Monday 16 March 2015

मानसिक आरोग्याची बाराखडी २ शिपाई गडी

मागच्या लेखात मानसिक आरोग्य म्हणजे काय याचे अगदी प्राथमिक निकष आपण बघितले. त्या निकषांच्या कसोटीवर आपल्यापैकी कोणीही १०० % खरं उतरणार नाही हे मला माहीत आहे. मग काय आपण सगळेच आजारी ? नाही. अजून काही गोष्टी लक्षात घेऊया.

आपण कसे आहोत ? आनंदी, दु:खी, चिडलेले, उत्साही, हताश हे कशावरून कळतं ? आपल्या वर्तनावरून. वर्तन कोण ठरवतं? आपल्या भावना. भावना कशातून व्यक्त होतात ? विचारांमधून. म्हणजे मला आनंद झालाय म्हणजे हे आनंदाचं रसायन माझ्या मेंदूत तयार झालंय हे कळण्यासाठी एखादा विचार तयार व्हावा लागतो. भावना अव्यक्त असते. विचार तिचं व्यक्त रूप आणि वर्तन तिचं दृश्य स्वरूप. म्हणजे आपलं 'वागणं'; जे मानसिक आरोग्याची कळ आहे, ते म्हणजे विचार-भावना-वर्तनाचं कडबोळं. चक्र. एकातून दुसरं निर्माण होणारी सलग साखळी. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणताना या तीनही गोष्टींचा एकत्रित विचार करूया.

आरोग्य ही संकल्पनाच मुळात अस्थिर आहे. शारीरिक मानसिक बदल हे सतत अगदी प्रत्येक क्षणाला होत असतात. भोवतालचे आणि आपल्यातलेही अनेक घटक या बदलांना कारणीभूत असतात. म्हणून आरोग्य हे घड्याळाच्या लंबकासारखं असतं. ते स्थिर होणं म्हणजे घड्याळ बंद पडणं. हलत राहाणं म्हणजे घड्याळ चालू असणं. म्हणून स्थिर निरामय मनस्थिती हे एक मिथ मानलं जातं. बदल ही एकच गोष्ट शाश्वत आहे. हे बदल आपण कोणीही थांबवू शकत नाही. पण म्हणजे वाहावत जातो असंही नाही. मग आपल्याला मानसिक आरोग्य बिघडलंय किंवा काहीतरी समस्या आहे असं कधी समजायचं? रागाच्या प्रसंगी राग, दु:खी प्रसंगात रडू, आनंदात नाचत सुटणं, भांडणाच्या मुद्द्यात चिडणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. या राग, चिडचिड, चिंता, भय अशा भावना अकारण नेहमीच आणि जास्त काळासाठी निर्माण होत असतिल तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखादी अपायकारक भावना किंवा विचाराची इंटेन्सइटी-फ्रीक्वेन्सी आणि ड्युरेशन जास्त असेल तर प्रॉब्लेम आहे. कधीतरी चिडचिड होते ते ठीक आहे. पण संवादच होऊ शकत नाही एवढ्या तीव्रतेची चिडचिड रोज-सततच होत असेल आणि एकदा चिडचिड झाली की नॉर्मलला यायला खूपच जास्त वेळ लागत असेल तर चिडचिड हा प्रॉब्लेम आहे. सो स्वतःला किंवा इतरांना कोपिष्ट, आक्रस्ताळी, चिडका, भित्रा अशी अनेक लेबलं लावण्या आधी इन्टेन्सिटी फ्रीक्वेन्सी ड्यूरेशन हे सूत्र अवश्य लावून पहा.

