Monday, 21 November 2016

तनैया आणि ईल

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. तनैय्या नावाची एक गोड मुलगी होती. एका सुंदर तळ्याच्या काठावर एक छोट्या झोपडीत ती राहायची. तिला पाण्यात खेळायला फार आवडायचं. दिवसभर ती पाण्यात पोहत राहू शकायची. "अहाहा ! किती मस्त वाटतंय!!!!" असं म्हणत ती डुंबत राहायची.

 एक दिवस ती पाण्यात डुंबत असताना तिला कुठला तरी वेगळाच स्पर्श झाला. अचानक तिला सापासारखं काहीतरी वळवळताना दिसलं. पण त्या प्राण्याचं डोकं सापापेक्षा बरंच मोठं होतं. थोडी भीती वाटत असूनही तनैय्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो एक ईल होता. एक प्रकारचा मासा.

 तनया घाबरून तलावाच्या बाहेर आली आणि झोपडीकडे धावत गेली. दुसर्‍या दिवशी पोहायला गेली असताना तिने पाहिले की तो कालचा ईल एका खडकाजवळ पोहत रेंगाळतोय. जणू काही तो तिची वाटच बघतोय. तनैय्या दिसताच ईलने पोहण्याचा वेग वाढवला. तिला आश्चर्यच वाटलं. ती ईलकडे पोहत गेली आणि हळूच त्याला हात लावला. त्याचा स्पर्श खूप मऊ आणि थंडगार होता. "काय सुंदर प्राणी आहे हा!" असे मनाशी म्हणत ती स्वत:शीच हसली आणि पोहू लागली.


 त्या दिवसापासून हे रोजचंच झालं! रोज सकाळी ईल तनैय्याची वाट बघत असायचा. ती आली की दोघे तासंतास एकत्र पोहत राहायचे.

eel1



 ईलच्या सुंदर शरीराकडे तनया बघत राहायची आणि जाताना त्याच्या पाठीवर हळुवार थोपटायची.

  एके दिवशी खूप वेळ पोहून झाल्यावर तनाया पाण्याबाहेर येऊन काठावर बसली होती. तेवढ्यात ईल सुद्धा पाण्याबाहेर आला. "एक मासा पाण्याबाहेर कसा काय येऊ शकतो ? आणि का?" तनैय्या अचंबित होऊन विचार करु लागली.

 अचानक, तिला आश्चर्याचा धक्काच बसला. बघता बघता ईलचे रूप पालटले. एका अतिशय देखण्या तरूणाच्या रूपात तो तनैय्या समोर उभा राहिला. तनैय्या आश्चर्याने अवाक् झाली.

 तो तरुण म्हणाला, "माझे नाव अंबु. मी ईल माशांचा देव आहे. मला तू खूप आवडतेस. तुझ्याजवळ नेहमी राहायला मला फार आवडलं असतं, पण आता तुला सोडून निघून जाण्याची वेळ आली आहे." हे ऐकताच तनैय्याचा चेहरा पडला. "काय? तू निघून जात आहेस?" तिने विचारले. "होय. मला जावंच लागेल. पण जाण्याच्या आधी तुला माझी सतत आठवण राहील असे काहीतरी वरदान देण्याची माझी इच्छा आहे. मात्र ते वरदान मिळवण्यासाठी तुला मी जे सांगतो ते न बोलता करावं लागेल. उद्या मी तुझ्या झोपडीजवळ ईल माशाच्या रूपात येईन. तुला माझं शीर धडापासून वेगळं कापून झोपडीच्या जवळ पुरावं लागेल."  असं म्हणून अंबुने पाण्यात सूर मारला आणि तो दिसेनासा झाला. धक्का बसलेली तनैय्या झोपडीकडे परतली. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला दिसले की झोपडीच्या पायर्‍यांपाशी खरंच ईल झोपला आहे आणि त्याचे डोके अगदी काठावर आहे. ती आश्चर्याने टक लावून ईलकडे बघत राहिली. "हा ईल तर खरंच मरायला तयार झालाय!" असं तिच्या मनात आलं. पण तिने ईलला वचन दिले होते म्हणून ती काहीही बोलली नाही.

 ईल तनैय्याकडे बघत जणु म्हणत होता, "मी सांगितल्याप्रमाणे कर. कृपया संकोच करु नको!" तनैय्याने एकदा ईलकडे पाहिलं, एक मोठा श्वास घेतला, कोयता उगारला आणि एकाच झटक्यात त्याचे शीर धडापासून वेगळे केले. मग तिने ते डोके तिच्या झोपडीमागे पुरले. त्या दिवसापासून तनैय्या खूप दु:खी आणि निराश दिसू लागली.

 रोज ती ईलचं डोकं पुरलं त्या जागी जायची आणि रडत बसायची. असेच काही दिवस उलटून गेले. एके दिवशी तिला त्या जागी एक कोंब फुटलेला दिसला. ते पाहून तिला खूप आनंद झाला. ती रोज त्या कोंबाला पाणी घालू लागली. त्याची निगा राखू लागली. हळूहळू कोंब वाढत गेला आणि त्याचे उंच अशा नारळाच्या झाडात रुपांतर झाले. ते झाड डौलाने वार्‍यावर हलत असे. त्याच्या लांबच लांब झावळ्या गोड गात असत. त्या प्रकारचे दैवी संगीत तनैय्याने कधीच ऐकले नव्हते. त्याचे गोड दुधाळ पाणी चवीला अमृतासमान लागे. तनैय्या आता खूप आनंदात होती. ती त्या झाडाभोवती गात नाचत असे. "खरंच ही मला मिळालेली जगातची सर्वात सुंदर भेट आहे!" असे सारखी म्हणत असे.

 म्हणूनच असे म्हणतात की नारळाचे झाड, ज्याचा प्रत्येक भाग आपल्यासाठी उपयुक्त आहे, आपल्याला ईल च्या देवांकडून मिळालेले वरदान आहे. असंही म्हणतात की नारळाचे वरचे आवरण काढले की तुम्ही ईल चे दोन डोळे अजूनही बघू शकता.

(केरळी लोककथेवर आधारित)

( चित्र जालावरुन

No comments:

Post a Comment