Monday, 22 June 2020

पुनश्च हरिओम

परवा सकाळी सकाळी वर राहणाऱ्या स्टाफ आणि मार्टिनने शनिवार बाजार सुरू झाल्याचं सांगितलं. आता जाणं भाग होतं! गावात शनिवारी बाजारात न जाणारी जनता आळशी,माणूसघाणी, चेंगट वगैरे वगैरे समजली जाते !!! आम्हाला एवढे लोक एकत्र बघायची आठवड्यातली ही एकमेव संधी असते. त्यात 3 महिन्यांच्या लॉक डाऊन नंतर आज बाजार उघडणार म्हणजे आम्ही जाणं वारकऱ्यांच्या वारीएवढंच अत्यावश्यक होतं!
भराभर आवरून,फांदीला बाळगाडीत बसवून उत्साहाने बाजाराकडे गेलो. मुख्य रस्ता ओलांडून बाजारच्या रस्त्यावर लागलं की साखरेचे कण डोक्यावर घेऊन येणाऱ्या आनंदी मुंग्यासारखे हातात बाजारचं ओझं घेऊन येणारे लोक दिसू लागतात. आज या मुंग्या मास्क लावून आणि जरा अंतर ठेवून चालत होत्या असं दिसलं.
अजून कॅफे उघडले नाहीत म्हणून एरवी छत्र्या लावून टेबल खुर्च्या मांडलेली रस्त्याला अगदी चिकटून असलेली अंगणं मोकळी रिकामी दिसत होती.
वाटेत एक सेकंड हँड वस्तूंचं दुकान आहे. नव्या देशातले लोक समजून घ्यायचे असतील तर अशी दुकानं खूप कहाण्या घेऊन बसलेली असतात. तिथल्या वस्तू तुम्ही थोडी विचारपूस करायला गेलात की घडाघडा बोलतात. या दुकानात नुसतं रेंगाळायला मला आवडतं. आज मात्र ते दुकान अनिश्चित काळासाठी बंद असल्याची सूचना वाचून पुढे जावं लागलं.
पुढचा नदीवरचा छोटा पूल ओलांडला की आता सुरू होतं ग्रोटं मार्क्ट ! एक बस रस्ता, मग विस मार्क्ट (फिश मार्केट) आणि मग मुख्य मैदानातला बाजार. या बसच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शनिवारी दुकानं लागलेली असतात. दुकानांच्या जागा दर शनिवारी बदलतात. म्हणजे आज तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि ती परत करायची असेल तर तुम्हाला आजच पुढच्या शनिवारी हे दुकान कुठे असेल ते विचारून घेता येतं. कपड्यांपासून भांड्यांपर्यंत बहुतेक सगळ्या वस्तू योग्य कारणाने बदलून घेता येतात. इथे कपडे,खेळणी,कॅण्डीज, चॉकलेट्स, चपला बूट, खोटे दागिने,घड्याळ, जुन्या शोभेच्या वस्तू इ ची दुकानं असतात. मुख्य मैदानात भरणाऱ्या बाजारात बहुतांशी फळं,भाज्या,मांस,मासे,चीज,ब्रेड, फुलं, रोपं बियाणं इ दुकानं असतात. मोठ्या ट्रकचा एक बाजू उघडून बाकडे मांडून त्यावर जमेल तेवढ्या सुबकपणे लावलेला हा रंगीबेरंगी बाजार आपल्या मंडईची खूप आठवण करून देतो!
आज हे बघताना पूर्वीच्या बाजारापेक्षा बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसत होत्या.लॉक डाऊन नंतरचा महत्वाचा बदल म्हणजे दोन टप्प्यात भरणारा बाजार. पूर्वी सकाळी सात ते दुपारी एक एवढ्या वेळेत सगळी खरेदी विक्री होऊन दोन वाजता चूल पोटेरे केलेल्या स्वयंपाकघरासारखा सगळा परिसर लख्ख होऊन जायचा. आता अर्धी दुकानं सकाळच्या वेळेत आणि अर्धी दुपारी लागणार आहेत. यामुळे गर्दी कमी होणार असली तरी ज्यांना भाजी पण घ्यायची आणि चपला पण घ्यायच्या अशा लोकांना दोन वेळा यावं लागेल किंवा वाट बघत तिथेच थांबावं लागेल.
अजून एक बदल म्हणजे सगळीकडे आपल्या देवळांमध्ये असतात तसे दर्शनबारीसारखे बॅरिकेड्स! मुख्य चौकात जाण्यासाठी या रांगेत लागूनच आत जायचं. भलीमोठी लांबच लांब रांग!!! त्यामुळे आमच्यासारख्या नुसतंच बाजारात फिरायला आवडणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार हे निश्चित!
प्रत्येक दुकानात सॅनिटायझर ठेवलेले आहेत. मास्क मात्र ऐच्छिक कारभार आहे असं लोक वागताहेत.
पिलूला घेऊन रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं. तिलाही माणसं बघायला फार आवडतं. त्यामुळे सुरक्षित अंतरावर उभं राहून गर्दी टाळून जमतील तेवढे फोटो घेतले. किरकोळ खरेदी केली आणि घराकडे निघालो.
खरं सांगू का, आज खूप दिवसांनी एवढे लोक एकत्र बघून खरं तर बरं वाटायला पाहिजे. पण मास्क,सॅनिटायझर, रांगा, एकमेकांना स्पर्श होऊ नये म्हणून चालताना सुद्धा सतत सतर्क राहणं आणि लोकांच्या डोळ्यातली भीती याने थकून गेल्यासारखं झालं! घरोघरी महायुद्धात काहीतरी गमावल्याच्या खुणा अभिमानाने मिरवणारे, कष्ट केले की आनंदात राहता येतं यावर ठाम विश्वास असणारे, गोठलेल्या हिवाळ्यातही भेटलेल्या मित्राला हात हातात घेऊन उबदार माया देणारे हे लोक हतबल दिसत आहेत!
घरी येऊन बाजाराचे जुने फोटो बघितले. तुम्हाला दाखवण्यासाठी जुने नि नवे एकत्र केलेत. कदाचित अजून काही दिवसांनी सगळं पूर्ववत होईलही. पण त्यात खूप काही वाईट बघितल्याच्या, सहन केल्याच्या खुणा मात्र ठळक असणार आहेत!No comments:

Post a comment