आता पुढचा मुद्दा-
आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गानेच आपल्यामध्ये काही यंत्रणा तयार केलेल्या असतात. त्या यंत्रणा आपल्याला या सततच्या बदलांशी जुळवून घ्यायला मदत करत असतात.जात्याच माणूस तसा खुशालचेंडू आणि सुखासीन. या अचानक वाटणार्‍या बदलांशी जुळवून घ्यायला त्याला आवडत नाही. पण त्याशिवाय टिकाव लागणे शक्य नाही. म्हणून आपण या बदलांना अंगभूत यंत्रणांच्या सहाय्याने वळण देत असतो. एका अर्थाने आपला इगो जिवापाड जपणार्‍या या संरक्षक यंत्रणा आपल्यात असतात.
आपल्याला दुखवणारं, न पटणारं, लागणारं काही घडलं की यातली एक यंत्रणा कामाला लागते आणि आपल्याला तोल सावरायला मदत करते. कोणत्या आहेत या यंत्रणा ? खाली काही उदाहरणं देतेय. ती स्वतःच्या संदर्भात तपासून बघणं गमतीदार असणार आहे.
तर एक बाहेरचं मन असतं आणि एक आतलं मन. बाहेरचं मन थोडसं कमकुवत होतंय अशी परिस्थिती निर्माण झाली की आतलं मन कुमक पाठवतं. त्यातले काही शिपाई गडी बघूया- पटकन समजावे म्हणून इंग्रजी नावं (!!!) Wink
१. डिनायल - हा गडी वस्तुस्थिती मान्यच करत नाही.
उदा: जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. ही घटना पचवण्यासाठी सस्पेन्शन चं काम डिनायल करतो.
२.रिप्रेशन - नकोशा आठवणी मनाच्या समुद्राच्या तळाशी खोल खड्डा करून पुरून टाकणं.
बाल लैंगिक शोषण, खून-बलात्कार सारख्या घटना प्रत्यक्ष पाहाणे यात सामान्यतः हा गडी माणसाला उभं करतो. आठवायचंच नाही काही. विसरून जायचं.हे होतं मात्र आपोआप. आपल्या नकळत.
३. सप्रेशन- वरचासारखंच काम पण जाणीवपूर्वक केलेलं.
अतीनिकटच्या व्यक्तीचे अवगुण, त्यामुळे झालेला त्रास. इथे आंधळं प्रेम वरचढ ठरतं. व्यक्त होणं शक्य नसेल त्या भावना, विचार माणूस सप्रेस करतो.
४.डिसप्लेसमेंट - वड्याचं तेल वांग्यावर सारखा प्रकार.
५. रॅशनलायझेशन - खोटं पण लॉजिकली करेक्ट कारण शोधणं.
मोदींच्या कोटाचं उदाहरण आठवतंय Wink
६. कंपेन्सेशन - एखाद्या ठिकाणचं अपयश धुवून काढण्यासाठी दुसरीकडे स्वतःला सिद्ध करणे.
म्हणजे सोपं उदाहरण म्हणजे-- मुलांचे आपल्याकडून होणारे अनावश्यक लाड.
व्यक्तिगत जीवनात अपयशी असणार्‍या व्यक्ती सार्वजनिक जीवनात खूप मोठ्या झालेल्या दिसतात.
७. प्रतिक्रीया - दुसर्‍या टोकाच्या भावना किंवा वर्तन करणे.
८.स्वप्नरंजन - स्वप्नात गुंगत जाणे....वाटेत हरवून राहणे ! शेखचिल्ली !!!
ही लिस्ट खरं खूप मोठी आहे. आपण सगळेच नकोशा विचारांशी भावनांशी लढण्यासाठी असे वेगवेगळे शिपाई गडी बोलवत असतो. ते आपल्या हुकुमाचे ताबेदार असतात.
पण... प्रत्येक वेळी आपल्याला सुखद वाटणारी भावना किंवा विचार हा 'अनुरूप असेलच' असे नाही. योग्य असेलच असे नाही. आपल्या वागण्याला विवेकाच्या कसोटीवर घासता यावे म्हणून थोडक्यात परिचय करून दिला.
पुढच्या भागात भावनांविषयी बोलू.

No comments:

Post a Comment