झळाळून डोकं वर काढणाऱ्या हिवाळ्यातल्या संधीसाधू सूर्याकडे बघताना किती हरखून जाशील! या दिवसांत काळ्याशार स्वच्छ आभाळात बोट टेकवावं आणि चतकोरच उमटावी अशी चांदीची चंद्रकोर सुद्धा भित्री असते!
जेमतेम आठ तासात संपणाऱ्या दिवसाची घडी घालायच्या सतत मागे लागलेला अंधार खरा सोबती! पानगळीनंतरची विरुपता ममत्वाने जबाबदारीने पांघरूण घालून झाकून जपून ठेवतो तो! या सगळ्याला काय म्हणशील? ऋतूची उदासीनता की करुणा?
फक्त वसंतात आणि शिशिरात रमून कसं चालेल बयो! ही निष्पर्णताही तितकीच सहज पेलता यायला हवी. सगळी पानं गळून गेलेल्या घट्ट, वठल्यासारख्या या खोडाफांदीमध्येही वसंताच्या आठवणी असणारच की! पायाशी वाहणाऱ्या पाण्याबरोबर कदाचित कधीतरी एखाद्याच राहिलेल्या पानासोबत गळून त्या आठवणी तरंगतही असतील. स्थलांतरित पक्ष्यांची कलकल उघड्यावागड्या कानाआड करून त्या आठवणी जपायला लागणारा घट्टपणा शेवाळाच्या आड दडवताना झाडं संकोचत नाहीत. त्या आठवणींची ऊर्जा पुढच्या ऋतूंच्या पालवीसाठी साठवून ठेवायची असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्याच निर्धारात ती निःसंगपणे रोजचा सूर्योदय अंगी मिरवतात, सूर्यास्त सहन करतात, पाऊस माखून घेतात, वाऱ्यावादळाशी सहज खेळून सोडून देतात...!
सगळीच्या सगळी पानं कुरवंडुन, सोहळा करून निर्विकार उभी असणारी ही झाडं म्हणजे अतिप्राचीन लिपीत लिहिलेला जन्ममृत्यूतला करार आहे बघ !
त्याच कराराचा एक अंश आज मला समजलाय - एकाच ऋतूच्या प्रेमात कायमस्वरूपी राहण्यापेक्षा प्रत्येक बदलत्या ऋतूचा आपणच अंश व्हावं ! मग आपणही आपोआप बदलतो कारण ऋतू बदलतात!
No comments:
Post a Comment