Monday, 21 November 2016

योशीची मेजवानी

खूप जुन्या काळातली गोष्ट.
येडो नावाच्या शहरात एक पंखेवाला रहायचा. योशी त्याचे नाव. त्याचा शेजारी होता साबु. साबु त्या शहरात त्याच्या खरपूस भाजलेल्या स्वादिष्ट अशा ईल माशांसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या घराभोवती नेहमीच मासे भाजल्याचा सुवास दरवळत रहायचा. पण त्या मानाने ग्राहक मात्र फार कमी येत. त्याची कोळशाची शेगडी असलेली छोटी जागा यायला-जायला जरा अडचणीचीच होती म्हणा ना.
योशीला भाजलेला ईल फार फार आवडायचा. साबुच्या घरातून येणार्‍या वासाने तर त्याची भूक अजूनच चाळवायची. पण ते मासे विकत घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची मात्र त्याची तयारी नव्हती. रोज तो साबुला ईल पागून आणताना, ग्राहकांसाठी भाजताना, शिजवताना बघायचा. सगळे मासे काही संपायचे नाहीत. मग रोज संध्याकाळी उरलेले मासे साबु एकटाच खात बसलेला योशीला दिसायचं.
"ईल भाजणाराने उरलेले मासे शेजार्‍यासोबत वाटून तरी खावेत!" योशी बडबडायचा.
"पंखेवाल्याने शेजार्‍याकडून कधीतरी ते 'विकत'ही घ्यावेत"! तिकडून साबु ओरडायचा.
योशीला मात्र आपल्या तिजोरीतील नाण्यांचा खणखणाट जास्त प्रिय होता. ईल विकत घेण्यासाठी ते खर्च करण्याची त्याचे मुळीच इच्छा नव्हती. त्या ऐवजी तो रोज साधा भात खाऊन ईलच्या वासावर समाधान मानत असे. न्याहारी करताना ईलचा सुगंध, जेवताना ईलचा सुगंध तो श्वासात भरभरून घेत असे. चवीवर खर्च करायचे पैसे सुगंधावर समाधान मानून वाचवत असे.
एक दिवस योशी साबुला म्हणाला,"बरं झालं बाबा, तू फक्त ईलच भाजतोस ते. 'सामा'सारखे दुर्गंधी येणारे मासे भाजले असतेस तर काही खरं नव्हतं! या ईलचा काय सुरेख घमघमाट येतो म्हणून सांगू !!!!"
"तू कधी विकत घेतलेस माझे मासे?" साबु कपाळावर आठ्या पाडत म्हणाला.
"कधीच नाही," योशी उत्तरला. "तुझ्या माशांच्या सुगंधानेच माझे मन तृप्त होते. त्यामुळे मी रोज साधा भातच खातो. आणि माझी तिजोरीही त्यामुळे फुगत राहाते!" "तुझ्या ईलमुळे प्रत्येक जेवणात मी जास्त श्रीमंत होतोय!"
साबु खूप चिडला. म्हणाला, "योशी, तुझ्यामुळेच मी गरीब होतोय. वास घेतलेल्या ईलचे जर तू पैसे दिले असतेस तर मलापण श्रीमंत होता आलं असतं." रागारागाने त्याने एक बिलच तयार केले. ते योशीकडे फेकून तो म्हणाला, "शेजार्‍या, माझ्या ईल माशांच्या सुगंधाचे तू मला एवढे पैसे देणं लागतोस!"
"खरं आहे तुझं" योशी म्हणाला. "मी माझी पैशांची पेटी आणतो हं".
असे म्हणून तो पेटी घेऊन आला. अतिशय काळजीपूर्वक ती पेटी समोर ठेवून त्याने त्यातली सोन्यारुप्याची नाणी मोजून काढली.
"ही बघ तू सांगत असलेली रक्कम!" असे म्हणून ते पैसे साबुला न देता पेटीत टाकत योशीने पेटी हलवली. नाण्यांचा "छन छन छन" आवाज आला. त्याने पेटी अजून हलवली. नाणी वाजू लागली. त्या नादावर योशी साबुच्या मासे भाजण्याच्या शेगडीभोवती गिरक्या घेत नाचू लागला. ते पाहून लोक जमा झाले. योशीच्या नाचण्याला प्रोत्साहन देऊ लागले. योशी अजून नाचू लागला.
"थांबा!" साबु मोठ्याने ओरडला. "मला माझे पैसे हवेत. दे मुकाट्याने!"
आपल्या हातातला पंखा हळूच बिलाला लावत गोड आवाजात योशी म्हणाला, "मित्रा, ते तर तुला मिळालेत. आपली आता बरोबरी झाली. तू मला वास घेण्याचे पैसे लावलेस, मी तुला आवाज ऐकवून ते दिले!"
साबु रागाने लाल झाला. "याची किंमत तुला मोजावी लागेल, योशी!" असे ओरडत तो निघून गेला.
दुसर्‍या दिवशी सकाळी अचानक सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीने योशी हैराण झाला. घराबाहेर येऊन पहातो तो जास्तच घाण वास! साबुच्या शेगडीतून तो वास येत होता.
नाक मुठीत धरून योशी ओरडला, "अरे काय शिजवतोयस तू, साबु? सगळ्या गावात दुर्गंधी पसरली आहे."
"सामा!" थंड आवाजात साबु म्हणाला. "तुला हवा आहे थोडा?"
आता मात्र योशी रागाने लाल झाला. "सामा हा अख्ख्या जपानमध्ये सर्वात घाण वासाचा मासा आहे. माझी भूक अशी दुर्गंधीने मारुन टाकण्याची तुझी हिंमत कशी झाली?" असे तो बडबडू लागला. आता मात्र साबु मंद हसला. "मित्रा, करावे तसे भरावे.." असे म्हणत आपले काम करू लागला.
योशी धावत घरात गेला. दारे, खिडक्या, पडदे बंद करूनही दुर्गंध काही जाईना. न्याहारी करताना, जेवताना तो त्या घाण वासाने हैराण झाला. त्याचे पोट ढवळून आले.
मग योशीला एक कल्पना सुचली. आपलं नाक दाबून धरत तो साबुकडे गेला आणि म्हणाला, "मित्रा, आपल्यात मतभेद आहेत हे मला माहीत आहे. पण आपण त्यावर उपायही शोधू शकतो."
"तो कसा?" साबु ने विचारले.
"तू फक्त ईल मासेच भाज आणि बाकी माझ्यावर सोपवून दे. मग बघत रहा..." योशी म्हणाला.
दुसर्‍या दिवशी योशीने आपला सर्वात सुंदर किमोनो घातला. आणि साबुच्या शेगडीभोवती नाचू-गाऊ लागला.
yoshi (मूळ चित्रः amazon.com वरुन साभार)
"भाजलेला ईल.... छन्नक छन्नक जोरा जोरा भाजका ईल घे रे पोरा... भाजलेला ईल...."

