Sunday, 19 July 2015

मांजरगप्पा २

मांजराची पिल्लं घरात असणं हे काय सुख आहे हे अनुभवल्याशिवाय समजणारच नाही. सकाळी उठलं की ही बाळं दूध मिळेपर्यन्त मागे मागे घरभर फिरत रहायची. दूध पिउन झालं की अचानक एक सुपरवायजर यांच्या अंगात यायचा. भयंकर कुतुहल ! भाजी आणली..आधी यांना बघायची. कणिक मळतेय...यांना एक गोळा खायला द्या, वाणसामान आणलंय्...यांना तपासू द्या. डोळ्यात प्रचंड कुतुहल. पिशवीवर दोन पाय ठेवलेले, सगळं शरीर ताणलेलं, नाक आणि डोळे सगळ्या जगाला विसरून काम करतायत ! वास घेतील, मग पंजाने हळुच स्पर्श करतील,मग जवळ जावून निरीक्षण, मग वास मग यात आपल्या कामाचं काही नाही कळलं की कुतुहलाचं स्विच डोळ्यातून ऑफ करून चालू लागतील. एकदा वाणसामानाची पिशवी घरात ठेवली नि कुठल्याशा कामात गुंतले. त्यात होते तेलाचे पुडे ! नेहमीप्रमाणे या दोघी पिशवीचं निरीक्षण करायला लागल्या. पंजाने स्पर्श करताच तेलाचा पुडा हलला ! झालं ! एकदा हळूच मारून पुडा हलल्यावर दोघींनी अक्षरशः त्याची त्याच्याशी जिवंत प्राणी समजून मारामारीच सुरू केली ! त्यात एक पुडा फुडला. तेलाचा ओघळ खाली आला. यांना तो ही साप वाटला आणि त्याच्यावरही यांनी हल्ला केला ! हे प्रकरण हातात न येता पुढं पुढं जातंय हे बघून दोघी घाबरल्या न पळायला लागल्या. पण पायांना तेल लागल्याने फरशीवरून सटकू लागल्या. मग दिवाण वरची गादी गाठली. आणि प्रचंड भेदरलेल्या नजरेने दोघी मिळून खाली वाहणार्‍या त्या तेलाकडे बघत बसल्या !!!!
मी येऊन बघतेय तर हा प्रताप दिसला ! एवढा राग आला ! नुकसान तर आहेच पण नंतर पसारा तो ही तेलाचा आवरणं !!! मनीमाऊला समोर बसवून जोरदार ओरडले. खूप रागवले. त्यांनी मात्र एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून दुसर्‍या पिशवीशी खेळायला सुरुवात केली...
खाण्यापिण्याची तर मजाच. दुधाने गॅसेस होऊन ओरडायला लागल्या तेव्हा जाणकारांनी सांगितलं कॅटफूड द्या. आणलं. त्याची चव लागल्यापासून अपवाद वगळता एकदाही दुधाकडे ढुंकूनही बघितलं नाही दोघींनी.
आमच्याकडे चार फ्लॅट समोरासमोर आणि चारींना टेरेस गार्डन जवळ्जवळ जोडून अशी रचना आहे. मनीमाऊ या चारही अंगणात खेळायला लागल्या. त्याचा वास येऊन की काय एक दिवस एक भलं मोठं काळं मांजर यांच्यावर हल्ला करायला आलं. मनी थोडी नाजुक. पांढरी असल्याने चटकन दिसणारी. माऊ थोडी गुंड आणि काळी असल्याने लपल्यावर लवकर न दिसणारी. ते मांजर अक्षरशः मनीच्या डोक्यावर मारयचं. मनी घबरून फ्रीज होऊन थांबायची. ओरडायलाही आवाज नाही फुटायचा. माऊ मात्र थेट त्या मांजरावर उडी मारून झुंज द्यायची. ओरडायची. मग आम्ही कोणीतरी जाऊन त्या मांजराला हाकलायचो. पुढे पुढे तर एक बोकाही येऊ लागला. त्याला घाबरून या दोघी सुसाट धावत घरात येऊन दिवाणखाली, कपाटावर, माळ्यावर लपून