Monday, 10 August 2020

व्हिएतनाम

विमान उतरताना खाली बघितलं तर तिथं काचा विखुरल्यासारखी तळी,सरोवरं,नद्या,झरे चमचम करताना दिसतात !
लांबच लांब कुरणांसारखी दिसणारी भातशेती, नागासारखे सळसळत वळणं घेत जाणारे काळेशार रस्ते, लाल करड्या मातीने माखलेली कौलारू घरं, आणि चिरतरुण दिसणारे आनंदी चेहऱ्याचे लोक !! ही पहिली फ्रेम मनात साठते!
हॉटेलांमध्ये उत्तम अमेरिकन इंग्रजी बोलणारा स्टाफ असतो. आणि तो लहानसहान गोष्टींना वाकून वाकून सॉरी आणि thank you म्हणत असतो. बुकिंग करताना फोटोत दिसलं त्यापेक्षा खूपच चिमुकलं हॉटेल असतं हे. त्याची जाणीव स्टाफला असल्याने कमळाचा चहा, खास कॉफी, कमळाच्या बियांची मिठाई असे फ्री लाड होत राहतात! 
उशीरच झालेल्या जेवणाची सोय म्हणून शेजारच्या दुकानात जाता. दुकान बघून तुम्हाला तुमच्या खेड्यातल्या बस स्टँड वर असलेलं दुकान आठवतं. तिथे पुणेरी दुकानदारांची मावशी टीव्ही वर चालू असलेली त्यांच्या भाषेत डब केलेली भारतीय सासबहू मालिका बघण्यात तल्लीन झालेली दिसते. समोर खरेखुरे अडीच भारतीय आहेत आणि त्यांना काहीतरी विकत घ्यायचं आहे या किरकोळ गोष्टींशी तिचा काही संबंध नसतो.
तुम्ही शाकाहारी आहात म्हणल्यावर गावभर शोधून एका हॉटेलमध्ये शाकाहारी मिळेल म्हणून जाऊन बसता. आणि समोर येतो चिकट भात आणि उकडलेली मॉर्निंग ग्लोरी ! झेन चेहरा ठेवून तुम्ही ते तोंडात घालता आणि बुद्ध हसतो !!!! अप्रतिम चव !  तिळाच्या तेलाची आणि लसणाची चव फक्त ओळखू येते. पण जे काही असतं ते फार छान असतं!!!
शहरातल्या ठराविक फारशा छाप न पाडणाऱ्या चार गोष्टी बघून दिवस संपतो.
मग तुम्ही पायऱ्यांची भातशेती असलेल्या अति उंच डोंगरावर शेतकरी कुटुंबात रहायला जाता. कुटुंबप्रमुख स्वतः गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला आलेला असतो. जाताना उत्तम इंग्रजी बोलणारा चालक मालक शेतकरी "आमच्याकडे आम्ही मज्जा म्हणून निवडणुका घेतो " असं सांगून देशाच्या राजकारणाच्या रंजक गोष्टी सांगतो. मग या देशाचा इतिहास, रानटी टोळ्या, त्यांचे कबिले, सांस्कृतिक गोष्टी यांची देवाणघेवाण होते! सुमारे 8 तासांचा प्रवास असतो हा! तो गाणी लावत नाही,तो अंदाज घेऊन प्रश्न विचारतो,प्रश्न विचारले तर भरभरून माहिती देतो!
मैलोनमैल रस्त्यावर टोलनाक्यावर एकच स्त्री टोल गोळा करत असते. कोणत्याही सिक्युरिटी गार्डशिवाय!
मध्येच काहीतरी होतं आणि पोलीस गाडी अडवतात. मालक सराईतपणे बाजूला नेऊन त्यांना पाकिटातून खाऊ देऊन येतो. लाच देणं हे दैनंदिन आयुष्याचा भाग आहे म्हणतो!
या आमच्या होस्ट चे वय काय असेल याचा आम्ही अंदाजच बांधत राहतो. अंदाजे 25.
वाटेत धाब्यावर सँडविच आणि केक मिळतो. चालक महाशय फक्त उकडलेली बारीक बारीक अंडी खातात. शेंगा फोडून खाल्ल्यासारखी!
पाच सहा तास फक्त उंच उंच जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला मुन्नार आठवते! आल्प्स च्या रांगा आठवतात. सांगला चितकुल रस्ता आठवतो! पण हे अजूनच वेगळं असतं.
वाटेत एका वळणावर चालक खिशातून दोनतीन नोटा काढून वाऱ्यावर उधळून देतो! त्या ठिकाणी अपघातात गेलेल्या कुणा नातेवाईक आत्म्यासाठी हे करावं लागतं असं सांगतो.
घरी गेल्यावर जीव वेडावून टाकणाऱ्या हिरव्यागार  डोंगराळ शेतात सुबक झोपडी रहायला मिळते. मालकीण बाई रांगत्या लेकीला घेऊन स्वागताला येते आणि मालक सलग 12 तास अशी अवघड रस्त्यावर गाडी चालवूनही गावची फुटबॉल मॅच म्हणून टीम मध्ये खेळायला जातो!
रात्री जेवायला उकडलेल्या भाज्या,टोफू,फळं, भात ,फो नावाचं सूप, उकडलेली कणसं,असा टेबल भरून मेनू असतो तो तृप्त करतो!!! मग येतो सफरचंद दालचिनी चहा !!
