Monday, 10 August 2020

पाण्याकाठचं घर ९

उन्हाळा नुसता बहरला आहे. सकाळी सव्वासहाच्या सुमारास सूर्य उगवला की वॉर्म अप करून जो खेळू लागतो तो थेट संध्याकाळी आठ साडे आठला त्याच कूल डाऊन सुरू होतं. खरं तर अगदी तीस बत्तीस डिग्री तापमान म्हणजे आपण भारतीय मजेत फिरू असं! पण इथं ते फार जास्त वाटतं. बाहेरची सगळी कामं सायकलवर फिरत किंवा चालत. शिवाय इथं पंखे एअर कंडिशनर,कूलर वगैरे अजूनतरी हौशी लोकांच्या गोष्टी. त्यामुळे फर्निशड अपार्टमेंट असलं तरी त्यात या चैनीच्या गोष्टी नाहीत ! आम्ही  मागच्या उन्हाळ्यात मस्तपैकी टेबल पंखा घेऊन टाकला आहे त्यामुळे आमची चैन आहे असं शेजारीण म्हणते !!!
तर या ऊतू चाललेल्या उन्हाळ्यात इथलं जगही सुट्टी लागलेल्या पण वांडपणा करायला न मिळणाऱ्या पोरासारखं मरगळलेलं, कंटाळवाणं दिसू लागलंय.
नेहमीचे वॉटर स्पोर्ट्स नाहीत, हायकिंग कॅम्पिंग नाही,समुद्रावर हजार बंधनं, दिवस मावळल्यापासून पहाट फुटेपर्यन्त पार्ट्याही नाहीत की आप्तेष्टांसोबत पोरंबाळं खेळवत बार्बेक्यू नाहीत!
ज्या कोणत्या तुटपुंज्या गोष्टी हातात आहेत त्या नाईलाजाने पुरवून वापराव्या लागणाऱ्या खाऊसारख्या चालू आहेत.
घराशेजारी एक कनोईंग क्लब आहे. उन्हाळ्यात तिथं येणाऱ्या हौशी,प्रोफेशनल नाविकांची जत्रा भरलेली असते. दाराबाहेर केव्हाही नजर टाकली की कालव्यात शिस्तबद्ध नावांच्या गडद रंगाच्या ओळी तरंगताना दिसतात. कुणी व्यायाम म्हणून तर कुणी हौस म्हणून, कुणी नवं कौशल्य शिकायला तर कुणी स्पर्धेच्या तयारीसाठी मन लावून एकाग्रतेने वल्हे वळवत असतात. आठ वर्षाच्या मुलांपासून पंचाहत्तरीच्या आजोबांपर्यंत कनोइंग चा उत्साह नुसता उलट असतो.
त्यातही मुलांच्या वेळी मजा बघण्यासारखी असते. काठावर बसून मुलांच्या नावाने शिट्या वाजवत,टाळ्या पिटणाऱ्या पालकांकडे बघितलं की मला आपल्याकडे पोहायला शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची,विशेषतः आई लोकांची फार आठवण येते!!!
दर वर्षी इथंच मोठ्या स्पर्धा असतात. सर्व वयोगटातले खेळाडू आपापल्या नावा चारचाकीवर टाकून एका शुक्रवारी दुपारी यायला सुरुवात होते. कालव्याच्या काठावर गवत कापून स्वच्छ केलेल्या ठिकाणी तंबू ठोकले जातात. एका बाजूला फिरते स्वच्छतागृह, स्वयंपाकघराची गाडी, डायनिंग हॉल म्हणून मोठा 25-30 लोक बसू शकतील असा तंबू उभारला जातो. क्लब च्या समोर स्टेज आणि सुचनफलक वगैरे. या रस्त्यावरच्या सर्व रहिवाशांना चारचारदा दोन दिवस गाडी रस्ता बंद म्हणून सॉरीचे मेसेज येतात. त्याही आधी संयोजक आणि स्वयंसेवक अख्खा काठ स्वच्छ करून टाकतात. आणि शनिवारी सकाळी स्पर्धा सुरू होतात!
प्राथमिक फेरी पासून शेवटच्या फेरीपर्यंत जिंकत राहणारे रविवारी दुपारपर्यंत राहतात. हे दोन तीन दिवस एरवी शांत,गंभीर असणाऱ्या आमच्या काठावर चैतन्य आणणारे असतात. कोवळ्या मुलामुलींची लगबग, आवाज,गोंधळ,रात्री खूप उशिरा शांत होणारे दिवे आणि संगीत,स्पर्धेचे जल्लोष सगळं उत्सवी असतं!
रविवारी दुपारी आवरायचं सुरू झालं की पूर्ण काठावरच्या आपापल्या घराच्या बाल्कनीत ठाण मांडलेल्या बहुतेक करून वयस्क डोळ्यांमध्ये पण चुटपुट दिसू लागते!
यंदा हा उत्सव होईल की नाही माहीत नाही!
तरीही सराव करणारे आणि नव्याने शिकणारे वल्हे अगदी ओळींनी नाही पण ठिपक्यांनी तरी दिसतात तेवढंच समाधान!
