इथेही दर दोनचार गावांमध्ये मिळून एक शेतकरी बाजार असतो. प्रत्येक गावी भरणाऱ्या आठवडी बाजारापेक्षा हा वेगळा. इथं फक्त शेतकरी आपापल्या शेतातली उत्पादनं थेट ग्राहकांना विकू शकतात.बटाटे,अंडी,चीज लोणी,सुकवलेलं मांस,लोणची,स्वतःच्या शेतात पिकवलेल्या भाजीपाला यात टोमॅटो, अस्परागास, विटलोफ,पालकाचे प्रकार,मश्रूम आणि कोबीचे कितीतरी प्रकार असतात. फळांमध्ये स्ट्रॉबेरी,रास्पबेरी इ बेरीज,द्राक्षे, सफरचंद आणि पेअर.बाकी फळं कमी असतात. आपल्याकडे बसतात तसे ताडपत्री अंथरून भाज्या, फळं यांचे छोटे छोटे ढीग करून लोक ओरडून आपल्या शेतमालाची जाहिरात पण करत असतात. मात्र इथं कोणी घासाघीस करताना दिसलं नाही.बहुतेक सगळ्यावर किंमत लिहिलेला कागद असतो. अर्धा किलो एक किलोच घ्यायला पाहिजे असं काही नाही. एकच कुर्जेट, दोनच ढोबळी, एकच सफरचंद असं घेतलं तरी किंमत बदलत नाही. बाकी वातावरण एकदम घरगुती असतं. बहुतेक शेतकऱ्यांचे नेहमीचे ठरलेले ग्राहक असतात. आम्ही परवा अशाच एका अडबाजूच्या गावातल्या शेतकरी बाजारात गेलो होतो.त्या भागात फारसे परदेशी लोक जात नसावेत हे आमच्याकडे वळणाऱ्या कुतूहलाच्या नजरा सांगत होत्या.
बाजार सुरू होतो तिथं मास्कच्या सूचना होत्या. समोरासमोर उभ्या असलेल्या दोन रांगा एवढाच बाजार. स्वच्छ, शिस्तबद्ध. सुरुवातीलाच नव्या बटाट्याच्या पुष्कळ गाड्या होत्या. बहुतेक लोक दहा दहा किलोच्या गोण्या घेत होते. त्यातही तळायचे बटाटे वेगळे,भाजायचे वेगळे आणि प्युरी करायचे वेगळे. कांदे आणि रताळी भरलेली पाच पाच किलोची छोटी पोती भराभर संपत होती. चीज चे ट्रक अक्षरशः रिकामे होत होते. आता येणाऱ्या कडक हिवाळ्याची तयारी. सध्या सफरचंद आणि पेअरचा हंगाम आहे. अतिशय स्वस्त दरात ताजी फळं मिळत होती.
या ऋतूत इथे लोक खूप भोपळे खातात. भोपळ्याची सजावटही करतात. अमेरिकेत करतात तसं कोरून आतमध्ये लाईट किंवा दिवा लावून ठेवण्याचीही पद्धत नव्याने सुरू झाली आहे. पण सगळ्यांच्या अंगणात नुसते भोपळे सजावट म्हणून ढीग करून एकावर एक रचून ठेवलेले दिसतात. अर्थातच सजावटीसाठी वेगळ्या प्रकारचे भोपळे असतात. ते सगळे खाण्यायोग्य नसतात. एका शेतकऱ्याकडे असेच खूप प्रकारचे भोपळे होते. त्याच्याकडून थोडे खायचे भोपळे घेतले. आणि फोटो काढू का विचारलं. तो आनंदाने हो म्हणाला.
त्या सगळ्या प्रकारात मला सांगडीचे भोपळे दिसले आणि एवढा आनंद झाला!
माहेरी गोदावरीच्या काठावर पोचले! गंगेकाठचं गाव म्हणून प्रत्येकाला पोहता आलंच पाहिजे हा नियम! थर्माकोल,रबरी टायर, फ्लोट्स येण्याच्या आधी भोपळा पाठीवर बांधून पोहायला शिकायची पद्धत होती. आतून पूर्ण पोकळ असलेले भोपळे पक्क्या दोरीमध्ये गुंफून त्याची सांगड तयार करायची. ती सांगड एकदा पाठीवर बांधली की बुडायची भीतीच नाही! पोहून आलं की सांगड दोरी वाळेपर्यंत नीट लटकून ठेवायची.
हेच भोपळे समजा फुटले तर फेकायचे नाही. त्रिपुरारी पौर्णिमेला त्या तुकड्यांवर दिवे लावून गंगेत सोडायचे. दूरवर तरंगत जाणारे हजारो दिवे,कुडकुडायला लावणारी थंडी आणि गंगेचं पहाटे उबदार असणारं पाणी या मनावर कोरलेल्या गोष्टी आहेत!
हे सगळं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात लहानशा खेडेगावात त्या भोपळ्याच्या ढिगासमोर आठवत होतं. त्या शेतकऱ्याला कुतूहल वाटलं. त्याने तुझ्या देशात पण असे भोपळे असतात का असं विचारलं. मला काही सांगड म्हणजे काय हे त्याला डचमध्ये सांगता येईना. इंग्रजी त्याला कळेना. शेवटी मी चक्क मराठी आणि डच मिसळून हातवारे करून सांगितलं ! ते मात्र समजलं !!! त्याच्या चेहऱ्यावर एवढं आश्चर्य होतं ! त्याने लगेच शेजारच्या म्हाताऱ्या शेतकऱ्याला हे सांगितलं. त्यानेही भोपळ्याचा असा उपयोग कधी पाहिला नव्हता असं म्हणून दाद दिली ! आता हा भोपळेवाला सांगड करणारे म्हणे !!!
संवादाची इच्छा असेल तर भाषा ही अडचण कधीच नसते हे पुन्हा सिद्ध झालं!
No comments:
Post a Comment