Tuesday 25 August 2020

स्वयंपाक का करायचा?

🥘🍲 तुम्हाला स्वयंपाक करून काय मिळतं? 🍱🍜 

लॉक डाऊन च्या काळात सुरुवातीला नवे पदार्थ करून पाहणं, फोटो दाखवणं वगैरे सुरू असताना "केवढा हा माजोर्डेपणा" असं म्हणत स्वयंपाक म्हणजे काहीतरी तुच्छ गोष्ट आणि ती करणारे अतिशय अप्पलपोटे स्वार्थी लोक असं म्हणण्याची फॅशन आली होती. तेव्हा मी माझ्यासाठी स्वयंपाक काय आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला होता. इथं स्वयंपाकावर अतिशय प्रेम करणारे लोक आहेत. म्हणून शेअर करावा वाटतोय. 

सूचना (ही पोस्ट स्वयंपाकासंबंधी आहे. यात कोणतीही रेसिपी नाही. विषय आवडत नसल्यास तुमचा कंटाळ्याचा अधिकार अवश्य वापरा) 

समोर ठाकलेल्या विपरीत परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगवेगळे असतात. सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूला बघितलं तर लोक काय काय करत आहेत! इथे बेल्जियम मध्ये लोक गात आहेत, व्हायोलिन वाजवत आहेत, रोज ठराविक वेळी टाळ्या वाजवत आहेत आणि सगळ्यात जास्त लोक स्वयंपाक करत आहेत. इथेही वेगवेगळ्या रेसिपीज, फोटो व्हिडीओ, कमीत कमी जिन्नस वापरून उत्तम पदार्थ करण्याचे चॅलेंजेस यांची धूम चालू आहे. लोक आपण जास्तीत जास्त सकारात्मक कसे राहू याचा विचार करत आहेत. खूप मोठा अंधारा बोगदा सगळ्या जगाला पोटात घेऊन बसलाय. हे कधी संपेल याचं निश्चित उत्तर कोणाकडेही नाही ही त्यातली सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट आहे. 

जेव्हा समोर फक्त अनिश्चितता असते, परिस्थिती बदलण्यासाठीची एकही गोष्ट माझ्या हातात नसते, मनात विचारांच्या अस्वस्थ वावटळी फिरत असतात, सगळं जग उलथापालथ होऊन अस्थिर झालंय असं वाटत असतं, हे सगळं बघत मुकाट्याने सहन करत  निष्क्रीय बसणं अगदी अशक्य वाटत असतं तेव्हा मी माझी एक खास वही (होय वहीच!) घेऊन स्वयंपाकघरात पाऊल ठेवते. 

मी करू शकेन अशा असंख्य शक्यता त्या वहीतुन आणि स्वयंपाक घरातल्या भाज्या,धान्य,मसाले यातून डोकावत माझ्याकडे बघत असतात. 

मग सुरू होतं माझं रिलॅक्सेशन ! पदार्थ ठरतो. उदाहरणार्थ सांबार. ही रेसिपी मी ज्या अन्नपूर्णेकडून शिकले तिची आठवण येते. रेसिपी शिकतानाच्या गप्पा सगळ्या आठवत नसल्या तरी तेव्हा आम्ही दोघी किती आनंदात होतो ते आठवतं. तिच्या हातचं अप्रतिम चवीचं ताज्या मसाल्याचं सांबार जिभेला आठवतं आणि आत्ता काय करायचं आहे हे उद्दिष्ट नक्की होतं. 

