Wednesday, 22 July 2015

सरिंवर सरी आल्या ग...


कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो.
तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली. उन्हाच्या काहिलीनंतर बर्‍याच दिवसांनी अशा हळुच येऊन शेजारी बसणार्‍या पावसामुळे साहजिकच आमचं लक्ष विचलित होत होतं. पावसाचे ते थेंब लक्ष हातांनी बाहेर बोलवत होते. आम्ही ऐकत नाहीसे बघून पाऊस चिडला आणि मुसळधार वर्षू लागला.  सर बोलायचे थांबले. म्हणाले पावसाच्या कविता म्हणूया !!!

समीक्षेसारख्या घनघोर अरण्याला लीलया पेरणारा हा माणूस पावसाच्या थेंबांच्या माळा करू म्हणत होता !!!!

 मग सुरू झाल्या पावसाच्या कविता. सरांचा कमावलेला आवाज, बाहेर पाऊस, वर्गातली जेमतेम १२-१४ उत्सुकलेली डोकी आणि पावसाच्या कविता !

 बोरकरांची ओळख खरी तेव्हा झाली. एकामागून एक कवितेची सर झेलत वेगळ्याच धुंदीत किती वेळ गेला माहीत नाही !

आजही पाऊस संथ लयीत मध्येच ताना घेत स्वमग्नपणे जेव्हा बरसत राहतो तेव्हा त्या कविता आठवतात. गुलमोहराची उरलीसुरली फुले भिजताना दिसतात. खारोट्यांची लगबग जाणवते...याला साथ बोरकरांच्या पाऊस कवितांची..

 बोरकरांची पाऊसगाणी म्हटलं की पहिली कविता ओठांवर येते ती

  गडद निळे गडद निळे जलद भरुन आले 
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.. 

या ओळीतले हे गडद निळे चपलचरण वाचेपर्यन्त ट्प ट्प थेंब पडू लागतात

  टप टप टप पडति थेंब मनिंवनिंचे विझति डोंब

आणि हे होतानाच...

  वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले 
 गडद निळे गडद निळे जलद भरुन आले ॥ 

आहाहा !  ही कविता खरोखर पंचेंदियांनी अनुभवायची.

मातीच्या वासाचा आशीर्वाद देऊन हे जलद श्रावणधारा होतात आणि एक त्या श्रावण दर्शनानेही कवी स्तिमित होतो.

  गिरीदरीतुनि झरे---नव्हे हे हिरे उसळती निळे ।

पावसाळ्यातल्या मंडुकगानानेही लुब्ध होत कवी म्हणतो

ऋषी कुणी मंडूक संपवुनि उपनिषदाची ऋचा
 रविकिरणाचे भस्म लावुनी उबवित बसला त्वचा !

झाडे निळी होताना हवेचे जणु दही झालेले कवीला दिसते.

  झाले हवेचेच दही माती लोण्याहून मऊ
 पाणी होऊनीया दूध लागे चहूंकडे धावू
 लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय 
भिजणार्‍या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय..

या संतोषातच कवी तरलपणे लिहून जातो
  क्षितिजी आले भरते गं
 घनात कुंकुम खिरते गं 
झाले अंबर झुलते झुंबर
 हवेत अत्तर तरते गं !

हे हवेत तरणारे अत्तर बोरकरांच्या असंख्य कवितांना स्पर्शून गेले आहे. बोरकरांच्या निसर्गवेडात समुद्रावरचे त्यांचे प्रेम जेवढे ठळक आहे, तेवढेच पावसावरचेही. पावसाच्या अनेक लकबी, तर्हा, बोरकर सहजतेने कवेत घेतात. थेट आपल्या जगण्यातच पावसाला विणून घेतात.

  पर्जन्याची पिसें सांडली पिसांवलेल्या उन्हांत
 तुझे नि माझे लग्न लागले विसांवलेल्या मनात

आणि या त्यांच्या विसावलेल्या क्षणाला साक्षीदार असतात

  ढवळे ढवळे ढग खवल्यांचे निळीत वळती इवले इवले 
सरी ओवल्यागत ओघळती हरळीवरती निळसर बगळे 

न्हात पडणारा पाऊस पाहिलाय का तुम्ही? त्याला आम्ही कोल्ह्याचं लग्नं म्हणायचो. गोव्यात हा असा पाऊस माकडाचं लग्नं घेऊन येतो. ती पूर्ण कविता देण्याचा मोह आवरत नाही.