असे गात, टाळ्या वाजवत, हसत नाचू लागला. पुन्हा लोक जमा झाले. टाळ्या वाजवून त्याला साथ देऊ लागले. योशी हसू लागला. स्वतःच ईल असल्याप्रमाणे गिरक्या घेत त्याची पावलं थिरकू लागली. लोक बघत राहिले. भूक लागली की ईल विकत घेऊन खात राहिले.
दिवस संपला तेव्हा योशी आपले जेवण घेऊन बसला. भात आणि हिरवा चहा. तेवढ्यात साबु ईल माशांनी भरलेली अख्खी ताटली घेऊन आला.
"अरिगातो मित्रा! एवढे ग्राहक मिळवून दिल्याबद्दल मी खरंच आभारी आहे." साबु म्हणाला.
"अरिगातो साबु! पण तू माझ्यासोबत जेवायला बसणार असशील तरच मी ही भेट स्वीकारेन." योशी उत्तरला.
मग दोघेही शेजारी सोबत जेवायला बसले. योशीने ईलचा एक घास घेतला आणि डोळे बंद करून समाधानाने हसत म्हणाला, "वाह! आजवर मी चुकीचं बोलत होतो. ईल प्रत्यक्ष खाणं - तेही मित्रासोबत यासारखी सुंदर गोष्ट जगात कोणतीच नाही. नुसता वास यापुढे काहीच नाही."
त्यानंतर रोज योशी साबुच्या शेगडीभोवती आनंदाने नाचायचा. आणि रोज संध्याकाळी योशीच्या अंगणात दोघे शेजारी स्वादिष्ट ईल खात आनंदात गप्पा मारत जेवायचे.
(खूप दिवसांपूर्वी एक इंग्रजी जपानी बालकथा वाचली होती. हा त्या कथेचा स्वैर अनुवाद.)

1 comment: