई होतं की आम्ही वेळेचे भान पूर्ण विसरलो! भानावर आलो तेव्हा पार्काचं मुख्य दार कधीच बंद झालं होतं! मी भयंकर चिडले त्याच्यावर ! वाट्टेल ते बडबडत सुटले ! आणि त्याने मला अचानक त्या बंद दारापुढे असलेल्या पुष्करणीजवळ गुढग्यावर बसत लग्नाची मागणी घातली !! अजूनही गेली 40 वर्षं दरवर्षी एकदातरी पौर्णिमेच्या चंद्राला स्नो मध्ये बघण्यासाठी आम्ही दोघेही जातो ! " 

" आम्हाला व्हाईट वेडिंग हवं होतं ! आम्ही एका कॅसलमध्ये करायचं ठरवलं! आजूबाजूच्या कित्येक मैलांवर एकही गाव नव्हतं! तरीही आम्ही सगळी तयारी केली.  त्या काळी 150 लोक होते माझ्या लग्नात.सगळीकडे स्नो पसरलेला असताना शेकोट्या पेटवून रात्रभर नाचत गात होती मंडळी! स्नो पडतच होता. तिथलं एक सर्कल आखून भोवती कुंपण करून ठेवलं होतं. त्यात कुणी जायचं नाही अशी ताकीद देऊन !  आणि मग अगदी तांबडं फुटताना त्या आखलेल्या वर्तुळात फक्त आमच्या दोघांची पावलं उमटवत आम्ही लग्नाला उभे राहिलो ! अगदी परिकथेतल्यासारखं झालं आमचं लग्न !" 

"स्नो म्हणलं की मला लहानपणी आमच्या भल्या मोठ्या कुटुंबाने एकत्र साजरे केलेले ख्रिसमसच आठवतात. दिवसभर टेबलावर सतत काही न काही खायला आणून मांडणाऱ्या घरातल्या स्त्रिया, आम्हा मुलांसोबत स्लेज घेऊन बर्फात फिरणारे खेळणारे घरातले पुरुष आठवतात. या स्लेज पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असायच्या बरं का! आणि लाकडाचे बूट सुद्धा ! , सजावट केलेली घरं, स्नोमध्ये चमचमणारी झाडं आणि गोड मिठाया यांचा वास ! हे सगळं स्नो बघितला की कसं अलगद आठवत राहतं"!

असे कितीतरी किस्से ऐकताना त्यात आपणच गुंगून जातो! सांगणारे  डोळे चमकत असतात आणि शब्द मायेने भिजलेले असतात.

असं सांगून झालं की "गेले ते दिवस.." चा अनिवार्य सुस्कारा येतो. पुढे हे लोक जे सांगणार असतात ते आपल्याला सगळ्याकडून ऐकून माहीतच झालेलं असतं! 
ग्लोबल वॉर्मिंगमुळे आमच्या नातवंडं पतवंडाना हे अनुभव मिळणारच नाहीत अशी वेदना या लोकांच्या बोलण्यात असते. 

गेली काही वर्षे इथं बर्फ पडणं फार कमी झालं आहे. व्हाईट ख्रिसमस तर आता गोष्टींमध्येच राहिलाय. वर्षातले चार महिने बर्फ असायला हवा तिथं आता वर्षातून एखादा दिवस चारपाच तास बर्फ पडून जातो. एखाद्या वर्षी पडतच नाही. अगदी 10-12 वर्षांपूर्वी आम्ही स्नो मध्ये ख्रिसमस मार्केट्स बघितली आहेत. आता डिसेंबरात स्नो नाहीच होत. झाला तरी जानेवारी फेब्रुवारीत थोडा होतो. 

यंदा सुदैवाने आम्हाला मात्र बर्फ बघायला मिळाला. आमच्या गावापासून सव्वाशे km वर इस्कॉनचं एक मंदिर आहे. तिथे गेलो होतो. हे मंदिर म्हणजे एक जुनं कॅसलच आहे . आजूबाजूला फारशी वस्ती नाही. जंगल आहे. हा प्रवास फार सुंदर होता. जाताना लांबच लांब पसरलेली कुरणं आहेत, पवनचक्क्या आहेत! सपाट प्रदेश स्वच्छ हवा यामुळे खूप दूरवर असलेली गावही सहज ठळक दिसणार. 

एरवी हे दृश्य नेहमीचं म्हणून फार लक्ष गेलं नसतं. पण परवा मात्र स्नो मुळे सगळ्यांवर चेटूक झाल्यागत कमालीचं सुंदर दिसत होतं. लहानमोठी खेडी, शेती वाडी, पवनचक्क्या, कुरणं माळरानं, नद्या,कालवे, जंगलझाडी,लहान पायवाटा सगळं सगळं बर्फाने आच्छादलेलं ! नियमित रहदारीचे रस्ते तेवढे काळेशार पसरलेले! 

बर्फाचं, शुभ्रतेचं देखणेपण डोळ्यात भरून घेतलं !  
या डोळे दिपवणाऱ्या निसर्गाच्या रूपाने अनुभवातलं एक  ऋतुचक्र पूर्ण झालं !









No comments:

Post a Comment