Friday, 26 June 2020

पाण्याकाठचं घर ८

काल सकाळी उठले तेव्हा सगळी दारं बंद असूनही आवाज कसला येतोय म्हणून बघायला बाहेर डोकावले तर कालव्याच्या काठावर भरघोस वाढलेलं गवत कापायला सरकारी गाडी आलेली!  काल बदकाच्या अंड्यांमधून पिलं बाहेर पडून पाण्यात पोहताना दिसली तेव्हाच आता गवत कापायला हरकत नाही असं मनात येऊन गेलं. इथली ती पद्धतच आहे. दोन तासात आमच्या घरापुढच्या टप्प्यातलं गवत कापून झालं सुद्धा !

दुपारी बाहेर लावेंडरच्या वासात या ताज्या कापलेल्या गवताचा वास मिसळून हवा एकदम मिरमिरीत झाली होती! गावभर फुललेल्या लिंडनचा वास पूर्ण उन्हाळ्याला माखलेला असतो त्यात या ही गंधछटा!

उन्हाळा उन्हाळा म्हणलं तरी अजून ऊन मऊसरच आहे. त्यामुळे समोरच्या रस्त्यावर अचानक वर्दळ वाढली आहे. रोजची कामं करताना स्वयंपाक घराच्या खिडकीतून, बैठकीच्या भल्या मोठ्या दारातून बाहेरचा कालवा आणि त्यांच्याशी जोडलेल्या असंख्य गोष्टी आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. शांत वाटणाऱ्या, कमी गजबजलेल्या गावाच्या या भागात ऋतूनुसार सगळंच बदलणं खूप ठळकपणे जाणवतं.

खेळ म्हणून कनोइंग करणारे गट आता सरावाला रोज येतात. झपझप एका तालात वल्हे मारत काही क्षणात ते दिसेनासे होतात ते बघायला मजा वाटते. सायकलिंग करणारे पंधरावीस जणांचे घोळके बगळ्यांची रांग जावी तसे ग्रेसफुली जातात तेव्हा नीट लक्ष दिलं तर त्यांचा म्होरक्या ज्या सूचना देतो त्याही दिसतात! मालवाहू बोटींवर आता कॅप्टनच्या कार बरोबर सायकलही दिसू लागते. बारा महिने कनोइंगला येणारे काका आता जास्त खुष होऊन वल्हवताना दिसतात. काठावर सरळ चालत गेलं तर पाच सात तंबू, त्यात तात्पुरता संसार मांडून बसलेले हौशी मासेमार गळ टाकून समाधी लावून बसलेले असतात. हातात फोन नाही, कानात गाणी नाहीत, सोबत कोणीही नाही तरी यांचा आनंद त्या मिळालेल्या एखाद्या चुकार माशासारखा तकाकत असतो! कालव्यात पोहायची परवानगी असल्याने तरुण मुलामुलींचे घोळके सुळसुळ मासोळ्या होऊन खेळत ओरडत हसत खिदळत पोहत असतात! कुटुंबवत्सल बाप्ये लहान मुलांना घेऊन स्केटिंग, सायकलिंग नाहीतर गवतावर नुसतंच लोळून खेळत्या मुलांची राखण करत पहुडलेले दिसतात. सगळ्या वयाच्या बायका पोरी उन्हाळी कपडे घालून टॅन होण्यासाठी म्हणून गवतावर वाळवण टाकावं तशा पसरलेल्या असतात!

पाण्यातली धांदल वेगळीच असते! काठावर वाढलेलं गवत अचानक कापल्यामुळे पिलांना कुठं लपावं कळत नसतं. लांबवर पोहोता येईल एवढी शक्ती अजून आलेली नसते. अशा बाळबदकांना बदकाया कसं जगायचं शिकवत त्यांना काहीबाही खाऊ घालत खायला शिकवत उगाचच या काठावरून त्या काठावर हेलपाटे मारत असतात. कधी कधी एखाद्या बारक्याने हट्ट केलाच तर चक्क त्याला पाठीवर घेऊन पोहताना पण दिसतात या माऊल्या! मोठ्या बदकांची दोन तीन घराणी एकाच कालव्यात नांदत असल्याने शिस्तीत भांडणं, कर्कश्य आवाजात यथेच्छ आरडाओरडा, चोचीने टोचून मारामारी, पाण्यावर तुरुतुरु पळत मध्येच डुबकी मारत पाठलाग असं काठावरच्या जगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सगळं चाललेलं असतं!

