Friday 21 August 2020

अमोहाची डायरी ३

"हिला एवढे पाय फुटलेत ना! दोन मिनिटं एका जागेवर थांबेल तर शपथ!" असं आई फोनवर कोणाला तरी सांगत होती. पण मला तर दोनच पाय आहेत! त्या दिवशी सकाळी अचानक मला समजलं की आपल्याला हातही दोन आहेत! मग मी पुन्हा पुन्हा आरशात बघून खात्री करून घेतली की मला खरंच दोन दोन हात आहेत. हे बाबाला सांगितलं तर तो थक्कच झाला! मग त्याने बघितलं तर काय त्यालाही दोन दोन हात आहेत! आम्ही दोघे आईकडे गेलो तर तिलाही दोन हात !!! मला दोन दात आले तेव्हा आई म्हणत होती अजून थोडे दात आले की मला गाजर चावून खाता येईल. तसं आता पुढचे हात कधी येतात ते मी रोज उठले की आरशात बघते. कधी कधी मी मज्जा म्हणून रडत असेल तर आई मला अजून हात आले का ते बघायला आरशासमोर पाठवते मग रडायचं राहून जातं! 

सध्या रोज आंघोळझोप झाली की मी जेवते आणि आईसोबत गाणी ऐकते. मला खूप गाणी पाठ झालीत पण मी सांगितलेले शब्द वेगळ्याच आवाजाचे असतात म्हणे! मी सारखी बडबड करत असते. त्यातलं फारच थोडं या मोठ्यांना कळतं.  रडताना पण मला वेगवेगळ्या चालीत रडून बघायला फार आवडतं. कधी सावकाश कधी भरभर,कधी थांबून कधी थुंकीचा फुगा करत,कधी आ ई उ ओ असे सूर लावत रडलं की छान वेळ जातो. शिवाय कुणी कशाला नाही म्हणत असेल की आपण मोठ्या आवाजात रडायचं म्हणजे मला नाही म्हणलेलं आवडलं नाही हे तरी त्यांना कळतं. म्हणून मी रडते. त्याचा उपयोग कळण्यापुरताच! आई बाबा काही सगळे हट्ट पुरवत नाहीत! 

मला इथं तिथं चढून उंचावरून खाली कसं दिसतं ते बघायचं असतं. आई बाबा आधीच उंच आहेत. त्यांना उंच न चढताच सगळं वेगळं छान दिसतं. त्यांना कसं दिसतं ते बघण्यासाठी मला कशावर तरी चढावं लागतं. मग मी पेपरवर चढते,पुस्तकावर चढते,शूजवर चढते,सोफ्यावर चढते,खुर्चीवर चढून तिच्या हातावर पण चढते! मग मला उंच झाल्यासारखं वाटतं. मला टेबलवरचं काही घ्यायचं होतं म्हणून मी पेपरवर चढले तर सगळे मला हसले ! अजून एक गंमत सांगू का? मला गच्चीच्या रेलिंगवर पण चढता येतं! पण आई बाबा घाबरतात. बाबाने तिथं एक पक्की जाळी लावली आहे तिच्यात माझं बोट अडकलं होतं ! ते दोघे सतत वर चढायचं नाही सांगतात म्हणून मी पण त्यांना तसंच सांगते! बाहेर जायचं,रेलिंगवर चढायचं आणि मोठयाने ओरडायचं-मनूsss वर चढायचं नाsss ही ! 

शनिवारी रविवारी बाबाला सुट्टी असली की दोघेही माझ्यासारखंच पाय फुटल्यासारखी कामं करत असतात. मग मलाही काम करावंच लागतं! मी माझ्या घोड्याला आंघोळ घालते, त्याला खाऊ देते, माझं घर आवरते,गुळण्या करून हॉल मध्ये पाणी सांडलेलं असतं ते पुसूनही घेते, भाजी तोंडाने तुकडे करून देते, ट्रॉलीतली भांडी खाली काढते, भाजलेले दाणे निवडते !! आता मला दोन चेंडू हातात एकत्र घेता येतात. खरं तर मला दोन हात आहेत समजल्यापासून या हातात किती किती वस्तू एकदम घेऊ असं होतं! खडे,मुरमुरे, फुटाणे,वाळू,चेंडू,पुस्तकं, पेन्सिली असं दोन हातात मावेल एवढं उचलून सांडायला फार मज्जा येते! फक्त काल अननस ठेवलेला मोठा डबा हातातून खाली पडला तो पायावर पडला नाही हे नशीब असं बाबा म्हणत होता! 

