Wednesday 1 July 2020

झणझणीत भुरका

अबीरगुलालाप्रमाणे लाल तिखटाची उधळण नाही केली तर तो मराठवाडी स्वयंपाक कसला!
शेंगदाण्याची,तिळाची,कारळाची,जवसाची,खोबऱ्याची चटणी कोणतीही असो त्यात लाल तिखट भरपूर असायला हवं!  या चटण्या तशा मराठवाड्याबाहेरही माहीत आहेत. पण या सगळ्यांच्या पंगतीत आपल्या गुणांनी जिभेवर नाचत झोपलेल्या चवीला खडखडून जागं करणारा आमचा भुरका अती साधेपणाच्या गुणामुळे फारसा चमकत नाही!

खूप साधे दिसणारे पदार्थच खरं तर विशिष्ट चव आणून करायला अवघड असतात हे मी भुरका करताना शिकले.
जेवणाच्या टेबलवर लोणचं चटण्यांच्या बरण्यांच्या शेजारी वाडगाभरून भुरका नसला तर ते चित्र पूर्ण वाटत नाही. वेगवेगळे डिप्स, सॉस ,साल्सा आणि ओल्या चटण्या खाताना हा जरा मागेच पडतोय. याची कृती लिहून ठेवायलाच हवी!

लहानपणापासून भुरका खाल्ल्याच्या चविष्ट आठवणी आहेत.
मोठ्या वाड्यात अंगणात लिंबाच्या झाडाखाली रात्रीची दुधातली दशमी,घट्ट दही आणि भुरका अशी न्याहारी व्हायची. आंब्याच्या दिवसात आमरस,पोळी,कांद्याची भरडा भाजी आणि भुरका हे आवडीचं जेवण असायचं. आमच्या घरी एक स्टीलची बादली रसाची बादली म्हणून ठेवलेली होती. ती  बादली भरून रायवळ आंब्याचा रस शर्यत लावून तुडुंब प्यायल्यावर शेवटचं बोट भुरक्याचं !!!

कधी आजोबा किंवा मामा लातूरला आले की त्यांच्यासोबतच्या दशम्या आणि भुरका खायला फार आवडायचा. त्यातही ज्या दशमीवर लोणच्याची फोड आणि चमचाभर भुरका असेल ती माखलेली दशमी !!!!
 कधी ताकाचे धपाटे,कांदा आणि भुरका, कधी गरम भाकरी आणि भुरका,साधी बिनतिखटाची मुगाची वरणफळं आणि भुरका, मऊ खिचडी आणि भुरका, कधी कच्चे पोहे भुरका लिंबू लावून, प्रवासात केळीच्या नाहीतर गुळाच्या दशम्या आणि भुरका, शंकरपाळी आणि भुरका अशा असंख्य आठवणी आहेत.

देशाबाहेर पहिल्यांदा आलो आणि इथल्या चवींची आवड असून तयार व्हायची होती तेव्हा कुठे फिरायला जाताना सोबत भुरका असायचाच. गाकर करून घेतले सोबत भुरका घेतला की शिदोरी तयार! बर्गर पिझ्झावरही भुरका लावून खाल्लेला आहे. सँडविच मध्ये चीज स्लाइस आणि भुरका हे आजही आवडतं. आता इथल्या चवीचं खाणं आवडतं तरीपण प्रवासात चार दिवसांनी तिखटाचीच भूक लागते तेव्हा प्रिय भुरका मदतीला येतो!! आता हा भुरका आमच्या मित्रमंडळीत एवढा आवडतो की अंगतपंगत असली किंवा सहजच खाऊ काय आणू म्हणून विचारलं की भुरक्याची फर्माईश होते!

भुरका म्हणजे नुसतं तळलेलं तिखट नाही. त्याची थोडी वेगळी पद्धत आहे. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार सविस्तर सांगते.
पोह्यांचा भुरका
वेळ - 10 मिनिटे तयारीसह
साहित्य - लसूण ७-८ पाकळ्या
पाव वाटी लाल तिखट
पाव वाटी पोहे (कोणतेही चालतील)
दोन तीन चमचे शेंगदाणाकूट
जिरे,मीठ,तेल

कृती - साधारण पाऊण वाटी तेल तापत ठेवा. तेल तापतंय तोवर एका पसरट वाडग्यात तिखट थोडं पसरून ठेवा, त्यातच एका कोपऱ्यात दाण्याच्या कुटाची टेकडी करा, लसूण सोलून छान बारीक चिरून घ्या. पोहे हाताशी ठेवा. आता तेल चांगलं तापलं असेल. त्यात थोडे जिरे घाला. लगेच लसूण घाला. समोरची खिडकी, चिमणी,एक्झॉस्ट फॅन सुरू करा नाहीतर दिवसभर लसूण तळल्याचा वास घरात दरवळत राहील! लसूण गुलाबी कुरकुरीत झाला? आता गॅस एकदम कमी करून त्यात पोहे घाला. तेल एवढं गरम हवं की पोहे टाकल्याबरोबर फुलून यायला हवेत. पोहे फुलले की गॅस बंद करा. दुसऱ्या क्षणी हे मिश्रण तिखटावर घाला. तेल थोडं जरी गार झालं तरी तिखट तळलं जाणार नाही हे लक्षात ठेवा. आता मीठ घालून चमच्याने सगळं भरभर मिसळून घ्या. भुरका तयार आहे!

तेलात तिखट घालायचं नाही. ते जळतं आणि घशात जळजळ करत राहतं. तिखटावर तेल घालायचं.
हा झाला अशुद्ध भुरका! शुद्ध भुरक्यात दाण्याचा कूट घालत नाहीत! तो नुसत्या तिखटाचाच. मला दाण्याचा कूट घालून जास्त आवडतो कारण मग तो थोडा जास्त खाल्ला तरी पोटाला झेपतो.
तर भुरका प्रकरण एवढ्यात आटपत नाही. घरात कुणीतरी लसूण अजिबात न आवडणारं असतं. त्यांच्यासाठी तिळाचा भुरका करा. तेल गरम झालं की त्यात जिरे घालून तीळ घालायचे आणि ते तळले गेले की मिश्रण तिखटावर ओतायचं.

उन्हाळ्यात तीळ नको वाटतात का? मग एक काम करा. गाजराचा कीस उन्हात खडखडीत वाळवून ठेवा. भुरक्यासाठी तेल तापलं की त्यात तो तळून ते मिश्रण तिखटावर घाला.
दोडक्याच्या शिरा घालून , कढीलिंब घालूनही भुरका चांगला होतो.
असाच वाळवलेल्या कांद्याचा पण भुरका करा. मस्त लागतो!
एवढं सगळं लिहिल्यावर भुरका करावाच लागतोय!
आजचा मेनू मुगाची खिचडी,कोशिंबीर, गाकर आणि भुरका.
गाकर म्हणजे गव्हाची भाकर !
सोपी असते. पोळ्या लाटत बसायचा कंटाळा आला, कणिक जास्त सैल झाली, कालची कणिक शिल्लक राहिली असं काहीही कारण गाकर करायला पुरतं. त्याची रेसिपी वेगळी देईन.
तोवर तुम्ही भुरका करून बघाच !




No comments:

Post a Comment