Sunday 21 June 2020

दोन वर्षांचे जंगल

सगुणाचं जंगल लावायची सुरुवात करून आज दोन वर्षे झाली. छान वाढलेली झाडं, वेली बघताना ते समाधान तुमच्यासोबत वाटून घ्यावं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.
नव्या मित्रमैत्रिणींसाठी थोडक्यात माहिती सांगते. औरंगाबाद पैठण रस्त्यावर बिडकीनच्या जवळ गिधाडा हे आमचं गाव आहे. तिथे आमचं लहानसं शेत आहे. गेली ८ वर्ष आम्ही तिथे सेंद्रीय शेतीचे प्रयोग करत आहोत. आजूबाजूला मुख्यतः कोरडवाहू शेती आहे. पावसाअभावी वृक्षवल्ली आमच्या या भागाशी तशी जरा फटकूनच असते. तर आमच्या त्या शेताचा एक तुकडा घनदाट झाडीचा असावा असं खूप वर्षे वाटत होतं. काय काय करता येईल याचा शोध घेताना ज्ञानेशला मियावाकी पद्धतीच्या घनवनाची माहिती मिळाली. बेंगलोरची एक संस्था अशी घनवने लावून देण्याचं काम करते हे समजलं. त्या संस्थेच्या शुभेन्दु शर्मा यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळवली. तीन वर्षात स्वयंपूर्ण जंगल तयार होतं हे वाचून आश्चर्य वाटलं. अतिशय कमी जागेत घनदाट झाडी लावण्याची ही पद्धत आम्हाला पटली. शेतात त्या पद्धतीने अर्धा एकर भागात घनवन लावायचं ठरवलं.
मियावाकीनी सांगितल्यानुसार सगळे स्थानिक वृक्ष,झाडं, वेली, झुडूप या चार प्रकारांची माहिती मिळवून यादी करायलाच दोन वर्षे गेली. घरातल्या, नात्यातल्या, परिसरातल्या जेष्ठ मंडळींनी यात खूप मदत केली.
आमच्या भागातली दुष्काळी परिस्थिती पाहता अर्धा एकर जंगल एकदम लावणं शक्य नव्हतं. म्हणून एकूण १६ टप्प्यात ते लावायचं ठरवलं.
पहिल्या टप्प्यात १००० चौरस फुटावर ३०० झाडं लावायची होती.
आमच्याकडे यादी तर होती पण प्रत्यक्ष रोपं,ती ही साधारण एका वयाची मिळवणार कुठून! हे शोधताना औरंगाबादमधल्या साकला नर्सरी आणि पुण्यातली प्रांजल नर्सरी हे दोन खात्रीशीर स्रोत सापडले. सागर साकला यांनी तर प्रत्यक्ष येऊन मदत करायला हो म्हटलं. प्रांजल नर्सरीच्या जोग काकूंनी नुसती रोपंच नाही दिली तर प्रत्येकाचे बारकावे, स्वभावही सांगितले.
या सगळ्या काळात वाचन सुरूच होते. मनात प्रश्न होता की एवढ्या दाटीवाटीने लावलेली सगळी झाडं वाढणार कशी? मोठी झाडं लहानांना वाढू कशी देतील? यावर उत्तर मिळालं -"झाडांना कधी कोणत्या दिशेने कोणी वाढायचं ते समजतं!!!"
'झाडांना कळतं' यावर विश्वास ठेवला आणि पुढचं सगळं सोपं झालं!! एकच मुख्य काळजी घ्यायची होती, एकदा झाडं लावली की ३ वर्ष पाणी घालण्याव्यतिरिक्त त्याच्या वाढीत कोणताही हस्तक्षेप करायचा नव्हता.
जून १९ मध्ये पाण्याअभावी पुढचा टप्पा लावता आला नाही. तो आत्ता फेब्रुवारी २० मध्ये लावला.
आधीच्या टप्प्यात लावलेली झाडं जगवण्यासाठी टॅन्करचं पाणी घ्यावं लागलं होतं. यंदा मात्र विहिरीने साथ दिली. पहिल्या वर्षी जेवढं पाणी लागतं त्याच्या ५०% दुसऱ्या वर्षी आणि २५% तिसऱ्या वर्षी. असं या पद्धतीत सांगितलं आहे.
मियावाकी पद्धतीवर  अनेक आक्षेप घेतले गेलेत.
  हे जंगल नसून जंगलाचा भास आहे. अनैसर्गिक आहे, याने पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे, ही पद्धत अतिशय खर्चिक आहे इ.
तर थोडं स्पष्टीकरण देते.
हे सगळं आभासी आहे असं म्हणता येणार नाही. कारण गेल्या दोनच वर्षात अनेक सुखद बदल दिसू लागलेत. भर उन्हाळ्यात भाजून काढणाऱ्या उन्हात डोळ्यांना हिरवाई दिसणं आणि झुळूक अंगावर येणं आभासी नसतं!
प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी आमच्या या जंगलाला स्वीकारलं आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात आमच्याकडे ४२℃ तापमान होते. तिथे आजूबाजूच्या शेतांमध्ये एकही पीक उभं नव्हतं. तेव्हा साधारण २ वर्षे वयाच्या एक गुंठा जागेतील जंगलात ३ नवी मधाची पोळी आली.
साधारण सुगरणीचा खोपा हा जिथे सुरक्षितता असते तिथेच असतो. या केवळ एक गुंठा जागेत ४ पूर्ण खोपे (पूर्ण - म्हणजे ज्यात सुगरणीने अंडी घातली आणि पिल्लेही जन्मली) होते. अपूर्ण खोपे अजून जास्त होते.