मग ताज्या सांबार मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले,डाळी, ताटात योग्य प्रमाणात मोजून काढले जातात. भाज्या धुवून निवडून चिरून ताटात सज्ज होतात. एकीकडे वरणभाताचा कुकर लागतो. मैत्रिणीच्या दक्षिण भारतीय उच्चारातल्या सूचना वहीतून ऐकू येऊ लागतात ! ' कोकनट को तोsडा छोटा काटके फिर गरम करना ! चना धाल रेड्ड ओनी! ईंsग तोडा ज्यादा ! अय्यो टाईमरिंड तो मस्ट् !!! स्लोव गॅस पर रोस्ट करके सब मिलाके ग्रैंडिट्ट (चाल   -माईंडीट्ट) !!! कुकरची शिट्टी तंद्री तोडते. पण मसाले भाजून वाटून झाले असतात. कुकर उघडून वाफ तोंडावर आली की डाळ अगदी मऊ छान शिजल्याचं कळतं. हळद हिंग घालून घोटताना लय साधली जाते. आठवणीने लेकीचा साधं वरण गोळा बाजूला काढला जातो ! भांड्यात किंचित तेलावर क्रमाने भाज्या घातल्या जातात. प्रत्येक भाजी परतायचा,शिजायचा वेळ ठरलेला असतो, तो दिला जातो. मग डाळ ओतून हवं तेवढं पातळ मिश्रण खळखळून उकळू लागतं. त्यात मघाशी वाटलेला मसाल्याचा गोळा एकजीव होतो. मीठ अंदाजे घातलं जातं. चिंच कोळून घातली की मग जादू सुरू होते. घरादारात सांबार सांबार असा कल्लोळ दरवळू लागतो. आता खोबऱ्याच्या तेलाची कढीलिंब मिरच्या मोहरी तडतडत असलेली फोडणी ओतली की मला माझ्या  एवढ्या खटाटोपाचं फळ मिळणार असतं!! 

हे सगळं करताना डोकं तरतरीत झालेलं असतं. सांबार करताना एकानंतर एक करत गेलेल्या कृतींनी काही वेळ तरी मन प्रोसेस ओरिएंटेड होऊन विचारांचा गुंता पण बराच सरळ झालेला असतो. चिंता करताना निष्क्रिय असलेले डोळे,नाक,कान, जीभ आपापलं काम करायला मिळाल्याने सुखी झालेली असतात. अगदी काहीच नसणाऱ्या, एकेकट्या निरर्थक असणाऱ्या गोष्टींचा मेळ जमवून एक चवदार गोष्ट मी तयार केली म्हणजेच माझा कशावर तरी कंट्रोल आहे याचं समाधान जीव शांत करत असतं. घरातल्या मंडळींना हे नक्की आवडेल याची पावती आधीच मिळायला लागलेली असते. त्यातून जो आत्मविश्वास वाढतो तो वेगळाच !ही सगळी प्रोसेस होताना माझा खायला उठलेला रिकामा वेळ काहीतरी चांगल्या कारणासाठी वापरला गेलेला असतो ! जुन्या रम्य आठवणी सुखावून जातात. एखादा पदार्थ कोणाकडून तरी प्रत्यक्षात शिकणं हे फक्त पदार्थ शिकणं नसतंच मुळी. ते असतं एक चांगली आठवण विणून ठेवणं! याचा प्रत्यय पुन्हा आलेला असतो.

ताट वाढून घेतल्यावर क्षणभर त्या भरल्या ताटाकडे बघताना कृतज्ञता वाटून जाते. माहेर, सासर, आप्त यांच्याकडून अन्नपूर्णेचा वारसा हातात उतरल्या बद्दल , ताट भरलेलं असल्याबद्दल ! 

शेवटी एक मात्र आवर्जून सांगते, स्वयंपाक करणं ही जिभेचे चोचले पुरवणे एवढं एकमेव साध्य असलेली गोष्ट नक्कीच नाही. तो मनाचा व्यायाम आहे. ज्याला तो आवडतो त्याच्यासाठी पोषण करणारा, शक्ती देणारा! ज्याला आवडत नाही त्याच्यासाठी शिक्षा ! काही लोकांसाठी दात घासणे,आंघोळ,ऑफिस यासारखी न्यूट्रल गोष्ट! तर स्वयंपाक आवडणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुमची स्वयंपाक करण्यामागची प्रेरणा कोणती?

No comments:

Post a Comment