सगळी कामं झाली,अभ्यास झाला जेवण झालं की आम्ही तिघे गच्चीत बसतो. त्यावेळी मी रेलिंगवर किंवा खुर्चीवर चढत असले तरी पाय अडकायची भीती वाटत नाही. उन्हाची मोठी छत्री आहे तिचा दांडा धरून गोल गोल फिरताना कधी कालवा दिसतो कधी बाबा दिसतो! मग मी यिप्पी करून ओरडते! मग मी पाऊस बघते आणि आनंदाने भिजत ओरडते! पाऊस मला माळ देतो. तिला हात लावला की ती गळून जाते. तरीपण मला असं खेळायला आवडतं. कधीकधी मी आणि बाबा पावसात खाली बसून अरिंगमिरिंग किंवा आपडीथापडी खेळतो. 

माझा आवाज ऐकून वरचे आजी आजोबा लगेच खाली वाकून माझ्याशी गप्पा मारायला येतात. त्यांची आई मात्र असं वाकून बघायचं नाही असं त्यांना का सांगत नसेल ! पण ते दोघे मला फार आवडतात. ते खाली रस्त्यावर उभे राहून माझ्यासाठी गाणी म्हणतात,उड्या मारतात आणि नाचतात सुद्धा! ते निघाले की मोठा आवाज काढून रडते म्हणून आई मला मनुका हव्यात का किंवा बडीशेप हवी का असं विचारते. ते खाऊन येइपर्यंत ते दोघे गेलेले असतात! मला ते पण आवडतात आणि मनुका सुद्धा आवडतात! काय करावं! 

शेजारच्या मावशीशी बोलायला पण मला फार आवडतं पण ती काम करतेय असं सांगून आई मला आत आणते. खरं तर मी फार बोलत नाही. नुसती दर थोड्या वेळाने पिपपिप असा आवाज करून तिला बोलावते. ती माझ्याकडे बघून काहीही बोलली तरी मी पिपीप वरच ठाम राहते. हसून तिने काम सुरू केलं की मी पुन्हा पीपीप करते 😁

आई आणि ती वेगळ्या आवाजात बोलतात ते मला काही कळत नाही. मी नुसत्या यास यास असा आवाजाने त्यांचं बोलणं थांबवू शकते! 

तुम्हाला सांगू का, आजकाल माझी आणि आईबाबाबांची फारच जास्त भांडणं होतात! मी बोलतेय ते त्यांना कळत नाही,ते सांगतात ते मला करायचं नसतं आणि म्हणून मी मोठ्याने खाली बसून रडून सांगते तर ते बुचकळ्यात पडून नुसते बघत राहतात त्यांचं काय करावं ते कळत नाही! म्हणजे कपडे घालणं, जेवताना एका जागी बसणं, बागेत खेळून झाल्यावर घरी येणं, कुणी गप्पा मारत असेल तर टाटा करणं,एक पुस्तक एकदाच वाचून मग दुसरं वाचायला घेणं, कार्पेटवर गुळण्या न करणं,आंघोळ झाली की केस पुसू देणं अशा विचित्र गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत! रोज केस पुसताना मी राडा घालते त्याला कंटाळून आईने माझी कटिंग करून टाकली! बाबा मला जिंगल टूनस दाखवत होता तेवढ्यात केस कुठंतरी निघूनच गेले म्हणे! 

 मी एकदा नीट बोलायला लागले की आपली भांडणं अर्धी होतील असं आज मला बाबा म्हणत होता. मी तर खूप नीट बोलते ! मी आता 20 महिन्यांची झालेय ना!  हे दोघे अजून थोडे मोठे झाले की त्यांना माझं बोलणं कळेल असं मला वाटतं! 

आता मी सायकलवर बाहेर जाणार आहे. उन्हाळा संपला की जायला नाही मिळणार म्हणून सध्या रोज बाहेर जातो आम्ही ! बाहेर गेले की काय मजा होते ते नंतर सांगेन! बाय बाय !






No comments:

Post a Comment