दुसऱ्या दिवशी शेतात म्हशी रेडे काम करताना दिसतात. मालकीण बाई जातीने उत्तम न्याहारी घेऊन येते. दही दूध लोणी यांचा जाणवेल असा अभाव बघून तुम्ही चौकशी करता तेव्हा गायी म्हशी वासरं दुधापेक्षा खायला जास्त चांगली असं ज्ञान मिळतं!!!
पाणी कुठलं पिता याचं उत्तर 'झऱ्याचं' असं ऐकून आम्ही चकित होतो! नाश्त्याला ब्रेड बटर कॉफी ज्यूस !
हे तीन भाऊ एकत्र शेती आणि होमस्टे सांभाळतात. बायका मुलं शेतात मिळून काम करतात. त्यात ही जोडी मोठी. आणि या वाडीवर इंग्रजी बोलता येणारे हे दोघेच आहेत एवढी माहिती कळते.
 त्यातलाच एक आजूबाजूच्या गावात फिरायला नेणार असतो. आपण विचारतो, खरंच तुम्ही साप खाता?? यावर मराठी माणसाला भेंडीची भाजी खाता का विचारल्यावर येईल ती प्रतिक्रिया येते !!! खरंच रस्त्याच्या कडेला काठीवर आणि टोपलीत साप विकायला असतात!!!
सगळीकडे तीव्र उतरांच्या पण अतिशय सुबक आखलेल्या भात खाचरांच्या रेषा असतात. कॅलिग्राफी केल्यासारख्या त्या ओळी चक्क वाचाव्या वाटतात. पर्यटकांचे घोळके गटागटाने छत्री,काठी घेऊन लहानमोठ्या पायवाटा तुडवत असतात. पाऊस येतजात असतो त्याला कोणीही फार मनावर घेत नाही.
शेतात लावणीचा हंगाम असल्याने इरलीटाईप टोप्या घालून शेतकरी कामात मग्न दिसतात. वाटांवर कडेला बांबूची लहान मोठी बेटं आहेत. पिवळे पोपटी हिरवे बांबू !!
अनेक वळणांवर उकडलेली मक्याची कणसं आणि काळी कॉफी विकणाऱ्या बायका आहेत. टपरीवजा दुकानं आहेत त्यात पापड,चिप्स, कोकाकोला, बिस्किटे इ किरकोळ वस्तू आहेत!
ती शाळा,ते ग्रामपंचायत कार्यालय,तो दवाखाना अशा सारख्या दिसणाऱ्या दोन मजली कौलारू इमारती आहेत. बैठी कौलारू घरं आतून अतिशय प्रशस्त आणि सम्पूर्ण लाकडी जमीन केलेली दिसत आहेत. गळ्यात हातात नाकात कानात मण्यांचे दागिने घातलेल्या बायका पोरी टोप्या, कीचेन्स, बासऱ्या, पंखे विकत फिरत आहेत.
हवेला करकरीत स्वच्छ ताजा वास आहे!
गाडीभर दालचिनीचा वास दरवळत असतो तेव्हा कळतं की फ्रेशनर म्हणून दालचिनीच ठेवली आहे !!! हे तुम्ही घरी जाऊन करणार असता!
लोकल मार्केट म्हणजे भलं मोठं गोडाऊन आणि त्यात थेट बिडकीनच्या बाजारात शोभतील अशी दुकानं! त्यात तऱ्हेतऱ्हेच्या लाकडी,चामडी, धातू च्या वस्तू, मसाले,सुकी फळं, मासे, भाज्या, फळं, मांस ,प्राणी ,टोप्या,टोपल्या,जडीबुटी, चपला,कपडे, छत्र्या,पंखे,मिठाई,दागिने असं सबकुछ !!!!
रात्री मालक त्यांच्या कुटुंबासोबत जेवायला बसा म्हणतात. भलं मोठं लाकडी टेबल त्याभोवती 5-6 लेकरं, तीनचार बायका,तीनचार पुरुष. टेबलवर उकडलेली कणसं, मांस,कच्च्या मिर्चीची प्लेट, भात खायला छोट्या वाट्या आणि चमचे नाहीतच नुसत्या काड्या !!!
आमचं शाकाहारी टेबल शेजारी मांडलेलं त्यावर घट्ट सूप,भात,टोफू,बांबूची भाजी,गोड तिळाची खीर आणि हे खायला काड्या !!!
एवढं मोठं कुटुंब अखंड बडबडत मधूनच आम्हाला काहीबाही अनुवाद करून सांगत जेवत होतं. या अनुभवाने पोट भरलं!
तीनचार दिवस असं सगळं बघत साठवत परतीचा दिवस उगवतो. मालकीणबाई म्हणतात अजून दोन दिवस राहिला असता तर मिलिटरी शाळेत शिकणाऱ्या मोठ्या लेकराची भेट झाली असती !!! या दोघांच्या वयाबद्दलचा अंदाज सटकून चुकलेला आहे तर !!!
आता शहराच्या जवळच्याच एका रिसॉर्ट मध्ये आम्ही राहणार म्हणल्यावर मालक तिकडे किती भाडं आहे असं विचारतो. त्यावर त्याला रक्कम सांगताना आपण इकडच्या लवासा मध्ये रहायला जातोय याची बोचरी जाणीव होते!
ट्रिप संपवून परत निघताना विमानतळ रस्त्यावर पुन्हा शेतं आणि पाण्याच्या काचा बघून शेवटी तेच ठळक लक्षात राहणार आहे हे नक्की होतं!
आज हे सगळं 5 वर्षांनी आठवताना खूप मिश्र भावना मनात आहेत.जगातल्या एवढ्या गोष्टी एकाच आयुष्यात बघायला मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. सगळे फोटो पुन्हा पुन्हा बघितले आणि सुस्कारा सोडला!
ओह्ह व्हिएतनाम !!!!!

















No comments:

Post a Comment