जगात दोन प्रकारचे खवैय्ये असतात. एका गटाला चावून निवांत तोंडात घोळवून कोरडं कडक इ खायला आवडतं आणि दुसऱ्या गटाला कमीत कमी कष्टात चावायचे फार कष्ट न पडता लवकरात लवकर गिळता येईल असं खायला आवडतं !
तुम्हाला भाकरी पोळीपेक्षा पराठे; बिर्याणी, मसालेभात इ फडफडीत प्रकारांपेक्षा खिचडी,मऊ भात बिशिब्याळीभात ; धपाटे, थालिपीठापेक्षा वरणफळं, गडगिळे, उकडशेंगोळे;पोह्यांपेक्षा उपमा; पिझ्झापेक्षा नूडल्स पास्ता; रोटी,नानपेक्षा इडली डोशे हे असं आवडत असेल तर आपणतुपन एकाच गटात आहोत !
तुम्हीही माझ्यासारखे दुसऱ्या गटात गिळणारे असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी !
सूप्स सूप्स सूप्स !!!
जनरली रस्सा भाजी,कढी, आमटी,वरण, सार,सांबार वाटीने प्यायला आवडणाऱ्या लोकांना सूप प्रकार आवडतात.
आमच्याकडे सूप हा मुडाखिसारखाच नियमीत होणारा प्रकार आहे. बेल्जियन लोक सूप खातात. पीत नाहीत. बिस्क या घट्ट फ्रेंच सूपच्या प्रकाराचा इथल्या सुपांवर प्रभाव आहे. इथं चमचे सुद्धा कॉफीलेपल आणि सूपलेपल अशी असतात. सूप बोल नसतात तर सूप डिश असतात. रोज संध्याकाळी जेवणात कोणतातरी मांसाचा तुकडा, पाव आणि सूप किंवा पास्ता आणि सूप असं यांचं जेवण असतं. आम्हाला संध्याकाळच्या जेवणाला हा सुटसुटीत प्रकार आवडतो. छान रंगीबेरंगी कोशिंबीर करावी किंवा भाज्या नुसत्याच मीठ मिरपूड घालून लोण्यावर परतून घ्याव्या, घट्ट सूप करावं आणि एखादा छोटा पाव घेऊन जेवायला बसावं! रोजच्या कुकर,तवा,फोडण्या,मसाले यातून मिळणारा असा ब्रेक मला फार आवडतो.
गेल्या काही दिवसातले सूपविचार तुमच्याशी शेअर करतेय. घट्ट क्रीमी सूप, भाज्यांचे तुकडे असलेलं सूप, क्लिअर सूप, मोमो सूप,नूडल्स सूप असे सगळे प्रकार आवडतात पण त्यातल्या त्यात क्रीमी सूप जास्त!
ही सगळी सूप्स संपूर्ण शाकाहारी, लो फॅट, बाहेरचं कोणतंही फ्लेवर्ड प्रिझर्व्हेटिव्ह (मसाला ब्लॉक्स , स्टॉक ब्लॉक्स,एमएसजी वगैरे)न घालता केलेली आहेत.
सगळी सूप्स करायची पद्धत जवळपास सारखीच आहे. तरी थोडक्यात सांगते.
तेल/तूप/बटर चमचाभर गरम करायचं. त्यावर तमालपत्र आणि लवंग मिरी दालचिनी यातलं आवडेल ते घालायचं. अर्धा कांदा घालायचा. मग लाल भोपळा/दुधी भोपळा/गाजर/मटार/मश्रुम/फुलगोबी/झुकीनी/ब्रोकोली/पालक/भिजवलेल्या डाळी इ पैकी एक किंवा आवडतील त्या भाज्या घालायच्या. शिजवून वाटून किंचित दूध घालून गरम केलं की सूप तयार.
मी कोणताही स्टॉक / फ्लेवर एनहॅन्सर वगैरे वापरत नाही.
क्रीमी सूप हवं असेल तर बटरवर मसाले घातले की चमचाभर कणिक किंवा ज्वारी पीठ घालायचं. ते नीट परतलं की कपभर दूध घालायचं आणि शिजू द्यायचं. गाठी मोडल्या नाहीत तरी हरकत नाही कारण भाज्यांसोबत एकत्र प्युरी करताना त्या आपोआप फुटतील.
असं सूप छान दाटसर होतं. मिळून येतं.
दाट सुपासाठी बटाटा किंवा रताळी पण घालता येतील.
मसाले आणि भाज्या यांचं कॉम्बिनेशन आवडीनुसार वेगवेगळ असू शकतं.
उदा: लाल भोपळा सूप करताना त्यात फक्त जायफळ घालते. भोपळा जायफळ यांचा स्वाद खूप छान लागतो.
मटार सूप करताना बडीशेप घालायची. उत्तम लागते.
टोमॅटो सूप करताना दालचिनी हवीच. जिरे आणि नारळाचं दूध पण हवं ! किंवा ताजा बासिल.
मश्रुम सूप करताना मिक्स्ड हर्ब्ज घालायचे. आणि वरून मिरपूड. बाकी कोणतेही मसाले नाही घातले तरी चालतात.
तुर्की पद्धतीने लेंटील सूप करताना वरून तेलतिखट तिळाची फोडणी अप्रतिम लागते.
ताजा बेसिल,सेलरी,पुदिना इ घालून सूप्स खूप छान होतात.
सूपसाठी भाज्या शिजवताना अक्रोड बदाम घातले की स्वाद बदलून 'शाही' होतो.
मोमो सूपचे पण हवे तसे प्रकार करता येतात. फोटोत दाखवलेलं मोमो सूप तिळाचं आहे. मोमो कोबी गाजर फरसबी भरलेले आहेत.
क्लिअर सूप्स करताना शक्य तितके कमी मसाले घालावे. लिंबू मिरपूड पुरेशी असते. क्लिअर सूप आणि मोमोज पण छान लागतात.
पास्ता सूप - कोणत्याही क्रीमी सूपमध्ये मूठभर पास्ता शिजवला की एकाच डिशमध्ये पोटभरीचं जेवण होतं.
माझ्या दृष्टीने फूटी कढी, सोलकढी, आंबील, रस्सम, कढण, आळण इ प्रकार पण सूप आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी!
तुम्हीही तुमची सूप्स सांगा.मला शिकायला, करून बघायला नक्कीच आवडतील!
No comments:
Post a Comment