Tuesday, 15 September 2020

रागी मुद्दे/नाचणीचे उंडे

सध्या वजन कमी करण्यासाठी, फिटनेससाठी दोघेही लक्षपूर्वक जेवत आहोत. म्हणजे डोळसपणे. दोन तीन महिन्यात चांगले परिणाम पण दिसायला लागलेत. वजन कमी करायचं म्हणजे उपाशी रहायचं,कमी खायचं, बेचव खायचं हे या जन्मात तर कधी जमणार नाही. पारंपरिक स्वयंपाक करताना अधूनमधून नवीन हेल्दी गोष्टी शोधणं, करून बघणं हा आवडीचा उद्योग आहे.

त्यातच एप्रिलमध्ये मानसी होळेहोन्नूर ने एक नवा पदार्थ सांगितला जो आता आवडता झालाय. रागी मुद्दे! नाचणीचे उंडे. आज ते केले. 

सांबार खावं वाटत होतं पण भात खायचा नव्हता आणि इडली वगैरे करणं ऐनवेळी शक्य नव्हतं. (for a change इडली हा प्रकार इन्स्टंट आणि झटपट केला की मला गिळत नाही. त्याचं सगळं कसं साग्रसंगीत दोन दिवसांचं कार्य हवं!) अशा वेळी मुद्दे ब्येष्ट ऑप्शन आहे. 
सांबार हा अति प्रिय प्रकार! मनासारखी चव जमली नाही तर मी या बाबतीत स्वतःला सरळ नापास करून टाकते. तमिळ मैत्रिणीकडून शिकलेली रेसिपी एवढी साधी सोपी आहे की ती करताना चुकणं म्हणजे तुम्ही अगदी ढ असल्याचे प्रमाणपत्र ! अप्रतिम चवीच्या या सांबार मसाल्याची कृती सांगते. 
सांबार मसाला - 
हरबरा डाळ - 1 मोठा चमचा
धणे - 2 मोठे चमचे
खोबरं - 3 मोठे चमचे (किंवा छोटी अर्धी खोबऱ्याची वाटी)
मेथी दाणे - 12-15
लाल सुक्या मिर्ची - 7-8(जास्तही चालतील) 
कढीलिंब 10-12 पानं 
हे सगळं एकेक करून थेंब थेंब तेलावर मंद आचेवर भाजून घ्यायचं. मग गार झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. लगेच वापरणार असाल तर थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्या. जास्तीचा करून ठेवणार असाल (खरं तर 8 दिवसांनी सुगंध कमी होतो) तर कोरडं रवाळ दळून घ्यायचं. 
डन! 

फोडणीला जून भेंडी/लाल भोपळा/बाळ कांदे/ शेवग्याच्या शेंगा/वांगी/ किंवा इतर आवडती भाजी परतून त्यावर शिजवून घोटलेली तूर डाळ चिंच हळद मीठ वगैरे घालून मग ताजी सांबार पेस्ट घालायची. चांगलं 10 मिनिट उकळू द्यायचं. वरून खोबऱ्याच्या तेलात हिंग मिर्ची कढीलिंब जिरे घालून फोडणी ओतून लगेच झाकण ठेवायचं. 
झालं सांबार. (किती ग बाई मी हुशार 😜)

रागी मुद्दे - पातेल्यात 2 वाट्या पाणी चमचाभर तूप आणि मीठ घालून खळखळ उकळलं की त्यात सव्वा वाटी नाचणीचे पीठ हटायचं. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. अजून एक चमचा तूप घालून झाकण ठेवून 5 मिनिट मंद आचेवर वाफ येऊ द्यायची. 
मग दुसऱ्या ताटात काढून जरा गार झालं की हाताला तेल/तूप लावून उंडे वळायचे. 
झाले रागी मुद्दे! आहे की नाही झटपट !!!! 😎

आजचं जेवण तीन मुद्दे आणि सांबारावर तुडुंब झालंय. खरं तर दोन मुद्दे खाऊन पोट भरलं होतं. सांबाराने आग्रह केला मग मोडवेना 😉
हे खाऊन सुस्त होऊन वामकुक्षी वगैरेची गरज नाही. जेवण झालं की नीट कामाला लागायचं ! 😂



No comments:

Post a Comment