"कैंय्यातूSSS तुत्तातूंSSS" अशा घोषणा देत हातात बाबा वाळत घालत असलेल्या कपड्यातली माझी ओली पॅन्ट हातात घेऊन तिने झाडून काढत घरभर फिरायला मला फार आवडतं! गेले 3 आठवडे मी हे दोन शब्द मोठमोठ्या आवाजात हसत ओरडत म्हणतेय पण आईबाबा सारखं म्हणजे काय म्हणजे काय म्हणून विचारतात!!!
शेवटी आज बाबाला अचानक त्या शब्दांचा अर्थ समजला! काय झालं सांगू का, खूप दिवसांनी माझं आवडतं मुस्तीचं पुस्तक सापडलं. मग मी पळत पळत 'पु स त क SS पु स त क SS' असं म्हणत बाबाकडे गेले. ती गोष्ट मला पाठ आहे पण त्यातले काही शब्द मला फारच आवडतात म्हणून मी तेच तेच म्हणते. तर गोष्टीत मुस्तीचा मित्र साबणाच्या पाण्यात पडतो. मुस्ती त्याला बाहेर काढतो तर त्याच्या 'कानातून' 'तोंडातून' साबणाचे फुगेच फुगे उडतात !!! हेच ते 'कैंय्यातूं' 'तुत्तातूं' !!! बाबाला समजल्यावर त्याने आईला पण सांगितलं आणि मग ते हसायला लागले !!!
मला आता कुरुकुरु बोलता येतं! गोष्ट सांगता येते. मी रोज आई बाबाला त्याच त्याच त्याच त्याच गोष्टी सांगते. तुम्हाला पण सांगते -
एक असते मनू, एक असतो बाबा
एकदा बाबा मनूला म्हणतो मनुल्याSSS बाहेर जायचं टोपिया घालाया, मोजे घाला हापयमोजीए (हातमोजे) घाला मग बाबा आणि मनू बागेत जातात. (दोन अक्षरांत येणारं य मला आवरत नाही)
एक असते मनू एक असते आई आई म्हणते मनुल्या बाहेर जायचं. टोपिया घालाया. मोजे घाला. मग आई आणि मनू सायकलवर बसून लायबाडीत (लायब्ररी) जातात.
मला या गोष्टी खूप आवडतात. अशा गोष्टी मलाच तयार पण करता येतात.
एक होतं वरण, एक होता भात. वरण म्हणालं, भातुल्या बाहेर जायचं! टोपिया घालाया ! मोजे घालाया, स्वेटर घालाया... आणि मग ते सायकलवर बसून बागेत गेले.
मी जशी सोफ्यावरून धबाक्कन पडते तसं आमच्या घरात कधी कधी ऊन धबाक्कन पडतं. ऊन आलं की मला सावलीशी खेळायला मिळतं म्हणून मी खूप नाचते. उन्हात नाचता नाचता मला गोष्ट आली.
एक होतं ऊन, एक होती सावली. एकदा सावली म्हणाली उनुल्या, बाहेर जायचंय. टोपिया घाला, स्वेटर घाला, बूट घाला मग ऊन आणि सावली सायकलवर बसून बाजारात गेले !
मला पण बाजाडात जायला फार आवडतं. बाबाच्या खांद्यावर बसून आईच्या मागे मागे जायचं. तिकडे खूप लोक असतात आणि खूप दुकानं असतात. एक चिमण्या आणि ससे असलेलं दुकान आलं की आम्ही तिथे थोडावेळ थांबतो. मग भाजी घ्यायला जातो. मी मग शहाणी मुलगी व्हायचं ठरवते. इकडे तिकडे हात लावायचा नाही. टोमॅटो आणि संत्री दिसली तरी पण हात लावायचा नाही. मला मग खूप खूप रडू येतं. मी मोठ्याने रडते. बाबा समजून सांगायला जातो तेव्हा मी वेगवेगळे आवाज काढून रडून बघते. सगळे लोक माझ्याकडे बघतात पण आई बाबा अजिबात बघत नाहीत. मग आई घरी आल्यावर टोमॅटो आणि संत्री खायला देते.
मी आता नीटच चावून चावून खायला लागलेय. पराठा आणि पेअर, काकडी सगळं मी छान चावून खाते. पण त्यामुळे एक घोळ झालाय. आमच्या घरातल्या सगळ्या दुधाच्या बाटल्या चिऊताईच्या पिलांकडे उडून गेल्या. मला कधी कधी बाटलीची फार आठवण येते. आईने कपमध्ये नळी घालून दूध प्यायला शिकवलं. दूध संपलं की फुरर फुरर आवाज येतो ना ती मज्जाच असते. मग मला बाटलीची आठवण येत नाही.
मला फिरायला आवडतं पण आता थंडी असते म्हणून आईबाबा मला बाहेर जाताना खूप कपडे घालतात. माझा अगदी कोबीचा गड्डा होऊन जातो. पण बाहेर खूप मजा येते. झाडांची गळलेली पानं चुरचुर आवाज करतात आणि पिवळी केशरी दिसतात. एखादी वाळकी काठी मिळाली की मी तासभर एकटी पानांशी खेळत राहते. बाबा कंटाळला की मी बाबाच्या खांद्यावर बसून धिंगतंग धितांग धिं !! असं गाणं म्हणत नाचत नाचत सायकलकडे जातो आणि बागेला मोठी चक्कर मारतो. आईसोबत घरामागच्या बागेत खेळायला गेले की आई आणि मी झाडांची पडलेली पानं झाडाला देतो. झाडाच्या पायाशी पानांचा छोटा डोंगर केला की खालच्या किड्यांना पांघरूण मिळतं आणि ते thank you अमोहा असं म्हणतात!
