दुःखाच्या/शोकाच्या वेळी सोबत नसणं, त्यात सहभागी नसणं माणसं विसरत नाहीत या आशयाची पोस्ट रमाक्का (Ramaa Atul Nadgauda) ने लिहिली. त्यावरची चर्चा वाचताना मनात आलेल्या गोष्टी...
अनेकांनी अशा प्रसंगी काय बोलायचं सुचत नाही म्हणून टाळलं जातं असं लिहिलं आहे. अनेकजणांची ही अडचण असते. विशेषतः जवळच्या वर्तुळात अशी घटना घडली असेल तर दुःख त्यांनाही झालेले असते. मागे राहिलेल्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असते, त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं, शब्द तोकडे पडतात असं वाटत असतं. नेमकं कसं व्यक्त व्हावं समजत नसतं. म्हणून दुःखी व्यक्तीला सामोरं जायचंच टाळलं जातं. बरं हे करताना सुटकेची भावना अजिबात नसते. दुःखी व्यक्तीला काय वाटेल याचा अंदाज असतोच. त्यामुळे एक अपराधी टोचणीही मनाला लागून राहते.
काय करायचं अशा वेळी?
मला असं वाटतं की अशा वेळी कसं वागायचं हे आपण शिकून घ्यायला हवं. ते गरजेचं आहे. दुःखी माणूस तुमचा जवळचा मित्र असतो, त्याच्याबद्दल तुम्हाला पोटातून माया असते, त्याची काळजी असते पण ती तुम्हाला दाखवता येत नाही हे काही कुणाच्या भल्याचं नाही.
दुःखात बुडालेल्या माणसाला तुमची गरज असतेच. अशा वेळी तुम्ही त्याच्या दुःखात सहभागी आहात हे 'दाखवायची' (पोहोचवायची)गरज असतेच. तुमचं प्रेम 'आपोआप' समजून घेण्याची शक्ती त्या व्यक्तीत त्या प्रसंगी नक्कीच नसते. मैत्री,प्रेम,सहवेदना या शक्ती देणाऱ्या गोष्टी असतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या व्यक्तीकडे पोहोचल्या पाहिजेत. तरच त्या अर्थपूर्ण आहेत. त्या गोष्टी दुःखी व्यक्तीला दुःखातून वर यायला नक्कीच मदत करतात.
अशा प्रसंगी बोललेच पाहिजे, शब्दच वापरले पाहिजेत असं काही नाही. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग असतात.
दुःखद घटना घडली त्या घरी प्रत्यक्ष जाणं शक्य असेल तर त्या घरी जावं, दिसतील ती किरकोळ कामं चर्चा न करता करावीत, जरा वेळ बसावं आणि निघावं.
जाताना फोन करावा, गर्दी तर नाही ना, तुम्ही गेलेलं चालणार आहे ना याचा अंदाज घ्यावा, बाहेरून काही गरजेच्या गोष्टी आणायच्या आहेत का ते विचारावं. (दूध,औषधे, किराणा,भाजी,जेवणाचा डबा अशा कितीतरी गोष्टीची गरज असू शकते)
घरातल्या लहान मुलांना जमल्यास बाहेर फिरवून खेळवून आणावं.
लहान बाळं असतील तर त्यांना अर्धा तास सांभाळणं ही खूप मोठी मदत असेल.
लक्षात घ्या, लहानलहान कृती खूप अर्थपूर्ण असतात.
त्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर काय करायचं?
संपर्काची इतकी साधनं हाताशी असतात. एक मेसेज करावा. तुमच्या दुःखात सहभागी आहोत आणि आत्ता तुमच्यासाठी मी काय करू शकते असं आवर्जून विचारावं.
आपल्या भावना लिहून पाठवणं हा फार प्रभावी मार्ग आहे. गेलेल्या व्यक्तीची चांगली आठवण, तुमच्याशी असलेलं नातं, कुटुंबात त्यांचं स्थान याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते लिहावं. अशा प्रसंगी रिलेट होणाऱ्या गोष्टी सापडणं,शेअर करणं हे खूप मोलाचं असतं.
हे ही लिहायला प्रत्येकाला जमेलच असं नाही.
मग फोन करावा. फोनवर साधे रोजचे प्रश्न विचारावे. आज स्वयंपाक केला का, जेवलात का? औषध घेतलं का? गर्दीमुळे दमला असाल ना, घरातली लहान मुलं काय करत आहेत? वृद्ध लोक कसे आहेत? मदतीला कोण आलंय असे साधे प्रश्न ! जे तुम्ही मनाने त्या जागी आहात हे सांगतील!
कदाचित हे प्रश्न बालिश,कोरडे,अस्थानी वाटून तुटक किंवा चिडकी उत्तरं येतील ही तयारीही ठेवावी. तो दुःखातला त्या व्यक्तीचा तुमच्यावरचा हक्क समजावा. आणि एक नक्की लक्षात ठेवावं की अजून पाच दहा पंधरा वर्षांनी तुम्ही काय प्रश्न विचारले होते हे त्या व्यक्तीच्या लक्षात राहणार नाहीये. पण तुम्ही रोज फोन करून चौकशी करत होता हे नक्की लक्षात राहणार आहे. या प्रश्नांनी वातावरण नॉर्मलला यायला फार मोठी मदत होते.
होतं असं की अशा प्रसंगी तुमचं त्यांचं नातं जवळचं असेल तर अपेक्षा असतेच. त्यांचंही तुमच्यावर प्रेम असतंच. मग तुम्ही अशा प्रसंगी सोबत नसल्याचा राग मनात राहत नाही. क्षमा केली जाते. पण क्षमा म्हणजे विसरून जाणं नसतं. ते लक्षात राहतंच!
हे सगळं लिहीलं ते तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या नात्यांबद्दल आहे.
जिथं फक्त औपचारिकता असते तिथे यातल्या गोष्टी फार लागू पडत नाहीत.
माणसं जिवंत आहेत,भोवताली आहेत तोवर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते महत्वाचं. माणूस संपला की या गोष्टी तशा निरर्थकच.
प्रेम माया काळजी या नातं घट्ट करणाऱ्या सशक्त करणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे सगळं काही अगदी सोशल मीडियावर लिहिण्याच्या काळात किमान अशा गोष्टी दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवणे त्याला बळ देणारं असतील तर त्या नक्की कराव्यात.
कोणत्याच मार्गाने व्यक्त न होता,तुमच्या प्रेमाचा/ काळजीचा/ मदतीच्या इच्छेचा समोरच्या व्यक्तीला काडीचाही उपयोग होणार नसेल तर तुमचं सो कॉल्ड 'अव्यक्त' प्रेम/काळजी/सहानुभूती हा केवळ तुमचा अहंकार असतो. समोरची व्यक्ती पाण्यात बुडत असताना तिला हात देण्याच्या ऐवजी डोळे मिटून जप करण्यासारखं हे!
No comments:
Post a Comment