
रस्त्यावर मनुष्यप्राणी असलेच तर ते बहुतेक करून आपल्याच जातीचे म्हणजे नादात चालायला किंवा लेकरांना फिरवायला आलेले असतात. सायकलिंगसाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने इथून थेट 25 किमी कालव्याच्या काठाने सायकल चालवत जाणारे लोकही असतात. पण ते बहुतेक वेळी गटाने सायकलिंग करत चाललेले असतात. मधमाश्यांचा थवा घुं करत झपकन शेजारून जावा तसे हे पुढे जाऊन कधी नजरेआड होतात कळतही नाही.
दिवस उन्हाचा असेल तर कालव्यात कनोइंग करणाऱ्यांची लगबग बघण्यासारखी असते. पुढे एक शाळा आहे. कालव्याच्या काठावर शाळा असूनही पाण्याजवळ कोणतेही कुंपण नाही.

मग येतो पाण्यावर बांधलेला हायवेला जोडणारा पूल! तिथे या वाटेने जाता येत नाही. त्या पुलाच्या खाली या वाटेवर अगदी पाण्याला खेटून कुणा स्त्रीची समाधी आहे. त्यावर तिचा फोटो आहे फक्त. नाव तारीख काही नाही. त्यावर अधूनमधून फुलं वाहिलेली दिसतात. तिथं जाऊन परतीच्या वाटेला लागलं की कोकणात दारी आंबा फणस पोफळीची गर्दी वाढवलेली कौलारू श्रीमंत घरं असतात तशी चार घरं आहेत. मागच्या वर्षीपर्यंत त्यापैकी एक घर ओसाड पडलं होतं. आता परवा बघितलं तर दुरुस्ती होऊन रंग लेवून नांदतं झालेलं दिसलं! माणसाचा वावर अशा निर्जीव गोष्टींमध्ये किती चैतन्य भरून टाकतो !
पलिकडच्या काठाला तुलनेने जास्त घरं आहेत.

घराकडेयेताना एक उघडणारा पूल लागतो. नेमकी त्याचवेळी तिथून मालवाहू बोट आल्याने पूल उचलून बोटीसाठी वाट करून देताना आणि पुन्हा बंद होताना व्हिडीओ करता आला.
तर हा असा आमचा शेजार आहे. आम्हाला या पाण्याचं, या हिरव्या निसर्गाचं एवढं अप्रूप का आहे हे मराठवाड्यातल्या माझ्या मित्रमैत्रिणीना नक्कीच कळेल! रोज नवा होणारा इथला निसर्ग बघताना मायदेशी चिमुकल्या शेतात लावलेला हिरवा ठिपका आठवत असतो आणि मग इथल्या वाऱ्याला तो वास नाहीच म्हणून एखादा सुस्काराही निघून जातो! अजून थोडेच दिवस ! असं म्हणत वाटेशी बोलत घर येतं.





No comments:
Post a Comment