मात्र मला बाहेरून घरी जायला अजिबातच अजिबातच आवडत नाही. एकदा मी आईसोबत लायब्ररीत गेले होते. तिथं छोटा हत्ती होता, पायऱ्या होत्या आणि खूप खूप पुस्तकं होती. मला सगळी पुस्तकं हातात घेऊन पायऱ्या चढून उतरायचा खेळ खेळायचा होता. आई म्हणे पुस्तकं खाली ठेवून चढ. पण मला काही माझी पुस्तकं खाली ठेवायची नव्हती. मी तसाच प्रयत्न करत होते पण जमतच नव्हतं. शेवटी पुस्तकं ठेवून चढता आलं. मग मात्र मला फक्त चढउतार करायचा होता. आई घरी चल म्हणाली तर मी तिथे रडत सैरावैरा धावले. तिथले काका आणि आजी मला रागावतील असं आई उगाच सांगत होती. कारण ते तर हसत होते! शेवटी आई एवढी चिडली की मला पुस्तकं समजून तिनं काखेत आडवं धरलं आणि तरातरा सायकल कडे गेली. "तुला आता कध्धी इथं आणणार नाही" असं नेहमीप्रमाणे ती म्हणाली. मला सायकलवर बांधून बसवेपर्यंत मी मजेत वेगवेगळ्या आवाजात रडून बघत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला! आता मात्र मला पावसातच घरी जायचं होतं. मी आईला मुळीच थांबू दिलं नाही. गारेगार टपटप पावसात आम्ही कुडकुडत घरी आलो.घरी बाबाने आईला चहा आणि मला गरम दूध दिलं तर मला झोपच आली! या नादात मी लायब्ररीत का रडत होते ते विसरूनच गेले!
कधीकधी आम्ही दुकानात जातो. कधी कधी दादाच्या घरी जातो. कधीकधी कारमध्ये बसून मोठी चक्कर मारून येतो. मला गाड्या बघायला खूप मजा येते. आणि जंगलात फिरायला पण मजा येते. पण मला आता माणसांची अजिबात सवय राहिली नाही असं आई बाबा बोलत होते.
फोनवर बोलायला मात्र मला फार आवडतं. मी इताई (इराताई) आणि आजी आणि आंबायाशकाका, अण्णा आणि खूप खूप मावश्या आहेत त्यांच्याशी बोलते. फोन सुरू झाला रे झाला की मी नाचून दाखवते, गोष्ट सांगते, रंग सांगते, पुस्तकं दाखवते, सोफ्यावर उड्या मारते... आई किंवा बाबा फोनवर बोलताना मला आवडत नाही. मग मी ओके बाय म्हणून लाल बटन दाबते आणि फोन बंद होतो! असं केलं की आई मला आगाऊ म्हणते! म्हणजे ऍडव्हान्स असं बाबा म्हणतो !
मी आता 23 महिन्यांची म्हणजे खूपच मोठी झाले किनी ! मला सगळं आपल्या आपल्या हाताने करायचं असतं. काटा चमचा हातात घेऊन फळं आणि इडली खाता येते. सीपरने झाकण उघडून पाणी पिता येतं. आंघोळ करताना उटणं आपलं आपलं लावता येतं, आपला आपला आणि आईचा भांगसुद्धा पाडता येतो.रात्री झोपण्याच्या आधी मी आईला पसारा आवरून देते. चेंडू, इथं बस गं! पुस्तक, इथं बस गं, पेन्सिल, इथं बस गं असं म्हणत सगळ्यांना बसवते आणि मग झोपायला जाते.
झोप मात्र आपली आपली येत नाही. चंदा आला की थोडा वेळ त्याच्याशी खेळून त्याला निन्नी जा सांगते. मग आई म्हणते आता सगळे झोपले. मी सगळ्यांची नावं घेऊन खात्री करून घेते. चिऊ? झोपली. कबुतर? झोपलं. बुंबाबाई (मुंगी) झोपली. भुभू झोपला, पुसताक झोपलं, कुकर झोपलं, कॉफी झोपली, डायपर झोपलं, पायजमाया(पायजमा) झोपला, शंकरपालेया (शंकरपाळी) झोपली....
मग आईला गाणं म्हणायला लावते -
चमचम चमचम चांदण्या
कोण आहेत या पाहुण्या
उंच उंच आभाळात
हिऱ्यासारख्या लखलखतात
चमचम चमचम चांदण्या
हे म्हणून कंटाळा आला की त्याच चालीत ककाकिकीकुकूके सुरू होतं. मग बाबाबिबी पर्यंत कधीतरी मला झोप लागते!
स्वप्नं पडलं की मी उठून बाबाला हात लावून पुन्हा झोपते. आई म्हणते की मी बाबासारखी झोपेत गप्पा मारते. पण मला ते म्हणजे काय कळत नाही. चुकून कधी मध्येच जाग आली तर मनुल्या झोप आता असं मोठ्याने म्हणून मी आपली आपली झोपून जाते !
एक गंमत सांगू? मला आता चालायची सायकल आणली आहे. बाबा मला शिकवतोय ! आता मला त्याचीच स्वप्नं पडतात..!
No comments:
Post a Comment