बसायच्या. हा त्रास एवढा वाढला की आम्ही त्या भटक्या मांजरीला न बोक्याला मारण्याचेही अयशस्वी प्रयत्न केले. शेवटी पिल्लांकडे लक्ष ठेवणं, बाहेर जाताना त्यांना घरात कोंडणं, रात्री झोपायला घरात ठेवणं एवढेच उपाय शक्य आहेत हे समजलं. यात मोठी मदत व्हायची मनीषची. शेजारचा हा दादा खरोखर डोळ्यात तेल घालून पिल्लांना जपायचा. पिल्लं बाहेर असेपर्यंत बाहेर खुर्ची टाकून काम करत बसायचा. हळुहळू पिलांचाही तो लाडका झाला. मनी तर त्याची चुटकी ओळखून असेल तिथून धावत त्याच्यापाशी जायची.दोन्ही मांजरांमुळे आमच्या दोन्ही घरात वेगळेच नाते निर्माण झाले. सुरुवातीला मांजरांना जवळ आली तरी घाबरणार्‍या मनीषच्या आई विभाताई आता त्यांना मांडीवर घेऊन बसू लागल्या ! आम्ही कुठे बाहेर किंवा गावाला जाणार असू तर मांजरांची जबाबदारी विभाताई आनंदाने घेऊ लागल्या. मांजरांच्या दॄष्टीने तर ही दोन घरं वेगवेगळी नाहीतच. दोन्ही घरात त्यांचे लाड होतात हे लक्षात आलं की त्यांनी तिकडेही आपापल्या जागा तयार केल्या.
एखाद्या जागेवर आपली मालकी निर्माण करायची असेल तर मांजरं कान घासून आपला गंध तिथे राहील असे बघतात. आमच्या घरातले भिंतींचे कोपरे,लटकवलेला झोका, कोपर्‍यातले दोन सोफे, ऑफीस टेबल, बाथरूमची दारं अशा सर्व ठिकाणी कान घासून यांनी आपली टेरीटरी निर्माण केली. रात्रभर खेळून दंगा घालणे आणि दिवसभर सुस्तावणे,खाणे आणि झोपणे अशा भयंकर क्लिष्ट दिनचर्येने दोघींच्याही अंगावर जरा मांस चढू लागलं.
दोघींनाही छोट्या मण्यांशी खेळायला भयंकर आवडायचं. मणी किंवा गोटी फरशीवर टाकली आणि उड्या मारत चालली की या दोघी शिकारीला निघायच्या. शिकारीचे सगळे डावपेच आम्हाला बघायला मिळायचे. पडद्यावर चढणे,सतरंजीवर नखे रोवून अंगाची कमान करून डोळे 'शिकारीवर' एकाग्र करून झेप घेणे, पडद्यामागे दबा धरून बसणे, आणि ती शिकार जरा जवळ आली की तोंडात धरून सुसाट धावत घराच्या कुठल्यातरी कोपर्‍यात नेऊन टाकणे असा कार्यक्रम असायचा. हे खेळायची त्यांची वेळ ठरून गेली होती. मग हे मणी हरवायचे. या दोघी अक्षरशः लहान मुलांसारखी भुणभुण लावायच्या. जिथे मणी गेला असेल, मशीन खाली किंवा फ्रिजखाली किंवा गादीत अडकला असेल तिथे जाऊन केविलवाणं तोंड करून ओरडत रहायच्या ! एकदा माझ्या मागे येऊन एकदा त्या जागी जाऊन ! मग तो मणी शोधून दिला की खुशीत खेळ चालू !
दुसरा आवडता खेळ रिकाम्या पिशव्या. एकीने पिशवीत शिरायचं. दुसरीने तिला हुसकून बाहेर काढायचं, मग तिने आत शिरायचं, पहिलीने हुसकायचं ! तासंतास हा खेळही चालायचा.