ऊन कमी असेल त्या दिवशी सायकल काढायची,आमची फांदी अमोहा ऐटीत टोपी घालून बाबाच्या सायकलवर बेबीसीटवर बसलेली असते. निघताना एक दिशा ठरवायची आणि सायकल  रस्त्यावर सुटायचं. दोन तीन किलोमीटर नंतर आमचं गाव संपतं. मग लहान लहान खेडी सुरू होतात. सायकल रस्त्याच्या एका बाजुला नदी किंवा कालवा वाहता असतोच. दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण कुरणांचे किंवा शेतीचे पट्टे! शेतं मुख्यतः मक्याची. विस्तीर्ण शेत त्यात एक बाजूला घर, दारात शेतीसाठी लागणारी अवाढव्य यंत्र, पाळीव कोंबड्या हरणं ससे,मुलांसाठी बांधलेली लाकडी किंवा प्लास्टिकची खेळघरं, झोके,घसरगुंडी वगैरे आणि लहानशी फळबाग.
 कुरणांमध्ये घोडे,गायी बैल,गाढवं, मेंढ्या मुक्तपणे चरत असतात. एखाददोन कुत्री त्यांची राखण करत असतात. एखादी मालकीण हॅट घालून रोजची फेरी मारायला आलेली असते. खरोखर ज्योडीच्या शेताची आठवण येते! त्याच्याच शेताकडे बघावं तसं दुरून थांबून हे सगळं चित्र बघावं तर एखादा ज्योडीही दिसतो! वर आभाळात पेस्टल कलर तरंगत असतात. त्यामुळे सगळ्या वातावरणालाच सौम्यपणा आलेला असतो. कुरणाला लागून लहानसं जंगल म्हणावं अशी दाट झाडी, एखादं लहान तळं, त्यावर झुकलेले विलो आणि त्या विलोवर विसावलेले बगळे!
दूरपर्यंत कोणत्याही वाहनाचा आवाज नसतो. सायकलिंग करणारे वीर घंटी वाजवणं स्वतःचा अपमान समजून सुरकन बाजूने वारं कापत जातात. दमलेल्या सायकलस्वारांसाठी दर किलोमीटरवर एक बेंच ठेवलेला असतो. वाटलं तर तिथं विसावा घ्यावा. सायकलची खूप छान लय सापडलेली असताना परत तितकंच अंतर जायचं आहे याचं भान ठेवून माघारी वळावं.
आता नदीकाठच्या बाजूला बघत गेलं तर क्वचित एखादा मासेमार गळ टाकून बसलेला दिसेल, तितर कुटुंबं रस्त्यावर फिरताना दिसतील. एखादी हरणांची शाळा दिसेल. करडे मोठे ससे आपल्या जोडीदार आणि पिलांशी खेळत आपल्याकडे कुतूहलाने बघत बिळात गायब होतील. रानजाई सारख्या रानफुलांचा,आटत गेल्याने काठावर वाळत चाललेल्या गाळाचा, तरंगणाऱ्या शेवाळाचा, उन्हाने हळुहळू पिवळ्या पडत चाललेल्या गवताचा, शेतांमध्ये उभ्या मक्याचा,गरम झुळुकांसोबत येणारा लीद,लेंड्या,शेणाचा वास तुम्हाला भारून टाकतो.
 यावेळी गेलेला कडक हिवाळा आठवत नाही,येणारी पानगळ दिसत नाही, असतो तो त्या रस्त्यावरचा तो प्रवास!
आमची चिमणी बेबीसीटवरून उतरायचंही म्हणत नाही. टपोरे डोळे हे सगळं एक आवाजही न करता टिपत असतात. चेहऱ्यावर शुद्ध कुतूहल असतं. आपणही ही समाधी मोडू नये असं म्हणत सायकल चालवत राहतो. गाव येतं आणि एखाद्या घराबाहेर पेअरचं लेकुरवाळं झाड तुम्हाला भानावर आणतं! पॅशनफ्रुटच्या वेली घराची आठवण करून देतात. लिंबाच्या झाडासारखं एखादं झाड थेट पिकलेला तौर आणि लिंबोळ्या घेऊन दत्त म्हणत समोर दिसतं! सरत्या गुलाबांच्या वेली कुंपण ओलांडून तुमचा निरोप घेतात. नेहमीचा पिंपळासारखा वृक्ष मावळतीला अंगावर घेऊन स्थिर उभा असतो. ढगांचा रांगोळीचा ठिपकाही आभाळात नसतो. सायकल घराकडं वळताना समोरच्या झाडांवर अक्रोड किंचित पोपटी झालेले दिसतात. आता दोन तीन आठवड्यात पिकतीलच असं म्हणत सायकल लावून इमारतीच्या दाराकडे येताना कालपरवापर्यंत फुलून घमघमणारा तुमचा प्रिय लिंडन आपल्या पायाशी पिवळ्या सोनेरी पानांच्या पताका पसरून बसलेला दिसतो. आणि तुम्ही मनातच त्याला म्हणता, पानगळ घेऊन आलासच तू !!!
हं.बाहेरच्या जगातलं काहीच बदलणं तुमच्या हातात नसतं तेव्हा असं मनातल्या जगात जगावं. एक नक्की उमगतं, ऋतू बदलतात !!!












No comments:

Post a Comment