उन्हातले सरी ! बाई, उन्हातलें सरी !
खरेच का माकडाचे लग्न तुझ्या घरी ?
सोनियाच्या घरा तुझ्या मोतियांच्या जाळ्या
आंत काय चालें तें न कळे काही केल्या
माकडाची टोपी कशी, माकडीची साडी ?
सोहळ्याला कोण कोण जमले वर्हाडी ?
कुणीं कुणीं केले किती अहेर केवढे?
पाहुण्यांना वाटले ते सांडगे की पेढें?
आम्ही मात्र ऐकले ते पाखरांचे मंत्र
आणि पानीं वाजलेले ताश्यांचे वाजंत्रं
ऐन वेळी घातलें का भुलाईचे पिसें?
चार क्षणांतच लग्न आटोपले कसे ? 


:) :) :) 

ही सुखाची साय दाट होतानाच

  फांदीसारखी झुकते सांज जांभळासारखे पिकती ढग 
हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग 
गगनभारल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे 
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे 

अशी कातरता दिसून येते. अशीच पावसाशी जोडलेली अजून एक सुंदर उदास कविता

  हवा पावसाळी जरा रात्र काळी 
ढगा़आडचा चंद्र थोडा फिका
 नदी आज जागी उदासी अभागी 
अजूनी न ये नीज या सागरा 

ही अस्वस्थता आणि जीवनासक्ती उलगडताना कवी पावसाचं बोट धरतो नि म्हणतो

  संतत धार झरे 
गढले अंबर जड जलदांनी
 गरजे सागर मदिर उधाणी
 धरिले वादळ वड माडांनी 
भरले खूळ धरे 
तरी हे चित्त पिपासित रे !

निसर्गाची ; समुद्र्-पावसाची अनंत रूपे बोरकरांनी शब्दचित्रित केली आहेत. त्याच्या प्रत्येक रूपावर बोरकर भाळतात. हे त्यांचे प्रेम एक सुंदर कवितानुभव होते..

  थंड आले तीव्र वारे : अत्तराचे की फवारे 
पंखसे व्योमी उडाले मृत्तिकेचे ध्यास सारे;

या पावसाशी एकरूप होत
  पावसाची ही निशाणी खेळवी गात्रांत पाणी,
 पाखरांनी उंच नेली पुष्पपात्रांतील गाणी; 

पावसाची तृप्ती कवी अनुभवतो नि म्हणतो

 शोक सारे श्लोक झाले, रंग सारे चिंब ओले
 तृप्तिचा अंदाज घेती आज माझे श्रांत डोळे 

 ही तृप्ती मन भारून जाते. या कवितांमधल्या पावसातून बळेच मनाला ओढून काढतानाही पावलं कृष्ण्वेड्या गोपींसारखी नाचत गात राहतात..

  सरिंवर सरी आल्या गं
 सचैल गोपी न्हाल्या गं । 
 मल्हाराची जळात धून 
 वीज नाचते अधुनमधून 
वनात गेला मोर भिजून 
गोपी खिळल्या पदी थिजून 
घुमतो पांवा सांग कुठून? 
कृष्ण कसा उमटे न अजून? 
वेली ऋतुमती झाल्या ग 
सरिंवर सरी आल्या ग... 
सरिंवर सरी आल्या ग...
 सरिंवर सरी आल्या ग...

4 comments:

  1. छान सरी आहेत या .. छान लिहिलंय

    ReplyDelete
  2. कित्ती छान! :)

    ReplyDelete
  3. कित्ती छान! :)

    ReplyDelete
  4. किती छान अगं??? इतकं मस्त वाटलं ही पोस्ट वाचताना की सांगूच नाही शकत. दिन बना दिया हमारा... थॅंक्यु!

    ReplyDelete