Monday, 10 August 2020

खडा

व्यायामासाठी निघाले होते. तासाभरात 5 किलोमीटर चालून झालं पाहिजे असं उद्दिष्ट ठरवलं होतं. खाली उतरून कालव्याला उजवीकडे बघत चालायला सुरुवात केली. हवी ती लय येण्यासाठी जनरली काही ठरलेली गाणी गुणगुणत राहणे हा उत्तम पर्याय असतो. किंवा मग घोषाच्या रचना. एकाच लयीत ठेक्यावर पावलं टाकत मोठा टप्पा पार करण्यात मला फार आनंद मिळतो. आणि ते तसं चालणं मला जमतंही छान असं माझे व्यायामदोस्त म्हणतात याचा मला सूक्ष्म अभिमानही आहे.
आज काहीतरी हुकलं होतं. हवा तो वेग हव्या त्या लयीत काही साधला जात नव्हता. त्यात मास्क असल्याने सगळं लक्ष मास्कमुळे होणाऱ्या गैरसोयीकडेच एकवटलं होतं. एकीकडे घाम,दुसरीकडे मास्कमुळे चष्म्यावर येणारी वाफ,तिसरीकडे उतरत्या उन्हाची टोचरी तिरीप याने कावल्यासारखं झालं होतं.
मग हळूच लक्षात आलं उजव्या पायाला मधूनच काहीतरी टोचतंय. बुटात खडा गेलाय. अगदी लहान वाळूचा. तो एका जागी नाही थांबत. मग त्या खड्याला दोन बोटांच्या मध्ये घे,चवड्याच्या टाचेच्या मधल्या खोलगट भागात तो खडा राहील असा प्रयत्न कर, जिकडून पावलाची कमान असते त्या कमानीच्या दाराशी ठेव असं करत करत चालतच होते. थांबायचं नव्हतंच मला. कारण मग लय चुकली असती. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या कुतूहल नजरा उडत आल्या असत्या, माझ्या मागे चालणारे लोक पुढे जाताना टाटा करून गेले असते, बूट काढून झटकून घालून पुन्हा चालणं सुरू करून पुन्हा लय साधण्यात वेळ गेला असता आणि मग एक तास पाच किमी हे उद्दिष्ट गाठता आलं नसतं. असा "माझा लयीसंबंधीचा कम्फर्टझोन म्हणत होता".! किंवा माझा केवळ लय हा एकच घटक लक्षात घेऊन चालू असलेला सेल्फ टॉक होता.
त्या नादात पावलं वेडीवाकडी टाकली जात होती, खड्डे चुकवून उडी मारली खडा जास्त टोचून जात होता, त्यामुळे गुढग्यावर ताण येत होता पण मला थांबायचं नव्हतं! कितीही प्रयत्न केले तरी तो खडा टोचायचं सोडत नव्हता. आणि मी ही सरळ चालणं सोडत नव्हते. उगाचच ! थांबला तो संपला या बहुतेकवेळी आक्रमक असणाऱ्या बिलिफमुळे !!!
शेवटी व्हायचं तेच झालं. पाय मुरगळला ! डोकं ठिकाणावर आल्यागत झटकन थांबले. खाली बसले. कुणाकडेही लक्ष न देता बूट काढून हातात घेतला, त्यात हात घालून शोधून खडा बाहेर काढला फेकून दिला बूट घातला आणि दहा सेकंदात हवी ती लय गाठून चालू लागले! हे चालणं कितीतरी आरामदायी होतं.
तो खडा नेमका कसा दिसत होता आठवत नाही,कुठं जाऊन पडला हे मला माहित नाही. त्याने टोचलेलं मात्र लक्षात आहे.
काही नाही एकूणच नात्यांच्या प्रवासात असे खडे असतातच. मी आजच त्यातला एक खडा थांबून काढून फेकला त्यामुळे फार मस्त मोकळं वाटतंय. हे तुम्हाला सांगायचं होतं!

No comments:

Post a Comment