तुम्हाला हळू आवाजात सांगते, आईबाबांना अजिबात करता येत नाहीत अशा खूप गोष्टी मला सहज करता येतात.
सोफ्यावर चढून उड्या मारणं, वाळू खेळताना मुठी भरून डोक्यावर ओतून घेणं, घरभर उंटासारखं चालणं, पावडरचा डबा उघडून जोरात हलवला की जमिनीवर सगळीकडे पांढरं पांढरं पावडर सांडतं त्यात चित्र काढणं, 3 गोष्टी एकत्र करून सांगणं, न लाजता रस्त्यावर,लायब्ररीत, दुकानात वगैरे मोठ्याने रडता येणं, बागेत बसलेल्या कोणत्याही अनोळखी माणसांशी जाऊन बोलता येणं, टिव्हीतल्या चित्रांशी पण खूप गप्पा मारता येतात, चित्र काढायच्या ढबू पेन्सिली घेऊन टोक तुटेपर्यंत ताशा वाजवता येतो, वाट्टेल त्या भाषेतली पुस्तकं वाचता येतात, कोणतीही गोष्ट झाडाचं पान, मुंग्या, खडे,दोरा, पांघरूण असं काहीही असेल ते खाऊन बघता येते !!! अशी मज्जा आहे माझी !!!
पण मी लहान आहे हे मला माहीत आहे. कारण मोठ्या माणसांना येणारा कंटाळा मला काही येत नाही !
आज आई फोनवर अण्णांशी बोलताना तिला कंटाळा आलाय असं म्हणत होती, पण तिचं नाक तर स्वच्छ होतं ! बाबा काकाला कंटाळा आला म्हणून सांगत होता त्याचं पण नाक स्वच्छ होतं !!! कुठं येतो कंटाळा काय माहीत!!
असेल काहीतरी. मी आज काय काय केलं सांगू का?
रोजच्याप्रमाणे सकाळी सात वाजता उठून बसले तर आई अजून झोप म्हणत होती. तेव्हा लोळले थोडावेळ. आईच्या कुशीत जाऊन तिला 'अंजीर ग माझं ' असं म्हणायला लावलं. मी आईचा पेरू,काजू,प्लम,अननस, अक्रोड आणि सीताफळ पण आहे !!! हे सगळं आईकडून म्हणवून घेतल्यावर "झोपा झाला" असं खणखणीत आवाजात सांगून खाली उतरून बाबाला "दात घाया" सांगितलं. मग दूध पिऊन लगेच पुस्तकं दिसली म्हणून घेऊन बसले. मुस्ती मांजर, ल्युसी कोळी, होप्ला, रुपस अशी सगळी पुस्तकं उलटसुलट वाचून काढली.
रोज तीच पुस्तकं वाचून खरं तर आम्हाला तिघांनाही ती पाठ झाली आहेत. आई बाबा तर पानं उलटतात पण त्याकडे न बघता तिथली गोष्ट वाचून दाखवतात !
साराची तीन पुस्तकं मला फार आवडतात. तिन्ही गोष्टी मला पाठ झाल्यात. आईबाबा नुसतं 'अग...' असं म्हणाले की मी "तो फंखा चायु आहे न? म ? मी उडार कशी?" असा पुस्तकातला चिऊ चा डायलॉग म्हणून टाकते. आईबाबा अग... नंतर ' तू पडशील / चावून खा/आंघोळीला चल ' असं काहीतरी वेगळंच म्हणत असतात !!!
अजून पुस्तकाच्या गमती नंतर सांगेन हं !
आईने आज माझ्यासाठी शिरा केला होता. तो खायला मी गच्चीत जाऊन बसले तर वरचे आजी आजोबा आले. मग ते दोघे खालच्या पायऱ्यांवर आणि मी गच्चीवर खूप वेळ नाचलो. आमचं एक गाणं आहे त्यात आधी डोक्यावर मग खांद्यावर मग पोटावर मग गुढग्यावर आणि मग पावलांवर हात ठेवायचे असतात आणि मग एक गोल गिरकी !!! मी आईला पण शिकवलं आहे हे ! हे करेपर्यंत शिरा संपून पण गेला ते एक बरं झालं! मला गोड आवडत नाही तरी आई दर रविवारी शिरा करते आणि बाबा बळच भरवतो !!
मग घरात येऊन मी गाणी लावायला सांगितली. ती एक मजाच आहे. आईबाबांना ती गाणी झोपेत पण म्हणता येतात म्हणे ! जिंगल टून्सची सगळी पन्नास साठ गाणी आणि मग म्हातारीचं लेकीच्या गावाला नंतर टोळ आणि मुंगीचं , मग टीना टीलूचं भटो भटो, मग इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्याचे आणि मग शेवटी अग्गोबाई अशी गाणी होईपर्यंत मी माझा खेळण्यांचा पसारा मांडून खेळत बसते.
एक मोठी पेटी आहे तिचं नाव पसारा आहे. मला ती मऊ खेळणी,बाहुल्या, टेडी वगैरे आवडत नाही. मला भोवरा, भिंगऱ्या, चेंडू, ठोकळे, साखळ्या, माळ करायला , लाकडी झुकगाडी करायला, किल्ली देऊन गोगलगाय आणि बदक पळवायला आवडतं. हे सगळं पसारा पेटीत असतं! मला आवरायला पण आवडतं. मी आणि आई किंवा मी आणि बाबा 'दोगे दोगे' असं म्हणत पटकन एक पसारा आवरून दुसरा पसारा काढतो.