लहान हाऊसबोटींमधून फिरणारे प्रवासी खायला देतात ते निर्विकारपणे खाऊन हा हा हा असं माणसासारखं हसत एकमेकांना टाळ्या देत यांचे आपले उद्योग पुन्हा सुरू  !!

सगळं काही फोटोत टिपत बसलं तर बघणार कधी म्हणून मनाने लावलेल्या "फोटो काढ"च्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करून नुसतं बाल्कनीत बसून राहणं खूप सुखाचं आहे.

असं म्हणत आज नुसतीच बसले. तर सकाळपासून उन्हाने तळतळ करणारं आकाश साळसूदपणे वेगळेच रंग लेवून दाखवत होतं. अतिशय लहरी हवामानाच्या या देशात हे नेहमीचं आहे. राहवलं नाही म्हणून चार फोटो काढले आणि पुन्हा स्वस्थ बसले तर समोरच्या झाडांवरच्या कावळ्यांना सहन झालं नाही वाटतं!

त्याचं असं आहे की समोरच्या काठावर जी झाडांची ओळ आहे त्यात चार वडीलधारी झाडं आहेत. उजवीडावी झाडं अंगात आल्यासारखं वागतात तेव्हा ही वडीलधारी झाडं पाखरांना सांभाळून घेतात. त्यावर घरटी असतात. कितीही वारं वावधान सुटलं तरी ही ढळत नाहीत. यांच्या पायथ्याशी बसून कोणी काहीही बोललं तरी ती फक्त ऐकून घेतात!

 

आता उन्हाळ्यात रात्री साडेदहापर्यंत सूर्यप्रकाश रेंगाळत असताना ही झाडं शांतपणे कावळ्यांना आपल्या कुशीत झोपवताना रोज पाहते. सूर्यास्तानंतर थोड्या वेळाने रस्त्यावरचे दिवे लागेपर्यंतच याना शांतता मिळत असावी! कावळे सुधरु देत नाहीत. रोजच्या रोज भल्या मोठ्या संख्येने शाळा सुटल्यावर बाहेर पडणाऱ्या मुलांच्या लोंढ्यासारखे ते येतात आणि आपापल्या जागेसाठी भांडू लागतात! वडीलधारी झाडं नुसती स्तब्ध उभं राहून त्यांना हवं ते करू देतात. जवळपास तासभर कोणत्या जागी कोणी झोपायचं हे ठरत असावं. कारण उशीर झालेला एखादा जरी कावळा मध्ये घुसला तरी दुप्पट जोराने ओरडून ते त्याला दुसऱ्या झाडावर जायला सांगतात!!!
आजही हे सगळं बघत बसले. तेवढ्यात फिकट चंद्र आभाळात दिसू लागला. मावळतीच्या उन्हाने आवरायला सुरुवात केलीच होती तो हा येऊन उभा राहिलासुद्धा !

चंद्र आल्यावर मात्र कावळे हळूहळू शांत झाले. झोपी गेले. कालव्यातून बदकांनी पण शांत रहायचं ठरवलं. रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली. काठावर हवा खात बसलेले लोक घरी गेले. वारं हळूहळू एका लयीत शांतपणे वाहू लागलंय.

आभाळात फक्त उभं राहून चंद्राने  सगळ्या धांदलीला, गडबडीला आठवड्यातल्या या दिवसानंतरचा स्वल्पविराम दिलाय !!! ( इथली चंद्रकोर स्वल्पविरामासारखी असते.)

No comments:

Post a Comment