Monday, 22 June 2020

माझ्यावरील संघसंस्कार

गेले काही दिवस लिहायला सुरुवात केल्यापासून खूप लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. त्यात स्वतःची ओळख अमुक पक्ष तमुक विचारधारा अशी ठळकपणे दाखवणारे लोकही खूप जास्त आहेत. माझ्याबद्दल त्यांचे कोणतेही गैरसमज असू नयेत असं प्रामाणिकपणे वाटतं म्हणून हा लेखन प्रपंच.

होय मी संघवीचारांची आहे. संघ कार्यकर्त्याच्या घरात जन्म झाला. अनेक मोठे कार्यकर्ते बघत, बाबांचं काम बघत,समितीच्या शाखेत जात,शिबिरांमधून आधी दंड वगैरे शिकत नंतर शिकवत मोठी झाले. माझ्या शाखेत 90 च्या आसपास मुली यायच्या. संघगीतं शिकणं हे सिनेमाच्या गाण्यांइतकंच प्रिय होतं. समितीच्या कामानिमित्त लहान वयात एकटी प्रवास करण्यापासून एखाद्या गावात कोणीही ओळखीचं नसताना जाऊन शिबिरं घेण्यापर्यंत आत्मविश्वास आला तो शाखेमुळे. माणसं बघायला शिकले ते शाखेमुळे.

हे माझ्यासाठी नैसर्गिक मोठं होणं होतं. सुदैवाने मला सासरही संघाचं मिळालं. जिथे माझे विचार समजवून सांगण्यासाठी मला कोणताही संघर्ष करावा लागला नाही. जोडीदार कोणतीही कर्मकांड न मानणारा असल्याने दोघांनाही फार जुळवून वगैरे घ्यावं लागलं नाही.

आपला जन्म कुठल्या जातीत व्हावा ते आपल्या हातात नसतं त्यामुळे जातीचा अभिमान किंवा लाज दोन्ही असू नये तसं मला मी संघाची आहे याचा अभिमान किंवा लाज दोन्ही नाही.पण आई बाबा संघाचे असल्या कारणाने मला विवेकाने जग बघायची संधी मिळाली, स्वतःसमोरच स्वतःची ओळख तयार करता आली याबद्दल आपण सुदैवी आहोत असं नक्कीच वाटतं.

कोणतीही विचारसरणी चांगल्या गोष्टी शिकवत असते. त्यातून तुम्ही काय शोषून घेता तर सर्वस्वी तुमचं मडकं किती पक्कं आहे त्यावर  अवलंबून असतं. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे भवतालातुन कण वेचत असतो.
हिंदू म्हणून जगायचं म्हणजे काय करायचं, संघटनेत शक्ती असते म्हणजे काय, देशावर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मला शाखेने शिकवलं. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे व्यक्तिपूजा नाही करायची हे शाखेत शिकले. भिन्न विचारसरणीचा आदर शाखेत शिकले. ज्या क्षेत्रात असाल, ज्या भूमिकेत असाल तिथे 100% प्रामाणिक राहून काम करायचं हे शाखेत शिकले.

संघ सांगतो त्यातल्या बहुतांशी तत्वांवर माझा ठाम विश्वास आहे. पण असा विश्वास ठेवण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती कधीही कुणीही केली नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकारणात सहभागी न होण्याचं माझं स्वातंत्र्य कोणीही चूक ठरवलं नाही.  गेली काही वर्षे प्रत्यक्ष कामात सहभागी नाही तरी मला कोणीही वाळीत टाकलं नाही.

अमुक प्रकारच्या माणसांचा द्वेष करा असं कधी कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आठवत नाही. त्यामुळे माणूस म्हणून तुम्ही बरे असाल तर अमुक पक्ष,तमुक धर्म हे फार महत्त्वाचं वाटत नाही.

माझ्या जवळच्या मित्रमंडळींमध्ये अनेक विचारधारा असणारी सुसंस्कृत लोक आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमच्या मैत्रीत कधीही त्यांची किंवा माझी विचारसरणी आड येत नाही. संघकामाचं जेवढं कौतुक आणि आदर आहे तेवढाच आदर अनेक प्रकारचं समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती यांच्याबद्दल आहे. यात जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्याबद्दल अभिमानही आहे! हा विवेकही मी शाखेत आणि संघाच्या घरात शिकले.
आपलं व्यक्तिमत्त्व तयार होण्यात भवतालाचा फार मोठा सहभाग असतो.  माझ्यावर संघाचा आहे.

आता अमुक माणसं संघाची असूनही अमुक पद्धतीने चुकीची कशी वागतात या तुमच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. कोणतीही संघटना त्या समाजाचाच लहान तुकडा असते. त्यामुळे समाजातल्या सगळ्या प्रवृत्ती तिथे असायच्याच हे उत्तर मला सापडलेलं आहे.आधी म्हणल्याप्रमाणे त्यांनी  काय कोणत्या प्रकारे शिकावं हे माझ्या हातात नाही. त्यामुळे इतर कुणी कार्यकर्ता म्हणून चुकीचं वागत असेल तर ती जबाबदारी माझी असत नाही. आज मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या मी करत नाही. त्याबद्दल मी अनुशासन भंग केला असं कोणीही म्हणत नाही कारण संघ कुणा एकाच्या मालकीचा नाही. हे मी संघाच्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर निर्भयपणे म्हणू शकते.

आजही शक्य असेल तेव्हा मैदानावर शाखा लावून मुलींचे व्यायाम खेळ घ्यायला मला आवडेलच! आजही माझा आदर्श शांतपणे डोंगराएव्हढं काम करत जमिनीवर घट्ट पाय रोवून साधं जीवन जगणारे कार्यकर्तेच आहेत.
तर आहे हे असं आहे. मित्रयादीत घेताना किंवा कुणाच्या यादीत जाताना ती व्यक्ती सुसंस्कृत आहे एवढंच बघितलं जातं. कारण फेसबुकवर मी कोणताही अजेंडा घेऊन आले नाही.

मी संघाची आहे ही ओळख मुद्दाम करून देण्याची किंवा लपवण्याची गरज वाटत नव्हती. तरीही काही लोकांना धक्का बसू नये म्हणून सांगावं असं ठरवलं.

तेव्हा जे आहे ते आहे. मित्र म्हणून राहताना मैत्रीचे सगळे नियम मी पाळते. इतरांनीही ते पाळावे असं वाटतं.
एक सामान्य स्त्री म्हणून अशी ओळख सांगताना अनेकदा 'मी मी' झालंय पण स्वतःबद्दल बोलताना ते अपरिहार्य असतं. यात कृपया मी स्वतःला फार ग्रेट समजते असा अर्थ काढू नये. माझ्या मर्यादा आणि दोष यांची नक्कीच जाणीव आहे.

आता हे सांगितल्यावर तुम्हाला पटत नसेल इथं थांबण्याचा आग्रह नाहीच! मी तुमच्यावर तुम्ही  चांगले असल्याचं सिद्ध करायची सक्ती करत नाही तसंच इतर कुणी माझ्यावर करू नये एवढीच अपेक्षा आहे !

No comments:

Post a comment