गाय, कुत्रा, घोडा, बदक, माऊ सारेगमप म्हणतात तो पियानो मला खूप आवडतो. आणि झायलोफोन पण ! तो वाजवतात त्या काड्या चावायला मज्जा येते पण आई बघत असेल तर मज्जा येत नाही.
तर आज आम्ही लायब्ररीत गेलो होतो. माझ्या नावाचं कार्ड आईने घेतलं असेल की नाही या काळजीने मी रस्ताभर सायकलवर गप्प बसून होते. तिथे गेल्यावर आधी मला सायकलवरून उतरायचं नव्हतं. मी मोठा भोंगा काढला मग बाबाने उचलून घेतलं आणि आम्ही तिघेही 'दोगे दोगे'आत गेलो ! आई मला आवडतील अशी पुस्तकं शोधत असताना मी आणि बाबा तिथल्या हत्तीशी खेळलो. आणि पायऱ्या चढलो उतरलो. तिथं माझ्यापेक्षा मोठ्या आवाजात रडणारं बाळ होतं! ते बघून मी थक्कच झाले. जवळ जाऊन बघू लागले. त्याची आई त्याच्याकडे न बघता पुस्तकं घेत होती. ती माझ्याकडे बघून छान हसली.
आईने शोधून शोधून पुस्तकं घेतली. आता मला तिथून परत यायचं नव्हतं. सारखं सारखं बदल करायला मला नाही आवडत. इथं किती छान वाटत होतं !
मला खेळणी नसली तरी खेळता येतं. बागेत गेलो की गवत,काड्या, पानं, वाळू,ओकच्या बिया,दगड,किडे,गांडुळं, गोगलगायी, मुंग्या,मधमाश्या,फुलपाखरं असं आवडतं मला.घरात ऊन आलं की त्यात नाचत सावलीशी खेळायला पण मज्जा येते. स्वयंपाकघरातली खेळणी घेऊन मलापण खेळायचं असतं. कधी कधी नुसतंच सारेगमप म्हणत किंवा अकरा बारा तेरा असं स्वतःशीच म्हणत गच्चीतून कालव्यात चाललेल्या बोटी बदकं बघायला पण आवडतं.
एक खेळायचं चित्र शोधायचं पुस्तक आहे. त्यात प्रत्येक पानावर काहीतरी शोधायचं असतं.त्यात काही सापडत नसलं की बाबा शोधा शोधा म्हणतो ते मला खूप आवडतं. मला कुणी प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसलं की मी खुशाल शोधा शोधा म्हणते! मी आईचे डोळे,केस,नाक,तोंड असं दाखवत होते. आई म्हणाली गळा? मला माहीतच नव्हतं गळा कुठं आहे तर मी शोधा शोधा म्हणाले. यावर आईबाबा मोठ्याने का हसले कळत नाही !
असे ते कधीपण उगाच हसतात. परवा मी आणि आई मातीचा गोळा घेऊन खेळत होतो. आई मला टोमॅटो करायला शिकवत होती. मी तो गोळा घेतला आणि त्यात बोट घुसवलं तर तिथं बेंबी झाली ! तुम्हाला माहीत आहे न बेंबी ? मला आहे तशीच! मी आईला ती बेंबी केली म्हणून सांगितलं तर ती हसायलाच लागली. वर याचा व्हिडीओ करून आजीला पण पाठवला !!! त्यात काय एवढं ! बेंबी करणं काही अवघड नसतं !!!
कधी कधी मात्र मला फार त्रास होतो. रात्र झाली की आई बाबा झोपण्यासाठी मागे लागतात. मी 'चंदा या' म्हणून चांदोबाला बोलावते. मग छतावर गोल गोल फिरणारा चांदोबा येतो. मला पोटावर झोपून त्याच्याकडे बघायचं असतं. पण तो काही सरळ झोपल्याशिवाय दिसत नाही.आई म्हणते माझ्या डोक्याला मागेही डोळे हवे होते ! पण ते नाही आले अजून. मग मी थोडावेळ पोटावर झोपते चंदा आठवला की पाठीवर थोडावेळ ! असं करत करत झोप उडून जाते असं बाबा म्हणतो. पण मला काही उडत जाताना दिसत नाही. ते कबुतरं आणि कावळे उडत असतात तसं ! मग आई चंदाला घरी जा सांगते मीही त्याला 'निन्नीजा चंदा' असं हळू आवाजात सांगते. माझे डोळे आपोआप मिटत असले तरी मी ते उघडे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करते. मी डोळे बंद केले आणि मग फुलपाखरू उडालं किंवा मोठी बस गेली, सायकलवर शाळेत जाणारे दादाताई माझ्याकडे बघून टाटा करत गेले तर मला कसं दिसणार ! आई कशी दिसणार ! बाबा कुठे आहे ते कसं दिसणार ! असं वाटून मी अधूनमधून हात लावून दोघेही जवळच आहेत ना ते बघत असते. तरीही मला झोप लागत नाही. दिवसभर खेळलेलं, बाहेर दिसलेलं सगळं छान छान जग आठवत असतं. आई चंदाला 'उद्या ये हं ' असं सांगते आणि मग अंधार होतो. मग मात्र मला झोपावंच लागतं !
आता आज आणलेल्या पुस्तकातल्या डच गोष्टी आई आता बाबाला सांगेल आणि मग बाबा मला सांगेल. म्हणून उद्या लवकर उठायचं आहे मला !
झोपले मी आता ! तुम्हीपण निन्नी जा ! टाटा !
बाळांच्या नजरियातून मांडलेल्या कथा बेस्टच असतात. साध्या तरीही आकर्षक, मनाला त्या जगात घेऊन जाणाऱ्या. माझ्या मुलीच्या बाळ-गप्पांची आठवण झाली. 👌👌👌
ReplyDelete