Wednesday, 21 October 2020

पाण्याकाठचं घर १०

जरा गारठा आहे असं मनात म्हणत झपझप चालायला सुरुवात करावी आणि दारापुढच्या अक्रोडाने टपटप अक्रोड पुढ्यात फेकत पानगळ सुरू झाल्याचं सांगावं हे दर वर्षीचं ! उन्हाळा किती जरी लख्ख, स्वच्छ, सुंदर असला तरी पानगळीचं मुरलेलं देखणेपण त्याच्याकडे नसतं हे हळू हळू पटू लागतं. सगळी झाडंवेली आपसात ठरवून अति संथ गतीने रंग बदलायला लागतात. आई अपल्यापाशीच असणार आहे या खात्रीत गाढ झोपलेल्या बाळमुठीतून आपलं बोट हळूच सोडवून घेऊन नीरव काम करणाऱ्या आईसारखा हा ऋतू ! 

आधी सगळी फळं देऊन टाकतो. पेअर,सफरचंद, अक्रोड, चेस्टनट अशा नाना तऱ्हा ! मग बिया. ओकचे सडे !! त्याच बियांची टोपलीसारखी कवचं.. फुलं केव्हाच संपली असं म्हणताना मोठा श्वास घ्यावा तर ऋतूतला शेवटचा लावेंदर अजून हवेत तरंगत असतोच. पुन्हा एकदा कालव्याच्या काठावरचं कापलेलं गवत आणि हा गंध एकत्र येऊन गुंगवत राहतो. पण आता हवा जड होते.  कालव्याच्या काठची वडीलधारी झाडं आधी लहानग्या झाडांना रंग बदलायला लावतात. तोवर त्यांच्या अंगाखांद्यावरची घरटी रिकामी होऊन विरळ पानांत उठून दिसु लागतात. मग येताजाता कुणाची किती पानं रंगीत झाली हे बघायचा नादच लागतो. 

एकीकडे ही रंगीत पानं शोधायची आणि दुसरीकडे पांढऱ्या शुभ्र पाहुण्या  पक्षांची कलकल ऐकायची! कालव्यातल्या नुकत्याच वयात आलेल्या बदक पिलांसाठी हे जगण्यासाठीचं आव्हान ! हे सीगल प्रचंड संख्येने येऊन त्यातल्या त्यात मध्यम आकाराच्या झाडांवर वस्तीला राहतात. आता टेहळणी करणारी टोळी आलीये तीच मुळी पंचवीसएक जणांची. आता पुढच्याच महिन्यात याच्या दहा पंधरा पट सोबती येऊन पाण्यात उतरतील. तेव्हा मात्र मूळ गरीब स्वभावाच्या बदकांना अन्न मिळवण्यासाठी खूप झगडावं लागेल! पाण्यावर शेवाळे रंग बदलू लागल्याचं दिसु लागलं की हे बदक अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतात! 

एके दिवशी उठून बऱ्याच दिवसांनी गुलाबाचं रान असलेल्या पार्कात जावं तर तिथं जगाचे सगळे रंग नवे झालेले असतात. वाटेतल्या घरावरची आयव्ही हट्टाने हिरवेपण मिरवत भिंतभर पसरतच असते. तिच्याही छटा बदलल्याचं सहज दिसतं.अगदी रोडच्या शेजारची झाडंही रुप्याने सोन्याने माखलेली !!! 

वसंताच्या सुरुवातीला फुलांनी वेड लावलेली ती चाफ्यासारखी फुलं उधळणारा वृक्ष आता धीरगंभीर चेहऱ्याने भेटतो. लिंडनचे शेंडे केशरी झालेले दिसतात. ओकची पानं नाजूक पिवळ्या रंगाकडे झुकत असलेली दुस्तात.मेपलची आधीच्या हिरव्यागार लाटेत लपून गेलेली झाडं आता लाल शेंदरी पिवळ्या रंगामुळे लपूच शकत नाहीत. सगळ्या पायवाटा सोन्याच्या पानांनी माखलेल्या दिसतात.नेहमीची पाखरं आता जवळजवळ दिसतंच नाहीत.बुंध्याशी असलेले किडे,मुंग्या,वाळवी, रंगीत अळ्या सगळे गायब ! जरा धीर धरून बराच वेळ लपून किंवा न हलता बसलात तर कदाचित शेंदरी रंगाची मोठा झुपकेदार शेपटा माती लागू नये म्हणून वर करून तुरुतुरु फिरणारी बिया गोळा करणारी एखादी खारोटी मात्र नक्कीच दिसते! 

जरा पुढे तळ्याच्या काठी मासे पकडायला बसलेल्या मंडळींच्या उरल्यासुरल्या अन्नावर डोळा ठेवून भली मोठी पांढऱ्या बदकांची फौज निवांत बसलेली दिसेल. त्यांच्यापासून जरा सावधच ! उगाच मायेचा उमाळा येऊन त्यांच्याकडे बघायला जाल तर त्याचा भलताच अर्थ काढून हे सगळेच्या सगळे लुटुलुटू तुमच्यामागे पळत येऊन तुम्हाला त्यांच्या वेशीबाहेर ढकलूनसुद्धा देतील !!! 

तिकडून गुलाबाचं रान ओलांडून अलिकडे आलात की हर्ब्स गार्डनमध्ये डोकवायला विसरू नये. बाकी काही नसलं तरी चार लाल भोपळे, कसल्या तरी मोठ्या केसाळ शेंगा आणि शेवटचे उरलेसुरले चेरी टोमॅटो दिसतीलच. रोजमेरी आणि सेज च्या वासाच्या नादात पुढे वाकून बघितलं तर अचानक हळदी कुंकू वेल चकित करायला बसलेली दिसेल. हळदी कुंकू आपलं म्हणायचं नाव ! हे एक प्रकारचं सॅलड म्हणून खातात. फुलं पण आणि गोल टिकलीदार पानंपण. 

आताच्या हवेतही मान उंच करून तेवढ्याच उत्फुल्लतेने डोलत असलेल्या गुलाबांचं कौतुक करून पुढचे दोन लहानगे ओढे साकव बघायला जायचंच. तिथं सगळ्या ऋतूंतले सौंदर्याचे तुकडे विखुरलेले असतात. ऋतू बदलला की ओढ्याच्या पाण्याचा रंग बदलतो. वरून डोकावणारी झाडं वेली, कमळाची पानं,बेडूक,मासे,बदक,करकोचे सगळे सगळे बदललेल्या ऋतूचा रंग घेतात. 

उन्हाळ्यात लक्ष न गेलेल्या मातीचा आणि गळलेल्या पानांचा, हळुहळू मातीमय होणाऱ्या फळांचा आणि मधूनच येऊन हात हातात घेणाऱ्या पावसाचा एकत्रित वास एव्हाना तुमच्या मनाला लागलेला असतो. त्यात मागच्या सगळ्या सगळ्या ऋतूंच्या आठवणी असतात, आनंदी दुःखी पण आत्ता या क्षणी जवळ नसणारे हजारो क्षण त्या गंधामुळे पुन्हा पुन्हा भेटत राहतात. रंगमाखलेपण लेवून मनही हळूहळू जड तरीही शांत होत जातं. कालचं सगळं बदललेलं असतं. उद्याही सगळं बदलणार असतं. आणि हा वर्तमान क्षण एवढंच सांगत असतो; ऋतू बदलतात !!!














No comments:

Post a Comment