Tuesday 23 June 2020

अन्नपूर्णेचा वारसा १ - ज्वारीच्या लाह्या, फोडणीचे दूध

चौथी पाचवीत असेन मी. शाळेतून आले तर आई कुठेतरी बाहेर गेली होती. शेजारच्या जोशींकाकुंकडे किल्ली आणायला गेले तर त्यांची धाकटी पाटावर बसून वाटीत काहीतरी घेऊन खायला बसतच होती, काकूंनी मलाही पाट घ्यायला सांगितला. या कर्नाटकी वैष्णव घरात नेहमी एक हवाहवासा वास भरून राहिलेला असे. आमच्या घरी कधीकधीच होणारे सांबार, गुंतपंगूले, इडल्या, उप्पीट यांच्याकडे रोजचंच. त्यात कांदा लसूणही अजिबात चालायचा नाही!

काकूंनी वाटी हातात दिली. चमचा भरून तोंडात घातला आणि पुढच्या अक्षरशः तीन मिनिटात वाटी रिकामी झाली होती! ज्वारीच्या लाह्यांचं पीठ होतं ते! ताकात कालवून वर हिंग मिर्चीची फोडणी दिलेलं!!

लातूरकडे नागपंचमी मोठा सण. तेव्हा घरोघरी लाह्या होत. नागाच्या नैवेद्यावर लाह्या आणि दूध ठेवायची पद्धत आहे. तर नागपंचमी जवळ आली की आई आणि जोशी काकू भल्या मोठ्या लोखंडी टोपल्यात मूठ मूठ ज्वारी टाकत लाह्या फोडत असत. त्यांचं टोपल्यातच पीठ होऊ नये म्हणून मोठ्या रवीला पुढे कापड बांधून ती टोपल्यातली लाह्या बनून उडणारी ज्वारी सतत हलवत रहावी लागे. जवळच एका मोठ्या कापडावर तयार लाह्यांचा डोंगर तयार व्हायचा! पांढऱ्या शुभ्र झगा उभा करून ठेवावा तशी एकेक टपोरी लाही! ही लाह्यांची ज्वारी खास वाण म्हणून आमच्याच शेतातून मंजरथहुन आलेली असायची.

मग पुढचे काही दिवस लाह्या मेतकूट तेल मीठ, लाह्या तिखट लोणचं, गोकुळाष्टमी स्पेशल लाह्या दही आलं मिर्ची कोथिंबीर घालून गोपाळकाला असा लाहीमय खाऊ आम्हाला मिळायचा.

लाहीपीठ आमच्याकडे फार आवडायचं नाही. जोशी काकूंकडे मात्र झटपट पोटभरीचा सकस नाश्ता म्हणून लाहीपीठ घरात तयार असायचं.  वाडग्यात लाहीपीठ घेऊन त्यात ताक आणि कोणतीही चटणी घालून कालवलं की तयार!

मग हळूहळू हा प्रकार मागेच पडत गेला. नंतर कित्येक वर्षांनी मला आमच्या आयुर्वेदिक dr नी न्याहारीला फक्त ज्वारीच्या लाह्या खा असं सांगितल्यावर लाहीपीठ पुन्हा घरात रुळलं. लाह्या मिक्सरमध्ये फिरवून घरीच लाहीपीठ करता येतं. फक्त त्या लाह्या स्वच्छ हव्या. कधीकधी विकतच्या लाह्या गरम वाळूत फोडलेल्या असतील तर त्यात कणी असते पीठ खाताना ती दाताखाली येते. तयार लाहीपीठ विकतही मिळतं. मी ते भारतातून येताना घेऊन येते. जवळजवळ वर्षभर ते खराब होत नाही.

सध्या मी रोज न्याहारीला खातेय.भाजलेलं असल्याने पचायला हलकं, लो कॅलरी, पौष्टिक आणि चवीचं!! आणि शिजवावं लागत नाही !

लाहीपीठ दूध मनुका भाजलेलं जवस
लाहीपीठ ताक मेतकूट
लाहीपीठ दही शेंगदाणे चटणी
लाहीपीठ दूध केळी
लाहीपीठ दूध साखर
ही आवडती कॉम्बिनेशन्स आहेत.
आता फोडणीचं दूध !

चारठाणला आजोळी घरात कोणीही चहा पीत नसत. सगळे दूध घ्यायचे. तेही 'चहा करा बरं' सारखं 'दूध करा बरं' असायचं! म्हणजे पातेल्यात दूध घेऊन त्यात साखर घालून नीट उकळून मग कपात ओतायचं! चुलीवर दूध आत्ताच तापलंय तरी दूध करायचं ते असंच!!! काय लॉजिक कुणास ठाऊक !

तर आजीला मात्र तसं दूध आवडत नसावं. ती फोडणीचं दूध प्यायची. आम्हालाही द्यायची.

म्हणजे आधी ते पितळी पातेलं स्वच्छ असलं तरी थोड्या पाण्याने विसळून घेणार,मग चुलीवर ठेवणार,त्यात थोडी साखर टाकून मग दूध आणायला दुसऱ्या चुलीजवळ जाणार. तिथून येईपर्यंत साखर रंग बदलून खरपूस खमंग वास सुटलेला असायचा. त्यावर चुररर आवाज करत दूध ओतलं की झाली फोडणी! मग मात्र ते नीट उकळू द्यायचं. कारण जळताना साखर पातेल्यात बुडाशी चिकटून जायची ती उकळणार्या दुधात विरघळून पातेलं स्वच्छ व्हायला हवं !!!

मग ते फिकट गुलाबी सोनेरी दूध फुलपत्रात ओतून प्यायला तयार!

माझी एक शाळामैत्रीण होती. तिचे बाबा चहाचं दुकान चालवायचे. एकदा माझ्याकडून हे फोडणीचं दूध ऐकून त्यांनी पण करून बघितलं आणि दुकानात चहा बरोबर ते ही विकायला लागले! मला खूप मस्त वाटलं होतं!

परवा घरी एका मैत्रीणीला मध्यरात्री गप्पा मारून दमल्यावर हे दूध करून दिलं! दूध न आवडणाऱ्या त्या मांजरीलापण हे आवडलं !

तर मंडळी, आत्ता इथं मस्त झिम्म पाऊस सुरू आहे. आमचं बाळ झोपलं आहे, गाणी सुरू आहेत,एकीकडे स्वयंपाक चालू आहे आणि हे दूध करून एकीकडे पीत ही पोस्ट पूर्ण करतेय!

मराठवाड्यातल्या विसरत चाललेल्या साध्यासुध्या पाककृती वाचायला तुम्हाला आवडणार असेल तर हॅशटॅग लक्षात ठेवा !

#अन्नपूर्णेचावारसा, #मराठवाडापारंपरिक

No comments:

Post a Comment