हिवाळ्यातल्या एखाद्या दुपारी गाव बघायला जायचं तर सकाळपासूनच आधी मनात निवांतपणा मुरू द्यावा. बाहेर पडलं की सवयीने पाण्याकडे किंवा गुलाबांच्या रानाकडे वळणारी पावलं माणसांच्या वस्तीकडे वळवावीत. माणसं दिसतील अशी फारशी अपेक्षा ठेवू नये. संथ मधाळ हिवाळी सुट्यांच्या काळात चराचराने व्यापलेली थंडी येऊन अंगाला बिलगते तो क्षण उरात भरून घ्यावा. पहिली हाक मारेल तो रस्ता धरावा आणि निरुद्देश चालू लागावं.
भर दुपारी या जुन्याजाणत्या गावातल्या गल्ल्या तुरळक पावलं वगळता पेंगतच असतील. आपण आपल्याच पावलांचा आवाज ऐकत दगडी फरसबंद रस्त्यावर नव्याने सगळीकडे बघत चालत रहावं. घरादारांवर नाजूक लखलख करणाऱ्या दिव्यांच्या माळा उबेचा भास निर्माण करत असतात. चुकून एखाद्या घराच्या भल्यामोठ्या खिडकीचा पडदा उघडा असलाच तर भर दिवसाही घरात दिव्यांच्या उजेडात आपापल्या साम्राज्याचे राजे राण्या वावरताना दिसतील. कुठे टेबलावर नाजूक नक्षीकाम केलेल्या कपबश्या मांडणारा राजा, हातात पुस्तक घेऊन किंवा भरतकामाची हौस असणारी राणी असेल, तर कुठे निवांतपणे पियानोवरची धूळ झटकून त्याला बोलतं करणारी एखादी राजकन्या ! चित्र काढणारा किंवा लाकडी ठोकळे घेऊन त्यात काहीतरी कोरणारा छोटा राजपुत्र असेल ! ते त्यांचं राज्य आहे हे देहबोलीतून उमलून दिसतं याची मजा वाटेल ! बाहेरची निष्पर्णता सहन न होऊन किंवा आशेला नाकारायचं नाही म्हणून ; फुलदाण्या ताज्या टवटवीत फुलपानांनी भरून ठेवलेल्या दिसतील. ख्रिसमस ट्री सजून अलिप्त नजरेने सगळ्याकडे बघत उभा असेलच. चिमणीतून ताज्या भाजलेल्या केक किंवा बिस्किटांचा सुगंध बाहेरच्या गारेगार थंड वासाला चव देतोय हे अचानक लक्षात येईल ! शेकोटीचा अचानक येऊन आदळलेला वास सुखावून जाईल.
पेंगत्या वळणदार गल्ल्या संपल्यावर खूप जुन्या घरांची ओळ लागेल. खरोखरच ती घरं बाकीच्या तरुण घरांची निगराणी करणारी,काळजी घेणारी पण जुन्या वैभवाच्या खुणा तितक्याच असोशीने मिरवणारी भासतील.
शहराच्या मध्यातून भांग पाडल्यासारखी दिसणारी नदी दोन्ही काठावरची स्तब्धता बघत शांतपणे थांबल्यासारखी करत असेल. तिच्यावरचे पादचारी पूल डौलात दिवे मिरवत मान वर करून उभे असतील. प्रवासी बोटी दम खात पांघरुणात लपेटलेल्या दिसतील. मुख्य चौकात टाऊनहॉलवर सजवलेले दिवे बघायला आलेली चारदोन डोकी सोडली तर सगळीकडे एक सुसह्य शांतता असेल. राखाडी,काळोख्या भासणाऱ्या पण खरं तर दिवस असलेल्या वेळी अचानक सगळं शुष्क वाटायला लागेल!
आपण एखाद्या चित्रात घुसलोय की काय असं वाटून तिकडून झपझप चालत पायाच्या ओळखीच्या वाटेला लागावं.
एव्हाना ऊन घरवाटेला लागलं असेल. अचानक काहीतरी विसरल्यासारखं ऊन परतून येतं आणि तुम्हाला दिसतं की पहाटेच्या दव बर्फाची आता रस्त्यांवर चांदी झाली आहे. सगळ्या वातावरणाचा रंग अचानक परतलेल्या उन्हाने ढवळून बदलून गेला आहे. नेमका कोणता रंग आहे हा याचे आडाखे बांधत बदलणारे रंग न्याहळत सावकाश रोजची फेरी पूर्ण करावी. अगदी एकनएक पान झटकून टाकणाऱ्या झाडांनी पाखरांची घरटी मात्र अंगावर वागवावी हा त्यांचा भलेपणा की भाबडेपणा अशी शंका मनात उमटेल. तिला फार पाणी देऊ नये. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आपल्याला काहीही अधिकार नाही हे एव्हाना उमगलेलं असतं! त्याच झाडांवर निःशंक होऊन परतणाऱ्या पाखरांनी ते समजवलेलं असतं. ते बघून आता घराची ऊब आठवावी.
कालव्याकाठच्या रस्त्यावर वळलं की रोजची बदकं स्तब्ध पाण्यात नक्षीकाम करत पोहून दाखवतील. व्यायाम करणारी मंडळी भेटतील. एवढ्या गारठ्यातही नावेची साथ न सोडणारे नावाडी दिसतील. काठच्या झाडांवर परतणाऱ्या पाखरांचा कलकलाट वाढत असेल. अशा वेळी आजच्या या दुपारीबद्दल माया वाटून मनातल्या एका कप्प्यात ती वेळ जपून ठेवावी!
No comments:
Post a Comment