Monday, 22 June 2020

सावित्री

माझी सावित्री या संकल्पनेवर श्रद्धा आहे. पण  त्याचा नवरा,वड,सात जन्म,उपास,दोरे यांच्याशी काहीही संबंध नाही. मुळात त्याचा लग्न या वेगळ्या संकल्पनेशीच काही संबंध नाही.

इथपर्यंत वाचून जजमेंटल होणार असाल तर शुभेच्छा घ्या आणि पुढच्या भिंतीवर जा!

 प्रत्येक बाईमध्ये सावित्री असते. तिला कळो वा न कळो ! संकटात असताना बळ देणारी, कल्पकतेने त्यातून मार्ग काढू पाहणारी, दुःखात असताना धीर देणारी, अन्याय होताना चवताळून विरोध करणारी, आपलं माणूस चुकत असताना त्याचा ठाम विरोध करणारी,कान धरणारी, ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी धडपड करणारी,त्या मार्गात येणाऱ्या अडचणीना जाऊन थेट भिडणारी,सगळं मोडून गेलं तरी पुन्हा काडी काडी जमवून सुरुवात करणारी, पडलीठेचकाळली तरी कळवळून क्षणभर थांबून पुन्हा चालू लागणारी, आपल्या माणसांवर जीव ओतून प्रेम करणारी, ती दुबळी असतील तर त्यांचं रक्षण करणारी, भलं चिंतणारी जी प्रेरणा आहे ती सावित्रीच !

ती देवी वगैरे नाही. ती चुकते, मोडून पडते, रडते,दुबळी ठरते, गोठून जाते पण तरीही उठतेच !

या सावित्रीचा हातातल्या चुड्या बांगड्याशी, गळ्यातल्या मंगळसूत्राशी, कपाळाला कुंकू लावण्याशी काहीही संबंध नाही.

या सावित्रीची आठवण ठेवावी लागत नाही. वेळ आली की शक्ती होऊन तुमच्यापाशी आपोआप येते आणि तुम्हीच सावित्री होता!

या जाणिवेला तुम्ही सावित्री म्हणणार नसाल तर नका म्हणू. देवी म्हणणार असाल तर खुशाल म्हणा. टिंगल करणार खुशाल करा.  त्याने तिच्यात काहीही बदल होत नाहीत. ती कुणा विशिष्ट गटाची,धर्माची,जातीची मालकी मानत नाही. एखादया आदिम प्रेरणेसारखी ती आपलं काम करत राहते.

सावित्री म्हणजे जिजीविषा !
सावित्री म्हणजे विजीगिषा !
तिचं अस्तित्व तुमच्या माझ्यात सतत जिवंत राहो!

No comments:

Post a Comment