मांजर उघड्यावर शी शू करत नाहीत हे माहीत होतं.त्यांना त्यांच्या खुणा उघड्यावर ठेवायच्या नसतात म्हणे. इथे फ्लॅट मध्ये काय हा प्रश्न पडला होता. पण या दोघींनी बागेचा एक कोपरा या कार्यासाठी ठरवून घेतला न प्रश्न सुटला. पण बोक्याच्या भितीने जेव्हा या रात्रभर घरात राहू लागल्या तेव्हा एका टोपल्यात माती भरून ते घरात ठेवू लागलो. दोघींनीही आजवर एकदाही घरात इतरत्र घाण केलेली नाही.जमिनीवर असो की टोपल्यात, नीट खड्डा खणून कार्यभाग उरकल्यावर तो पुरून टाकणार ! आणि हो, या दोघींनाही त्यासाठी प्रायवसी लागते :)) त्यावेळी आपण त्यांच्याकडे बघत असू तर मान खाली घालून तिरप्या नजरेनी बघत काही न करता बसून राहतात. आपण दुसरीकडे बघितलं की मग कार्यक्रम उरकतात !
आता त्यांना दाराचा आवाज ओळखू येऊ लागला. आम्ही बाहेरून आलो की दाराच्या दिशेने धावत यायचं नि मग काही वेळ लक्ष वेधून घेणारे चाळे करायचे हे या दोघी आता दोन वर्षाच्या झाल्या तरी करतात. अपेक्षा एवढीच की त्यांना थोपटावं, दोन शब्द बोलावे, वेळ असेल तर खेळावं. एवढं झालं की या बॅक टू वर्क !
जवळजवळ सहा महिने आम्ही एकमेकांशी जुळवून घेत होतो. त्यांच्या प्रत्येक म्यांव चा अर्थ कळू लागला होता. भूक लागल्यावर, शी शू आल्यावर, खाऊ हवा असल्यावर, काही दुखत असेल तर, खेळायचं असेल तर, कोणी एक सापडत नसेल तर हाक मारणारा प्रत्येक आवाज वेगळा.
मांजरांचे स्वभावही वेगवेगळे असतात हे हळुहळू कळू लागले.
मनी नाजूक, नखरेल्,तासंतास स्वता:चा नट्टापट्टा करणं हा तिचा आवडीचा उद्योग. ती फक्त मनीषदादाचंच ऐकायची. केवळ कॅटफूड खायची.ते ही तिच्यासमोर डब्यातून ओतलेलंच. आधीच ताटलीत असेल तर ही तोंड लावणार नाही. तिच्या जागेवर माऊ बसलेलं तिला अजिबात आवडायचं नाही.माऊ काय करतेय, कुठे आहे याच्याशी हिला काही देणंघेणं नाही. आणि प्रचंड भित्री. माऊ तिच्या विरुद्ध. मनी थोडावेळ जरी दिसली नाही की हिच्या हाका सुरू व्हायच्या.ताटलीत असेल त्याचा चट्टामट्टा. ताक, मक्याचे दाणे विशेष प्रिय. कणीस सोलायला बसलं की ही समोर शेपूट हलावत बसून राहणार. नजर कणसाकडे.ते दिल्याशिवाय हलणारच नाही. एकदा पोट भरलं की मग कुठेही ताणून देणार. कोणतीही जागा वर्ज्य नाही. कोणीही मांडी घालून बसलं की ही आधी तिथे. कोण माणूस वगेरे कडे लक्ष न देता मांडीवर अंगाचं मुटकुळं करून क्षणभरात घोरायला लागणार.
मनी तिच्या मनात असेल तरच हाकेला ओ देणार. माऊ मात्र कुठेही असली तरी दोन हाकांमध्ये जवळ येणार किंवा महत्वाच्या कामात गुंतली असेल तर तोंड तरी दाखवून जाणार.
ते दिवस या दोघींनी भरून टाकले होते. कुठेही बाहेर गेलो तरी या दोघींच्या काळजीने नि ओढीने लवकर घरी यायची सवय लागली. कामाच्या यादीत टोपलं साफ करणे, खाणं आणणे,लसीकरण, आजारी असेल तर औषध देणे ही कामेही महत्वाची ठरू लागली.
आणि एक दिवस समजलं..मांजरी वयात आल्या !!!
क्रमशः

2 comments:

 1. ब्लॉग आवडला. संपर्कासाठी तुमचा ईमेल आयडी मिळू शकेल का?

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद !
   माझा ईमेल आयडी mayadd@gmail.com

   Delete