याच जंगलात मुंगूस दिसून आले. जोड्याने छान फिरत होते. निर्भयपणे !
उन्हाळ्यात आमच्या शेतात हरणं वस्तीला असतातच. ते आजूबाजूचं पीक खातात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी दशरथ घास लावतो. या हरणांनी घास सगळी खाल्ली पण जंगलाला त्रास दिला नाही. त्यांना माहित आहे की याचा पुढे उपयोग होणार आहे.
माकडं नेहमीच येत असतात पण जंगलाला कधीही त्रास देत नाहीत. कच्ची फळं तोडणं नाही की फांद्या तोडून धुडगूस घालणं नाही. येतात,सावलीला बसतात विश्रांती झाली की निघून जातात !
आमच्या भागातून मोर जवळपास हद्दपार झाले होते. मागच्या वर्षभरात मोरांचे थवे अनेकदा आमच्या शेताला भेट देऊन गेले.
आमच्यासाठी हे सगळे आशीर्वाद आहेत.
दुसरा आक्षेप असा की ही भारतीय पद्धत नाही म्हणून अनैसर्गिक आहे. आणि त्याने पर्यावरणाचे नुकसान होणार आहे.
त्यावर आम्ही असं सांगू इच्छितो, तसं तर शेती करणं हेच अनैसर्गिक आहे! या विशिष्ट पद्धतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे यांनी सप्रमाण सिद्ध केलं तर आम्ही स्वतः हे जंगल तोडून टाकू. या झाडांना कोणतंही खत घातलेलं नाही. कोणतीही औषध फवारणी कधीही केली नाही. एखाद्या झाडावर कीड आलीच तर त्यांचं ते म्हणजे झाडं आपसात बघून घेतात. थोड्याच दिवसात ती कीड न पसरता आपोआपच जाते. हे प्रत्यक्ष पाहिलं आहे.
स्थानिक झाडं लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. बहुसंख्य पद्धतीत झाडं वाढायला २५ ते ३० वर्षं लागतात.आम्हाला कमी वेळात,कमी पाण्यात,कमी काळ काळजी घेऊन आमच्या हयातीत एक जंगल वाढलेलं बघता येईल अशी ही पद्धत आवडली. पटली.
कोणत्याही पद्धतीने स्थानिक झाडं लावणं, वाढवणं नुकसान करणारं कसं असेल !
तिसरा मुद्दा खर्चाचा. तर आमचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही आणि आमच्या चैनीच्या कल्पनेत खूप खर्चिक गोष्टी फार कमी आहेत.  त्यामुळे व्यवस्थित जंगलाच्या नावाचे पैसे साठवून यावर खर्च करण्यात आम्हाला समाधान मिळतं.
आमच्यासारख्या शेतीवर पोट अवलंबून नसणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणीना आम्ही या पद्धतीने जंगल लावायचा आग्रह करतो आणि तो करत राहणार.
आम्ही हे का करतोय असं अनेक लोक विचारतात. त्याचं उत्तर केवळ आनंद मिळतो म्हणून एवढंच आहे.
 कोणाला सोनं साठवायला आवडतं, कोणाला घरं बांधायला आवडतं, कोणी चित्रं जमवतो,कोणी नाणी... तसं आम्हाला झाडं लावायला, वाढवायला आवडतं. आमचं स्वप्नं आमच्या हातांनी ५००० झाडं रुजवावी असं आहे म्हणून हे करायचं!
तर मंडळी, असं हे आमचं जंगल ! सातत्याने वाढत जाणाऱ्या रखरखाटात आमच्या हातांनी एक हिरवा ठिपका आकार घेतोय याचं समाधान अपार आहे. दोन्ही टप्प्यात मिळून ६४० झाडं लावली होती. त्यातली ६३४ झाडं रुजली आणि वाढीला लागली आहेत.  ज्ञानेशचा या संदर्भातली सगळी माहिती देणारा ब्लॉग आहे तो वाचून मराठवाड्यात अशी घनवने निर्माण होत आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे प्रयोग करणारे लोक आहेत.आमच्या प्रयोगापेक्षा मोठ्या जागेत या पद्धतीने स्वयंपूर्ण जंगलं तयार झाल्याची उदाहरणे आहेत. हळुहळू का होईना हे हिरवे ठिपके वाढत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हीही यात सहभागी व्हावं अशी विनंती. याबाबत लागणारी शक्य ती मदत करायला आम्हाला आनंदच होईल.
या सगळ्या गोष्टीत आमचे आप्त, सुहृद आमच्या सोबत घाम गाळायला तयार असतात ही आमची मोठी शक्ती आहे. त्यांच्या हातांनी लागलेली झाडं आज फळाफुलांनी बहरत आहेत. त्यातलं काहीही आमचं नाही. कोणीही ते तोडत नाही. मुळात तो तुकडा एवढा घनदाट झालाय की ४ फुटांच्या पुढे आत जाताच येत नाही!
ही झाडं वेली गगनाला जावोत! असेच निसर्गाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत राहोत!
खाली दिलेला व्हिडीओ घनवनाची आजवरची वाढ दाखवणारा आहे. नक्की बघा.
http://dnyanamhane.blogspot.com/2019/03/blog-post.html?m=1

No comments:

Post a Comment